Dukhi - 3 books and stories free download online pdf in Marathi

दुःखी.. - 3

दुःखी..

पांडुरंग सदाशिव साने

३. अघटित घटना

लिलीची आई हिंडत हिंडत एका शहरात आली. तेथे एक मोठा कारखाना होता. त्या कारखान्यात तिला नोकरी मिळाली. एका लहानशा खोलीत ती राहात असे. काटकसरीने वागत असे. आपल्या मुलीसाठी पैन् पै शिल्लक टाकीत असे.या कारखान्याचा मालक फार उदार होता. त्याचा इतिहास मोठा विचित्र होता. तो या शहरात कधी, कोठून आला ते कोणास फारसे माहीत नव्हते. तो खूप श्रीमंत होता; परंतु त्याला मूलबाळ कोणी नव्हते. त्याला कोणीच नव्हते. तो एकटाच होता. एका मोठया बंगल्यात तो राहात असे. त्याने अनेक धर्मशाळा बांधल्या. अनेक सार्वजनिक विहिरी खणविल्या. त्याने मोफत दवाखाने घातले. अनाथालये उघडले. जिकडेतिकडे त्याची कीर्ती पसरली. सरकारी अधिकारी त्याला मान देत, जनता त्याच्यावर प्रेम करी.तो त्या शहराच्या नगरपालिकेचा अध्यक्ष होता. नेहमी तो निवडून येई. निवडून येण्यासाठी त्याला खटपट करावी लागत नसे. सर्वांच्या हृदयात त्याला स्थान होते. अशा या उदार पुरुषाच्या कारखान्यात लिलीची आई कामाला जाई. काही दिवस गेले; परंतु पुढे निराळीच परिस्थिती उत्पन्न झाली. त्या कारखान्यात दोन भाग होते. एका भागात सारे पुरुष कामगार होते. दुसर्‍या भागात सार्‍या बाया होत्या. बायांवर देखरेख करणार्‍या बायाच होत्या.बायकांचा स्वभाव मोठा जिज्ञासू असतो. त्यांना चौकश्या फार कराव्याशा वाटतात. ही नवीन आलेली बाई कुठली, कोण याची माहिती त्या काढू लागल्या; परंतु फार माहिती मिळेना.

'ती एकटी असते.' एक जण म्हणाली.'नवरा वगैरे नाही वाटतं?' दुसरी म्हणाली.'तिचं कोणीच नाही का कुठं?' तिसरीने विचारले.'ती पोस्टात जाते व कोणाला तरी पैसे पाठवते.' चौथी म्हणाली.'कोणाला पाठवते पैसे? काही तरी काळंबेरं आहे. चांगल्या चालचलणुकीची दिसत नाही ही बाई.' पाचवी म्हणाली.बायांची अशी बोलणी एके दिवशी चालली होती. पोस्टात जाऊन बातमी काढण्याचे एकीने ठरविले. शेवटी त्यांना कळले की, एका मुलीला पैसे पाठविण्यात येतात. कोण ही मुलगी? ही का पैसे पाठवते? हिचीच असेल मुलगी? मग ही त्या मुलीला येथे का आणीत नाही? नवरा कोठे आहे? काही तरी भानगड आहे खास.लिलीची आई कारखान्यात जाताच सार्‍या बाया तिच्याकडे बघत. कोणी नाके मुरडीत. कोणी फिदीफिदी हसत; परंतु ती शांतपणे काम करू लागे. होता होता या गोष्टींची फारच वाच्यता होऊ लागली. एके दिवशी मुख्य बाई लिलीच्या आईला म्हणाली, 'येत्या एक तारखेपासून तुम्हाला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. वाईट चालीच्या बायका इथं नकोत.''परंतु मी वाईट चालीची नाही. वाईट चालीची असते तर इथं भीक मागत आल्ये नसते. दिवसभर राबत बसले नसते. मी सुंदर होते. अजूनही सुंदर आहे.' ती म्हणाली.'मला जास्त बोलायचं नाही. इथं शिस्त राहिली पाहिजे. सार्‍या बाया तुमच्या नावानं बोलतात. तुम्ही गेलेल्याच बर्‍या.' मुख्य अधिकारीण म्हणाली.'माझ्या लिलीचं कसं होईल? मी तिला कोठून पाठवू पैसे? तिच्यासाठी हो सारं. मी एकटी असते तर कधीच जगाला रामराम केला असता. नका मला घालवू.' ती म्हणाली.'सांगितलं ना की, इथं पापी माणसं नकोत म्हणून? जा नीघ. का शिपायाकडून घालवू?' ती मुख्य बाई दरडावून म्हणाली.लिलीची आई दु:खाने बाहेर पडली. 'आता कुठं पाहायचं काम? कारखान्याचा मालक उदार म्हणतात; हाच का त्याचा उदारपणा? मला काढून टाकलेलं त्याला का माहीत नसेल? त्याच्या परवानगीनं सारं होत असेल. का काढलं त्यानं मला? कोणता माझा अपराध? काय केलं मी? अरेरे! आता कुठं जाऊ मी? कोण देईल मला काम?'

तिला कपडे शिवण्याचे काम मिळाले. एका दुकानदाराने तिला उक्ते काम दिले. शंभर कपडे शिवून दिले तर अमुक इतके पैसे द्यावयाचे असे ठरले. लिलीची आई रात्रंदिवस शिवीत बसे! तिचे हात दुखून येत. सुईने शिवता शिवता हाताला भोके पडण्याची पाळी आली; परंतु ती शिवीत बसे. मुलीला पैसे नकोत का पाठवायला?परंतु त्या दुकानदाराला दुसरा एक माणूस भेटला. तो आणखी कमी पैशात काम करून देणारा होता. लिलीच्या आईचे हे काम गेले. तिने त्या मालकाला पुष्कळ सांगून पाहिले; परंतु तो ऐकेना. तो म्हणाला, 'व्यवहार आहे. इथं दया करून कसं चालेल? माझं दिवाळं निघायचं. जो कमीत कमी पैशांत शिवून देईल, त्यालाच मी काम देईन.'लिलीच्या आईला कोठे काम मिळेना. ती सर्वत्र भटकली; परंतु काम नाही. ती आता एकदाच जेवी. मुलीसाठी पैसे पुरले पाहिजेत. परंतु एक दिवस त्या खाणावळवाल्याचे, अधिक पैसे पाठवा, असे पत्र आले.'तुमची मुलगी फार आजारी आहे. डॉक्टराचं बिल बरंच झालं आहे. तिला गरम कपडे करावे लागले. चहाकॉफी, फळं यांचाही बराच खर्च येतो. तरी या वेळेस तुम्ही पंचवीस रुपये तरी पाठवा.' असे ते पत्र होते. कोठून पाठवायचे पंचवीस रुपये? सारी शिल्लक संपली होती. दहा रुपये फक्त जवळ होते. काय करावे ते त्या मातेला समजेना. ती दु:खाने वेडी होऊन खोलीत बसली होती.इतक्यात त्या घराचा मालक तेथे आला.'काय पाहिजे?' तिने रडत रडत विचारले.'तुमच्या दु:खाचं कारण विचारायला मी आलो आहे,' तो म्हणाला.'पैसे, मला पैसे पाहिजेत. कोठून आणू? काम ना धाम, काय करू समजत नाही,' ती म्हणाली.

'मी सुचवू एक उपाय?' त्याने भीतभीत विचारले.'हं, सुचवा.' ती आशेने म्हणाली.'रागावणार नाही ना?' त्याने प्रश्न केला.'उलट आभार मानीन.' ती म्हणाली.

'हे पाहा, तुमचे केस फारच सुंदर आहेत. एका नाटक कंपनीला ते हवे आहेत. तुम्ही जर ते कापून द्याल तर तुम्हाला त्यांची योग्य ती किंमत ती कंपनी देईल. तुम्हाला वाईट का वाटत आहे? मी एक उपाय सुचविला.' तो म्हणाला.'केस कापून देऊ?' तिने दु:खाने विचारले.'दुसरा कोणता उपाय?' तो म्हणाला.'बरं तर. देईन कापून. माझ्या लिलीसाठी मी मानही कापून देईन, मग केसांची काय कथा? आणि आज हे केस सुंदर आहेत. उद्या हे फिक्कट होतील. त्यांना उद्या कोण विचारणार आहे? आज सार्थकी लागत आहेत. माझ्या आजारी मुलीच्या कामी येत आहेत. उद्या सकाळी या. कापून ठेवीन हे केस.'तो मालक गेला. लिलीची आई तेथे शून्य मनाने बसली होती. तिने आरशात पाहिले. ते केस किती सुंदर दिसत होते! तिच्या म्लान मुखाला अद्यापही ते शोभा देत होते. ते केस कापून टाकायचे? हो. मुलीच्या सुखासाठी तसे करणे भाग होते. तिने कात्री घेतली व ते लांब सडक सुंदर केस कापून टाकले. त्या केसांची गुंडाळी करून तिने ठेवली. दुसर्‍या दिवशी सकाळी मालकाजवळ ते केस तिने दिले. पंचवीस रुपये मिळाले. ते रुपये तिने मुलीला पाठवून दिले.परंतु त्या खाणावळवाल्याला अधिक लोभ सुटला. लिलीच्या आईजवळ कितीही पैसे मागितले तरी ती देईल, असे त्या लोभी मनुष्यास वाटले. थोडे दिवस जातात न जातात, तो पुन्हा त्याचे पत्र आले. त्याने आणखी जादा पैशांची मागणी केली होती. लिलीची आई कोठून पाठविणार पैसे?ती अभागिनी खोलीत सचिंत बसली होती. काय करावे तिला सुचेना इतक्यात मालक तेथे आला.'तुम्ही पुन्हा का सचिंत?' त्याने प्रश्न केला.'पुन्हा पैसे पाहिजेत,' ती म्हणाली.'मी सुचवू एक उपाय?' त्याने विचारले.'शरीर विकण्याचा का?' तिने दु:खाने प्रश्न केला.'शरीर नाही,' तो म्हणाला.'मग काय?' ती म्हणाली.

'हे पाहा, तुमचे दात फार सुंदर आहेत. ते द्याल का काढून? कसे मोत्यांसारखे आहेत. एका सिनेमा कंपनीला ते पाहिजे आहेत. तुम्हाला मोबदला मिळेल. योग्य ती किंमत मिळेल. पाहा विचार करून.' तो म्हणाला.'माझं हसणं पाहून पूर्वी लोक मोहित होत असत. माझे हे शुभ्र दात जगाला दिसावेत म्हणून मी पूर्वी मुद्दाम हसत असे. ते दात काढून देऊ? काय हरकत आहे? आता कोणाला हसून दाखवायचं आहे? आता माझ्या सार्‍या जीवनाचंच हसू येतं आहे! देईन, माझे दात काढून देईन. परंतु एखादा डॉक्टर इथंच आणाल का? घरच्या घरी काढून घ्या दात,' ती म्हणाली.दुसर्‍या दिवशी डॉक्टर आले. लिलीच्या आईचे ते सुंदर दात एकामागून एक काढण्यात आले. ते दात विकण्यात आले. लिलीच्या आईला पैसे मिळाले. ते लिलीला पाठविण्यात आले; परंतु पुन्हा पैशांची मागणी आली तर! आता का डोळे काढून द्यावयाचे! लिलीची आई या विचारात असे.लिलीची आई घरातून बाहेर पडत नसे. तिला लाज वाटे. तिचे सुंदर केस नष्ट झाले होते. तोंडाचे आता बोळके झाले होते. ती विद्रुप दिसे. लोक तिला हसत. पोरे तिच्या पाठीस लागत. कोणी दगड मारी, कोणी वेडावी. मग लिलीची आईही दु:खाने संतापे. तीही शिव्या देऊ लागे. तीही हातात दगड घेऊन मारू लागे. लोक म्हणत, हिला वेड लागले.लिलीच्या आईला त्या कारखान्याच्या मालकाची फार चीड येई. त्त्या कारखान्यातून काढून टाकण्यात आले नसते तर अशी परिस्थिती येती ना. केस कापावे लागते ना. दात काढून टाकावे लागते ना. लोक म्हणतात, तो कारखानदार उदार आहे. तो गोरगरिबांच्या उपयोगी पडतो. कसला उदार नि कसले काय? माझी तर अत्यंत वाईट दशा त्याने केली आहे. दुष्ट आहे मेला, असे लिलीची आई मनात म्हणे. त्या उदार महात्म्याची कोणी स्तुती करू लागला, तर लिलीची आई बोटे मोडीत कपाळाला आठया पाडी. पापी चांडाळ आहे मेला, असे म्हणे. ती स्तुती तिला सहन होत नसे.एके दिवशी एक विशेष प्रकार घडला. तो उदार पुरुष फिरायला गेला होता. त्या बाजूच्या रस्त्याला मोठा उतार होता. एक गाडी त्या बाजूने येत होती. बैल वाटते नवीन होते. ते बैल उधळले. भडकले. ते गाडी भलतीकडे नेऊ लागले. अरे, तिकडे तर खळगा आहे. भयंकर खळगा. बैल खळग्यात टाकणार का उडी! अरे, ते पाहा चाक! गेले. जवळ जवळ खाली चालले. फूट अर्धा फूट अंतर! जरा आणखी चाक बाजूला गेले की गाडी खळग्यात जाणार! काय करावे! चालले, - चाक चालले! एका क्षणाचा अवकाश!

परंतु इतक्यात तो आमचा उदार पुरुष रस्त्याच्या खालच्या बाजूला एकदम जाऊन उभा राहिला. डोळयाचे पाते लवते न लवते तोच तेथे उभा राहिला. ते चाक - खाली घसरणारे चाक त्याने आपल्या हाताने एकदम पलीकडे ढकलले! अरे बाप रे, केवढी ही शक्ती! जड गाडी, मालाने भरलेली! परंतु त्याने ते चाक ढकलले. चाक ढकलून तो पुन्हा एकदम वर आला. त्याने गाडी रोखून धरली. गाडी थांबली. तो गाडी आस्ते आस्ते नेऊ लागला. बैल त्याला वचकले. त्याची सिंहाची शक्ती पाहून ते बैल नरमले, थंड झाले. ते रीतसर चालू लागले.चौकात प्रचंड गर्दी झाली. 'गाडी थांबविली. चाक उचललं. आपले प्राण धोक्यात घातले, केवढा महात्मा!' असे जो तो बोलू लागला. नगरपालिकेचा एवढा अध्यक्ष, किती तरी कारखान्यांचा मालक, उदारांचा राणा; परंतु किती साधा, किती त्यागी! त्याच्या नावाचा जयजयकार होऊ लागला.इतक्यात ती लिलीची आई तेथे आली. तिला त्या महात्म्याची स्तुती सहन नाही झाली. ती धावत धावत त्याच्याकडे गेली. त्याच्या अंगावर ती थुंकली. 'दुष्ट, पापी, चांडाळ मेला. माझं सारं तू नुकसान केलंस. तू माझं वाटोळं केलंस,' अशा प्रकारे ती शिव्या देऊ लागली. तिने त्याला दगड मारले, लोक तिला ओढू लागले. इतक्यात पोलिसांनी तिला पकडले, तिला गिरफदार करण्यात आले. लिलीच्या आईचा पोलिसठाण्यावर खटला सुरू झाला. तिच्या दंडाला दोर्‍या बांधण्यात आल्या होत्या. पोलीस अंमलदार तेथे खुर्चीवर बसलेला होता. इतक्यात तो उदार पुरुष, तो म्युनिसिपालिटीचा अध्यक्ष तेथे आला. पोलिसांनी त्याला खुर्ची दिली. तो पोलीस अंमलदार उभा राहिला, तो नवीनच आला होता.'या बाईला शिक्षा देणार आहे. तुमच्या अंगावर ती थुंकली. तुम्हाला तिनं शिव्या दिल्या, दगड मारले,' तो पोलिस अंमलदार म्हणाला.'तिला सोडून द्या असं सांगण्यासाठी मी आलो आहे. माझी काही तक्रार नाही. ती एक अनाथ स्त्री आहे. मी तिची चौकशी करून आलो आहे. गरिबीमुळं ती वेडी झाली आहे. चुकीनं माझ्या कारखान्यातून ती काढली गेली. मीच तिचा अपराधी आहे. सोडा तिला. सोडा तिच्या दोर्‍या,' तो म्हणाला.'माझ्या सांगण्यावरून तिला पकडण्यात आलं. तिला सोडण्यात येणार नाही.' तो अंमलदार म्हणाला.

'परंतु ज्याच्यासाठी पकडण्यात आलं त्याची तर तक्रार नाही. मी नगराचा अध्यक्ष आहे. मी सांगतो की, या स्त्रीला सोडा. माझं म्हणणं ऐका.' तो नगराध्यक्ष रागाने म्हणाला.'नाही सोडलं तर काय कराल?' अंमलदाराने तीव्र दृष्टीने बघत प्रश्न केला. 'जे करता येईल ते करीन. माझीही काही शक्ती आहे,' तो उदारात्मा म्हणाला.'सोडा त्या स्त्रीला!' अंमलदार म्हणाला.पोलिसांनी तिला मुक्त केले. ती त्या नगराध्यक्षाच्या पाया पडू लागली. ती म्हणाली, 'खरंच का तुम्ही उदार आहात? तुम्ही मला सोडविलंत! मी तुम्हाला दुष्ट समजत होते. तुमच्या कारखान्यातून मला काढून टाकण्यात आलं. माझ्या मुलीला मी पैसे पाठवते. मुलगी असणं म्हणजे का पाप? हे पुरुष पापी असतात, स्त्रियांची ते फसवणूक करतात, विटंबना करतात. मी पापी नाही. माझ्या मुलीसाठी मी जगते. माझी नोकरी गेली. मुलीला पैसे कसे पाठवू? माझे केस कापून मी विकले. माझे दात विकले. माझं सारं सौंदर्य! ते गेलं माझ्या मुलीसाठी. का माझी नोकरी दवडलीत? का?' 'मला माहीत नव्हतं. परभारे तुम्हाला काढून टाकण्यात आलं. पुन्हा देईन नोकरी.' तो म्हणाला.

'माझा हात धरा. ताप भरला हो मला. धरा ना? धरा. अनाथाला आधार द्या. छे:! अंधारी येते डोळयांसमोर, धरा हात, नाही तर मी पडेन,' ती म्हणाली.त्याने एक गाडी बोलावून घेतली. त्या तापाने फणफणणार्‍या स्त्रीला गाडीत घालून तो गेला. वाटेत तिने स्वत:ची कहाणी सांगितली. एकाहॉस्पिटलमध्ये तिला घेऊन तो गेला. ते हॉस्पिटल त्याच्याच देणगीतून सुरू झालेले होते. तो महात्मा तेथे येताच दवाखान्यातील सारे डॉक्टर, सार्‍या बाया, सारे नोकरचाकर आदराने उभे राहिले. सर्वांनी त्याला वंदन केले.'या भगिनीची नीट व्यवस्था लावा,' तो म्हणाला.एका खाटेवर त्या भगिनीला निजविण्यात आले. सारी व्यवस्था लागली.

'आता इथं व्यवस्था होईल, शांत पडून राहा,' तो उदार पुरुष तिला म्हणाला.'माझी एक तुम्हाला प्रार्थना आहे,' ती म्हणाली.'कोणती?' त्याने विचारले.'माझ्या मुलीला तुम्ही घेऊन या. तिला इथं आणा,' ती डोळयांत पाणी आणून म्हणाली.'परंतु मला कशी देणार? तुमच्या सहीचं पत्र हवं,' तो म्हणाला.'द्या कागद व शाई; मी देते पत्र लिहून,' तिने सांगितले.ती तापाने फणफणत होती. तरी तिने त्या खाणावळवाल्याला पत्र लिहिलं. त्या पत्रात 'ही चिठ्ठी घेऊन येणार्‍यांबरोबर मुलीला पाठवावं;' असे लिहिले. त्या उदार पुरुषाने चिठठी खिशात घातली.'बरं मी जातो. तुमची मुलगी तुम्हाला भेटवीन,' तो म्हणाला.'देव तुमचं कल्याण करो!' ती अंथरुणावर पडून म्हणाली.तो उदार पुरुष घरी गेला. तो नगरपालिकेचा अध्यक्ष होता. बराच वेळ तो घरी काम करीत होता. रात्रीही लिहीत बसला होता. बर्‍याच उशीरा तो झोपला, सकाळीही जरा उशिराने उठला.सकाळचे विधी संपवून तो आपल्या खोलीत वर्तमानपत्रे चाळीत बसला. एका वर्तमानपत्रातील मजकुराने त्याचे लक्ष वेधून घेतले. मोठया अक्षरांत ती बातमी होती -'अपूर्व खटला. कित्येक वर्षांपूर्वी एक चोर पळून गेला होता. पोलिसांनी एका माणसाला पकडले आहे; परंतु तो माणूस म्हणतो, 'मी तो चोर नव्हे. मी कधीही तुरुंगात नव्हतो.' पोलिस म्हणतात, 'तूच तो.' त्या खटल्याचा आता निकाल लागायचा आहे. पाहावे काय होते ते.'अशा अर्थाचा तो वृत्तान्त होता. उदार पुरुषाने तो पुन्हापुन्हा वाचला. त्याने ते वर्तमानपत्र खाली ठेवले. त्याची चर्या गंभीर झाली; परंतु त्याने झटपट काही तरी निश्चय केला. त्याने नोकराला बोलाविले. तो आला.'काय रे, रायगावला चपळ घोडयावरून जायला किती वेळ लागेल?''चार तास तरी लागतील.' नोकर म्हणाला.'आपल्या घोडयांतील सर्वांत चपळ असा घोडा तयार ठेव. मी काम आटोपतो. त्या गावी मला जायचं आहे.'

'ठेवतो तयार घोडा.'नोकर निघून गेला. त्या उदार पुरुषाने भराभर कामाचे कागद वाचले. अनेक कागदांवर सह्या केल्या. मधून मधून तो घडयाळाकडे पाहात होता. दहा वाजायला आले. तो उठला. त्याने भराभर जेवण केले आणि घोडयावर स्वार होऊन तो निघाला. लोक आश्चर्याने पाहात होते.त्याने भरधाव घोडा सोडला. घोडा घामाघूम झाला व तोही घामाघूम झाला. धुळीने तोंड माखले. शेवटी एकदाचे ते गाव दिसू लागले. त्या गावात तो शिरला. कोणत्या बाजूला कोर्ट आहे?'काय हो, कोर्ट कोणत्या बाजूला?' त्याने एकाला विचारले.'असं सरळ जा व उजव्या बाजूला वळा. तिथं दिसेल गर्दी. आज एक गमतीचा खटला आहे, तो ऐकायला सारे लोक गेले आहेत,' तो मनुष्य म्हणाला.निघाला घोडा. उजव्या बाजूकडे वळला. तो तुफान गर्दी. आपला हा उदार पुरुष घोडयावरून खाली उतरला. एका झाडाला त्याने घोडा बांधला. त्याने आपले तोंड वगैरे पुसले. दुसरा अंगरखा त्याने घातला. तो कोर्टात जाऊ लागला. त्याची भव्य व उदार मूर्ती पाहून लोक आपोआप त्याला जायला जागा देत. तो त्या मुख्य सभास्थानी आला. न्यायाधीस उच्चासनावर बसले होते. हा उदार पुरुष आत शिरताच सर्वांचे लक्ष त्याच्याकडे गेले. सारे उभे राहिले; परंतु अंधारात प्रकाश आला, सूर्य आला. न्यायाधिशाने या पुरुषाला ओळखले.'या. येथे या. माझ्याजवळ बसा. आज आमचं भाग्य!' असे न्यायाधीश विनयाने म्हणाले.न्यायाधिशाजवळ एक सुंदर खुर्ची ठेवण्यात आली. तीत हा पुरुष बसला. न्यायाधीशही बसले. खटला सुरू झाला.'महाराज, तो पळून गेलेली कैदी मी नव्हे. त्या तुरुंगाचं नावही मी कधी ऐकलं नाही. माझ्या वयाला आता पन्नास वर्षं झाली. कधी कोणाचं वाकडं केलं नाही. बारा वर्षांपूर्वी म्हणे पळून गेलेला कैदी! तो का मी? म्हणे तसाच उंच आहे. तसाच जाडजूड. हा का पुरावा? उंच असणं व जाडजूड असणं हा का गुन्हा? महाराज, मी निरापराधी आहे. मला हे काही माहीत नाही. कोर्ट-कचेरीची कधी पायरी मी चढलो नाही. जाऊ दे मला घरी. माझी मुलंबाळं वाट पाहात असतील,' तो आरोपी म्हणाला.

'अरे, त्या तुरुंगातील पोलिस आले आहेत. ते तुला ओळखतात. ते पोलिस का खोटे? त्या तुरुंगातील हे कैदीही साक्षीदार म्हणून आले आहेत. ते म्हणतात की हा आमच्याबरोबर होता. आम्ही एकत्र चक्की ओढली. फत्तर फोडले. हे कैदीही का खोटे? तुझ्याविरुध्द भरपूर पुरावा आहे. माझा नाइलाज आहे. तुरुंगातून पळून आलास. पूर्वीच्या शिक्षेच्या दुप्पट शिक्षा तुला दिली पाहिजे!' न्यायाधीश म्हणाले'कोणती पूर्वीची शिक्षा?' आरोपीने विचारले.

'अरे, तू बारा वर्षांपूर्वी तुरुंगात होतास, त्या वेळची. इतकं विसरून गेलास का? चांगलीच बतावणी करतोस तू!' न्यायाधीश हसून म्हणाले.'मी नव्हतो हो तुरुंगात. का माझ्यावर कुभांड रचता? बालंट घेता? जगात न्यायच नाही का? हे माझे पांढरे होणारे केस का खोटं बोलतील?' आरोपी म्हणाला.

'पुरे कर वटवट. तुझ्यावर आरोप सिध्द झाला आहे. आता मी निकाल सांगतो,' न्यायाधिशांनी कठोर आवाजात बजावले.काय होणार निकाल? लोक अधीर होते ऐकायला; परंतु इतक्यात चमत्कार झाला. तो आलेला उदार पुरुष न्यायधिशांच्या कानात काही बोलला.'हे थोर गृहस्थ आले आहेत. या खटल्यावर ते काही प्रकाश पाडू पाहतात. त्यासाठी ते मुद्दाम दौडत आले. सत्यासाठी किती ही तळमळ. त्यांचं म्हणणं ऐकू या,' असे न्यायाधिशांनी सांगितले.उदार पुरुष उभा राहिला. सर्वांनी त्याला प्रणाम केला. तो बोलू लागला, 'न्यायाधीशमहाराज, इतर सर्व अधिकारी, आरोपी व फिर्यादी आणि इतर बंधूंनो, वर्तमानपत्रात या खटल्याची हकीगत मी वाचली. ती वाचून मी चकित झालो. सत्यासाठी येथे धावत आलो. एका निरपराधी माणसास वर्षांनुवर्षे तुरुंगाच्या नरकात खितपत पडावं लागू नये म्हणून मी आलो. पोलिसांचा धंदा मोठा चमत्कारिक असतो. एखाद्या गोष्टीचा जर त्यांना तपास लावता आला नाही तर त्यांना आपली अब्रू गेली असं वाटतं. आपली अब्रू सांभाळण्यासाठी, आपलं कौशल्य व शिताफी दाखविण्यासाठी दुसर्‍याची अब्रू घ्यायला ते मागंपुढं पाहात नाहीत. ते वाटेल तो पुरावा तयार करतात. नवी सृष्टी उभारतात आणि सरकारही पुष्कळ वेळा पोलिसांच्या बाजूला उभं राहातं.'

'या प्रस्तुतच्या खटल्यात आरोपी म्हणून जो मनुष्य उभा करण्यात आला आहे. तो संपूर्णपणे निर्दोषी आहे आणि तुम्हाला आरोपी पाहिजे असेल तर तो मी आहे. तुरुंगातील पोलिसांनो, माझ्याकडे पाहा. नीट पाहा. म्हणजे तुम्ही मला ओळखाल. जे कैदी साक्षीदार म्हणऊन आणण्यात आले आहेत त्यांना मी ओळखतो. त्यांनी व मी एकत्र होऊन एकदा या पोलिसांना बेदम मारलं होतं. यासाठी मला फटक्यांची शिक्षा झाली होती. माझ्या अंगावर ते वळ अजून दिसतील. तुरुंगातील भटटीजवळ काम करताना एकदा मी भाजलो होतो ते डाग माझ्या पाठीवर आहेत. तुम्हाला बघायचे आहेत? थांबा. मी अंगरखा काढतो. हं, हे पाहा ते डाग. आहेत ना? थांबा. अंगात घालू दे हं. आलं लक्षात? या पोलिसांना, माझ्यासारखा दिसला एक तगडा माणूस, केला त्याला उभा. हा चावटपणा आहे. पोलिसांना याची लाज वाटली पाहिजे. चोर सोडून संन्याशाला सुळी देण्यात पुरुषार्थ नाही.'आज बारा वर्षं मी जवळच्या शहरात वावरतो आहे. तेथल्या नगरपालिकेचा मी अध्यक्ष आहे. मी कारखाने उभारले आहेत. दवाखाने घातले आहेत. मंदिरं बांधली आहेत. पोलिसांना का मी दिसत नव्हतो का त्यांना ओळखता आलं नाही? मी का लपूनछपून होतो? राजरोस वावरतो आहे. सभांतून बोलतो आहे. मानपत्रं घेतो आहे. पोलिसांच्या अकलेचं दिवाळं निघालं आहे.''आरोपी मी आहे. मी पळून गेलो होतो. तुरुंगात एखादा कैदी गेला की, तो कायमचा कैदी होतो. मी प्रथम का गेलो तुरुंगात? कोणता केला गुन्हा? माझ्या घरी भावंडांना खायला नव्हतं. आम्ही बेकार होतो. उद्योगधंदा मिळेना. काम करायला तयार असून काम नाही. उपाशी बहीणभावंडं माझ्यानं बघवतना. मी रस्त्यातून चाललो होतो. एका हॉटेलात पाव दिसले. चोरले दोन पाव. पळत पळत घरी गेलो व माझ्या भावंडांना दिलं; परंतु मला पकडण्यात आलं. दोन पावांसाठी मला पाच वर्षांची सजा झाली. घरी भावंडांचं काय होईल हा विचार सारखा मनात येई. पाच वर्षं तुरुंगात राहायचं? मी पळून गेलो; परंतु लगेच मला पकडण्यात आलं. पाच वर्षांची सजा बारा वर्षें झाली. पुन्हा मी पळून गेलो. दुसर्‍या बाजूला गेलो. तेथे भटक्या व उडाणटप्पू म्हणून खटला भरण्यात येऊन पुन्हा माझी तुरुंगात पाठवणी केली गेली. तेथून सुटलो. परंतु कोणी आधार देईना. एका साधूनं आधार दिला; परंतु त्याच्याकडचं चांदीचं ताट मी चोरलं. का चोरलं? त्या भांडवलावर काही धंदा करीन, प्रामाणिकपणं वावरेन. कारण चोराला कोण देणार भांडवल? एकदा चोर ठरला की पोलीस नेहमी त्याच्यावर आळ घेतात. त्याची समाजात प्रतिष्ठा नसते. जो तो त्याच्याकडे साशंकतेनं पाहातो. म्हणून ते ताट मी चोरलं. पुन्हा पोलिसांनी मला त्याच रात्री पकडलं. त्यांनी मारीत मारीत मला साधूकडे नेलं. साधू थोर मनानं म्हणाला, 'ते ताट त्यानं चोरलं नाही, मीच ते त्याला दिलं आहे.' पोलिसांना मी तसंच सांगितलं होतं. पोलिसांचा उपाय चालेना. मला सोडून ते गेले. तो साधुपुरुष मला म्हणाला, 'जा, पुन्हा आत्मा मळवू नकोस.' ते ताट हे माझं भांडवल. त्या भांडवलावर मी उद्योग आरंभिला.

हळुहळू माझी भरभराट झाली. ज्या शहरात मी हल्ली राहातो तिथं आलो. तिथं कारखाना घातला. बेकारांना काम मिळावं म्हणून उद्योग आरंभिले. चोरी करणारा चोर नसतो. समाजरचना रद्दी आहे, त्यामुळं चोर्‍या होतात. मनुष्याला वाईट करायला कोणी लावीत असेल तर तो समाज होय. मी त्या स्थितीतून गेलो होतो. म्युनिसिपालटीतर्फे परिश्रमालये मी उघडली आहेत. बेकारानं तेथे यावं, काम करावं. अनाथांसाठी मी दवाखाने घातले आहेत. सार्वजनिक बागा उभारल्या आहेत.''परंतु आता काय! आज पुन्हा मी पळून गेलेला चोर म्हणून जगासमोर उभा राहात आहे. पुन्हा मला पोलिस पकडतील. माझं सारं कर्तृत्व विसरतील. त्या कर्तृत्वाचा मला अभिमान नाही. त्या साधू पुरुषाचा तो आशीर्वाद आहे. ज्यांना चोर चोर म्हणून तुम्ही वर्षानुवर्षे डांबून ठेवता त्या चोरांच्या अंगात केवढं कर्तृत्व असतं हे माझ्या उदाहरणावरून पाहा. चोरांस आदरानं वागवा. समाजात त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळेल असं करा, म्हणजे चोर्‍या होणार नाहीत.''त्या निरपराधी माणसाला सोड. माझ्यासाठी. त्याला त्रास झाला. मी त्याच्याजवळ क्षमा मागतो.'असे म्हणून तो उदार पुरुष जायला निघाला. सारे तटस्थ होते. सर्वांनी त्याला रस्ता दिला. त्याच्या त्या माहात्म्याने सर्वांस दिपविले. थोर कृत्याचा जादूसारखा परिणाम होतो. एक तेजस्वी किरण येतो व सारा अंधार प्रकाशमय होतो. त्या उदार पुरुषाला पकडावयाला कोणी पुढे झाला नाही. जो तो एका उच्च वातावरणात गेला. घोडयावर बसून तो महात्मा निघून गेला. नंतर काही वेळाने सारे भानावर आले.'तुमचा खटला खोटा ठरला!''चूक झाली महाराज. हा मनुष्य वालजी नव्हे. पळून गेलेला वालजी आता बोलत होतो तो. या माणसावरचा खटला आम्ही काढून घेतो,' पोलिस अधिकारी म्हणाला.'यापुढं जपा. वास्तविक तुम्हाला शिक्षा केली पाहिजे असे खोटे खटले भरण्याबद्दल. जा.' न्यायाधीश म्हणाले.तो निरपराधी मनुष्य मुक्त झाला. त्या उदार पुरुषाला धन्यवाद देत तो निघून गेला.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED