शेपुची भाजी Sadhana v. kaspate द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

शेपुची भाजी

शेपुची भाजी

भुकेने व्याकुळ ' केरबा ' जेवणाची वाट बघत बसला आहे. थोड अंतर सोडुन त्याचा मुलगा ' गोट्या ' अभ्यास करत बसला आहे. तेवढ्यात केरबाची बायको ' द्रोपदी' उर्फ ' धुरपा ' , जेवणाच ताट वाढुन केरबाच्या समोर ठेवते. ताटातील शेपुची भाजी बघुन केरबा संतापतो.

केरबा - धुरपे , शेपुची भाजी आवडत नाही हे माहित असुनही का वाढतेस गं ?

धुरपा( थोड लाजुन) - अहो पण मला आवडते ना..

केरबा - तुला आवडते म्हणुन मी का खायची ?

स्वतः चीच तारीफ करत ,

धुरपा - माझ्या हातची भाजी खावुन लोक बोटं चोखत बसतात..तुम्हाला कौतुकच नाही.

हलक्या रागाने तोंड वाकड करते.

केरबा - हे बघ मी शेपु खाणार नाही. मागे तुझ्या आग्रहास्तव एकदा खाल्ली होती पण माझ्या दाताच्या कँपमध्ये ती अडकुन बसली आणि किती ञास झाला..चार दिवस दात सलत होता.

धुरपा ( मस्करीत ) - जेवताना कँप काढुन ठेवत जा...

केरबा ( टोमन्याच्या सुरात ) - ती काय तुझ्या वडिलांची कवळी नव्हे वाट्टेल तेव्हा काढायला आणि घालायला..

धुरपा - बायकोसाठी तुम्ही साधी शेपुची भाजी खावु शकत नाही ?

थोडस चिडुन केरबा बोलतो.

केरबा - नाही.. बायकोसाठीच काय कुणासाठीच मी शेपु खावु शकत नाही. त्या भाजीचा नुसता शेणासारखा वास येतो. दिवसभर करपट ढेकरं..अस वाटत गोठ्यात बसलोय..!

धुरपा (चिडुन) - बरोबर बोलतात... आईच्या शब्दावर मान हलवणारा नंदिबैलच तुम्ही.. म्हणुन गोठ्यात बसल्यासारख वाटत.

नवरा - हो.. मी बैल तु कोण ? म्हैस ? तुझ्या माहेरची माणसं.........

माहेर हा शब्द ऐकताच धुरपा पेटुन उठते.

धुरपा - हिम्मतच कशी झाली माहेरच्या माणसांना मध्ये घेण्याची? जे बोलायचय ते मला बोला. माहेरच्यांचा उद्धार करायची गरज नाही.

केरबा - हिंग आश्शी.... आता कशा मिर्च्या झोंबल्या ?माझ्या आईला कशाला मध्ये घेतल होतस?

ईतकावेळ त्यांच शेपुपुराण बघणारा गोट्या खुदकन हसला.

केरबा - ये डुचक्या.. गपचुप अभ्यास कर. पुन्हा हसलास तर फटकेच खाशील.

धुरपा - खबरदार माझ्या मुलाला डुचक्या म्हणाल तर..

केरबा(चेष्टेने) - पांडुरंगा काय ऐकतोय हे.. हे पोरग माझ नाही ? फक्त तिचच आहे ?

धुरपा - घ्या तुम्ही शंकाच घ्या.. दुसर येतय काय ? पण देवाने हे दोन बटाट्यासारखे डोळे अन भुसा भरलेल डोक दिलय ना ते तरी वापरायच...

रागाने गोट्याचा चेहरा हातात घेत , गरकन त्याची मान नवर्याकडे करत बोलते.

धुरपा - दिसत नाहीत का हे झुरळासारखे डोळे , फुटभर उंची..हुबेहुब बापावर गेलाय डुचका कुठला..

(गोट्याचा चेहरा रागाने झिडकारत ) आईचा एकतरी चांगला गुण घ्यायचा.

केरबा( आश्चर्याने ) - पण आत्ताच तर माझे डोळे बटाट्यासारखे म्हणालीस ?

गोट्या परत हसतो.

केरबा - आणि काय गं.. तु डुचका म्हणालीस तर चालत आणि मी म्हणटलेल चालत नाही.

धुरपा - स्वतः दोन फुटाची लुंगी नेसणार्याने तरी माझ्या पोराला डुचक्या म्हणु नये..

नवर्याचा अंहकार दुःखावतो.जेवणाच ताट बाजुला सारून ताडकन् उभा राहतो. पांढऱ्या बनियान वर हात आपटत , नसलेली छाती फुगवुन , निळी रेघा रेघांची लुंगी डाव्या हाताने वर करत , जणु काही लढायला जातोय या आवेशात बायकोकडे डोळे मोठे करुन बघु लागतो. बायकोही डरकाळी फोडलेल्या वाघाप्रमाणे , ताटच कस भिरकावलत ,बघतेच तुम्हाला या भावनेने पदर कंबरेला खोवत समोर उभी राहते. ४.५ फुट उंचीचा नवरा , समोर ५.५ फुट उंचीची बायको. जणुकाही मांजरासमोर उंदिर उभा असल्यासारखे वाटते. उंची कमी असल्याचा एकच फायदा केरबाला होता , तो म्हणजे भांडताना बायकोसमोर मान आणि डोळे वर करुन बोलणे.

धुरपा - डोळे आणि मान खाली करा..माझ्यावर रुबाब झाडताय थांबा दाखवतेच..

म्हणत ती काहीतरी शोधु लागते.

केरबा (स्वतः शीच ) - अरे देवा.. माझ्या पांढऱ्याशुभ्र पटलांवरील काळे काळे गुळगुळीत चंचल बुबुळे फोडण्यासाठी ही सुया तर शोधत नाही ना ?

हा विचार करुनच चार पाच वेळा डोळे मिचमिच करतो आणि आवरत घेण्यासाठी बोलतो.

केरबा (प्रेमाने) - अगं राणी.....

राणी हा शब्द ऐकताच...संतापाची भयंकर लाट ऊसळते.

धुरपा - राणी ? या क्षणी सुद्धा त्या शेजारच्या सटवीच नाव सुचतय तुम्हाला ? हे ऐकण्याआधी कान का फुटले नाहीत माझे ?

नवरा - अगं बाई तस नव्हत म्हणायच....

धुरपा(रागाने) - बा..ई ? बाई म्हणायच नाही.

दुःखी होत.

धुरपा - मी तुम्हाला बाई वाटते का ? फक्त २९ वर्षाची आहे हो मी. लवकर लग्न झाल म्हणुन हे १० वर्षाच पोरग झालं.

केरबा - बरं बाई.. एवढ्याशा बाई या शब्दासाठी एवढी मोठी बाई (हाताने आकार दाखवत) रडते शोभत का हे ? बाई नाही म्हणणार..पण बाई सोडुन काय म्हणु ते तरी सांग बाई !

आता माञ बायको रागाने बेलन उचलते. आता डोक फुटणार म्हणुन हातांनी डोक्याचा बचाव करण्यासाठी केरबा कुंगफु ची पोझ घेतो. तर गोट्या आता विनोदी भाषणासोबत विनोदी प्रात्यक्षिक ही बघायला मिळणार म्हणुन टाळ्या वाजवण्याच्या अतिउत्साही तयारीत...तेवढयात दारावरची बेल वाजते. सगळीकडे भयाण शांतता. गोट्या दुःखाने दरवाजा उघडतो. केरबा सुटकेचा निश्वास सोडतो. दारात शेजारची ढमी उभी असते.

ढमी - काकु आईन शेपुची भाजी सांगितलीय....

भयाण सन्नाटा...तिघेही ऐकमेकांकडे बघतात. धुरपा बेलण्याची मुठ आवळते.

केरबा(स्वतः शीच) - सत्यानाश....आगीत तेल...आता राञीच जेवण सुद्धा मिळणार नाही. शेजारच्या बायकांना पण हिच्या भाजीच कौतुक! चला राजे चला..

म्हणत आतल्या खोलीत निघुन जातो. धुरपा आणि गोट्या बेभान हसत सुटतात. ढमीला काहीही माहित नसत तरी ती यांच्यासोबत हसते. ढमीला विनाकारण हसताना बघुन ते दोघे पुन्हा हसु लागतात.

- साधना वालचंद कस्पटे ©