ISHQ - 6 books and stories free download online pdf in Marathi

इश्क – (भाग ६)

राधा गेट उघडतच होती तोच समोर एक रिक्षा येऊन थांबली. रिक्षावाला पटकन उतरला आणि त्याने रिक्षातुन सोफी ऑन्टींना हात धरुन खाली उतरवले.

सोफी ऑन्टींच्या हाताला आणि कपाळाला थोडं खरचटलं होतं. ते बघताच हातातली बॅग टाकुन राधा धावत रिक्षेपाशी गेली. कबिरही काय झालं बघायला मागोमाग धावला.

“सोफी ऑन्टी ! काय झालं?” राधाने त्यांचा हात धरत विचारलं..
“काही नाही ताई.. त्या रिक्षेतुन चालल्या होत्या, म्हापसा चौकात मध्येच एक मोटारसायकलवाला आला, त्याला वाचवण्याच्या नादात रिक्षा उलटली..”
“अहो काय.. निट चालवता येत नाही का रिक्षा तुम्हाला..? माजलेत तुम्ही लोकं…!!”, राधा तावातावाने बोलली
“ताई, अहो माझ्या रिक्षेत नव्हत्या त्या.. दुसरी रिक्षा होती. तो गेला पोलिस स्टेशनात.. मी विचारलं ह्यांना दवाखान्यात सोडु का, तर नको म्हणाल्या, घरीच सोड म्हणुन मी घेऊन आलो ह्यांना घरी तर..”
“बरं बरं.. थॅंक्स. किती झाले पैसे?”
“काही नाही.. सांभाळा ह्यांना..” तोंडातल्या तोंडात पुटपुटत तो रिक्षावाला निघुन गेला.

सोफी ऑन्टी तश्या ठिक होत्या, पण घाबरल्याने त्यांचे हात-पाय अजुनही थरथरत होते. गुडघ्याला सुध्दा थोडं खरचटलं होतं.

राधा त्यांना घेऊन घरात गेली. कबिरनेही संधी साधुन राधाची बॅग उचलली आणि मागोमाग तो घरात शिरला.


कबिरने कॉफी करुन आणली तेंव्हा सोफी ऑंन्टी औषधं घेऊन अंथरुणात शिरत होत्या.

“कश्या आहात?” कबिरने कॉफीचा कप त्यांच्या हातात देत विचारलं
“ठिक आहे.. थोडं धडधडतंय अजुन..”, सोफी ऑन्टी म्हणाल्या..
“डॉक्टरांकडे जायचंय का?”, कबिर
“नको नको.. आय एम ऑलराईट माय सन.. जिझस इज देअर टु प्रोटेक्ट मी..”
“ऑलराईट, पण काही वाटलं तर सांगा.. मी आहे बाहेरच..”, असं म्हणुन कबिर बाहेर निघुन गेला

१०-१५ मिनिटांनी राधा खोलीचं दार बंद करुन बाहेर आली.

“हाऊ इज शी?”, कबिर
“ठिक आहे आता, झोप झाली की बरं वाटेल…”, बोलत असताना राधाचं लक्ष व्हरांड्यात ठेवलेल्या तिच्या बॅगेकडे गेलं. तिनं एकवार कबिरकडे बघीतलं. कबिरने पटकन नजर चुकवली. पण नजरेच्या कोपर्‍यातुन त्याला जाणवलं की राधा त्याच्याकडेच बघत होती.

दोन क्षण थांबुन राधाने तिची बॅग उचलली आणि ती तिच्या खोलीत निघुन गेली.


“भोसले, दोन मिनीटं आत मध्ये या..”, इंटरकॉमवर डीजी साहेबांनी भोसलेंना बोलावुन घेतलं.
भोसले आतमध्ये गेले आणि कडक सॅल्युट ठोकुन खुर्चीत बसले.

“भोसले.. सध्या काय केस आहेत तुमच्याकडे?”, डीजी साहेबांनी विचारलं
“तश्या महत्वाच्या काही नाहीत.. हा, पण ते अनुराग आहेत ना..त्यांच्या मिसींग बायकोची केस मी हॅन्डल करतोय..”, भोसले
“अनुराग? यु मीन.. ते अनुराग दीक्षीत?”, डीजी
“हो.. हो सर तेच.. काही आठवडे झाले त्या नाहीश्या झाल्यात घरातुन..”, भोसले
“बरं.. काही लिड?”
“हो.. तेच तुमच्याशी बोलायाला येणार होतो.. एक गोव्यातुन लिड मिळालंय, त्यासाठी तुमचं अप्रुव्हल हवं होतं. मी आणि कदम जाऊन…”
“नको!, त्यापेक्षा असं करा, ही केस स्टडी करा जरा, वरुन ऑर्डर आल्यात.. त्या बारमध्ये एका तरुणीची कोणी छेडछाड काढली बघा जरा ते..”
“पण सर.. कन्फर्म्ड लिड आहे, फक्त २-४ दिवस, क्लोज करुनच येतो केस.. शिवाय अनुराग सारखे कमीशनर साहेबांशी बोलु का म्हणतात…”
“भोसले.. मी बोलतो कमीशनर साहेबांची.. ही केस प्रायोरीटीवर घ्या तुम्ही.. आधीच एक तर आपलं सरकार नविन आहे.. ह्या असल्या छेडछाडीच्या केसेस लगेच मार्गी लागायला हव्यात..”
“पण सर..”
“यु कॅन गो नाऊ भोसले.. आणि हो.. प्लिज ते गोव्याचं इतक्यात अनुरागना बोलु नका. आधीच आपल्याकडे स्टाफ कमी आहे, उगाच कुणालातरी पिटाळावं लागेल. विचारलं तर सांगा शोध चालू आहे. कळलं?”

भोसलेंच्या गोवा मोहीमेवर अचानक पाणी पडलं होतं.
“येस सर…”, भोसलेंनी परत एक कडक सलाम ठोकला आणि ते निराश होऊन बाहेर पडले.


संध्याकाळचे ७.३० वाजुन गेले होते. आकाशात आधी केशरी, मग गुलाबी-निळा आणि नंतर काळसर रंगाची उधळण करत सुर्यास्त होऊन गेला होता. कबिरच्या डोक्यात अनेक प्रश्न पिंगा घालत होते.

कोण आहे ही राधा?
त्या दिवशीची ती राधा आणि ही. असं वेशांतर का?
दुपारी फोनवरुन इतकं चिडायचं कारणंच काय? इतकं की सरळं इथुन निघुनच जायची वेळ यावी?
मला ही इतकी का आवडते? इतकी? की तिला जाताना बघुन कुणाची, कसलीही पर्वा न करता मी सरळ तिला ‘आय-लव्ह-यु’ म्हणावं!

त्याच्या मनाचा प्रचंड कोंडमारा होतं होता. दुपारनंतर तो आणि राधा अनेकदा समोरासमोर आले, पण त्याला विचारायचं काही धाडस झालं नाही.

बंगल्याच्या हिरवळीवर मांडलेल्या टेबल-खुर्चीवर तो विचारात बुडुन गेला होता, इतका की आजुबाजुला पसरलेला मिट्ट काळोखही त्याला जाणवला नाही. त्याची तंद्री भंगली ती लॉनमधल्या खांबांवर लागलेल्या लाईट्सने.

राधाला त्याच्या दिशेने येताना पाहुन तो खुर्चीत सावरुन बसला.

राधा जवळ आली आणि तिने हातातली ‘चिवाज रिगल’ ची बॉटल आणि दोन ग्लास टेबलावर ठेवले.

“घेतोस ना? आय अ‍ॅझ्युम घेत असशील..”, राधा म्हणाली
“हो..”
“ऑन द रॉक्स? का सोडा हवाय?”
“सोडा चालेल…”
“ओके, आणते फ्रिजमधुन आणि चिप्स चे काही पॅकेट्स आहेत ते पण आणते..”
“राधा… पण हे.. कश्यासाठी?”
“तु दुपारपासुन जे असंख्य प्रश्न चेहर्‍यावर घेऊन फिरतो आहेस ना? त्याची उत्तर देण्यासाठी.. इरिटेट होतेय मला तुझा तो प्रश्नांनी भरलेला चेहरा बघुन… त्यानंतर मला आणि कदाचीत तुला सुध्दा ह्याची गरज लागेल..”, किंचीत हसत राधा म्हणाली आणि ती परत किचेनकडे गेली.

कबिर तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघत होता. मरुन रंगाचा स्लिव्हलेस टॉप आणि मोरपंखी रंगाच्या लॉंग स्कर्ट मध्ये राधा खरंच खुप सुंदर दिसत होती. का कुणास ठाऊक पण ती नुसती समोर आली तरी कबिरला आपल्या हृदयाच्या वाढलेल्या ठोक्यांची जाणीव होई.

“डॅम्न आय लव्ह हर…”, कबिर स्वतःशीच पुटपुटला.

राधा य़ेईपर्यंत त्याने कॅम्पफायरसाठी बनवलेल्या जागेत काही लाकडं रचली आणि त्यावर रॉकेल टाकुन विस्तव पेटवला.


हवेमध्ये मस्त गारवा पसरला होता. काही अंतरावरच असलेल्या नदीवरुन आलेला गार वारा मधुनच अंगावर शहारे आणत होते.
कबिरने दोन पेग बनवले आणि तो खुर्चीत टेकुन बसला.

“मी राधा.. अं.. रादर मी अनुराधा.. अनुराधा दीक्षीत, मॅरीड टू अनुराग दीक्षीत, दी वेल नोन मिडीया बिझीनेस टायकुन…”

कबिरने प्रचंड प्रयत्नांनी आपला चेहरा स्थिर ठेवला, पण ’मॅरीड टू’ ह्या दोन शब्दांनी त्याला आतुन पुरतं हलवुन सोडलं होतं.

“ओह कमऑन, हाऊ कुड धिस बी..”, त्याचं मन जोर जोरात आक्रंदत होतं.

“राधा.. खरं तर किती छान नाव ठेवलं होतं माझ्या आई-वडीलांनी माझं, पण लग्नातल्या नाव बदलायच्या ह्या विचीत्र पध्दतीत पुरुषी अहंकार आड आला आणि अनुरागचा ‘अनु’ माझ्या नावापुढं चिकटवला गेला. पण हरकत नाही. मी जुळवुन घेतलं.

हनिमुनला खरं तर मला मस्त युरोप फिरायचा होता. खरं तर ठिकाण महत्वाचं नसतं म्हणा.. महाबळेश्वरला गेलो असतो तरी काहीच हरकत नव्हती. पण फॉरेन-ट्रिपच करायची होती तर युरोपला काहीच हरकत नव्हती. पण आम्ही गेलो कुठे? शांघायला? का? कारण अनुरागना त्या भेटीतच काही बिझीनेस कॉन्फरंन्स पण करायच्या होत्या. म्हणजे चाललोच आहोत मिटींग्न्स अ‍ॅटेंन्ड करायला तर हनिमुन पण उरकुन घेऊ…” निरर्थकपणे हवेत हात हलवत राधा म्हणाली…

“अर्थात शेवटी बायकोने नवर्‍याच्या खांद्याला खांदा लावुन, किंवा त्याच्या पाठीशी उभं राहुन सदैवं ममं म्हणायचं असतं नाही का? मी तेथे पण जुळवुन घेतलं.. हनिमुनचे ते शुश्क मोरपंखी दिवस संपवुन मी अनुरागच्या त्या महालात रहायला आले. दिमतीला सगळं होतं. नोकर-चाकर होते, गाड्या होत्या, पैसा बक्कळ होता.. काही नव्हतंच तर प्रेम. आजुबाजुला वावरणार्‍या खोट्या भावना चेहर्‍यावर घेऊन फिरणार्‍या लोकांमध्ये मी हरवुन गेले. मला हवं असलेलं माझं प्रेम मला फक्त चित्रपटांतच दिसत राहीलं.

“पहील्या पहील्यांदा मी स्वतःला समजवायचा, बदलवायचा प्रयत्न केला. अनुराग नसले म्हणुन काय झालं. मला जे पाहीजे ते माझ्याकडे आहे.. सो गो आऊट, एन्जॉय लाइफ़. नविन मित्र-मैत्रीणी बनव, नविन सोशल-लाईफ़ आहे हॅव फन.. पण मला काही केल्या ते जमेना.”

“ओह लुक मिसेस दीक्षीत…”
“ती बघ.. अनुरागची बायको.. गॉड शी इज सो डल..”
“मिसेस अनुराग..”

“माझं स्वतःच काही अस्तीत्वच राहीलं नव्हतं. ह्या सगळ्याला कंटाळुन मी माझ्या कॉलेजच्या मित्र-मैत्रीणींबरोबर एकदा पार्टीला गेले. अर्थात त्यांना परवडणार्‍या सारख्या साध्या हॉटेलमध्ये. मला सुध्दा माझे पैसे उगाच वापरायचे नव्हते, कदाचीत तो उगाचच ‘शो-ऑफ’ वाटला असता. सो गेले. खुप मस्ती केली आम्ही. वाट्टेल तसे हसलो-खिदळलो, टपोरी शिव्या दिल्या. डिजे च्या तालावर राऊडी डान्स केला. मस्त मुड जमला होता, तो खर्र्कन उतरला घरी आल्यावर.

अनुराग मला वाट्टेल तसं बोलले. जो तमाशा करायचाय तो घरात कर बाहेर नाही म्हणुन दम भरला. त्या दिवसानंतर प्रत्येकवेळी ‘बॉडीगार्ड’ च्या नावाखाली एक माणुस सतत माझ्याबरोबर फिरु लागला. तो कश्यासाठी होता हे न कळण्याइतपत मी दुध-खुळी तर नक्कीच नव्हते.”

राधाने आपला रिकामा ग्लास खाली ठेवला आणि कबिरने तो पुन्हा भरुन तिच्याकडे दिला.

“ए तुला यो.लो. माहीते?”, अचानक राधाने विचारले
“यो.लो.? यु मिन. वाय.ओ.एल.ओ. यु-ओन्ली-लिव्ह वन्स ना?”, कबिर
“येस.. यु-ओन्ली-लिव्ह वन्स !, हे बघ.. कॉलेजमध्ये असताना मी मानेवर इन्क केलं होतं..” राधाने मान वळवली आणि मानेवरचे केस बाजुला करुन तिने तो टॅटू कबिरला दाखवला.

“तो टॅटू मला त्या घरात बोचु लागला होता. आयुष्यातला प्रत्येक दिवस मला वाया गेलेल्या क्षणांची आठवण करुन देत होता कबिर.”, अश्रुंचे दोन थेंब राधाच्या डोळ्यांतुन घरंगळत बाहेर आले.

“आय सर्टनली डिझर्व्ड मोर इन लाईफ़.. तुला माहिते, कॉलेजेमध्ये मी हार्ट-थॉर्ब होते. दिसायला छान आहे, अभ्यासातही चांगली होते. वागायला पण मी कधी माजुर्डेपणा केला नाही. सगळ्यांशीच मि मोकळेपणाने वागायचे. एका स्माईलवर कित्तेक जणांना पटवता आलं असतं मला. अगदी कोणीच नाही तर गेला बाजार एखाद्या आय.टी. प्रोफ़ेशनलशी लग्न करुन अमेरीकेत स्थाईक झाले असते. नॉर्मल जगण्याचा हक्क होता मला.. मग माझ्याच नशीबी हे सोनेरी-पिंजर्‍यातलं जगणं का यावं कबिर…?”

इतक्यावेळ रोखुन धरलेले अश्रु एव्हाना बांध फोडुन वाहु लागले होते.

“तु किती ओळखतोस मला? दोन दिवस..! तरी त्या दिवशी तु मला ‘आय-लव्ह-यु’ म्हणालासच ना.. तुझ्यासारखेच कित्ती जण होते माझ्यावर प्रेम करणारे पण मी सगळ्यांना सोडुन अनुरागशी लग्न केलं, कारणं ते स्थळ माझ्या आई-वडीलांना योग्य वाटलं म्हणुन…”

मनगटाने डोळे पुसत राधा म्हणत होती.

“शेवटी एके दिवशी पेशंन्स संपला आणि मी घर सोडुन बाहेर पडले. इथे गोव्यात मला हवं असलेलं मुक्त जिवन मला मिळालं. इथे मला ओळखणारे कोणी नव्हते. नाईट-लाईफ़ला मी गेट-अप चेंज करुन जायचे.. ते रंगीत केस.. तो विचीत्र ड्रेस.. यु नो ईट बेटर…”, मधुनच हसत राधा म्हणाली…

“ओह येस.. हु एल्स विल..” भुवया उडवत कबिर म्हणाला..
“बट आय गेस.. इट्स ओव्हर.. मला इथुन निघायला हवं, तुझ्या मुर्खपणा मुळे.. आय एम शुअर.. माझा फोन ट्रॅक होत असणार.. एव्हाना अनुरागना नक्की कळले असेल की मी इथे गोव्यात आहे ते.. सो धिस इज इट कबिर.. सकाळी जेंव्हा तो उठशील तेंव्हा कदाचीत मी इथुन गेलेले असेल…”, रिकामा ग्लास टेबलावर ठेवत राधा म्हणालि.

कबिरची आणि तिची नजरानजर झाली. एक प्रकारची हताशता, एक प्रकारची उद्वीग्नता, जिवनात ओढवलेले रितेपण तिच्या नजरेत समावले होते. कबिरची नजरानजर झाली तरी तिने आपली नजर हटवली नाही.

काय सांगु पहात होती ती नजर? तिच्या मनात सुध्दा कबिरबद्दल काही भावना होत्या, की तो कबिरच्या मनाचा एक खेळ होता?
कबिरची आणि राधाची ती शेवटची भेट होती?
राधाची गोष्ट ऐकल्यावर कबिर अधीकच तिच्यात गुंतला होता. तिने अनुभवलेला तो प्रेमाचा रितेपणा कबिरच्याही वाट्याला आला होताच की. मोनिका आणि तो एकत्र असुनही कधी एकत्र आले एकत्र नव्हते. प्रेमाची भुक त्याला सुध्दा होती आणि ते प्रेम त्याला का कुणास ठाऊक, पण राधाच्या रुपाने मिळेल ह्याची खात्री होती.

काय होणार होते पुढे?
जाणुन घ्या पुढच्या भागात….


[क्रमशः]

इतर रसदार पर्याय