katusaty books and stories free download online pdf in Marathi

कटुसत्य

कटुसत्य

काही कामानिमित्त मी काळेवाडी तील पाचपीर चौकात गेले होते. तेथील देवीच्या मंदिराशेजारी थोडीशी गर्दी जमा झाली होती. आजुबाजुला चौकशी केल्यावर कळलं की एक व्यक्ती सकाळी १० वाजल्यापासुन मंदिरासमोर पिऊन पालथा पडला होता. आणि आत्ता ४ वाजता तो सरळ झाला. हे ऐकुन त्या मी त्या गर्दी कडे जाणार तोच एक ओळखीच्या काकू भेटल्या आणि सांगायला सुरुवात केली , " आहो तो माणुस मेलाय. सक्काळी १० वाजल्यापासुन पालथा पडुन होता. आत्ता सरळ झालाय. त्याच्या चेहऱ्यावर खुप माश्या बसल्यात. सगळ्यांना वाटलं दारु पिऊन पडलाय म्हणुन कुणी लक्षच दिल नाही. आत्ता सरळ झाल्यावर लोकांनी बघीतल . अंगावर चांगले इस्त्री केलेले कपडे आहेत. हातात टिफीनची पिशवीपन आहे. बहुतेक कामावर जात होता. " हे ऐकुन आम्ही सर्व गर्दी कडे निघालो. तोपर्यंत खुप गर्दी वाढली होती. पण त्या गर्दी तील एकही व्यक्ती त्या माणसाला ओळखत नव्हती .

आम्ही जाताना अचानक एक मुलगा स्कुटीवर आला आणि मला विचारल काय झालयं ? त्याला झालेला प्रकार सांगितला . तो ही आमच्या सोबत गर्दीत आला आणि त्या माणसाला पाहुन ओरडला , ' पेठेकर काका.. ? अहो इथच पुढच्या गल्लीत राहतात. सकाळीच भेटले होते, आँफिसला जाताना. अरे देवा.. मी मी त्यांच्या घरच्यांना घेवुन येतो ' म्हणत तो स्कुटीला किक मारुन निघुन गेला.

हा माणुस १० वाजता आँफिसला जाण्यासाठी पायी निघाला होता. देवीचे दर्शन घेवुन निघताना त्याला अटँक आला आणि तो जाग्यावरच कोसळला. तो ही पालथा. कोसळताना त्याला कोणीही पाहील नाही .. हा मोठा गुढ प्रश्न आहे. देऊळात बरीच गर्दी असते. कुठल्याही भक्ताने त्याला पाहील नाही हे ही नवलच. चार पावलांवर फेमस वडापाव चा गाडा होता , त्या वडापाव वाल्याने किंवा खाणार्या लोकांनीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही. खुप रहदारीचा रस्ता आहे तो , तरीही कोणीही पाहण्याची तसदी घेतली नाही. सर्वांची समजुत अशी होती की , ' तो दारु पिऊन पडला आहे '. विशेष म्हणजे एक ते दोन मिनीटाच्या अंतरावर पोलिस चौकी आहे, कोणीतरी पोलिसांना फोन केला होता तरीही पोलिस एकदाही फिरकले नाहीत असे तेथील जमाव बोलत होता . १० ते ४ पर्यत त्या व्यक्ती मध्ये जीव होता. ४ वाजता त्याला दुसरा अटँक आला आणि तो सरळ होऊन पडला. आणि जीव गेला. अर्ध्या तासाने माश्या त्याच्या तोंडावर बसायला लागल्या , तेव्हा लोकांनी जवळ जावून बघायला सुरुवात केली. गर्दी जमायला लागली होती. तेवढ्यात त्याची पत्नी , मुलगा आणि भाऊ आले. सर्वांनी एकच टाहो फोडला. कोणीतरी अँम्ब्युलन्स ला फोन केला. त्याच्या बायकोचे वाक्य आणि रडणे काळीज पिळवटणारे होते. शेवटी अँम्ब्युलन्स आली आणि त्यांना घेवुन गेली .

माझ्या मनात विचारांचे झुंड मनाला पोखरुन वारुळ बनवत होते. लहानपणी गावाकडे पाहीले आहे , एखादा गावातील माणुस तालुक्याच्या ठिकाणी पिऊन पडलेला असतो आणि गावातील दुसरी व्यक्ती त्या पिदाड्याला गाडीवर घेऊन येतो. त्याच्या घरी सोडतो आणि वर तोर्यात बोलतो , " वैनी पप्याचा बाप पिऊन पडला होता बसस्टँड च्या मुतारीजवळ . म्हणल आपल्या गावचा माणुस हाय म्हणुन गाडीवर घालुन घिवुन आलो. लक्ष द्या त्याच्याकडं ."

एक क्षण वाटलं हा व्यक्ती गावाकडे असता तर वाचला असता का ? लोकांनी ओळखल असत का ? पुढच्या गल्लीत राहणारा माणुस पण एवढ्या वेळात त्याला कोणीही ओळखल नव्हत. ओळखल असत तर वाचला असता का ?

दारु पिदाड्या लोकांमुळे आज एका गरजुला मदत मिळाली नव्हती का ? पुढच्याच गल्लीत राहणाऱ्या व्यक्तीला कोणीच कसकाय ओळखल नसेल ? तो व्यक्ती आँफिस ते घर.. घर ते आँफिस एवढच आयुष्य जगत असेल का ? जर तो रोज जाताना कौणाला तरी स्माईल , हाय बाय करत असता तर ? छे छे आजच्या धक्काबुक्कीच्या फास्ट आणि गर्दी च्या आयुष्यात हे कस शक्य आहे ? खरच आपण एवढे असंवेदनशिल झालो आहोत का ?

आँफिस आणि फ्लॅट नावाच्या डब्यात आपण एवढे गुरफटलोय का , की त्या दोघांना जोडणारा रस्ता सोडुन इतरत्र जाणाऱ्या असंख्य रस्त्यांकडे आपण कधीच ढुंकुनही फिरकत नाही. आपल्याच शहरातील अगणीत पायवाटांची धूळ ही आपल्या पायाला लागलेली नसते . आपणच बकाल वाढवलेल्या शहरातील अनेक गल्ल्या , इमारती , सोसायटी अंतराने जवळ असुनही अनोळखी असतात. ट्रिपसाठी सतत नविन लोकेशन्स शोधणारे आपण, आधी आपल्याच सोसायटीचा , एरियाचा प्रत्येक कोपरा हिंडुन पालथा घालावा अगदी पायाचे तुकडे पडेस्तोर .. अस का वाटत नाही आपल्याला? फ्लॅट ची दार २४ तास बंद करुन जगणारे आपण.. समोरच्या फ्लॅट मध्ये कोण राहत हे कळायलाही आपल्याला वर्ष दोन वर्ष लागतात. खरच आपण राहतो तो भाग इतका सामान्य आणि जुनकट असतो का ? उद्या कदाचित आपल्यापैकी कोणीही शहराच्या कुठल्यातरी कोपऱ्यात मरुन पडलेले असेल आणि ओळखणार कोणीही नसेल. किती विदारक दु:ख , आणि कटुसत्य आहे हे.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED