दुःखी.. - 5 Sane Guruji द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

दुःखी.. - 5

दुःखी..

पांडुरंग सदाशिव साने

५. समुद्रात

ते पाहा, एक मोठे गलबत बंदरात उभे आहे. ते गलबत कैद्यांनी भरलेले आहे. दु:खी कष्टी कैदी. त्यांच्या पायांत वजनदार साखळदंड अडकवलेले आहेत. त्यांच्या आजूबाजूस हत्यारबंद पोलिस आहेत. तो पाहा आपला वालजी! त्या सर्व कैंद्यांत तो उठून दिसत आहे. त्याच्या तोंडावर एक प्रकारची दिव्यता आहे. धीरोदात्त वीराप्रमाणे तो दिसत आहे.गलबताच्या डोलकाठीवर एक खलाशी चढला होता. त्या डोलकाठीला लांब जाडया दोर्‍या बांधलेल्या होत्या. तो खलाशी त्या दोर्‍यांवर चढून त्या आवळीत होता की काय? परंतु हे काय झाले? तो दोरीला लटकत राहिला. आता ? कोण वाचवणार त्याला? हात सुटले तर समुद्रात पडेल तो, परंतु असा लोंबकळत तो किती वेळ राहणार? एकेक क्षण मोलाचा जात होता. सारे पाहात राहिले.'त्या वालजीच्या पायांतील शृंखला काढा. त्याला मोकळं करा. तो या डोलकाठीवर चढेल. तो आपला पाय लांबवील. त्या पायाला खलाशानं आपले पाय अडकवावे. वालजी एका पायानं त्याचा सारा भार सहन करील. खलाशानं मग हात सोडावे इकडच्या डोलकाठीला धरावा,' असे कोणी तरी सांगितले. त्याप्रमाणे करण्यात आले. वालजी झपझप वर चढला. त्याने आपला मजबूत पाय लांबविला. त्या लोंबकळणार्‍या खलाशाने आपले पाय त्याच्या पायांत अडकवले व त्याने हात सोडले. त्याचा सारा झोल वालजीने सहन केला. वालजीचा पाय वाकला नाही. जणू सिंगलबारच्या दांडीप्रमाणे त्याची ती तंगडी होती. खलाशाला वालजीने डोलकाठीकडे आणले. खलाशाने हाताने डोलकाठी पकडली व वरच्या पायांनी डोलकाठीला धरले. मल्लखांब सुरू झाला. तो सुर्रकन् खाली आला. सर्वांनी टाळया वाजविल्या. शाबास वालजी, असा जयजयकार झाला.

परंतु अरेरे! हे काय? वालजी पाण्यात पडला! अथांग समुद्रात पडला. आता काय करणार? त्याने दुसर्‍यास वाचविले, परंतु त्याला कोण वाचवणार? समुद्र खवळला होता. प्रचंड लाटा उसळत होत्या. कोठे आहे वालजी? तो दिसतही नाही. त्या लाटांनी का त्याला गिळंकृत केले? पाहा कशा लाटा नाचताहेत, हलताहेत! पाहा ते त्यांचे जबडे. पाहा ते लाटांचे विकट हास्य. त्या लाटांमध्ये एकदम भयंकर खळगा पडतो. जणू पाताळाचे दर्शन. पुन्हा त्या वर उसळतात; परंतु वालजी कोठे आहे?ते का वालजीचे डोके? आला वाटतो वर? छे! गेला खाली. घेतला समुद्राने बळी. त्या लाटा आनंदाने उसळताहेत. हसताहेत. लाटांची धिंगामस्ती सुरू आहे. त्यांचा भीषण खेळ; परंतु दुसर्‍याच्या प्राणाचा नाश.गेला वालजी गेला. पत्ता नाही त्याचा. थोडया वेळाने ते गलबत हाकारले गेले. वालजीशिवायच ते गेले. वर्तमानपत्रात जाहीर झाले की, वालजी समुद्रात बुडून मेला. वालजीच्या आश्चर्यकारक जीवनाच्या हकीगती वर्तमानपत्रांतून आल्या. 'एका थोर चोराचा अंत' अशी कोणी शीर्षके दिली. हळुहळू वालजीचा सर्वांना विसर पडला. पोलिसांनाही विसर पडला. त्यांना हायसे वाटले. सतरांदा त्यांच्या हातावर तुरी देणारा, त्यांची बेअब्रू करणारा, त्यांची परीक्षा घेणारा जगातून एकदाचा नाहीसा झाला.