Featured Books
श्रेणी
शेयर करा

५. तारकर्ली - मस्त समुद्र किनारा, लख्ख सूर्यप्रकाश आणि वॉटर स्पोर्ट्स..

५. तारकर्ली - मस्त समुद्र किनारा, लख्ख सूर्यप्रकाश आणि वॉटर स्पोर्ट्स..

विस्तीर्ण पसरलेला समुद्रकिनारा, पायांना कोमल स्पर्श करणारी मऊ वाळू, कोवळे उन. स्वर्ग यापेक्षा काही वेगळा असेल? तारकर्ली किनारा असाच अनुभव देतो. तारकर्ली किनार्‍यावर गेल्यानंतर या स्वर्गाचा अनुभव येते. अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा, बांबूची, सुपारीची झाडे पाहून मन प्रसन्न होते. इथले समुद्र किनारे इतके स्वच्छ आणि नितळ आहेत की पाण्यातील सौंदर्य डोळ्यांनी पाहता येते. समुद्र किनारे नेहमीच माणसाला खुणावत असतात. भारतात तसे बरेच प्रसिद्ध समुद्र किनारे आहेत आणि महाराष्ट्रा मधील अत्यंत प्रसिद्ध किनारा हा तारकर्लीचा आहे.

तारकर्ली महाराष्ट्राचे मॉरीशास म्हणून ओळखले जाते. मालवणपासून अवघ्या ७ कि.मी. अंतरावर अतिशय स्वच्छ व सुंदर असा समुद्रकिनारा आणि खाडी ह्यांच्या अनोख्या संगमातून तयार झालेले अद्भूत सौंदर्य तारकर्ली येथे पाहण्यास मिळते. विस्तीर्ण पसरलेला समुद्रकिनारा, पायांना कोमल स्पर्श करणारी मऊ वाळू, कोवळे ऊन ही ह्या किनाऱ्याची खासियत! तीरावरील नारळी पोफळीची हिरवीगार नयनरम्या दौलत, सुर्यास्त् आणि सूर्योदय या दोन्हींचे अनोखे सौंदर्य पहायचे असेल तर तारकर्ली सारखी जागा नाही. अप्रतिम स्थळ म्हणून तारकर्ली प्रसिद्ध आहे. इथे निसर्गाने जणू सौंदर्य उधळले आहे. येथे थांबून निसर्गाचा आनंद घेण्यासाठी रिसॉर्ट आपल्या सेवेत हजर आहेत. येथील समुद्र किनारे एवढे नितळ, स्वच्छ आहेत की पाण्यातील सौदर्य अगदी साध्या डोळ्यांनी न्याहाळता येते. निळेशार पाणी आणि क्षितिजापर्यंत पसरलेला किनारा रोजच्या ताणतणावापासून दूर ठेवतो. मनाला शांत करतो. गर्दीपासून दूर शांत, निवांत क्षण घालवण्यासाठी हे ठिकाण नक्की भेट देण्यासारखे आहे. तंबूत निवास, नावेतून सफर व स्कूबा डायव्हिंगचा अनुभवदेखील येथे घेता येतो. वॉटर स्पोर्ट्स आवडणाऱ्या लोकांसाठी तर तारकर्ली उत्तम ठिकाण आहे. तिथे वॉटर स्पोर्ट्स ची मजा अनुभवता येते. रोजच्या आयुष्यापासून शांत निवांत आपल्या कुटुंबासमवेत आपण सुंदर वेळ तारकर्ली ला घालवू शकतो. एमटीडीसीने तारकर्लीला प्रसिद्धी मिळवून देण्यात विशेष हातभार लावलाय.. गर्दीपासून दूर शांत, निवांत क्षण घालवण्यासाठी हे ठिकाण नक्की भेट देण्यासारखे आहे. इथे फक्त समुद्र किनारा नाही तर बरीच ठिकाणे आहेत जिथे जाता येऊ शकते. आणि खवय्यांसाठी तर इथे पर्वणीच असते. विविध प्रकारचे मासे हे इथलं आकर्षण!

* तारकर्ली जवळची ठिकाणे-

१. सिंधुदुर्ग किल्ला-

महाराष्ट्र किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहेच. ज्या पर्यटकांना इतिहास खुणावत असतो आणि ज्यांचे शिवाजी महाराज विशेष आवडते आहेत त्यांना भेट देण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ला आहे. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणजवळ अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या ५२ व ४५ दगडी जिने आहेत. ह्या किल्ल्यावर शिवकालिन ३ गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत.त्यांची नावे दूध विहीर,साखर विहीर व दही विहीर अशी आहेत. या किल्ल्यामध्ये महाराष्टातील एकमेव शिवाजी महाराजांचे शंकराच्या रुपातील मंदीर आहे. याची स्थापना ‍राजाराम महाराजांनी केली होती. इथे जाण्यासाठी नाव किंवा फेरी उपलब्ध आहे. इथे गेल्यावर शिवाजी महाराजांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

२. धामापूर लेक-

मालवण तालूक्यातील धामापूर हे एक रमणीय ठिकाण आहे. सदैव हिरवीगार असणारी घनदाट वृक्षराजी, माड पोफळीची दौलत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दुतर्फा डोंगराच्याच मधोमध असलेला ऐतिहासिक धामापूर तलाव यामुळे धामापूर हे उत्कृष्ठ पर्यटन केंद्र बनले आहे. या ऐतिहासिक धामापूर तलावाच्या काठावर श्रीभगवतीचे प्राचीन देवालय आहे. आत भगवतीची मुर्ती आहे जी खूप सुबक आहे. ५ एकर क्षेत्रात पसरलेल्या विस्तीर्ण तलावाचा जलाशय अत्यंत नितळ आणि स्वच्छ आहे. इथे नौकाविहार उपलब्ध आहे. आणि नौका विहार करण्याची इच्छा नक्कीच जागृत होते.

३. आंबोली-

आंबोली नेहमीच पर्यटकांच आवडत ठिकाण आहे. बेळगांव आणि गोव्याला जोडणारा रस्ता म्हणजेच आंबोलीचा घाट. पर्यटकांना सतत आव्हान देणारे असे हे आंबोली सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे. आंबोली घाटातून प्रवास करताना निसर्ग पर्यटनाचा आनंद पर्यटक मनमुराद घेत असतात. आकाशाशी स्पर्धा करणार्‍या टेकड्या, बाराही महिने हिरव्यागार असणार्‍या दर्‍या. पावसाळ्याच्या दिवसात तर या दर्‍या अधिकच सुंदर दिसतात. इथे निसर्ग नेहमीच डोळ्यांना सुख देत राहतो. सिंधुदुर्गातील आंबोली गाव समुद्र सपाटीपासून 690 मीटर उंचीवर असलेले थंड हवेचे ठिकाण आहे. तत्कालीन सावंतवाडी संस्थानाची ही उन्हाळ्यातील राजधानी. या आंबोलीमध्ये अजुनही आपणास संस्थानकालीन भव्य इमारती पहावयास मिळतात. महात्मा गांधी काही काळ या ठिकाणी वास्तव्य करुन शिरोडा येथील मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी याच आंबोली घाटातून मार्गस्त झाले होते, असा इतिहास आहे. पावसाळ्यात तसेच जोडून येणार्‍या सुट्टीला येथे पर्यटकांचा ओघ सुरु असतो. दाट जंगले, दर्‍या खोर्‍यांचा नयनरम्य देखावा असे अमर्याद सृष्टीसौंदर्य येथून पाहता येते आणि घनदाट जंगलातून मनमुराद भटकंती करण्याचा आनंद पर्यटकांना घेता येतो.

आंबोली पासून जवळच असलेल्या निसर्गरम्य अशा चौकुळच्या जंगलात गवे, हरिण, भेकरे, बिबट्या, ससे, रान मांजरे असे वन्य प्राणी वास्तव्य करुन आहेत. शिवाय असंख्य प्रकारच्या वनौषधी या ठिकाणी सापडतात. नुकत्याच चौकुळ येथील परिसरात 35 ते 40 लहान मोठ्या गुहा आढळून आल्या आहेत. काही गुहा तर अतिशय भव्य आहेत. जंगल पर्यटनाची आवड असलेल्या पर्यटकांना या गुहा साद घालतात. चौकुळ हे गाव गर्द वनराईने नटलेले असून, जैविक विविधता या ठिकाणी आढळून येते.

असे हे आंबोली आता उत्कृष्ट पर्यटन स्थळ म्हणून विकसित झालेले असून, दरवर्षी हजारो पर्यटक येथे येत असतात. पावसाळ्यात तर फेसाळणार्‍या शुभ्र अशा धबधब्याखाली स्नानाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडालेली असते. आंबोली येथील महादेव गड, कावळे साद, शिरगांवकर, नट, सावित्री, सनसेट असे असंख्य पॉईन्ट अहेत. हिरण्यकेशी नदीचा उगम येथूनच होतो. महाशिवरात्रीस तर भाविकांचा ओघ येथे वाहत असतो. असे हे आंबोली सर्वच ऋतुत आल्हाददायक आणि हवेहवेसे वाटणारे आहे.

४. भोगवे समुद्र किनारा-

अथांग समुद्र... निळशारं पाणी... पांढरी वाळू... कमालीची स्वच्छता..आणि शांतता... भोगवे बीचच्या प्रेमात पडायला ही दृष्यं पुरेशी आहेत. वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे येथील समुद्रकिनाराही विलोभनीय आहे. भोगवेचा किनारा हा महाराष्ट्रातल्या बीचेसचा राजा म्हणल्यास वावगं ठरणार नाही. भोगवे गावाला कर्ली नदी व समुद्र यांचा संगम पाहायला मिळतो, हे आगळे वेगळे वैशिष्टय आहे. लांबच्या लांब पसरलेली पांढर्‍या शुभ्र व स्वच्छ वाळूची चौपाटी आणि किनार्‍यावरील माड पोफळीच्या बागा यांमुळे या समुद्रकिनार्‍यावरील निसर्गसौंदर्य अधिक देखणे बनले आहे. कोचरे गावाच्या हद्दीत भोगवे समुद्र किनार्‍यालगतच्या एका टेकडीवर रम्य समुद्रकिनार्‍यावरच ऐतिहासिक निवती किल्ला हा छत्रपती शिवाजीमहाराजांनी बांधलला छोटासा किल्ला आहे. निवती किल्ल्यावरुन भोगवेची मनमोहक, रम्य चौपाटी अप्रतिम दिसते. निवतीच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात अणि जवळून 'डॉल्फिन' माशाच्या झुंडी पाहाता येतात. डॉल्फिनचे नृत्य पाहाण्याचा आनंदही अनुभवता येतो. होड्यांमधून समुद्र सफर करत 'डॉल्फिन' पाहाता येतात. हे डॉल्फिन मोठ्या संख्येने येथे पाण्यावर येतात. उंच उड्या मारत जलविहार करणारे डॉल्फिन पाहाणे पर्यटकांसाठी पर्वणीच ठरते. पर्यटकांना आवश्यक त्या सुविधा असणारे बीच रिसॉर्टही येथे आहे. जगभरातल्या सर्वोत्कृष्ट बीचेससाठी दिल्या जाणाऱ्या 'ब्लू फ्लॅग' मानांकनासाठी निवड झालेला हा महाराष्ट्रातला एकमेव किनारा आहे. म्हणजेच ह्या किनाऱ्याला एकदा तरी भेट ही दिलीच पाहिजे.

५. निवती समुद्र किनारा-

कुडाळपासून साधारण २५ किमी वर निवतीचा किनारा आहे. कुडाळ- पाट-म्हापण-निवती असा प्रवास आहे. खाडीच्या दक्षिणेकडे निवती बंदर आणि उत्तरेकडे श्रीरामवाडी. निवतीला विजयालक्ष्मी पंडितांचे घर आणि आंब्याची विस्तीर्ण बाग आहे. निवतीच्या पूर्व-दक्षिण समुद्र किनारा पसरलेला आहे. सकाळी आकाश निरभ्र असेल तर सुर्योदयाचे फोटो छान मिळतात. निसर्गाचा फोटो शूट करण्यासाठी ही जागा उत्तम आहे. गावाच्या पश्चिमेस निवती किल्ला समुद्रात पाय पसरून उभा आहे. किल्लयावर पडके बुरूज, खंदक आणि बऱ्यापैकी झाडी आहे. क्वचित मोर आणि जंगली प्राणीही दिसतात. भोगव्याच्या बाजूने थोडीशी दमछाक करणारी चढण आहे. किल्ल्यावरून भोगव्याचा किनारा अत्यंत सुंदर दिसतो. तासन तास इथून जाऊ नये असे वाटते. संध्याकाळी सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य दिसते. भोगवे-निवती किल्ला-निवती गाव व त्यापुढील किनारा असे चालत गेल्यास एक दिवसाची छान सहल होते. साहसाचाही आनंद मिळतो. किनाऱ्यावर खडकामध्ये अनेक समुद्री जीव आढळतात. कुडाळ-पाट-परूळे-भोगवे असेही जाता येते. आणि भोगव्याच्या किनाऱ्यावरून निवती किल्ल्यावर चढता येते. पाट येथे गावतळयामध्ये वेगवेगळया रंगाची कमळे आहेत. या विस्तीर्ण तळयाच्या पश्चिमेस दलदलीच्या ठिकाणी अनेक प्रकारचे पक्षी नेहमी दिसतात. निवतीच्या समुद्रात मोठ्या प्रमाणात अणि जवळून 'डॉल्फिन' माशाच्या झुंडी पाहाता येतात. हे डॉल्फिन मोठ्या संख्येने येथे पाण्यावर येतात. आपल्या महाराष्ट्रात इतक सुंदर ठिकाण आहे जे नक्की मिस करू नका.

६. सावंतवाडी-

महाराष्ट्र आणि गोवा यां दोन राज्यांच्या सीमेवर वसलेलं एक सुंदर शहर आहे. अमाप निसर्गसौंदर्याने नटलेल्या काही मोजक्या आणि ऐतिहासिक शहरांमध्ये सावंतवाडीचं नाव आवर्जून घेतलं जातं. सावंतवाडीचं पूर्वाश्रमीचं नाव सुंदरवाडी असं होतं. त्यानंतर इथल्या संस्थानिकांच्या नावानुसार या शहराचे सावंतवाडी असे नामकरण करण्यात आले. सावंतवाडीचं निसर्गवैभव पाहता आजही सुंदरवाडी या नावाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कोकण म्हटलं कि डोळ्यासमोर येतो निळाशार समुद्र.निसर्गाची अद्भुत अदाकारी म्हणजे निलवर्णी समुद्र,जो कोकणची शान आहे. पण कोकणचा महत्त्वाचा घटक असूनही सावंतवाडी मध्ये समुद्र नाही. सावंतवाडी शहरालाच काय तालुक्यात देखील समुद्र किनारा नाही पण समुद्राच्या अभावामुळे शहराच्या लौकिकात जराही उणीव भासत नाही. समुद्र नसला तरीही समुद्रास तोडीस तोड असा मोती तलाव आपल्या सावंतवाडीमध्येच आहे. सावंतवाडीचं धडधडंतं हृदय अशी मोती तलावाची ओळख जगभर प्रसिद्ध आहे. संस्थानकाळात निर्मिलेल्या या तलावाने केवळ आपल्या अस्तित्वाने सावंतवाडीची वेगळीच अस्मिता निर्माण केली आहे.

अश्या निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या तारकर्ली आणि तारकर्ली जवळच्या ठिकाणांना नक्की भेट द्या आणि सुट्टीचा आनंद घ्या.