इश्क – (भाग ८) Aniket Samudra द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

इश्क – (भाग ८)

कबिर तिथे किती वेळ बसला होता? त्यालाच माहीत नाही. कदाचीत दोन मिनीटं असेल, कदाचीत दोन तासही असेल. प्रश्न तो नव्हताच, प्रश्न होता राधा निघुन गेली पुढे काय?

काही क्षण ओसरल्यावर कबिर भानावर आला. त्याच्यात लपलेला गुन्हेगारी-कथा-लेखक जागा झाला. राधाने काही तरी ‘क्ल्यु’ सोडला असेलच की. काही तरी, ज्यावरुन राधा कुठे गेली ह्याचा पत्ता लागेल. कित्तेक सराईत गुन्हेगार सुध्दा गुन्हा करताना नकळत काहीतरी खूण सोडून जातातच…

कबिर नव्या उमेदीने उठला आणि त्याने राधाची खोली शोधायला सुरुवात केली. कपाटं, टेबलाचे ड्राव्हर्स, बेडखाली, डस्टबीन जेथे शोधता येईल तेथे.. पण कागदाचा एक साधा कपटा सुध्दा सापडला नाही.

कबिर स्वतःशीच चरफडत होता… ‘थिंक कबिर.. थिंक…’
त्याने घड्याळात पाहीलं.. ३.३० वाजुन गेले होते.

अचानक त्याच्या डोक्यात ट्युब पेटली. इतक्या रात्री, राधा इथुन चालत तर कुठे गेली नसेल…रिक्षा ह्या आड बाजुला मिळणार नाही.. म्हणजे..
म्हणजे.. तिने नक्कीच कॅब बोलावली असणार.. आणि कॅब बोलवायला तिच्याकडे फोन नव्हता.. म्हणजे…

कबिर धावतच हॉलमधल्या लॅंडलाईन फोनपाशी गेला.
फोनचा रिसीव्हर उचलताना कबिरच्या हृदयाची धडधड वाढली होती, शेवटचा हा रिसीव्हर उचलला गेला होता तेंव्हा नक्कीच राधाच्या हातांचा स्पर्श त्याला झाला असणार…

कबिरने रिडायलचे बटण दाबले..
काही क्षण रिंग वाजली आणि पलीकडून आवाज आला.. ‘हॅल्लो.. डायल कॅब…’

कबिरला मैदान मारल्याचा जोश आला..

“हॅल्लो.. मी साऊथ-गोव्यातुन बोलतोय.. साधारण तासाभरापुर्वी माझ्या मिसेसने एक कॅब ऑर्डर केली होती.. अम्म.. अ‍ॅक्च्युअली तिची लॅपटॉपची बॅग गाडीत राहीलीय.. प्लिज जरा गाडीचा नंबर बघुन चेक करता का?”

“वन मिनीट.. होल्ड..”, काही क्षण शांततेत गेले..

“कुठे ड्रॉप होता सर?”, पलीकडून परत आवाज आला..
“एअरपोर्ट…”, कबिरने तुक्का मारला..

“सॉरी सर..”, गेल्या दोन-चार तासात एअरपोर्ट ड्रॉप एक पण कॉल नव्हता..
“प्लिज चेक करुन बघा ना एकदा…” कबिर
“चेक केलय सर.. एअरपोर्ट ड्रॉप कुठलाच नव्हता..”
“हे बघा.. लॅपटॉपमध्ये महत्वाचा डेटा आहे..”
“सॉरी सर.. ओल्ड गोव्यातुन दीड तासापुर्वी एक पिक-अप होता, पण तो एअरपोर्टला नाही, बस-स्टॅंन्डला होता…”
“ओह्ह.. हे कॅब-डायलचाच नंबर आहे ना?”, कबिर
“नो सर.. इट्स डायल-कॅब, आमची ५ वर्षापासुनची सर्व्हिस आहे.. कॅब-डायल चार महीन्यांपुर्वी सुरु झालीय.. आमची क्रेडेबिलीटी घ्यायला सेम नाव ठेवलय सर…”, पुढची पाच मिनीटं तो कॅब-डायलमुळे कसे त्यांचे कस्टमर कमी झाले आहेत आणि अशी नावं ठेवण कसं इल्लीगल आहे ह्यावर भाष्य करत राहीला..

कबिरने त्याच्याशी संभाषण आवरत घेतलं आणि फोन ठेवुन दिला.

“सो राधा बसस्टॅन्डला गेली होती तर..”

कबिरने उबरचे अ‍ॅप उघडले आणि जवळची कॅब किती अंतरावर आहे बघीतलं. त्याच्या नशीबाने ५ मिनीट ड्राईव्ह-डिस्टंन्सवर कॅब होती. कबिरने पटकन बस-स्टॅंन्ड ड्रॉपसाठी कॅब बुक केली. धावतच तो खोलीत गेला, जिन्स आणि स्पोर्ट्स-जॅकेट चढवले आणि पळतच तो गेटपाशी गेला.

दोन मिनीटांतच कॅब हजर झाली.

कबिर बस-स्टॅंन्डवर पोहोचला तेंव्हा सर्वत्र बर्‍यापैकी सामसुम होती. बस-स्टॅंन्ड बर्‍यापैकी पेंगुळलेलाच होता.
अधुनमधुन येणार्‍या बसभोवती गरम चहा-कॉफी, सामोसा-वडापाव विक्रेत्यांची गर्दी जमे ती तेवढ्यापुरती. बस गेल्यावर परत सर्वत्र शांतता. ख्रिसमस जवळ आल्याच्या खाणाखुणा कॅंन्टीनमधुन दिसत होत्या. कांचांवर चिकटवलेले सॅंन्टा, रंगेबिरंगी दिव्यांनी पिवळट ट्युबलाईटच्या प्रकाशात सजवलेला साज, क्रिसमस-आणि इअर-एन्डच्या पार्टीजचे माहीती देणारे उभे रहात असलेले साईन-बोर्ड्स दिसु लागले होते.

कबिरची भिरभीरती नजर मात्र राधाचाच शोध घेत होती.

प्रत्येक प्लॅटफॉर्म, वेटींग रुम, लगेज रुम, कॅन्टीन सर्व शोधुन झाले पण राधाचा कुठेच पत्ता नव्हता. निराश मनाने कबिरने चौकशी-खिडकी गाठली.

“काका, गेल्या दोन तासात इथुन कुठल्या-कुठल्या बसेस गेल्या सांगु शकाल का?”, कबिरने विचारले
“तुम्हाला कुठे जायचेय?”, आळसावलेले समोरचे काका उत्तरले
“नाही, मला कुठे नाही जायचेय.. पण थोडी माहीती हवी होती..”, कबिर
“आता अश्या अनेक बसेस इथुन गेल्या.. इथुन निघालेल्या.. किंवा दुसरीकडुन आलेल्या पण प्रवासी थांबा म्हणुन थांबलेल्या.. तुम्हाला कुठल्या हव्यात?”
“सगळ्या सांगा…”, कबिर अधीरतेने म्हणाला आणि खिश्यातुन एक शंभराची नोट काढुन त्याने खिडकीतुन सरकवली.

पुढची ५ मिनीटं त्या काकांनी अनेक विवीध गावांची यादी वाचली. राधा ह्यापैकी कुठल्याही बसमधुन गेली असु शकत होती. हा प्रकार म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखे होते. शिवाय ह्या बसेसचा पाढा फक्त स्टेट-ट्रांन्स्पोर्टचा होता. स्टेशनच्या बाहेरही अनेक प्रायव्हेट बसेस उभ्या होत्या.

कबिर हताश मनाने कपाळावर हात ठेवुन उभा राहीला.. राधा एव्हाना त्याच्यापासुन कित्तेक किलोमीटर दुर अनभिज्ञ दिशेने निघुन गेली होती.


१५ दिवसांनंतर…

मेहतांच्या ऑफीसमध्ये रोहन कोल्ड कॉफीचे घोट घेत बोलत होता..

“नो सर… १५ दिवस होऊन गेले, कबिरचा काहीच पत्ता नाही. त्याचा फोन स्विच्ड ऑफ येतोय, आणि त्याच्या हॉटेलच्या.. आय मिन.. त्या होम-स्टेचा सुध्दा माझ्याकडे काहीच नंबर नाहीये…”

“हाऊ कॅन ही डू धिस रोहन? शेवटी हा बिझीनेस आहे.. इतक्या दिवसांत निदान आम्हाला कथेची एक कंन्सेप्ट तर मिळायला हवी होती. मला सुध्दा उत्तर द्यावी लागतातच ना. डेडलाईन्स सगळ्यांनाच असतात रोहन..”, मेहता काहीसे चिडून बोलत होते.
“आय अंडरस्टॅन्ड सर.. मी खरं तर त्याला सांगीतलं सुध्दा होतं की कंन्सेप्ट मेल कर म्हणुन. कबिर मुद्दाम असं करणार नाही. नक्कीच काही तरी प्रॉब्लेम झाला असेल..”, रोहन
“मग आता काय करायचं आपण?”, मेहता
“सर मला वाटत हा आठवडा आपण वाट बघुयात.. कबिर नक्की कॉन्टॅक्ट करेल..”, रोहन
“आय होप सो रोहन.. नाही तर मला हा प्रोजेक्ट नाईलाजाने कॉल ऑफ करावा लागेल.. पुस्तकांची पाईपलाईन आमच्याकडे आहे.. बाकीच्यांनी मी इतके दिवस होल्डवर ठेवु शकत नाही..”
“शुअर सर.. मी समजु शकतो..”, रोहन बोलतच होता इतक्यात त्याच्या मोबाइलची रिंग वाजली..

“कबिरचा फोन..”, रोहन अत्यानंदाने म्हणाला.. त्याच्या मनावरचे मोठ्ठे दडपण उतरले होते. एकतर कबिरची काळजी होतीच.. पण मेहता जसं म्हणत होते, तसं खरंच प्रोजेक्ट हातचा गेला असता तर पंचाईत झाली असती..

“मे आय?”, रोहन खुर्चीतुन उठत मेहतांना म्हणाला

मेहतांच्या संमतीची वाट न बघताच रोहन केबीनमधुन बाहेर पडला..
“अरे काय हे कबिर, काय पत्ता आहे तुझा? १५ दिवस होऊन गेले तुझा फोन सुध्दा बंद आहे, तुला मेहतांना कंन्सेप्ट मेल कर म्हणलो होतो त्याचंही काही उत्तर नाही.. कुठे आहेस कुठेस तु?”, रोहन

“मी ऑफीसमध्येच आहे रोहन..?”, कबिर थंड स्वरात म्हणाला…
“ऑफीसमध्ये.. यु मिन तुझ्या ऑफीसमध्ये?”, रोहन
“हो.. माझ्याच ऑफीसमध्ये..”, कबिर

“कधी आलास कधी तु?”
“दहा दिवस झाले…”
“व्हॉट… दहा दिवस झाले तुला इथे येऊन आणि कुणाला पत्ताही नाही त्याचा.. अरे झालय काय तुला.. इथे मी मेहतांच्या ऑफीसमध्ये अजुन कंन्सेप्ट रेडी नाही म्हणुन त्यांची बोलणी खातोय आणि तु…”
“डोन्ट वरी रोहन.. मेहतांना घेऊन माझ्या ऑफीसवर ये कंन्सेप्ट काय, पुर्ण कथाच देतो मी…”
“आर यु सिरियस?”, आनंदाने रोहन म्हणाला..
“येस रोहन.. कथा तयार आहे, दहा दिवस मी रात्रं-दिवस ह्यावरच काम करत होतो. मला कुणाचाच डिस्टरबंन्स नको होता, सो फोन बंद ठेवला होता…”
“ओके ओके.. मी.. मी पोहोचतो तासाभरात.. मेहतांना पण घेऊन येतो.. ओके?… ग्रेट यार.. ग्रेट न्युज कबिर…”, केसांमधुन हात फिरवत रोहन म्हणाला.


कबिरने छापलेल्या त्या पानांवरुन अलगद हाथ फिरवला. `राधा’चं नाव त्याने ‘मीरा’ बदललं होतं, तर मिडीया टायकून ‘अनुराग’ चा कुणी ‘शर्मा’ बनवला होता. पण हे सगळे बदल कथानकापुरते होते. कबिरच्या लेखी त्या प्रत्येक पानांमधुन फक्त आणि फक्त राधाचं होती. तिच्याबद्दल लिहीताना कबिर इतका एकरुप झाला होता की लिहीताना कित्तेक वेळा त्याला आजुबाजुला राधा असल्याचा भास होई.

आपल्याला इतक्या कमी वेळात राधा का आवडली असावी हा प्रश्न कबिरला राहुन राहुन पडत होता. राधा अशी एकमेव सुंदर मुलगी नव्हती जी कबिरने बघीतली होती. कबिरची पहीली दोन पुस्तक हिट झाली तेंव्हा कित्तेक मुलींचे त्याला फोन यायचे, कित्तेक जणी सोशल-मिडीयावर चॅट करताना त्याच्याशी फ्लर्ट करायच्या. पण कबिरला कधीच कुणाबद्दल इतक आकर्षण वाटलं नाही जितकं त्याला राधाबद्दल वाटत होतं.

“समोरची व्यक्ती आपल्याला केंव्हा आवडते?”, कबिरच्या दोन मनांचा एकमेकांशी संवाद सुरु होता
“जेंव्हा कदाचीत त्या व्यक्तीमध्ये आणि आपल्यामध्ये काहीतरी कनेक्शन आहे असं जाणवतं तेंव्हा..”
“म्हणजे कसं?”
“म्हणजे असं बघ, जेंव्हा समोरच्या व्यक्तीशी आपली नजरानजर होते तेंव्हा चेहर्‍यावर काहीही भाव असले तरी, डोळे कधी खोटं बोलत नाहीत.. जेंव्हा त्या व्यक्तीच्या डोळ्यातले भाव आपल्या मनाला भावतात, जेंव्हा त्या डोळ्यात तुसडेपणा नाही तर आपल्याबद्दल प्रेम दिसते तेंव्हा कदाचीत..”
“ओह यु मीन.. तुला असं म्हणायचंय की राधा पण तुझ्या प्रेमात पडलीय?”
“माहीत नाही.. कदाचीत तो भास असेल.. पण हो मला वाटतं तसं..”
“म्हणजे नक्की कधी असं वाटलं..?”
“त्याच दिवशी रात्री.. तिचे डोळे खुप काही बोलत होते.. खुप काही सांगु पहात होते.. पण काय ते माझं मलाच कळत नव्हतं. किंवा कळत होते, पण वळत नव्हते.
“मग ती तुला सोडुन का गेली?”
“हे बघ.. तुझी निगेटीव्हीटी मला पटत नाही…”
“पण तु सुध्दा खुप ऑप्टीमिस्टीक होतो आहेसच की..”
“असेल.. पण माझं म्हणण्ं खरं की खोटं हे राधा भेटल्याशिवाय कळणार नाही..”

कबिरचा हा दोन मनांचा संवाद अखंड चालु होता. कधी ह्या मनाचा विजय तर कधी त्या.. पण त्या दोघांच्या भांडणात कबिरची मात्र प्रचंड फरफट होत होती.

ते दहा दिवस कबिरने स्वतःला पुरते कोंडुन घेतले होते. राधाबद्दल लिहीताना, तिच्याबद्दलच्या भावना मांडताना त्याला कुणाचीही मध्ये मध्ये लुडबुड नको होती.

लिहुन झाल्यानंतर जणु कबिर पुर्ण रिता झाला होता. पहिल्यांदा जेंव्हा त्याने ते पुस्तक वाचले तेंव्हा त्याला स्वःताचेच आश्चर्य वाटले होते. खून-मारामार्‍या, दरोडे, किडनॅपिंग लिहीणारा अचानक असे प्रेमरसाने ओतप्रोत भरलेले लिखाण करु शकतो ह्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. पुस्तक मार्केटमध्ये यशस्वी ठरो किंवा न ठरो, फक्त एकदा राधाने हे पुस्तक वाचावे एवढीच कबिरची मनोमन इच्छा होती. प्रत्यक्षात आपल्या मनातल्या भावना तिला बोलुन दाखवु शकलो नाही, कदाचीत लिखीत शब्दांच्या रुपाने ह्या भावना तिच्यापर्यंत पोहोचाव्यात असे त्याला वाटत होते.


एकदम पुस्तकच तयार आहे हे ऐकल्यावर मेहतांची कळी खुलली होती.

“हॅल्लो यंग मॅन..”, कबिरच्या ऑफीसमध्ये शिरताच मेहता म्हणाले
“हॅलो सर.. सॉरी, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नाही करु शकलो”, कबिर..
“इट्स ओके सन, नो प्रॉब्लेम अ‍ॅट ऑल..”, मेहता

कबिरने त्यांना प्रुफ़-रिडींगसाठीच्या खोलीत बसवले आणि त्यांच्या हातात ती छापील पाने ठेवली.

“मी कॉफी पाठवुन देतो..”, कबिर मेहतांना म्हणाला…
“एक नाही पुरणार… जो पर्यंत वाचुन होत नाही तो पर्यंत पाठवत रहा..”, मेहता हसत हसत म्हणाले.

मेहता खोलीत गेल्यावर रोहन कबिरकडे आला..

“अरे काय हे? जरा सांगशील का कुठे होतास ते? आणि राधाचं काय झालं? घेऊनच आलास की काय तिला? अं?”, चेष्टेने रोहन म्हणाला खरा, पण कबिरच्या चेहर्‍यावरची उदासी पाहुन त्याच्या एकुण प्रकार थोडाफार लक्षात येत होता.

“काय झालंय? एव्हरीथींग ऑलराईट?”, रोहन
“नो रोहन.. नथींग इज राईट… नथींग इज राईट..”, कबिर
“यु वॉंट टू टॉक?”, रोहन
“नो..डोन्ट वॉंट टु.. त्यापेक्षा एक काम कर.. मेहतांबरोबर तु पण एकदा वाच.. जे घडलं, जसं घडलं ते सगळंच्या सगळं लिहीलय मी त्यात..”, कबिर म्हणाला…
“ओके देन..”, असं म्हणुन रोहनही मेहता बसले होते त्या खोलीत गेला.


साधारण ३ तासांनंतर दोघंही जण खोलीतुन बाहेर आले…

“एस्कलंट.. एक्स्लंट.. सुपर्ब.. वेल डन मॅन..”, मेहता खुशीने बाहेर आले…
“मी म्हणलो नव्हतो.. हे शिवधनुष्य कबिर पेलणार म्हणुन..”, रोहनची पाठ थोपटत मेहता म्हणाले…

“थॅंक्यु.. थॅंक्यु सर…”, कबिर
“पण मला शेवट कळला नाही.. आय मीन अशी अर्धवट वाटली मला गोष्ट.. ती ‘मीरा’ अशी अचानक त्याच्या आयुष्यातुन निघुन जाते… गोष्टीला काहीतरी शेवट हवा ना. निदान ती का गेली, कुठे गेली.. नायकाचं पुढे काय झालं वगैरे…”, मेहता

“येस सर.. गोष्ट अपुर्ण आहे.. मुद्दामच ठेवलीय…”, कबिर
“म्हणजे..”
“म्हणजे आपण ह्याचा दुसरा भाग काढणार आहोत ६-८ महीन्यांत…”
“ओहो.. स्प्लेंडीड आयडीया.. गुड बिझीनेस माईंड..”
“तो कुठल्याश्या सिनेमातला डायलॉग नाही का सर…फिल्मोंकी तरहं हमारी जिंदगी मै भी एन्ड मै सब ठिक हो जाता है.. हॅपीज एन्डींग्ज.. और अगर सब-कुछ ठिक ना हो.. तो वो द एन्ड नही है दोस्तों.. पिक्चर अभी बाकी है…”

कबिर बोलत होता आणि नविन बिझीनेसची संधी पाहुन मेहता खुश होत होते.. पण ह्या क्षणी कबिरला कोणी समजु शकत असेल तर तो होता रोहन…

“ऑलराईट.. कबिर… रोहन.. मी ह्या प्रिंट्स आमच्या प्रुफ़-रिडरना देतो.. थोडे फार बदल करुन फायनल-ड्राफ्ट पाठवुन देतो २-४ दिवसांत आणि मग.. मग छपाई चालु करु.. पानांची आणि नोटांची… काय??” असं म्हणुन मेहता निघुन गेले…

मेहता निघुन गेल्यावर तेथे एक विचीत्र शांतता पसरली होती.
काही क्षण शांततेत गेल्यावर रोहन म्हणाला..

“तु राधाचा फोटो काही मला दाखवला नाहीस.. पण तुझं पुस्तक वाचल्यावर आय कॅन इमॅजीन हाऊ ब्युटीफुल शी इज…”
“हम्म..”
“सो.. आता काय करायचं ठरवलं आहेस..”
“काहीच नाही.. काहीच ठरत नाहीये…”
“यु नो तिचं लग्न झालंय… तुला हे ही माहीत नाहीये की तिला तु आवडतोस की नाही.. पुन्हा भेटल्यावर.. जर कधी भेटलीच तर ती तुझ्याबरोबर येईल की नाही…”
“हम्म..”
“तरी पण तुला तिला विसरायचं नाहीये…??”
“ते इतकं सोप्प नाहीये रोहन…”
“मी कुठे म्हणतोय सोप्प आहे.. पण मला वाटतं तु प्रयत्न करावास. विसरु नकोस तु लेखक आहेस.. असा देवदास होऊन राहीलास तर ही एक-दोन पुस्तकांनंतर परत आपलं…”

कबिरने चिडुन रोहनकडे पाहिलं..

“हे बघ.. मी रिअलिस्टीक बोलतोय.. कदाचीत तुला आत्ता पटणार नाही.. पण तु शांतपणे विचार कर ह्याचा… बाय द वे.. मोनाचा ४-५ वेळा फोन येऊन गेला.. तुला खुप ट्राय करत होती.. पण तुझा फोन बंदच होता…”, रोहन..
“मोनिकाचा फोन? आणि माझ्यासाठी?”, आश्चर्यचकित होत कबिर म्हणाला..
“हम्म.. इतके दिवस तुझा फोन बंद तिला चिंता वाटत होती.. म्हणुन सारखं मला फोन करुन विचारत होती तुझ्याबद्दल..”
“स्ट्रेंज..”
“हे बघ कबिर.. कदाचीत मोनिकाच तो मार्ग असेल तुला ह्यातुन बाहेर पडण्याचा.. झालं गेलं सगळंच विसरुन जा.. तुझ्या आणि मोनामधली भांडणं आणि राधा… स्टार्ट अ न्यु लाईफ़.. तिला फोन कर एकदा.. पुढे जे नियतीच्या मनात असेल ते होईल..”, कबिरच्या खांद्यावर थोपटत रोहन म्हणाला आणि तो बाहेर निघुन गेला..

कबिर बराच वेळ हातातल्या फोनकडे बघत राहीला आणि शेवटी त्याने मोनिकाचा नंबर डायल केला….

[क्रमशः]