अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 13 Suraj Gatade द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 13

रात्रीची ९:१७ ची वेळ. पार्क रिकामे होते. बाबाराव पार्कच्या मध्यभागी घनदाट झाडीत कोणाची तरी वाट बघत थंडगार बाकावर बसले होते...
                 थोड्या वेळाने एक व्यक्ती तेथे आली. झाडी पार करून एक मंद प्रकाश झोत त्या व्यक्तीवर पडला.
       "आलात तुम्ही विजय वाघ!" 
                बाबारावांनी वर पाहत तो मिस्टर वाघ असल्याची खात्री करून घेण्यासाठी विचारले.
      "होय सर. मीच आहे! बोला ना काय काम होतं?"
      "मी तुमचं खूप नांव ऐकून आहे. सामाजिक कार्य करत असताना अनेकदा पोलिसांशी संबंध येतो. सगळ्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये आपल्याच नांवाची चर्चा असते."
          बाबाराव हातातील काठीवर भर टाकत उभे राहत म्हणाले.
      "आपल्या इतका मोठा मी नक्कीच नाही सर!" पुढे होत त्याने बाबारावांना हात दिला.
      "उठू नका. बसा." त्याने आग्रह केला.
बाबारावांनी नकारार्थी मान हलवली,
        "असू देत."
        "बोला ना सर, काय काम होतं?"
"खरंच कराल मी सांगेन ते काम?" त्यांनी खूप आशेने मिस्टर वाघच्या नजरेत पाहत विचारले.
        "का नाही सर? बोला ना, काही गुन्हा घडलाय, की कोणाला शोधून काढायचंय?"
बाबारावांनी पुन्हा नकारार्थी मान हलवली.
        "त्च्च! शोध संपवायचं!" शून्यात पाहत ठामपणे ते म्हणाले. त्याच्या डोळ्यांत आशा मात्र तशीच होती.
       "म्हणजे? कशाचा?" मिस्टर वाघने विचारले.
                बाबारावांनी मिस्टर वाघकडे पाहिलं.
       "या आयुष्याचा!" ते म्हणाले.
       "मी समजलो नाही सर..."


        "आई मला पायलट होता येईल नका गं? मला भुर आकाशात उडायंच आहे..." प्रभाची मुलगी तिला विचारत होती.
प्रभा काहीच बोलली नाही.
"बोल ना गं आई..." मुलीने हट्ट धरला.
प्रभा काहीच बोलत नाहीही पाहून ती प्रभाच्या हाताला हिसके देऊ लागली.
       "पणजोबा जोपर्यंत जीवंत आहेत तोपर्यंत आपल्याला खर्च कसा आवरणार काही सांगता येत नाही..." मुलीच्या हलवण्याने तिच्या डोक्यातील विचार असा तोंडावाटे बाहेर पडला होता.
       "मग मी मोठी होईपर्यंत खापर पणजोबा मरतील ना? होय ना आई?" 
आपण काय बोलतोय हे समजत नसलेल्या त्या मुलीने विचारले.
"नक्की मरतील!" 
                असे म्हणत बाहेरून आलेल्या बाबारावांनी हसत मुखाने त्या मुलीला उचलून कडेवर घेतले. 
                प्रभा भानावर येऊन त्यांच्याकडे बघत राहिली. अपराध बोधाने तिचे डोळे भरून आले होते. 
बाबाराव मात्र काहीच झाले नाही अशा रीतीने मुलीला खेळवू लागले...


"तिची तरी काय चूक म्हणा? नवऱ्याला डोक्याला मार लागलाय. वर्षभरापासून त्याचे औषध - पाणी चालू आहे. तसे नसते, तरी शेखरच्या पगारात आमचे भागणे कठीणच. मी हा असा. काम करण्याचे वय राहिले नाही, समाजाच्या उचापती मात्र करतो. त्याची भीती तिला असणारच. घरचा कर्ता पुरुष आणि नवरा जाण्याची कामना ती कशी करेल. आमची प्रभा म्हणजे खरी पतीव्रता बघ... मग राहतो मीच..." ते पुढे बोलले नाहीत.
हे बोलत असताना कमालीचा शांत, वैरागभाव त्याच्या चेहऱ्यावर होता. 
"यात मी काय करू शकतो?" कधी नव्हे तो मिस्टर वाघ अस्वस्थ झाला होता.
"मला मारून टाक!" 
ते कसलाही विचार न करता बोलून गेले. पण नाही! ते सगळा विचार करूनच आले होते!
"म... मी?" मिस्टर वाघ चपापला. 
अशी अवस्था होण्याची ही त्याची पहिली वेळ असेल.
"माझं आयुष्य संपलंय. प्रमाणापेक्षा जरा जास्तच जगलो. हात - पाय चालत नसतानाही जगण्याची वासना ठेवणं या सारखं पाप नाही. शेखर आणि प्रभाचं आयुष्य आहे, जगू दे त्यांना.
"आजपर्यंत ताठ मानेनं जगलोय. त्यामुळे सद्सद्विवेक बुद्धी आत्महत्या करू धजत नाही. मला इच्छा मरण हवंय. म्हणून याशिवाय पर्याय नाही. मग मग कोण मला मृत्यू देऊ शकेल? 
"मग तुझ्या सारख्या कर्तव्यनिष्ठ आणि प्रामाणिक माणसाकडून मृत्यू आला तर बरं होईल असा माझा विचार झाला."
"पण... पण मीच का?" मिस्टर वाघ जड आवाजाने म्हणाला.
मिस्टर वाघच्या या प्रश्नावर ते हसले.
       "मला माहिती आहे, असे अनेक जण आहेत जे खुषीने मला मारतील, पण लायकी नसलेल्या लोकांकडून मरण म्हणजे मृत्यूचा पण अपमान. माझ्या इच्छेनुसार तू मला मारलेस, तर हा खुनही होणार नाही आणि आत्महत्याही! आणि मग ही घटना पाप - पुण्य, सत्य - असत्याच्या पलीकडे निघून जाईल. आपण दोघेही पापातून वाचू! म्हणून... म्हणून!"
या अवस्थेतही बाबारावांनी आपला स्वाभिमान गमावला नव्हता. त्यांचा मरणाचा निर्णय हे त्याचेच तर द्योतक होते...
"काळजी करू नको. मी पत्र लिहिले आहे, की हे माझ्या इच्छेने झालंय. त्यामुळे तुला दोषी ठरवू नये." त्यांनी पत्र खिशातून काढले आणि घडी न उघडताच मिस्टर वाघला दाखवले.
"पण मी फी घेतल्याशिवाय काम करत नाही. माझी फी?" 
पाणावलेल्या डोळ्यांनी बाबारावांना या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी त्याने शेवटचा प्रयत्न करून पाहिला.
आणि त्यांनी त्यांची लोड केलेली माउसर सी नाईन्टी सिक्स त्याच्या समोर धरली...
"पैसे नाहीत, पण याची किंमत आज दहा लाखांच्या आसपास तरी असेल." ते म्हणाले.
भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाचा एक भाग त्यांनी हात धरला होता. दहा लाखांची नाही, तर एक अमूल्य वस्तू होती ती. या पिस्टलनेच तर बाबाराव देसाईंनी वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी ब्रिटिश जनरल ऑगस्टसचा वध केला होता आणि आज याच पिस्टलने...
                 ज्या माऊसर व हातानी एकेकाळी एक क्रांती घडवून आणलेली; तीच माऊसर आता त्याच हाताला निश्चल करणार होती...

                पाणावलेल्या डोळ्यांनी मिस्टर वाघने ती माऊसर हाती घेतली. पण बाबारावांच्या डोळ्यांत डोळे घालून त्यांना ठार मारणं त्याच्यासाठी शक्य नव्हतं. म्हणून तो त्यांच्या मागे जाऊन उभारला...

'शूटऽऽऽ'

माऊसरचा आवाज त्या शांत वातावरणात घुमला...
                        आपल्या घरट्यात शांत झालेले पक्षी घाबरून ओरडू लागले...
                        आणि भटकी कुत्रीही बावरून भुंकू लागली...
                        त्या वातावरणात एकच दारुण विदारकता निर्माण झाली..