दुःखी.. - 6 Sane Guruji द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

दुःखी.. - 6

दुःखी..

पांडुरंग सदाशिव साने

६. लिलीची भेट

कोण चालला आहे तो मुशाफिर? काठीला अडकवलेले एक गाठोडे त्याच्या पाठीवर आहे. त्याची दाढी वाढलेली आहे. तो का पठाण आहे? तो जरा वाकलेला का दिसतो? वयाने का जरा वाकला? त्याचे डोळे पाहा. जरा पिंगट आहेत, नाही? परंतु त्यांत प्रेमळपणा आहे. आपल्याच तंद्रीत आहे. चालला आहे काही गुणगुणत.संध्याकाळ होत आली. तो जरा झपझप जाऊ लागला; परंतु वाटेत अंधाराने त्याला गाठलेच. रात्र झाली. चांदणे नव्हते. आजूबाजूला झाडी होती. आमचा प्रवासी चालला होता. मधूनमधून शीळ घालीत होता. त्याला दूर दिवे दिसले. गावाजवळ आला. त्याला पाहिजे होता तोच गाव होता. ते दिवे दिसताच त्याच्याही डोळयांत जरा प्रकाश आला.जवळ का ओढा वाहात होता? पाणी पडावे तसा आवाज येत होता. लहानसा का धबधबा होता तिथे? आमच्या प्रवाशाला तहान लागली होती. तो शीळ घालीत पाण्याच्या आवाजाच्या अनुरोधाने चालला. तो एकदम उभा राहिला. का बरे? काय त्याला दिसले?'घाबरू नकोस मुली. मी भूत नाही. पिशाच्च नाही. मी माणूस आहे. वाटेचा वाटसरू आहे. तू रात्रीची एकटी कुठं जातेस? त्याने तेथे दिसलेल्या लहान मुलीला विचारले.''तुम्ही मारणार नाही मला? तुम्ही चोर नाही?' तिने विचारले.'लहान मुलीला कोण मारील बेटा?'

'खाणावळवाला तर सारखं मारतो मला.''तू का खाणावळवाल्याकडे असतेस?''हो.''तुझे आईबाप कुठं आहेत?''आई आता नाही. ती मागं माझ्यासाठी पैसे पाठवी; परंतु बरेच वर्षांत आले नाहीत. खाणावळवाला म्हणाला, 'तुझी आई मेली.' तो मला सारखं काम करायला लावतो. 'फुकट का खायला घालू?' असं म्हणतो. पहाटे चार नाही वाजले तो मला उठावं लागतं, थंडीत मी गारठते; परंतु मला काम करावं लागतं. माझे हातपाय फुटतात; परंतु कुरकुर केली तर चाबकाचा मार. मला भांडी घासावी लागतात. या झर्‍यावरून पाणी न्यावं लागतं. आई नसली म्हणजे असं होतं. कुठं गेली माझी आई? का गेली ती मला सोडून? मी तिच्याजवळ राहिले असते. तिच्याबरोबर मेले असते. कुठं आहे माझी आई?'ती मुलगी रडू लागली. त्या वाटसरूच्याही डोळयांत पाणी आले.'उगी बेटा. रडू नकोस. तुझं नाव काय?''लिली.''किती गोड नाव!''जाऊ दे आता मला. उशीर झाला तर मारतील.''थांब, मीही तुझ्याबरोबर येतो. मला कोणत्या तरी खाणावळीतच उतरावयाचं आहे. तुझ्या खाणावळीत उतरू?''हं उतरा आणि माझ्याबरोबर चला. एक गि-हाईक मी मिळवून आणलं असं पाहून त्याचा राग कमी होईल. चला.''तुझी घागर जड आहे. दे, मी घेतो.''तुम्ही कशाला घेता? तुम्ही इतके कसे दयाळू? अशी दयाळू माणसं जगात असतात?''कुठं कुठं असतात. दे, खरंच दे घागर.''परंतु मालकानं पाहिलं तर तो रागावेल.''तुझी खाणावळ आली, म्हणजे पुन्हा तुझ्या कमरेवर ती मी देईन. समजलं ना? दे बाळ.'

त्याने तिच्याजवळची ती घागर घेतली. एका हातात लोंबकळवीत तो चालला. तिची हकीगत तो ऐकत होता. मधूनमधून तिला प्रश्न विचारीत होता. खाणावळ जवळ आली.'त्या दुकानासमोर आमची खाणावळ आहे. द्या घागर. मी पुढं जाते व सांगते की, एक गि-हाईक आणलं आहे. म्हणजे उशीर झाल्याबद्दल तो रागावणार नाही.' लिली म्हणाली.त्याने घागर दिली. लिली पुढे चालली. हा हळुहळू पाठीमागून जात होता. लिली घरात शिरली.'कार्टे किती वेळ झाला ग? पाणी आणायला पाठवलं तर तिकडेच बसलीस. थांब, तुला आज चौदावं रत्‍न दाखविलंच पाहिजे. बरेच दिवसांत चाबकाचा मार नाही मिळाला तुला. म्हणून अवदसा आठवली असेल, नाही का? थांब. हे आटपू दे. मग घेते तुझा समाचार. बघतेस काय अशी? ठेव घागर व ती ताटं दे नीट पटकन घासून.'खाणावळीणबाईंचा तोंडपटटा सुरू झाला.

'मी एक गि-हाईक आणलं आहे. त्यांना रस्ता माहीत नव्हता. म्हणून उशीर झाला.' लिली भीतभीत बोलली.

'कुठं आहे गि-हाईक?''हा मी इथं आहे. माझ्यामुळं मुलीला उशीर झाला. मी या गावात प्रथमच आलेला. रात्रीची वेळ. रस्त्यांचा परिचय नाही. ती मुलगी माझ्यासाठी हळुहळू येत होती. तिला रागावू नका.' तो वाटसरू म्हणाला.'बसा आपण. विश्रांती घ्या. आता जेवण तयार होईल.' खाणावळवाला म्हणाला.'लिले, त्या दुकानातून सामान आलं. तू जातानाच निरोप सांगितलास वाटतं? बरं केलंस. उरलेले पैसे कुठं आहेत? अधेली ना दिली होती? चार आणे दुकानदारास दिलेस, उरलेले चार आणे कुठं आहेत? अग बोल की गधडे? चार आणे कुठं आहेत? पावली का होती? पाण्यात का पाडलीस? विधुळी पोर आहेस अगदी. तिकडे आई गेली मरून. तू आमच्या मानेस बसली आहेस. खायला घाला दिवसातून तीनदा आणि असे पैसे हरव. अग कुठं आहेत चार आणं? थांब, आज तुझं भरलं आहे. हे पाहुणे जेवून उठू देत. मग काढते सारं.''लिले, तुझा तो परकरबिरकर नीट झाड. असेल खिशात नाही तर -' आमचा पाहुणा आत येत म्हणाला.

गरीब बिचारी लिली. परकरात का कोठे पावली अडकते? परंतु तिने आपला परकर चारचारदा झटकला, तो काय आश्चर्य? एकदम पावली वाजली.'अगं, ती बघ. ती बघ पडली. कुठं अडकली होती बरं!' तो आमचा पाहुणा म्हणाला.लिली परकर झाडीत असता त्या पाहुण्यानेच आपल्याजवळचे नाणे पटकन् फेकले होते. खाणावळवाल्याने ते पाहिले होते. हे गि-हाईक श्रीमंत व उदार दिसते असे त्याला वाटले. तो बायकोजवळ जाऊन काही कुजबुजला. लिलीला याच्यादेखत बोलू नकोस असे त्याने सांगितले असावे; कारण मालकीणबाईचा सूर एकदम बदलला.

'लिले, बेटा, तिकडे पडवीत बस. यांचं जेवण झालं, म्हणजे मग आपण सारे बसू. आधी हिरी, छबी, माणकी बसल्या आहेत. तू जरा मागून बस हो.' खाणावळीणबाई म्हणाली.लिली पडवीत जाऊन बसली. खाणावळीणबाईच्या मुलींच्या बाहुल्या तेथे होत्या. लिलीने त्यातली एक बाहुली उचलली. त्या बाहुलीजवळ ती खेळू लागली. त्या बाहुलीला पायांवर थोपटी, पोटाशी धरी. लिली आनंदली होती.इतक्यात त्या मुली जेवून आल्या.'हे ग काय लिलटले? माझी का बाहुली घेतलीस? तुझे ते घाणेरडे हात! ते लावलेस ना? आई, आमच्या बाहुल्या हिनं घेतल्या बघ. मळवलीन् माझी बाहुली.' हिरी ओरडून म्हणाली.'तुला तिथं पडवीत बस म्हटलं तर बाहुल्या उचलल्यास. आज झालं आहे काय तुला? तुझी आई असती तर दिल्यान् असत्या तिनं तुला बाहुल्या. आई नाही, बाप नाही. कोण देणार खेळणी? ठेव ती बाहुली खाली. ही उष्टी उचल व शेण लाव.' त्या मुलींची आई म्हणाली.खाणावळीसमोर मोठे दुकान होते. त्या दुकानात खेळणीही होती. एक मोठे थोरले कचकडयाचे बाळ सजवून तेथे ठेवलेले होते. त्या गावात इतके महाग बाळ कोण घेणार? परंतु तो प्रवासी पाहुणा एकदम त्या दुकानात गेला.'या बाळाची काय किंमत?' त्याने विचारले.'पाच रुपये साहेब!' दुकानदार म्हणाला.पाहुण्याने पाचाची नोट दिली. दुकानदार आश्चर्यचकित झाला. ते बाळ घेऊन तो पाहुणा आला.'लिल्ये, जरा इकडे ये.' त्याने हाक मारली.'जा. ते हाक मारताहेत. विचार काय हवं ते.' मालकीण म्हणाली. लिली आली. 'हे घे बाळ तुला खेळायला.' तो म्हणाला.'मला? मला नको इतकं छान बाळ.' ती म्हणाली.'अग घे की. ते देताहेत तर नको म्हणते! अडाणी आहे अगदी. घे ते.' मालकीणबाई बाहेर येऊन म्हणाली. 'खरंच का मला देता?'

'होय हो. घे. निजव ते मांडीवर किंवा अंथरुणात कुशीत घेऊन नीज. ते तुझं आहे. त्या मुलींच्या बाहुल्यांना नको हात लावू हो.' पाहुणा म्हणाला.खाणावळवाला, त्याची बायको यांना मत्सर वाटला. त्यांच्या मुलीही तेथे आल्या. त्यांच्या बाहुल्या चिंध्यांच्या होत्या. लिलीजवळ ते सुंदर बाळ पाहून मालकाच्या मुली जळफळू लागल्या. 'ते पाहुणे गेले की, आम्हीच घेऊ ते बाळ, तुला चाबूक.' असे त्या पुटपुटल्या.पाहुणे जेवले. त्यांची निजण्याची खास सुंदर व्यवस्था करण्यात आली होती. आता घरातील काम आटोपले. लिली ते बाळ कुशीत घेऊन झोपली. खाणावळीत शांत झाले.दुसरा दिवस उजाडला. पाहुणे आज जाणार की काय?'लिल्ये, त्या पाहुण्यांना विचार जा, आज राहाणार की जाणार ते.' मालकिणीने सांगितले.पाहुणे नेहमी येथे राहोत असे लिली मनात म्हणत होती. ती वर आली.'काय बेटा?' पाहुण्याने प्रेमाने विचारले.'तुम्ही इथं राहाणार का जाणार?' तिने विचारले.'राहू का जाऊ?''राहा. नेहमी इथंच राहा.''इथं नेहमी कसा बरं राहू? लिल्ये, मी जाणार आहे. तू येतेस माझ्याबरोबर? माझ्या घरी राहा.''हं येते. कुठं आहे घर?''तिकडे लांब आहे.''परंतु हे मला सोडतील का?''त्यांना मी विचारतो.'लिली खाली गेली. ते जाणार असे तिने सांगितले. मालक वरती गेला. त्याने पाहुण्यास नमस्कार केला. अदबीने तो त्यांच्याजवळ बसला.'आपण जाणार म्हणता? राहात नाही?' त्याने विचारले.'मला गेलं पाहिजे. आपले पैसे किती?''दीड रुपया.'

'दीड?'

'हो. कारण तुम्हाला निजायला पलंग दिला, गादी दिली. तुमची राजाप्रमाणे व्यवस्था ठेवली.''तुम्हाला एक विचारू का?''विचारा ना.''ही लिली तुमची मुलगी नाही. तिचे आईबाप नाहीत. तिला मी नेऊ का? तुम्हालाही ती जड आहे.''तुम्ही नेणार असाल तर न्या. परंतु तिच्या बाबतीत आमचे आजपर्यंत जे पैसे खर्च झाले ते तुम्ही दिले पाहिजेत.''काही वर्षं तिची आई पाठवीत होती ना पैसे? आणि ती मुलगीही घरी काम करते.''अहो, काम तर आता कुठं थोडं थोडं करते; परंतु सांडते, हरवते. तिची आई पैसे पाठवी, परंतु काही वर्षांत एक पैही आली नाही. म्हणतात, ती मेली म्हणून.''बरं. जो काय हिशेब होईल तो सांगा. पैसे मी देऊन टाकतो.''मी हिशेब आणून देतो.'

'लिलीला जरा वर पाठवा.''पाठवतो.'मालक खाली गेला. त्याने लिलीला वर पाठवले.'लिल्ये, येतेस ना माझ्याबरोबर? त्यांची परवानगी आहे.''हो येत्ये.''हा झगा बघ तुला होतो का? का हा परकर नेसतेस?''मला झगा आवडतो.''घालून बघ बरं.'लिलीने तो सुंदर रेशमी झगा घेतला. नंतर तिने तो अंगात घातला. अगदी बेताचा झाला.'आजोबा, बघा छान झाला.''मी का आजोबा?''मग काय म्हणू?'

'आजोबाच म्हण.'

इतक्यात मालक वर आला. त्याने लिलीची तयारी पाहिली.'हे घ्या बिल.' तो म्हणाला.'साडेपाचशे रुपये?''हो, थोडे कमी करून सांगितले.''बरं, देतो हं पाठवून.'मालक खाली गेला. पाहुण्याने आपल्या खिशातून कोर्‍याकोर्‍या नोटा साडेपाचशेच्या काढल्या. नंतर त्याने आपली काठी व गाठोडे घेतले.'लिल्ये, चल. ते बूट घाल ना.''ते का माझ्यासाठी?'

'हो, वेडीच आहेस.'लिलीने बूट घातले. पाहुण्याबरोबर ती निघाली. दोघे खाली आली. खाणावळवाल्याजवळ पाहुण्याने त्या नोटा दिल्या. नमस्कार करून तो निघाला. त्याचा हात धरून लिली निघाली.गावातील लोक बघू लागले. लिली नाचत-गात चालली होती. तिचे कशाकडेही लक्ष नव्हते. गाव संपला. बाहेरचा रस्ता आला.

'लिल्ये, तुला मी खांद्यावर घेतो. म्हणजे आपण लवकर घरी जाऊ.''घ्या मला खांद्यावर.' ती हसून म्हणाली.'नीट बसशील ना?''हो. झाडावर चिमणी बसते तशी मी बसेन.'आजोबांनी लिलीला फुलाप्रमाणे उचलले. ती हसली. तोही हसला. झपाटयाने वाघासारखा तो चालू लागला. आता रानातून रस्ता होता. लिलीला भीती वाटत होती. पुढे दाट जंगल लागले. ओळंबलेली झाडे लिलीच्या डोक्याला भेटायला येत. लिलीच्या केसांना पाने, लता-वेली लागत. तिसरा प्रहार होत आला. खांद्यावर बसून लिली कंटाळली असेल असे आजोबांना वाटले. ते जरा थांबले. लिली खाली उतरली. त्यांनी लिलीला खाऊ दिला. इतक्यात पाठीमागून कोणी तरी येत आहे असे त्यांना वाटले. त्यांनी नीट न्याहाळून पाहिले. तो खाणावळवाला येत होता. ती दोघे थांबली. खाणावळवाला जवळ आला.'का, तुम्ही का पाठोपाठ?'

'हिचे आणखी पैसे पाहिजेत.''आणखी?''हो. माझा हिशेब चुकला.''तू चावट आहेस. तू पैसे मागितलेस तेवढे मी दिले. या मुलीला रात्रंदिवस राबवलंस. फुकट का खायला घातलंस? तिच्या आईजवळून सारखे पैसे मागत असस. आजारी आहे, पैसे पाठवा. थंडीसाठी कपडे करायचे आहेत, पैसे पाठवा. कोणते रे हिला कपडे केलेस? लफंग्या, जा. निमूटपणं जा. नाही तर हा सोटा पाहिलास ना?''परंतु मी मुलगी देणार नाही. तिच्या आईचं पत्र आणा व मग मुलगी न्या. तुम्हीच लफंगे दिसता. मला फसवून मुलगी नेऊ पाहता.'आजोबाने आपल्या अंगरख्यातून एक चिठ्ठी काढली. त्याने ती त्या खाणावळवाल्यास दाखविली.'आई ना तिच्या आईची चिठ्ठी? ओळखता की नाही अक्षरं? तिच्या आईनंच हिला आणा असं सांगितलं आहे. जा. माघारी जा. खबरदार पाठोपाठ येशील तर. नीघ.'खाणावळवाला भीत भीत माघारी चालला. आजोबांनी लिलीला खांद्यावर घेतले. पुन्हा ते झपझप वेगाने चालू लागले. त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिले. तो तो खाणावळवाला आहेच. आजोबांनी अशा काही प्रखर दृष्टीने त्याच्याकडे पाहिले की, तो खाणावळवाला घाबरला. तो मागे मागे जात चालला. गेला, दूर गेला, दिसेनासा झाला. दातओठ खात तो परत चालला होता. 'काय करू रे, बरोबर पिस्तुल आणायला विसरलो. चुकलो. इथंच याचा बळी घेतला असता. माझा अपमान? या चिमुरडया पोरीच्यादेखत माझा अपमान? या अपमानाचा सूड घेईन. त्या पोरीचे पुन्हा हाल हाल करीन. रोज चाबकानं तिला फोडीन. अपमान. विसरणार नाही मी अपमान. या अपमानाचा सूड घेण्यासाठीच आता जगायचं. बस्स. ठरलं' असे म्हणत तो खाणावळवाला घरी गेला.