इश्क – (भाग ७) Aniket Samudra द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

इश्क – (भाग ७)

राधा उठुन आपल्या रुमकडे निघाली आणि कबीरच्या मनात प्रचंड चलबिचल सुरु झाली. काय करावं? काय करावं म्हणजे राधाला थांबवता येईल. कसंही करुन कबीरला राधाला नजरेआड होऊ द्यायचं नव्हतं.

राधा जेथे कुठे जाणार आहे, तेथे तेथे आपण सुध्दा तिच्या बरोबर जावं?
पण राधा का म्हणुन आपल्याला बरोबर घेऊन जाईल?

राधाला सांगावं की फोन निट चालू झालाचं नव्हता?
पण तिने बघीतला होता फोन चालु झालेला, आणि आपल्या सांगण्यावर ती का विश्वास ठेवेल, तिला तिचं स्वातंत्र्य महत्वाचं आहे..

काय करावं..? कबीरची मतीच गुंग झाली होती.

“राधा…”
“हम्म?”

“राधा.. आय एम सॉरी..”
“कश्याबद्दल? आय मीन कश्या-कश्याबद्दल?”, काहीसं हसुन राधा म्हणाली..
“ते मी सकाळी तुला.. ते गेटपाशी म्हणालो… आय-लव्ह-यु.. ते नको होतं म्हणायला!”
“ओह.. सो यु डोन्ट लव्ह मी?”, डोळे मोठ्ठे करत राधा म्हणाली..
“नो.. !.. आय मीन येस.. ! आय मीन.. खुपच चाईल्डीश झालं ना ते.. आपली ओळख ती कितीशी? आपण काही कॉलेजमधले नाही.. असं इन्फ़ॅच्युएशन दाखवायला..”

“तुला खरंच जायलाच हवं का?”, थोड्यावेळ थांबुन कबिर म्हणाला
….

“निदान उद्या जायच्या आधी एकदा मला भेटशील?”
“मी सकाळी लवकर निघेन कबीर, सोफी ऑन्टी उठायच्या आधी..”
“प्लिज राधा.. लुक.. मी काही तरी नक्की मार्ग काढेन आणि तुला जावं लागणार नाही..”
“ईट्स ऑफ़ नो युज कबिर..”
“हे बघ.. जर मार्ग निघाला तर? विल यु स्टे?”

राधाच्या मनातली चलबिचल तिच्या नजरेत दिसत होती.
“तुला वाटतं काही मार्ग निघेल?”
“आय थिंक सो..”
“ऑलराईट..”, राधाने घड्याळात बघीतले १२.३० वाजुन गेले होते.. “तुझ्याकडे ५ तास आहेत कबीर… नंतर कदाचीत मी गेलेली असेन..” असं म्हणुन राधा खोलीकडे निघुन गेली.

कबीरला स्वतःचा प्रचंड राग येत होता.
“काय गरज होती तिचा फोन चालू करुन बघायची?”
“काय गरज होती, अततायीपणा करायची?”
“मुर्ख कुठला.. बस आता बोंबलत…”

कबीर स्वतःलाच शिव्यांची लाखोली वाहात होता. घड्याळाचे काटे बुलेट-ट्रेनच्या वेगाने धावत होते.
विचार करुन करुन कबीरच डोकं ठणकायला लागलं होतं. व्हिस्कीचा अंमल वेगाने डोकं हलकं करत होता खरा, पण त्यापुढे कबीरला काही सुचतच नव्हतं.

एकीकडुन येणारा नदीवरचा गार वारा आणि दुसरीकडे पेटलेल्या निखार्‍यांची उब कबीरल सुखावत होती. कबीर खुर्चीतच रेलुन बसला. कॅफे मध्ये राधाचे झालेले पहीले दर्शन कबीरला राहुन राहुन आठवत होते. अतीव सुखाने कबीरने डोळे मिटुन घेतले. कॅफेचा तो प्रसंग जणु एक चलचित्रपट झाला होता आणि कबीर प्रेक्षक. पाहीजे तसा, पाहीजे त्या अ‍ॅंगलने कबीर तेच दृश्य पुन्हा पुन्हा पहात होता. स्लो-मोशन मध्ये दरवाज्यापासुन कबिरपर्यंत येणारी राधा… वार्‍याच्या झुळकीने चेहर्‍यावर येणार्‍या तिच्या केसांच्या बटा..तिच्या त्या चंदेरी बांगड्यांची नाजुक किणकीण, तिचे टपोरे डोळे….

विचार करता करता कबीरला झोप लागली.


पहाटे कधीतरी, पेटवलेला विस्तव विझला, निखार्‍यांची उष्णता त्या थंडीत विरुन गेली आणि हवेतला गारठा अंगाला झोंबु लागला तसा कबिर खाड्कन जागा झाला.

पहीले काही क्षण आपण कुठे आहे ह्याचंच भान त्याला येईना. जेंव्हा लक्षात आलं तेंव्हा पट्कन त्याने घड्याळात नजर टाकली.

पहाटेचे ३.३० वाजत आले होते

“शिट्ट..”, कबिर चरफडत उठला
इतका महत्वाचा वेळ त्याने वाया घालवला होता.

एखाद्या पिंजर्‍यात कोंडलेल्या वाघासारखा उठुन तो इकडुन तिकडे येरझार्‍या घालु लागला.

“कसं ही करुन राधाला थांबवलंच पाहीजे.. पण कसं?”

अचानक त्याला रोहनची आठवण झाली. त्याने फोन उचलला आणि रोहनचा नंबर फिरवला.

एक रिंग..
दोन रिंग..
दहा रिंग….
पण पलिकडुन काहीच उत्तर नाही.

फोन बंद झाला.

कबिरने परत नंबर फिरवला..
वाजुन वाजुन फोन परत बंद झाला.

“अरे यार.. काय करतोय हा रोहन…कुंभकरण.. इथे माझं आयुष्य टांगणीला लागलंय आणि हा झोपतोय काय..?”
कबिरने पुन्हा नंबर फिरवला…

६-७ वेळा रिंग वाजल्यावर पलीकडुन रोहनचा अर्धवट “हॅल्लो..” ऐकु आलं

“रोहन? रोहन उठ.. कबीर बोलतोय.. उठ लेका..?”
कबिरचा आवाज ऐकताच रोहन जागा झाला. टेबलावरच्या घड्याळात वेळ बघत रोहन म्हणाला, “कबिर, सगळं ठिक आहे ना? अरे एवढ्या रात्री फोन?”

“अरे काही ठिक नाहीये रे बाबा.. बर ऐक.. मला हेल्प हवीय तुझी.. आत्ता..”, कबिर इंपेशंटली म्हणाला
“काय झालं आता? काय घोळ घातलास?”
“अरे राधा चाललीय कुठे तरी.. प्लिज तिला थांबवायचंय.. मार्ग सांग काहीतरी..”, एका दमात कबिरने सांगुन टाकलं?

“म्हणजे? कुठे चाललीय राधा.. आणि इतक्या रात्री? का? आणि मी कसं तिला थांबवायचं ते सांगू?”, वैतागुन रोहन म्हणाला.
“चं, अरे यार.. ती गेली तर खरंच मी वेडा वगैरे होईन रोहन.. तुझी.. तुझी नोकरी जाईल.. एका वेड्या लेखकाला काय गरज मॅनेजरची… अं?”
“कबिर.. जरा मला समजेल अश्या भाषेत बोलशील का प्लिज?” रोहन
“सांगतो.. ऐक..” असं म्हणुन कबिरने आत्तापर्यंत घडलेल्या सर्व घटना त्याला ऐकवल्या..

“अरे पण तिला समजाव ना. नसेल पण फोन ट्रॅकींगवर टाकला..किंवा फोन पुर्ण नव्हता चालु झाला वगैरे..”, कबिरच सांगुन झाल्यावर रोहन म्हणाला..
“अरे झालंय सगळं सांगुन तिला.. पण तिला रिस्क घ्यायची नाहीये.. तिला पक्की खात्री आहे की फोन ट्रॅकींगवर नक्की असणारचं…”, कबिर कपाळावरुन हात फिरवत म्हणाला.

“बरं.. दोन मिनीटं दे.. मी रेस्टरुमला जाऊन येतो..”,रोहन
“तुझ्या…”
“गप्प बसं.. एक तर असं रात्री अपरात्री उठवतोस.. डोकं तर चालायला हवं ना.. अरे जरा तोंड बिंड पण धुतो..आलोच मी..” कबिरला पुढं काही बोलायची संधी न देता रोहन फोन चालु ठेवुन गेला…

दोन मिनीटांनी परत रोहन फोनवर आला..

“सुचलं काही”, कबिरने विचारलं
“कबिर साहेब, अहो उगाच नाही इतकी वर्ष मी तुमचा मॅनेजर.. रोहन म्हणतात मला..”
“म्हणजे? सुचलं काही? सांग.. पट्कन सांग..”, उताविळ होत कबिर म्हणाला
“सुचलं मला नाही, तुलाच सुचलं होतं..”, रोहन
“अरे काय कोड्यात बोलतो आहेस, निट सांग की..”, कबिर

“अरे म्हणजे.. तुझं ते दुसरं रॉबरीवरचं पुस्तक..”
“हं.. त्याचं काय? ते कुठुन आलं आत्ता?”
“अरे त्यातच तर सोल्युशन आहे.. आठव.. त्यातला एक सिन तु म्हणाला होतास ‘दृश्यम’ चित्रपटातपण वापरला आहे म्हणुन..?”
“अरे नाही आठवत ए बाबा.. सोल्युशन काय ते सांग पट्कन…”, कबिर..

“हे बघ.. राधाचं सिम-कार्ड आहे ना? का ते पण तुटलं?”, रोहन..
“आहे.. सिम आहे, फोन तुटला होता..”, कबिर

“गुड.. मग एक काम कर.. उद्या एक स्वस्तातला फोन घे.. त्यात तिच सिम-कार्ड टाक, फोनची बॅटरी फार चार्ज न करता, फोन चालु कर.. आणि दे टाकुन तो फोन एखाद्या मालवाहू ट्रक मध्ये…”, रोहन..

“ओह्ह.. येस्स आठवलं… तो फोन त्या ट्रकबरोबर जाईल कुठेतरी दुसरीकडे.. आणि दिवसभरात कधीतरी बॅटरी संपली की बंद पडुन जाईल.. सो ट्रॅकिंगवर दिसेल की राधा गोव्यातुन बाहेर पडलीय आणि दुसरीकडेच कुठेतरी आहे…”, आनंदाने एक उंच उडी मारत कबीर म्हणाला..
“जमलं बुवा.. हुश्श..”, हसत हसत रोहन म्हणाला..
“रोहन्या यार.. यु आर जिनीयस.. थॅक्यु सो.. मच..”
“अहो तुमचीच आयडीयाची कल्पना आहे ही.. मी फक्त आठवण करुन दिली…”
“हो यार.. खरंच डोकचं चालत नव्हत माझं..चल ठेवतो फोन आणि आत्ता राधाला जाऊन सांगतो हा प्लॅन..”, कबिर

“कबिर, एक विचारु?”, रोहन म्हणाला
“अरे विचार ना यार.. ये जिंदगी भी मांग ले तो हाजीर है तेरे लिए…”, कबिर
“आर यु शुअर अबाऊट राधा? आय मिन, खरंच तुला ती आवडते का? का फक्त टेंम्पररी…”
“आय एम डॅम्न शुअर रोहन… मी तिच्या बाबतीत चुकुच शकत नाही…”
“पण ती एक विवाहीत आहे, उद्या तिने ठरवलं नवर्‍याकडे परत जायचं तरं?”
“मी तशी वेळच येऊ देणार नाही कबिर… मी तिच्यावर इतकं प्रेम करेन की ति त्या अनुरागला विसरुनच जाईल बघ..”
“इफ़ दॅट्स द केस.. देन गो अहेड.. लिसन टू युअर हार्ट.. आणि हो, परत येशील इकडे तेंव्हा दोघींना घेऊनच परत ये…”, रोहन
“दोघींना?”
“हो.. दोघींना !! राधा.. आणि मेहतांची स्टोरी.. विसरलास का?”
“ओह येस्स.. नक्की नक्की…”
“मेहता विचारत होते, काही जमतंय का म्हणुन.. शक्य असेल तर निदान कन्स्पेट मेल कर त्यांना…”
“गप रे.. आत्ता फक्त आणि फक्त राधा.. बघु त्या मेहतांच काय करायचं ते नंतर.. चल तु झोप आता.. बाय..”, असं म्हणुन कबिरने फोन ठेवुन दिला..


फोन ठेवला आणि कबिर धावतच राधाच्या रुमकडे गेला.
दरवाज्यावर थाप मारायच्या काही क्षण आधी कबिर तेथे घुटमळला. त्याच्या हृदयाची धडधड अचानक वाढली होती.

त्याने आपल्या चेहर्‍यावरुन हात फिरवला आणि विस्कटलेले केस निट केले.

“काय म्हणेल राधा? तिला नक्कीच माझ्या ह्या कल्पनेचे कौतुक वाटेल. कदाचीत ती लगेच कन्व्हिंन्स होईल, नाही झाली तरी मी नक्की करुन शकेन.. धिस इज द आयडीया दॅट विल डेफ़ीनेटली वर्क…”

कबिर स्वतःशीच विचार करत होता.

त्याने हलकेच दारावर थाप मारली..
काही क्षण शांततेत गेली.

कबिरने पुन्हा एकदा थोड्याश्या जोरात थाप मारली.
दार हलकेच उघडले गेले..

कबिरने दार उघडले.. आतमध्ये पुर्ण अंधार होता आणि एक विचीत्र शांतता..

कबिरने चाचपडत खोलीतला दिवा लावला आणि अंधारात बुडालेली खोली उजळुन निघाली.
खोली पुर्ण रिकामी होती.

कबिरचा क्षणभर आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना.. त्याने सभोवार नजर टाकली, पण खोलीत कोणीच नव्हते.
राधाचे कपडे, बॅग्स.. चप्पल्स.. काही काहीच नव्हते…

आपण चुकीच्या खोलीत तर आलो नाही ना म्हणुन कबिर माघारी वळणार इतक्यात शेजारच्या टेबलावर ठेवलेल्या कागदाकडे कबिरचे लक्ष गेले..

थरथरत्या हाताने कबिरने तो कागद उलगडला..


कबिर,

सॉरी, तुला न भेटताच जाते आहे.. पण जायलाचं हवं. ह्या जिवनाकडुन मला खुप अपेक्षा आहेत आणि त्या मला पुर्ण करायच्याच आहेत. मला परत माझ्या आयुष्यात नाही जायचंय कबिर. आय होप यु विल अंडरस्टॅन्ड..

कदाचीत तु काही मार्ग काढला असतासही, परंतु…
हे बघ, तु ‘आय-लव्ह-यु’ म्हणुन आपल्यात कदाचीत निर्माण होऊ शकणारी निखळ मैत्री थोपवलीस. ह्यापुढे कितीही प्रयत्न केला असता, तरी तुझ्या आणि माझ्या मनातही तुला माझ्या बद्दल वाटणार्‍या भावना आल्याच असत्या.. आय नो यु लव्ह मी..! तुझ्या डोळ्यात ते मला स्पष्ट दिसतंय कबिर.. कदाचीत तु म्हणला नसतास तरीही..

पण मला तेच नको आहे कबिर.. मला रिलेशन्सच नको आहेत, मला अ‍ॅटेचमेंट्स नको आहेत.. मला परत त्यात नाही पडायचंय.. कदाचीत मी चुकीची असेन.. आज नाही तर उद्या मला त्याची जाणिव होईलही, पण तोपर्यंत तरी मला माझ्याच टर्मसवर जगायचंय.

विश मी लक कबिर.. विश दॅट मी माझी स्वप्न पुर्ण करु शकेन.. मी माझं आयुष्य मला जसं हवंय तसं जगु शकेन.. आणि हो.. तुला सुध्दा तुझ्या पुस्तकासाठी खुप सार्‍या शुभेच्छा. मी तुझ्या पुस्तकाची वाट बघतेय. मी जेथे कुठे असेन.. तुझं पुस्तक पब्लिश झालं की नक्की वाचेन..

आणि हो.. शेजारचं पाकीट सोफी ऑन्टीला दे… उगाच उचकुन बघु नकोस.. मी त्यात माझा पत्ता किंवा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देत नाहीए, रुमंचं भाडं आणि अश्याच काही गप्पा.. सो बी अ जंन्टलमन..

गुड बाय देन….
राधा….

कबिरच्या जणु पायाखालची जमीनच सरकल्यासारखं वाटलं.
क्षणभर त्याला वाटलं की कदाचीत राधा त्याची मजा करतेय.. पण रिकामी खोली त्या पत्राच्या सत्यतेची जाणिव करुन देत होती. कबिरची लव्ह-स्टोरी सुरु व्हायच्या आधीच संपली होती.

आयुष्यात येऊ घातलेल्या रितेपणाचं ओझं त्याचे पाय सावरु शकले नाहीत..
कबिर ते पत्र छातीशी कवटाळुन मट्कन खाली बसला..

[क्रमशः]