Dukhi - 8 books and stories free download online pdf in Marathi

दुःखी.. - 8

दुःखी..

पांडुरंग सदाशिव साने

८. भूत बंगला

लिली व वालजी त्या भूत बंगल्यात राहात होती. मुंबईतील अगदी दूरच्या गरीब वस्तीत. तो प्रचंड बंगला होता. त्या बंगल्यात शेकडो खोल्या होत्या. त्या बंगल्यात भुते आहेत अशी आख्यायिका होती, म्हणून फारसे कोणी तेथे राहायला येत नसे. तेथे भाडे थोडे असे. बरेच गरीब लोक हळुहळू तेथे राहायला येऊ लागले. गरिबांना भुते थोडीच बाधा करणार? दारिद्रयाचे भूत ज्याच्या मानगुटीस बसलेले, त्याला बाकीचे भुते साधी वाटतात. बिर्‍हाडे बदलता बदलता वालजीही तेथे आला.'लिल्ये, तू फार बाहेर जात जाऊ नकोस. घरातच खेळ. घरातच वाच हो.' वालजी म्हणाला.

'तुम्ही सांगाल तसं. तुम्ही किती प्रेम करता माझ्यावर? मला निजवता, थोपटता. जणू मी कुकुलं बाळ!''तू का मोठी झालीस?'

'नाही का?'

'मग नको का थोपटत जाऊ?'

'थोपटा. तुमचा हात म्हणजे आईचा हात. माझ्या आईबापांचा हात मला आठवत नाही. तुमच्या हातात त्यांचं प्रेम आहे. आजोबा, तुम्हाला कोणी नाही?'

'आहे तर.'

'कोण आहे?''तू नाहीस का वेडे!'

'खरंच. तुम्ही व मी. मी आणि तुम्ही.''लिल्ये, ते शेजारी कोण आले आहेत राह्यला?''ते एक गरीब विद्यार्थी आहेत. ते वकिलीचा अभ्यास करतात. ते गरिबांचं राज्य करणार आहेत. ते सुध्दा एकटे आहेत. इथं कमी भाडं म्हणून राह्यला आले आहेत.''त्याच्याजवळ फार बोलत नको जाऊ.''तुम्हाला जगाचा विश्वास नाही वाटतं?''जगात सारं दिसतं तसं नसतं. आपल्याला जपून राह्यला हवं बाळ, हो.''बरं आजोबा. तुम्ही सांगाल तशी मी वागेन.'वालजी व लिली तेथे राहात, परंतु वालजी दिवसभर बाहेर असे. घरी फारसा येत नसे. सकाळी सात आठ वाजता तो बाहेर पडे. मग जेवायला येई. पुन्हा जाई, तो रात्री येई. रात्री लिली निजली म्हणजेही तो बाहेर जाई. मग केव्हा तरी येई. त्याने भूत बंगल्यात जागा घेतली होती, तशीच दुसरीकडेही एक जागा होती. त्या जागेतही दिवसाचा काही वेळ तो राही. वालजीच्या अनेक खोल्या, अनेक बिर्‍हाडे, तो सर्व ठिकाणी थोडा थोडा राही. एक वालजी अनेक होई.एके दिवशी सकाळी वालजी बाहेर पडत होता. तो मालक तणतणत होता. एक प्रौढ मुलगी तेथे होती. तिच्या अंगावर चिंध्या होत्या. कोळशांनी हात काळे झाले होते.'तुम्ही खोली खाली करा. चार महिन्यांचं भाडं थकलं. हा काय फाजीलपणा!' मालक म्हणाला.'परंतु बाबा आजारी आहेत. आईलाही काम करवत नाही. काय करायचं? आम्हाला घालवू नका. कुठं जाऊ आम्ही?' ती मुलगी म्हणाली.'किती द्यायचं आहे तुमचं भाडं?' वालजीने विचारले.'चार महिन्यांचं. वीस रुपये.' ती मुलगी म्हणाली.

'मी देतो हो. जा तू. गरिबांची दैना असते.' तो म्हणाला.वालजी जरा बाजूला गेला. त्याने कोटाची शिवण जरा ढिली करून आतून नोटा काढल्या. त्या मालकाला त्याने त्या दिल्या. ती मुलगी आभार मानून गेली. तो मालक वालजीकडे साशंकतेने पाहू लागला. हा मनुष्य चोरबीर तर नाही? कोटात असे कसे पैसे ठेवतो, असे त्याला वाटले. त्याने पोलिसांस कळविले. पोलिस त्या वाडयाभोवती घिरटया घालू लागले.

वालजीच्या चाणाक्ष नजरेतून ती गोष्ट चुकली नाही. त्याने एके दिवशी बिर्‍हाड बदलले. तो अन्यत्र राहावयास गेला. ज्या खोलीत वालजी राहात होता, त्या खोलीत ज्यांचे भाडे त्याने देऊन टाकले होते ते बिर्‍हाड आले.त्या बिर्‍हाडकरूची आपणास माहिती हवी. त्याला तीन मुली आहेत. एक मुलगा आहे. त्याची बायको आहे. किती दिवस झाले त्यांना मुंबईत येऊन? कोणाला माहीत? अत्यंत दरिद्री अशी त्यांची अवस्था असावी. त्यांच्या खोलीत सामान फार नाही. एकदोन खुर्च्या आहेत. थोडी भांडीकुंडी. त्या मुलीची आई दिसायला उग्र होती आणि त्या मुलीचा बाप, तोही भेसूर दिसे. त्या आईबापांना हसताना कोणी पाहिलं नसेल. हसणे जणू त्यांना माहीतच नव्हते. नेहमी दुर्मुखलेली त्यांची तोंडे.मोठी मुलगी मोलमजुरी करायला जाई. ती असेल सोळा सतरा वर्षांची. तिच्या पाठची, असेल चौदा पंधरा वर्षांची. तिच्याहून लहान ती दहा वर्षांची आणि मुलगा सातआठ वर्षांचा असेल.ती चौदापंधरा वर्षांची मुलगी आहे ना? ती फार सुंदर नाही; परंतु एक प्रकारचा प्रेमळ भाव तिच्या डोळयांत आहे. त्यामुळे तिच्या चेहर्‍याला थोडी मोहकता आली आहे. तो जो तरुण शेजारच्या खोलीत राही, त्याच्याकडे ती सारखी बघत राहायची. एके दिवशी ती त्याच्या खोलीत गेली. एकदम त्याच्या खुर्चीच्या मागे उभी राहिली आणि समोरच्या आरशात पाहू लागली.

'मी वाईट आहे का हो? ती मागं इथं मुलगी राहात असे तिच्याहून मी वाईट आहे?' तिने विचारले.'तू केव्हा पाहिलीस ती मुलगी?' त्याने विचारले.'शंभरदा पाहिली आहे. तिचा तो म्हातारा श्रीमंत आहे, नाही? तिला चांगले कपडे मिळतात. कपडे चांगले असले म्हणजे कुरूप मनुष्यसुध्दा चांगलं दिसतं, नाही? माझे कपडे हे असे! मी कशी बरं सुंदर दिसेन? परंतु मी का फार वाईट आहे?''तू किती वटवट करतेस?

'मी जाऊ? माझं बोलणं तुम्हाला आवडत नाही? तुम्ही एकटे आहात. इथं तुम्हाला कंटाळा नाही येत? कोणाशी बोलणार, कोणाशी हसणार? तुम्हाला माणसांचा कंटाळा आहे? मी आवडत नाही तुम्हाला? तुमच्या टेबलावर बघा वस्तू कशा पडल्या आहेत. त्या मी लावून ठेवत्ये हं. सुंदर सजवून ठेवते टेबल.'असे म्हणून तिने टेबलावरची पुस्तके, वह्या वगैरे सारे नीट लावून ठेवले. तिने केरसुणी आणून खोली स्वच्छ केली.'तू कशाला झाडतेस?' तो म्हणाला.'का बरं? खोली स्वच्छ दिसेल.''परंतु तू का मोलकरीण आहेस?''मोलकरणीनंच काम करावं असं का आहे. घरातील काम आपण नाही करीत?''माझी खोली का तुझं घर?''हो.''तुझं नाव काय?'

'माझं नाव छबी.'

'छान आहे नाव.''आणि तुमचं?'

'दिलीप.'ती मुलगी एकदम निघून गेली. दिलीपची खोली जेव्हा जेव्हा उघडी असेल तेव्हा तेव्हा ती यायची. ती बोलत बसायची. कधी कधी ती त्याच्या खुर्चीच्या मागे उभी राहून त्याच्या केसांशी खेळायची. एखादे वेळेस दिलीप रागे भरे. ती मग ओशाळून निघून जाई.वालजी, लिली कोठे आहेत? लांब आहेत. अफाट मुंबई शहरात कोणाचा कोणाला पत्ता नसे; परंतु ती पाहा एक मुलगी हिंडते आहे. ती कोणाला तरी शोधते आहे. कोण हवे तिला? इतक्यात तिला एक उंच मनुष्य दिसला. ती गर्दीतून धावत त्याच्याकडे गेली. तिने त्याचा कोट धरला.'तुम्ही मला ओळखलंत का?' तिने विचारले.'हो. कसं आहे तुमचं?'

'भाडं थकलं आहे. आई आजारी आहे. बाबांना दमा लागतो. मी एकटी मोलमजुरी करते. तुम्ही काही मदत करता का?''किती हवी मदत?''द्याल तितकी थोडीच आहे.'त्याने खिशात हात घातला. पंधरा रुपये होते ते त्याने दिले. त्या मुलीचे तोंड फुलले.'किती तुम्ही उदार!''तुला मदत लागेल तेव्हा मागत जा.''परंतु तुम्ही कुठं भेटणार?''असाच या बाजूला कुठं तरी.'ती निघून गेली. तिने घरी आईबापांना ती गोष्ट सांगितली.'पुन्हा भेटले तर त्यांना सांग की, आमच्या घरी या. त्यांना म्हण की, आमच्या आईबापांना भेटायला या. तुम्ही आलात तर त्यांना किती तरी बरं वाटेल.' बाप म्हणाला.'कोणत्या दिवशी येणार ते ठरवून ये.' आई म्हणाली.काही दिवस गेले. पुन्हा एकदा वालजीची व त्या मुलीची भेट झाली.'काय ग, कसं आहे तुझ्या आईबापांचं?''तुम्ही या ना आमच्या घरी. आमचं कुणी नाही दुसरं. या शहरातून कुणी कुणाचं नाही. इतकी वर्षं आम्हाला येऊन झाली; परंतु कुणाशी ओळख ना देख. घरंही कितीदा बदलली. भाडं देता यायचं नाही. रात्री चोरून जायचं निघून. गरिबांची फार त्रेधा बघा.''औषध का देत नाही. वडिलांना, आईला?''घरगुती औषध असतं. डॉक्टरची फी कोण देणार? तुम्ही या ना एकदिवस. याल का?'

'येईन. एखादे दिवशी रात्री येईन.''नक्की दिवस सांगा.''पुढच्या गुरुवारी रात्री दहा वाजता.''बरं; या हं.'

ती मुलगी घरी गेली. तिने आईबापांना सांगितले की, पुढच्या गुरुवारी रात्री दहा वाजता ते येणार आहेत. आईबाप गुरुवारची वाट बघत होते. गुरुवार आला. सायंकाळची वेळ होती. त्या तरुणाच्या शेजारच्या खोलीतील त्या मुली वगैरे आज घरात नव्हत्या. घरात फक्त नवराबायको दोघे होती. घरात काही तरी घासले जात होते. घराची दारे लावलेली होती. कशाला धार का लावली जात होती? कुर्‍हाड का कोयता? विळा का सुरा? का बरे? आज धार का लावली जात आहे? त्या तरुणाच्या कानांवर धार लावणे येत होते. तो चमकला. शेजारच्या त्या नवराबायकोस त्याने कधी पाहिले नव्हते. ती घरातून कधी बाहेर पडत नसत. ती छबी त्या तरुणाकडे येई; परंतु अलिकडे बरेच दिवसांत तीही फिरकली नव्हती. ते पाहा धार लावणे ऐकू येत आहे. तो तरुण वर पाहू लागला. दिलीपला प्रकाश दिसला. त्या खोलोतील दिव्याचा प्रकाश होता तो. वरती भिंतीला भोक होते. त्यातून तो प्रकाश येत होता. दिलीपने हळूच टेबल भिंतीजवळ नेले. टेबलावर खुर्ची ठेवली. तो खुर्चीमध्ये उभा राहून त्या भोकातून पाहू लागला. कुर्‍हाडीला धार लावली जात होती! जवळच एक भटटीही पेटली होती. नवराबायकोचे बोलणेही चालले होते.'आज घेतो सूड. इतकी वर्षं वाट पाहात होतो. या तापलेल्या सांडशीनं डोळे फोडीन त्याचे. का जीभ भाजू त्याची? या कुर्‍हाडीनं तुकडे उडवू? मला दया माया नाही. भूत मी. अग, मी तरुणपणी दरोडेखोरच होतो. त्या वेळेस पेंढारी- ठग असत, त्यांच्यात मी होतो. एकदा सत्तावन सालचं ते बंड झालं. त्या वेळेस एक मोठी लढाई झाली. हजारो मुडदे पडले होते. रात्रीच्या वेळी त्या मुडद्यांच्या अंगावरचे दागदागिने पाहायला मी गेलो होतो. एका मुडद्याच्या गळयातील साखळी हाताला लागली. त्याच्या अंगावर दहा मुडदे होते. ते केले दूर. ती साखळी ओढली; परंतु तो मुडदा जागा झाला! ती साखळी घेऊन मी पळालो. तिच्या भांडवलावर तर काढली खाणावळ. तुझ्याबरोबर लग्न केलं. पूर्वी माझी खाणावळ लढवय्याची खाणावळ म्हणून प्रसिध्द होती. लोकांना मी खूप गप्पा सांगे. भिंतीवर लढायांची चित्रं काढीत असे. पुढं पोलिसांनी बंदी केली. तरी अजूनही मला लढवय्या म्हणून मानतात. मी होतो खुनी, दरोडेखोर. आज पुन्हा तसं व्हायचं आहे. समजलीस ना? त्या मुलींना सांगितलं आहे की, आज घरात कुणी यायचं नाही. तो वालजी आला की, त्याला खोली दाखवून तिनं बाहेरच्या बाहेर जायचं, असं हिरीलाही सांगितलं आहे. आज घेतो सूड. त्या मारेकर्‍याना बोलावलं आहे. ते येतीलच. चौघे आहेत ते. वालजी आला की, या खुर्चीवर त्याला बसवू. दार घेऊ लावून, घालू तोंडात बोळे व टाकू करकचून बांधून आणि मग हा लाल सांडस! ही कुर्‍हाड! सूड. आज घेतो सूड. रानातील अपमानाचा सूड. 'हा सोटा पाहिलास ना' असं म्हणाला. आज म्हणावं, ही कुर्‍हाड बघ. कशी छान धार लागली आहे. तुकडे तुकडे करीन बेटयाचे. हालहाल करीन; परंतु आधी मुलीचा पत्ता घेऊ या त्याच्याकडून. तिला मात्र जिवंत ठेवून छळायचं. समजलीस ना?'

खाणावळवाला कुर्‍हाडीला धार लावता लावता बायकोजवळ असे बोलत होता. दिलीप त्या झरोक्यातून बघत होता, ऐकत होता. तो भयंकर प्रकार पाहून त्याला कसे तरी वाटले. 'कोण मनुष्य? माझ्या बाबांना वाचवणारा तो हाच मनुष्य की काय?' बाबांनी पत्रात लिहिलं होतं, 'माझ्या अंगावरचे मुडदे एकानं दूर केले. मला हवा मिळाली. माझे प्राण परत आले.' हाच तो मनुष्य चोरी करायला रणांगणावर गेला; परंतु न कळत बाबांना वाचवता झाला. शूरांच्या अंगावरचे कपडेलत्ते नेणारा मांग, लांडगा; परंतु त्यानं बाबांना वाचविलं आणि बाबांनी सांगितलं आहे की, त्याला प्रेम दे, साहाय्य कर, हा तर आज इथं कोणाचा तरी हालाहाल करून वध करणार आहे. माझं कोणतं कर्तव्य? पोलिसांना वर्दी देणं हे.'दिलीपने पोलिसांस सारे सांगितले. तो घरी परत आला. त्याने आपले पिस्तुलही तयार करून ठेवले. जर पोलिस वेळेवर नाही आले, तर झरोक्यातून गोळया घालण्याचे त्याने ठरवले.रात्र होत आली. भूत बंगला भुतासारखा दिसू लागला. दहा वाजायची वेळ होत आली. ते पाहा कोणी तरी चार बुरखेवाले त्या खोलीत गेले आणि तो वालजी येत आहे. हिरी बाहेर उभी आहे.'इकडे इकडे. या खोलीत आता आम्ही राहातो.''याच खोलीत मीही राहात असे.''खरं का?''हो. तिसर्‍या मजल्यावरची खोली. रस्त्यावरच्या खिडकीतून लिली नेहमी गंमत पाहायची. तिला मी बाहेर जाऊ देत नसे. मग ती नेहमी खिडकीत बसे.'

'ती खोली. मी बाहेर जाते जरा. तुम्ही जा आत.' असे म्हणून ती हिरी गेली.वालजीने दार उघडले. घोंगडया पांघरून नवराबायको बसली होती. काळोखात कोपर्‍यात ते बुरखेवाले होते.'या, बसा खुर्चीवर.' नवरा कण्हत म्हणाला.'सारखी दोघं आजारी आहोत. पांघरायला नाही. ही भटटी ठेवली आहे पेटवून. पोरं भीक मागायला गेली आहेत. आणतील तुकडे तेव्हा शिळंपाकं खायचं.' बायको रडत म्हणाली.'ते दार घ्या लावून. वारा नाही सहन होत.' नवरा म्हणाला. वालजीने दार लावले.'ते उघडेल वार्‍यानं. कडी लावा!' बायको म्हणाली. वालजीने कडी लावली. तो खुर्चीवर बसला. तो खिडकीतून बघत होता. इतक्यात ते चारी बुरखेवाले उठले. त्यांनी त्याच्या तोंडात बोळे घातले. भराभरा त्यांनी त्याला दोरखंडाने आवळले. खुर्चीला बांधले. ती नवराबायकोही त्या कामात सामील झाली.झरोक्यातून तरुण दिलीप पाहात होतो. त्याने पिस्तुल धरून ठेवले होते. ते पिस्तुल मारावयाचे धैर्य त्याला झाले असते का? पित्याचे प्राण वाचवणार्‍यावर का गोळी झाडायची? त्याच्या मनात काहूर माजले होते. तो पाहात होता तो भेसूर प्रकार!भटटीतील निखारे फुंकले गेले. त्या निखार्‍यांचा लाल प्रकाश खोलीत पसरला. दिवा तर मिणमिण करीत होता. भटटीत सांडस होता. तो लाललाल झाला होता.'तुम्ही ओळखलंत का मला? तो खाणावळवाला मी. लिलीला छळणारा तो मी. जरा नीट बघा माझ्याकडे. पटली ओळख? रानात मला दरडावलंत, लाल डोळयांनी पाहिलंत. त्या लाल डोळयांत आता हा लाल सांडस जाणार आहे. मी शब्दांनी बोलत नसतो. कृतीनं! मी डाकू आहे. खुनी आहे. सूड घेतो आज; परंतु आधी त्या मुलीचा पत्ता सांग. ती कुठं आहे ते सांग.'तो लाल सांडस हातात घेऊन खाणावळवाला खुर्चीसमोर उभा राहिला.'बोल, तिचा पत्ता सांग.' तोंडातील बोळा थोडा वेळ काढण्यात आला.

वालजीने पत्ता सांगितला. खाणावळवाला बाहेर गेला व त्याने शीळ घातली. एकदम हिरी आली. त्याने हिरीला त्या पत्त्यावर जाऊन तेथे ती मुलगी आहे का बघ म्हणून सांगितले. तो पुन्हा खोलीत आला; परंतु दार लावायचे राहिले, - म्हणजे कडी लावायची राहिली. पुन्हा बोळे घातले गेले.'तुझ्या त्या लिलीचे हालहाल करीन. रोज चाबकांनी फोडीन तिला. तिला ठार नाही मारणार. तिला जिवंत ठेवीन. हाल करण्यासाठी जिवंत ठेवीन. तुझे तर तुकडे करायचे आहेत. हे पाहा चार दोस्त आहेत. ते तुझी खांडोळी करतील. मी लाल सांडसानं डोळे भाजीन, तुझी लांब जीभ भाजीन.'खाणावळवाला जरा थांबला. खोलीत भीषण शांतता होती. वालजी हलू शकत नव्हता, बोलू शकत नव्हता. तो सिंह अडकून पडला होता, परंतु त्याच्या डोळयांत निर्भयता होती.दाराशी हिरी आली. बाप बाहेर गेला. 'त्या पत्त्यावर लिली भेटली नाही. त्या पत्त्यावर कुणी राहात नाही.' असे तिने सांगितले. ती निघून गेली. बाप संतापाने घरात आला.'हरामखोरा, फसवतोस काय? बोल, लिली कुठं आहे? बोल.' त्याच्या तोंडातील बोळा काढून खाणावळवाल्याने विचारले.'अरे जा रे माकडा! ती लिली का तुझ्या हाती मी लागू देईन? माझे तिळाएवढे तुकडे केलेत तरी चालेल. लिलीचा, त्या अनाथ मुलीचा पत्ता मी सांगणार नाही. मला काय या लाल सांडसाची भीती दाखवतोस? मला भीती दाखवतोस?' असे म्हणून वालजीने दोरखंडातून हात एकदम मोकळा करून खाणावळवाल्याच्या हातातील तो लांब सांडस ओढून घेतला.'हे बघ. या लाल सांडसानं मी माझं अंग स्वत: भाजून घेतो. बघ. हा बघ माझ्या देहावर ठेवतो. बघ.' असे म्हणून वालजीने खरोखरच तो लाल फाळ खांद्यावर ठेवला. चुर्र चुर्र झाले. चरबी जळू लागली. दिलीपला ते दृश्य बघवेना.इतक्यात शिटया झाल्या. पोलिस आले. दार उघडून आत आले. खाणावळवाला, ते चौघे साथीदार, ती बाई, सर्वास एकदम पकडण्यात आले. पोलिस अधिकारी आत आला. तो खुर्चीवर त्याने कोणाला पाहिले?वालजी? समुद्रात मेलेला वालजी? त्या शहराचा अध्यक्ष वालजी! 'वालजी मेला नाही एकूण? वा! तुम्हीही सापडलेत. ठीक. योगायोग तुमचा आमचा. यांच्या दोर्‍या मोकळया करा. मागं ते आपण होऊन स्वाधीन झाले होते. ते चोर असले तरी थोर आहेत.' तो पोलिस अधिकारी म्हणाला.

वालजी मोकळा झाला. तो पोलिस अधिकारी बाहेर खुर्ची टाकून बसला होता. त्याच्यासमोर खोलीतील एकेकाला जबानीसाठी नेण्यात येत होते. इतक्यात, त्या मुलीही आल्या. त्यांनाही पकडण्यात आले. ते चार खुनी, खाणावळवाला, त्याची बायको आणि हिरी या सर्वांना हातकडया घालण्यात आल्या. छबी, तिची लहान बहीण व भाऊ यांना सोडण्यात आले.'आता त्या खुर्चीतील माणसाला आणा.' अधिकारी म्हणाला. पोलिस आत आले, तो वालजी कुठं आहे? तेथे वालजी नव्हता. तो भूत बंगला होता. भुताटकी झाली काय? कोठे गेला वालजी? तो अधिकारी आत आला. तो खिडकीतून दोरखंड खाली सोडलेले आढळले. सारे स्पष्ट झाले. वालजी पळून गेला. क्षणभर ते सारे पोलिस व तो अधिकारी चकित झाले! परंतु तो अधिकारी निघून गेला. पोलिस त्या कैद्यांस घेऊन गेले.त्या अधिकार्‍याने सर्व शहरभर घोडेस्वार पोलिस पाठवले. त्या रात्रीच्या वेळी घोडेस्वार हिंडू लागले. वालजीचा शोध होऊ लागला. नाक्यानाक्याला पोलिस होते. वालजी घरी गेला. त्याने झोपलेल्या लिलीला उठविले. तिला उचलून तो एकदम निघाला. तो ज्या रस्त्याने जात होता, तिकडून घोडेस्वार येत होते. तो पुन्हा वळला. एका पुलाखाली लपला. पुन्हा बाहेर पडला. एका अज्ञात रस्त्याने तो निघाला. फारशी रहदारी तिकडे नव्हती. पुन्हा घोडयांच्या टापांचा आवाज. वालजी पळत सुटला. रस्त्याच्या डाव्या बाजूला लांबच लांब भिंत होती. लिलीला पाठुंगळीस घेऊन कंदिलाच्या खांबावर तो चढला. 'लिल्ये, त्या भिंतीवर चढ.' तो म्हणाला. भिंतीकडे पाठ करून तो कंदिलाच्या खांबावर होता. लिलीने भिंत पकडली. नंतर तो भिंतीवर चढला. त्याने खिशातील दोरी लिलीला बांधून तिला खाली सोडले. त्याने उडी टाकली. भिंतीजवळ आत दोघे बसली.'लिल्ये, लागलं नाही ना कुठं?' त्याने हळून विचारले.'नाही.' ती त्याला बिलगून बसली.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED