ISHQ - 2 books and stories free download online pdf in Marathi

इश्क – (भाग २)

कबीर गोवा एअरपोर्टच्या बाहेर आला आणि समुद्राचा खारा, दमट वारा त्याच्या नाकात शिरला. कबीरने डोळे बंद करुन तो वारा शरीराच्या नसा-नसांत भरुन घेतला. शहरांतला तो पेट्रोलचा, पोल्युशन्सचा, कचर्‍याचा, कोंदलेल्या श्वासांचा, गल्लोगल्ली उभारलेल्या हातगड्यांवरील खाद्यपदार्थांचा.. सर्वा-सर्वांपेक्षा वेगळा…

काही क्षणच कबीर त्या स्वर्गीय अनुभुतीत होता. त्याची तंद्री भंगली ती टुरीस्ट-टॅक्सीवाल्यांच्या आवाजांनी.
“पणजीम..पणजीम.. म्हाप्सा.. म्हाप्सा..” च्या आवाजांनी परीसर गजबजुन गेला.

कबीरने एक दीर्घ श्वास घेतला, आपली ट्रॉली बॅग ओढली आणि तो टॅक्सीत जाऊन बसला.


“सर, फर्स्ट टाईम गोवा?”, ड्रायव्हरने टॅक्सीच्या आरश्यात कबीरकडे बघत विचारलं.
कबीर स्वतःशीच हसला आणि मानेनेच त्याने नाहीची खुण केली.

कबीरला त्याची शेवटची, सहा महीन्यांपुर्वीची गोवा-ट्रीप चांगलीच लक्षात होती. त्याच्या चार मित्र-मैत्रीणींबरोबर तो गोव्याला आला होता..त्यापैकी एक होती मोना.. मोना, अर्थात मोनिका, कबीरची गर्लफ्रेंड.. तेंव्हाची. एक महीन्यापुर्वीच कबीर आणि मोनिकाचं ब्रेक-अप झालं होतं.

मोनिका, एकदम स्मार्ट, आऊटगोईंग, व्यवसायाने एक प्रो-फोटोग्राफर, तर कबीर मात्र काहीसा एकलकोंडा, स्वमग्न, स्वतःच्या आणि पुस्तकांतील पात्रांच्या सहवासात रमणारा.

पुस्तकाच्या कव्हरपेजच्या फोटोशुटच्या वेळी कबीर आणि मोनाची भेट झाली. म्हणतात ना, ‘ऑपोझिट अ‍ॅट्रअ‍ॅक्ट्स’ त्याप्रमाणे कबीर आणि मोना एकमेकांकडे ओढले गेले. मोनिका सतत बडबड, तर कबीर कानसेन. तिची दिवसभराची बडबड तो आवडीने ऐकायचा. तिचे क्लायंट्स, फोटोशुट्सच्या गमतीजमती, फोटोग्राफीतील गिमिक्स ती सांगायची, तो ऐकायचा. दोघांचं चांगलं जमायचं. दिसायला सुध्दा दोघंही एकमेकांना अनुरुप होते. पण सतत शांतच असणार्‍या कबीरचा काही दिवसांनी मोनिकाला कंटाळा यायला लागला. बोलुन बोलुन सर्व विषय संपले तसे दोघांमधील संवाद कमी होऊ लागला. फोटोग्राफीला लाभलेल्या ग्लॅमरमुळे बाकीही अनेक स्मार्ट-डॅशींग लोकांशी मोनिकाच्या नविन ओळखी होत होत्या, त्यांच्यापुढे तिला कबीर खुपच लो-प्रोफ़ाईल वाटायला लागला. आणि मग दोघांमध्ये बारीक-बारीक गोष्टींवरुन कुरबुरी सुरु झाल्या. महीन्याभरातच दोघांमधली भांडणं विकोपाला गेली आणि दोघांमध्ये कायमचे ब्रेक-अप झाले.

मोनिका त्या ग्लॅमरस जगात सहज मिसळुन गेली, पण आधीच एकलकोंडा असलेला कबिर मात्र अजुनच स्वतःमध्ये गुरफटत गेला. कदाचीत हे सुध्दा एक कारण असेल की कबिरचं तिसरं पुस्तक म्हणावं तितकं प्रसिध्द होऊ शकलं नाही.

कबिरने मोबाईलची फोटो-गॅलरी उघडली आणि मोनिकाचे फोटो बघण्यात तो गुंग होऊन गेला.


“सर, गोवाऩ इंटरनॅशनल, तुमचं हॉटेल आलं..”, ड्रायव्हर कबिरला म्हणाला..
कबिरने मोबाईलमधुन आपलं डोकं काढलं आणि त्याने टॅक्सीच्या खिडकीतुन बाहेर बघीतलं. समोर अवाढव्य पसरलेले ’गोवाऩ इंटरनॅशनल’ हॉटेल उभे होते. आवारात वेगवेगळ्या रंगाचे झेंडे वार्‍याबरोबर फडफडत होते. विस्तीर्ण लॅन्ड्स्केपमध्ये तर्‍हेतर्‍हेची झाडं, फुलं डौलाने डुलत होती. ट्रॅडीशनल ड्रेसेसमध्ये दरबान आपल्या झुपकेदार मिश्या सांभाळत उभे होते.

कबीरने मिटर पे केला आणि तो हॉटेलच्या लॉबीमध्ये गेला. पाठोपाठ ड्रायव्हर त्याचे लगेज घेऊन आतमध्ये आला.

“गुड-इव्हनिंग सर, हाऊ मे आय हेल्प यु?”, मेकॅनिकल आवाजात रिसेप्शनिस्टने कबिरला विचारलं.
“आय हॅव्ह अ बुकिंग, कबिर द नेम..”, नाकावर घसरणारा चष्मा पुन्हा सरळ करत कबिर म्हणाला..

“जस्ट अ सेकंद सर..”, असं म्हणुन त्या रिसेप्शनिस्टने आपली लांबसडक बोटं संगणकाच्या किबोर्डवर फिरवायला सुरुवात केली.
काही क्षण गेल्यावर तिने कबीरकडे पाहीलं आणि म्हणाली, “जस्ट ए मोमेंट सर”, आणि ती मॅनेजरच्या केबीनमध्ये गेली.

कबीर चलबिचल करत तेथेच उभा राहीला. दीड-तासाची का असेना, फ्लाईटच्या प्रवासाने त्याला थकवा आला होता. मस्त हॉट-टब बाथ घेण्याची स्वप्न रंगवत तो उभा होता.

थोड्याच वेळात रिसेप्शनिस्ट आणि पाठोपाठ एक सुटाबुटातला माणुस बाहेर आला. त्रासिक नजरेने त्याने संगणकावर नजर फिरवली.
“चेक फॉर द सुट्स..”, मॅनेजर म्हणाला
“आय हॅव ऑलरेडी सर.. उद्या सकाळी एक व्हेकंट होईल, आत्ता तरी…”

“एनी प्रॉब्लेम?”, कबिरने त्या रिसेप्शनिस्टला विचारलं.
“सर.. द रुम दॅट वॉज अ‍ॅलोकेटेड टु यु इज हॅविंग सम प्लंबिंग प्रॉब्लेम…, बाथरुम इज नॉट वर्कींग अ‍ॅन्ड रुम इज फिल्ड विथ वॉटर..”, चेहरा पाडत रिसेप्शनिस्ट म्हणाली
“ओह, दॅट्स ओके, गिव्ह मी अनदर रुम, आय विल पे एक्स्ट्रा..”, खिश्यातुन पाकीट काढत कबिर म्हणाला..

“यु डोन्ट हॅव टु पे सर, प्रॉब्लेम इज फ़्रॉम अवर साईड, वुई विल अपग्रेड यु टु सुट्स विदाऊट एनी एक्स्ट्रा चार्ज.. बट..”, रिसेप्शनिस्ट
“बट? बट व्हॉट..”

“सर.. सुट्स सगळे फुल्ल आहेत, इन्फॅक्ट ऑल रुम्स आर ऑक्युपाईड, सुट कॅन बी अ‍ॅरेंज्न्ड टुमारो मॉर्निंग ओन्ली..”, मॅनेजर..
“सो.. आय मीन.. मग मी आत्ता काय करु?, संध्याकाळचे ८.३० होतं आलेत..”, कबिर आवाज चढवुन म्हणाला..
“आय एम सॉरी सर, बट द प्रॉब्लेम इज बियॉन्ड अवर कंट्रोल..”, मॅनेजर
“अरे पण मग मी काय करु तोपर्यंत? गिव्ह मी बुकिंग इन सम अदर हॉटेल्स देन..”
“सॉरी सर, पण आमचं कुठल्या हॉटेलबरोबर टाय-अप नाहीए..”, मॅनेजर..

“धिस इज रिडीक्युलस…अ‍ॅन्ड अनप्रोफ़ेशनल.. आय वॉन्ट टु कॅन्सल माय बुकिंग इमीडीयटली.. प्लिज रिटर्न द अमाऊंट पेड..”, कबिर
“वुई अंडरस्टॅंन्ड युअर कन्सर्न सर.. बट…”
“नो यु डोन्ट अंडरस्टॅंन्ड, माझं बुकिंग रद्द करा लगेच..”, कबीर काऊंटरवर हात आपटत म्हणाला

“ओके सर.. प्लिज बी सिटेड..”, रिसेप्शनिस्ट लॉबितल्या सोफ्याकडे हात दाखवत म्हणाली.

कबिरचे डोकं संतापाने भडकले होते, एव्हढं ‘इंटरनॅशनल’ नाव दिलंय हॉटेलला आणि साधे प्लंबींगचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होत नाहीत म्हणजे काय. तो जवळच उभा असलेल्या ड्रायव्हरकडे वळला.

“लगेज टॅक्सीमे रखो, हम दुसरा हॉटेल चलेंगे..”, कबीर म्हणाला..
“का सर? काय झालं?”, ड्रायव्हर

कबिरने झालेला किस्सा त्याला सांगीतला…

“सर, बुकिंग कॅन्सल मत करो.. चाहीए तो आज की रात के लिए कही रह लो.. अभी सिझन है तो बुकिंग मिलना मुश्कील है बाकी जगह..”
“अरे काय.. उलट ऑफ सिझन आहे.. पावसाळा सुरु होईल आता.. कुठेतरी मिळेलच ना..”, कबिर
“सर, आजकाल पावसाळ्याला पण फुल्ल गर्दी असते गोव्यात..”

“सर.. युअर रिफंड..”, दोघांच बोलणं चालु होतं तेंव्हा रिसेप्शनिस्ट एक पांढर पाकीट पुढे करत म्हणाली..

कबिर तणतणत काऊंटरवर गेला आणी त्याने ते पाकीट घेतले आणि तसाच माघारी फिरला.


पुढचा दिड तास कबीर टॅक्सीमधुन फिरत होता, परंतु ड्रायव्हर म्हणाला तसे खरोखरच हॉटेल्स फुल्ल होते.
कबिरने घड्याळात नजर टाकली, एव्हाना साडे-दहा वाजत आले होते.

“ड्रायव्हर.. कोई छोटा हॉटेल है तो देखो रात के लिए, कल सुबह ढुडेंगे अब, थक गया हु मै..”, वैतागुन कबिर म्हणाला
“जी सर, मेरे एक पैचानवाला है, देखता हु..”, ड्रायव्हरने आपल्या एका मित्राला फोन लावला.. दोन मिनिट बोलल्यावर तो कबिरला म्हणाला, “चलिए सर, कल शामतक एक रुम मिल जाएगा”

कबिरच्या परवानगीची वाट न बघताच ड्रायव्हरने टॅक्सी वळवली.

अर्ध्या तासानंतर टॅक्सी थोडी गावाच्या बाहेरच आली होती. सर्वत्र बर्‍यापैकी शांतता आणि अंधार होता. छोट्या मोठ्या गल्लींमधुन फिरल्यानंतर टॅक्सी एका निळसर जुनाट इमारतीपाशी येऊन थांबली. मळकट झालेल्या ट्युबलाईट्सचा पिवळट-अंधुक प्रकाश रस्त्यावर पसरला होता. आजुबाजुला सामसुमच होती. इमारतीच्या खाली एक छोटेसे मेडिकल-शॉप चालु होते.

कबिरने प्रश्नार्थक नजरेने ड्रायव्हरकडे बघीतले.

“कल शाम तक साब..दुसरा अब नही मिलेगा.. सुबह दुसरा ढुंड लेना…”, ड्रायव्हर म्हणाला
“नसिब ही खराब है साला..”, कबिरने लाथेनेच दार उघडले, परंतु ते इतक्या जोरात उघडले गेले की ज्या वेगाने ते उघडले होते त्याच वेगाने ते पुन्हा कबिरवर आदळले.

कबिर टॅक्सीतुन उतरतच होता, तोच ते दार येऊन कबिरच्या डोक्यावर आपटले.

कबिर डोकं धरुन खाली बसला…

“सर.. आप ठिक तो हो..”, खाली पडणार्‍या कबिरला सावरत ड्रायव्हर म्हणाला.

कबिरच्या डोक्याला हलकीशी जखम झाली होती.

“सर.. खुन निकल आया है थोडा, रुको मै मेडिकलसे पट्टी लेता हु..”, ड्रायव्हर म्हणाला..
“रहने दो.. मै ठिक हु.. लेता हु मै.. मिटर कितना हुआ?”, कबिर डोक चोळत म्हणाला…

कबिरने टॅक्सीचे बिल भरले तसा टॅक्सीवाला तेथुन निघुन गेला.


कबिरने आपली बॅग उचलली आणि तो जिने चढुन हॉटेलमध्ये गेला. दारातच लॉबीवजा छोट्याश्या कोपर्‍यात मोडकळीस आलेल्या टेबलावर एक पोर्‍या बसला होता. कबिरला बघताच तो बाहेर आला.

“रुम नै है साब..”, कबिरला तो म्हणाला..
“अरे.. अभी वो टॅक्सीवालेने फोन करके बोला था ना?”
“कौन? हेन्रीने भेजा क्या आपको.. हा.. आओ साब..”, त्या पोर्‍याने कबिरची सुटकेस घेतली आणि तो हॉटेलमध्ये गेला
एका क्षणासाठी अडकलेला श्वास सोडत कबीर त्या पोऱ्याच्या मागोमाग हॉटेलमध्ये शिरला

हॉटेलचे अंतरंग सुध्दा बरेचसे जुनाटच होते, नावापुरते असलेले फर्नीचर सुध्दा जुने, मोडकळीस आलेले होते.

त्या पोर्‍याने कबिरला त्याची रुम दाखवली आणि तो परत निघुन गेला.

कबिर चरफडत रुममध्ये शिरला, आपली बॅग कोपर्‍यात ढकलली आणि बाथरुममधल्या आरश्यासमोर जाऊन उभा राहीला.

कपाळावर बारीकसे खरचटले होते आणि टेंगुळ आल्यासारखे सुजून कपाळाचा तो भाग काळानिळा पडला होता. कपाळाला काहीतरी लावणे गरजेचे होतेच, पण एक पेन-किलर पण आवश्यक होती, नाहीतर रात्री झोपेचे खोबरे नक्की होते.

कबीरने खोलीचे दार ओढून घेतले आणि तो खालच्या मजल्यावर असलेल्या मेडिकल-शॉप मध्ये गेला.


मख्ख चेहऱ्याचा, साठीकडे झुकलेला एक गृहस्थ दुकानाची आवरा-आवर करत होता. कबीरला येताना पाहून त्याने कपाळावर आठ्या चढवल्या.

“एक बैन्डेड देता का?”, कपाळावरील जखमेकडे बोट दाखवत कबीर म्हणाला, “आणि एक पेन किलर पण द्या, डोकं दुखीवर”

त्याने ड्रोवर मधून बैन्डेड आणि दोन गोळ्या काढून कबीरकडे दिल्या.
कबीर तिथल्याच एका बाकावर बसून बैन्डेड कपाळावर लावतच होता इतक्यात एक मुलगी दुकानात घुसली. निळ्या रंगाने रंगवलेले केस, पांढरा टी -शर्ट आणि त्यावर मळलेले जीन्सचे जैकेट, पांढरट पडलेली निळ्या रंगाची जीन्सची शॉर्ट, हातात रंगेबिरंगी डझनभर बांगड्या आणि पाठीला एक छोटी सैक. ओठांवर भडक लाल रंगाची लिपस्टिक होती, गडद काळ्या रंगाचे आय-लायनर आणि पापण्यांवर हलक्या गुलाबी रंगाचे शेडींग.

तोंडावर हात दाबतच ती दुकानात शिरली.

“काय पाहिजे?”, दुकानदार म्हणाला

“मळमळतय , पटकन गोळी द्या…”
दुकानदाराने ड्रावर मधून एक गोळी काढून तिच्या हातात दिली

“हि नको, काल घेतली होती मी, पण आज परत मळमळतय”, ती तरुणी तोंड दाबत म्हणाली

दुकानदाराने ती गोळी परत घेतली आणि दुसरी दिली.
“हि पण नको, सकाळी घेतली होती, अजून दुसरी आहे कुठली?”, ती तरुणी म्हणाली

“नक्की काय होतंय तुम्हाला?”, दुकानदाराने वैतागुन विचारलं.
“खूपच मळमळतय, डोकं जड झालंय, अंग दुखतंय… चक्कर करतेय कालपासून..”, ती तरुणी बोलत होती.

त्या दुकानदाराने एकदा कबीरकडे पाहिले आणि त्या तरुणीला जवळ बोलावून तिच्या कानात हळूच म्हणाला, “पिरिएड मिस झालेत का?”
“एक्स्क्युज मी?”, ती तरुणी काहीशी संतापुन म्हणाली, पण तिच्या चेहऱ्यावर किंचितशी भीतीची एक लकेर पसरून गेली. तिने भीतीने एक आवंढा गिळला.

दुकानदाराने मागच्या कपाटातून एक खोकं काढून तिच्याकडे दिले आणि म्हणाला, “मागे बाथरूम आहे, प्रेग्नंसी चेक करा..”

त्या तरुणीने ते खोकं कबिरला दिसु नये म्हणुन पट्कन हिसकाऊन घेतलं आणि दुकानदाराने दर्शवलेल्या दरवाज्याकडे पळाली.

“हम्म.. तुम्हाला काय हवंय अजुन?”, दुकानदाराने कबिरला विचारलं.
“नाही, काही नाही..”, कबिर
“मग, निघा की आता..”
“नाही ते.. त्यांच काय होतंय बघितलं असत तर..”
“कश्याला नसत्या चौकश्या तुम्हाला? निघा..”
“हो.. निघतो..”, असं म्हणुन कबिर उठुन निघतंच होता, तोच ती तरुणी परत धावत धावत आली, हातातलं खोकं तिने काऊंटरवर ठेवलं आणि पळत दुकानाच्या बाहेर गेली.

दुकानदारही तिच्या मागोमाग गेला. रस्त्याच्या कोपर्‍यावर ती तरुणी उलट्या करत होती.
कबिरने पट्कन टेबलावर पडलेले ते प्रेग्नंन्सी किट उघडुन बघीतले.. रिझल्ट निगेटीव्ह होता.

कबिरने ते किट परत टेबलावर ठेवले आणि तो दुकानाच्या बाहेर पडला. त्याने एकवार त्या तरुणीकडे बघीतले. झाडाला टेकुन ती उभी होती. कबिरने रुमकडे जायला जिना चढायला सुरुवात केली. चार-पाच पायर्‍याच चढला असेल तोच दुकानदाराने त्याला हाक मारलेली ऐकु आले.

“ओ.. इकडे या पट्कन..”, तो दुकानदार कबिरला हाक मारत होता. मगाशी झाडाला टेकुन उभी असलेली ती तरुणी एव्हाना जमीनीवर कोसळली होती.

कबिर धावत धावतच त्यांच्याकडे गेला.

“काय झालं?”
“चक्कर येऊन पडल्यात ह्या…”
“अरे बापरे.. दवाखान्यात फोन करा पट्कन..”
“इथं कुठं आला दवाखाना.. २०-२५ किमी वर जवळपास काही नाही इथं..”
“मग? आता काय करायचं?”
“तुम्ही वरती हॉटेलमध्येच रहाताय ना?”
“हो..”
“मग एक काम करा, हिला घेऊन जा वरती, मला वाटतं अशक्तपणामुळे चक्कर येऊन पडल्यात.. १५-२० मिनीटांत येतील शुध्दीवर..”

“अहो काही तरी काय? मी ओळखत पण नाही हिला..”, कबिर वैतागुन म्हणाला.
“१० मिनिटांचा प्रश्न आहे.. येतील त्या शुद्धीवर”, दुकानदार समजावत म्हणाला, “मला आधीच उशीर झालाय, शेवटची बस गेली तर घरी जायचा प्रश्न होईल.. नाही तर मी थांबलो असतो इथं..”
“नाही नाही, मला नाही जमायचं ते.. तिचा अवतार बघा.. कॉल-गर्ल वगैरे वाटतेय, मी नाही न्हेणार तिला हॉटेलवर…”, कबिर निर्धाराने म्हणाला

“राहु द्या मग हिला इथंच.., शुध्दीवर येईल तेंव्हा जाईल..”, दुकानदार त्या तरुणीला तेथेच ठेवुन दुकानाकडे जाऊ लागला
“अहो पण.. असं रात्री हिला इथं रस्त्यावर सोडायचं म्हणजे…”, कबिर
“मग तेच तर म्हणतोय मी… तुम्हीच ऐकेना..”, दुकानदार नव्या जोमाने म्हणाला….

“बरं बर.. धरायला मदत करा तिला, जिन्यावरुन एकट्याला नाही न्हेता यायचं मला..”
“कोण बघतंय तुम्हाला इथं.. उलट गोव्यात तुमच्याबरोबर कोणी नसंल तर लोकं बघतील… घ्या उचला हिला..”, असं म्हणुन दुकानदाराने त्या तरुणीला उभं केलं

कबिर आणि त्या दुकानदारानं तिला कसंबसं उचललं आणि जिन्यावरुन कसरत करत करत कबिर तिला आपल्या हॉटेलच्या रुममध्ये घेऊन आला.


कोण होती ती तरुणी? कबिरच्या आयुष्यात काय घडणार असेल? नियतीच्या मनात नक्की काय होतं?
जाणुन घेण्यासाठी वाचत रहा, इश्क-भाग ३ लवकरच ब्लॉगवर…

[क्रमशः]

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED