करुणादेवी - 12 Sane Guruji द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

करुणादेवी - 12

करुणादेवी

पांडुरंग सदाशिव साने

१२. राजाकडून सत्कार

शिरीषने राजा यशोधरास सर्व वार्ता निवेदिली. करुणेची कथा ऐकून राजा कृतार्थ झाला. तो म्हणाला, ‘शिरीष, तुम्ही धन्य आहात. भूमातेची जिच्यावर कृपा, अशी पत्नी तुम्हास मिळाली आहे. कसे कर्तव्यपालन, किती निश्चय, कसे पातिव्रत्य ! शिरीष, करुणादेवीचा मी सत्कार करीन. माझ्या राज्यात अशी रत्ने आहेत, हीच राज्याची शोभा. अशी पवित्र सुंदर जीवनेच समाजाला सांभाळतात, मार्ग दर्शवितात.’ करुणादेवीची मला पूजा करु दे. पूज्याची पूजा जर केली नाही तर कल्याण होत नाही.

शिरीष निघून गेला. राजा यशोधराने एक दिवस ठरविला. त्या दिवशी मोठा समारंभ झाला. एका बाजूस हजारो नारी बसल्या होत्या. एका बाजूला हजारो पुरुष होते. सारे जुने नवे प्रधान होते. अधिकारी होते. राजघराण्यातील सर्व मंडळी होती. विद्यापीठातील आचार्य होते. राजधानीतील सर्व मंडळी होती.

राजा यशोधराने करुणादेवीस आसनावर बसविले. त्याने तिचा सत्कार केला. तिला बहुमोल वस्त्रेभूषणे दिली. राजाने भक्तिप्रेमाने करुणेच्या चरणास वंदन केले. त्या वेळेस टाळ्यांचा कडकडाट झाला. ‘साधू साधू’ असे जयध्वनी झाले. राजाने करुणेची दिव्य कथा आपल्या प्रासादिक वाणीने सांगितले. कर्तव्यपालनाचा दिव्य महिमा त्याने वर्णिला. करुणेने सासूसास-यांची सेवा कशी केली, त्यांच्या समाध्या कशा बांधल्या, पतीसाठी शेकडो कोस चालत ती कशी आली, ते सारे सांगितले. त्याने हेमाचीही स्तुती केली. सवतीमत्सर तिला कसा नाही ते त्याने वर्णिले. आदित्यनारायण व शिरीष ह्यांनी आपली कौटुंबिक दुःखे मनातच ठेवून, कौटुंबिक अडचणी दूर ठेवून प्रजेच्या कल्याणार्थ कसे तनमनधन दिले, सारे सारे त्याने वर्णन केले. ‘प्रत्येक जण जर नियुक्त कर्तव्य नीट पार पाडील, तर जशी भूमाता करुणेला प्रसन्न झाली, तशी तुम्हाआम्हासही ती होईल,’ असे तो म्हणाला.

राजा यशोधराचे भाषण झाले आणि करुणा काय बोलणार ! ती नुसती उभी राहिली. तिने वाकून सर्वांना नमस्कार केला. सर्वांनी तिला केला.

समारंभ संपला. हेमा व करुणा ह्यांसहवर्तमान रथात बसून शिरीष घरी आला.