Dukhi - 9 books and stories free download online pdf in Marathi

दुःखी.. - 9

दुःखी..

पांडुरंग सदाशिव साने

९. प्रेमाचा अंकुर

पहाटेची वेळ झाली होती. बाहेर घोडयांच्या टापा आता ऐकू येत नव्हत्या. तपास थांबला असावा. लिलीला जवळ घेऊन वालजी तेथे बसला होता. इतक्यात कंदील घेऊन कोणी तरी येत होते. कोण राहत होते त्या भिंतीच्या आत?तो एक म्हातारा मनुष्य होता. त्याने भिंतीजवळ कसले तरी वेल लावले होते. पहाटेच्या वेळेला त्या वेलांवर कीड पडते अशी समजूत होती. म्हणून रोज त्या वेळेला तो म्हातारा येई व वेलांच्या पानांवरून हात फिरवी. ते वेल तो हळूच झटकी. आजही त्याप्रमाणे तो आला. लिली घाबरली. वालजीला संकट वाटले.त्या म्हातार्‍याला कोणी तरी दिसले. तोही घाबरला, परंतु धैर्य धरून त्याने विचारले, 'कोण आहे?''आम्ही दोन अनाथ माणसं आहोत. आधार द्या.' वालजी म्हणाला. कोणाचा हा आवाज? त्या म्हातार्‍याला तो आवाज ओळखीचा वाटला. तो आठवू लागला. तो कंदील घेऊन पुढे झाला व त्याने नीट न्याहाळून पाहिले.'कोण तुम्ही? तुम्ही तर माझे अन्नदाते. तुम्ही नगराध्यक्ष. तुमचा कारखाना होता. तुम्ही दवाखाना घातलात. तुम्ही मला या मठात नोकरी दिलीत. या मठाला तुम्ही देणगी दिली होतीत. या महाराज, उठा, तुमच्या पाया पडतो. तुम्ही लाखोंना आधार दिलात. हजारोंचे तुम्ही अन्नदाते. तुमच्यावर अशी पाळी का यावी? उठा. थंडी आहे. माझ्या खोलीत चला. मी एकटा आहे. पलीकडे संन्यासी राहातात. संन्यासिनींचाही एक मठ आहे या बाजूला; परंतु मी एकटा आहे. चला माझ्या खोलीत. कढत कढत दूध प्या. झोपा पांघरून घेऊन. उठा देवा!' तो म्हातारा कृतज्ञतेने म्हणाला.

वालजीला वाटले, देवच भेटला. केलेला उपकार कधी कोठे कामाला येईल त्याचा काय नेम सांगावा? एखादे वेळेला उच्चारलेला गोड शब्द, एखादे वेळेस दिलेला आधार, केलेली मदत, कोठे फळास येईल त्याचा काय नेम? म्हणून जगात चांगले पेरीत जावे, ते उपयोगी येईल आज ना उद्या.वालजी व लिली त्या म्हातार्‍या रामजीच्या खोलीत गेली. रामजी त्या मठातील बागवान होता. तेथला तो माळी होती. वालजीकडे तो पुष्कळ वर्षांपूर्वी गेला होता. वालजीच्या सांगण्यावरूनच ही नोकरी त्याला मिळाली होती. लिली कढत दूध प्याली. ती झोपी गेली. वालजी व रामजी बोलत होते.'रामजी, ही लिली काही वर्षं इथं राहिली तर चालेल का?''चालेल. इथं आता सार्‍या संन्यासिनीच राहाणार आहेत. संन्यासी इथून निघून जाणार. त्या संन्यासिनी लिलीला शिकवतील. लिली माझ्याजवळ राहील. मलाही तिची करमणूक होईल.' रामजी म्हणाला.'परंतु लिलीला संन्यासिनी नाही हो करायचं!' वालजी हसून म्हणाला.'ते आजच कशाला बोलायचं? लिली मोठी होऊ दे. शिकू दे. मग बाहेर सुरक्षित वाटलं म्हणजे तिला घेऊन जा.''मग मी जाऊ? मधून मधून मी भेटत जाईन.''आताच जाता? दोन दिवस इथंच लपून राहा. मग जा.''बरं.'दोन दिवस वालजी तेथे लपून राहिला. एके दिवशी तो बाहेर निघून गेला. लिली तेथे मठात राहिली. रामजी तिला स्वत:ची जणू मुलगी मानी. लिलीने फुलझाडे लावली. ती पाणी घाली. रामजीबरोबर काम करी. संन्यासिनींकडे ती शिकायला जाई.'लिल्ये, किती फुलं केसांत घालतेस? इतकं नटून करायचं काय? तुला संन्यासिनी व्हायचं आहे ना? संसारात पडणार्‍यांना भूषणं शोभतात. आपणाला एक वैराग्याचा दागिना.' ती मुख्य महंतीण म्हणाली.'परंतु मला फुलं आवडतात आणि मी जन्मभर का इथंच राहू? ते दिलीप इथंच येतील, ते किती चांगले आहेत!' लिली म्हणाली.

'कोण दिलीप?''होते एक विद्यार्थी.''ते सारं विसरून जा. इथं रामनामाचा जप कर. ब्रह्माचं चिंतन कर.''जे आवडते ते ब्रह्मच.''जे सर्वव्यापी ते ब्रह्म.''जे आपल्याला आवडतं तेच सर्वत्र आहे असं भासतं, नाही?'लिलीचे व संन्यासिनींचे असे संवाद चालायचे. त्या एखादे वेळेस लिलीवर रागावत; परंतु लिलीवर त्यांचेही प्रेम बसले. लिली म्हणजे त्या मठातील मैना होती!वालजी तिकडे एका खोलीत राहात होता. एके दिवशी तो मनात विचार करीत होता. लिली आता मोठी झाली असेल. तिला मठातून आणले पाहिजे. लिलीला अशीच किती दिवस ठेवू? तिचे आता लग्न झाले पाहिजे. तिचा संसार एकदा थाटून दिला म्हणजे मी मोकळा झालो. तिच्या आईला दिलेल्या वचनातून मुक्त झाल्यावर वालजीचे काम संपले, असे विचार त्याच्या मनात येत होते.लिली परत आली. तिच्यात आता चांगलाच फरक झाला होता. ती सुंदर तरुणी दिसत होती. ती पुष्कळ शिकली होती. ती आता घरी नाना पुस्तके वाचीत बसे. एके दिवशी लिली वालजीबरोबर फिरायला गेली. सार्वजनिक बागेत फिरायला गेली. ती एका बाकावर बसली. वालजी हिंडत होता. लिली एकटीच होती. इतक्यात एक तरुण येऊन त्याच बाकावर बसला. दोघांनी एकमेकांकडे पाहिले.'दिलीप!''लिली!' 'किती दिवसांनी तुम्ही दिसलेत.''तुझं काय झालं मला कळेना.''तुम्ही रोज इथं फिरायला येता?''रोज येत नाही; परंतु आता येत जाईन.''का बरं?''म्हणजे इथं तू भेटशील.'

'आपण तिकडे जाऊ या ताटव्याजवळ.''चल.'लिली व दिलीप तेथे बसली होती. थोडया वेळाने वालजी आला. लिली पटकन उठून गेली. आता रोज लिली फिरायला येऊ लागली. वालजीच्या ती पाठीस लागे. लिली बगीच्यात प्रेम फुलवीत बसे. वालजी रस्त्यांतून हिंडे. रस्त्यांतील भिकार्‍यांस वालजी पैसे द्यायचा. रोज तो पैसे देई. पोलिसांचे त्याच्याकडे लक्ष गेले. कोण हा माणूस? रोज कोठून आणतो पैसे? पोलिसांचे पुन्हा आपल्याकडे लक्ष आहे ही गोष्ट वालजीच्या ध्यानात आली. त्याने फिरायला येणे बंद केले. त्याने पुन्हा घरही बदलले.दिलीप बागेत येई; परंतु लिली दिसेना. बागेत शेकडो सुंदर सुंदर सुगंधी फुले फुललेली असत; परंतु दिलीपचे लक्ष नसे. लिलीचे मुखकमल त्याच्या डोळयांसमोर असे. तो खिन्न होई, उदासपणे निघून जाई. एके दिवशी असाच तो उदासीन बसला होता, इतक्यात कोणी एक मुलगी आली.'तुम्ही असे उदासीन का? ती बरी आहे. ती दुसरीकडे राह्ययला गेली आहे. मला आहे तिचा पत्ता माहीत. तुम्हाला दाखवू तिचं घर? माझ्याकडे बघा ना जरा. मी का इतकी वाईट आहे? तुमची खोली मी साफ करीत असे, तुमचे केस विंचरून भांग पाडीत असे. तुमच्यासाठी मी वाचायला शिकल्ये. तुम्ही का हो नाही मजवर प्रेम करीत? लिली. लिलीचं तुम्हाला वेड व मला तुमचं वेड. बरं. पुढच्या जन्मी तरी मला प्रेम द्या. या जन्मी मी पेरते. पुढच्या जन्मी सहस्त्रपट मिळो. चला, येता? मी दुरून दुरून चालेन, म्हणजे तुम्हाला लाज नको वाटायला. मी घर दाखवते. चला. असे उदास नका बसू. मी हसल्ये नाही तरी तुम्ही हसावं, आनंदात असावं असं मला वाटतं. उठा.' छबी म्हणाली. तो निघाला. ती निघाली. बर्‍याच वेळाने एक घर आले.'त्या घरात ती राहाते. पुढच्या जन्मी द्या हो मला प्रेम आणि तुम्ही हसा. तुम्ही सुखी व्हा.' असे म्हणून ती गेली.दिलीप तेथे उभा होता. त्या घरात कोणी दिसत नव्हते. रात्र झाली तरी त्या घरात दिवे नव्हते. दिलीपने एक चिठठी लिहिली; परंतु द्यायची कोणाला? त्याने दरवाजाजवळ दगडाखाली ती चिठठी लिहून ठेवली. तो गेला.

लिलीचे हे घर एका बाजूला होते. तो बंगला होता. वालजी पहाटे उठला. तो अंगणातील बागेत हिंडत होता. दरवाजाजवळ त्याला दगड दिसला. रोज दगड नसतो. आज कोठून आला? त्याने उचलला. तोच खाली चिठठी. त्याने ती चिठठी वाचली. ती प्रेमपत्रिका होती. वालजी गंभीर झाला. त्या बागेत फिरायला जाण्याचा हटट लिली का धरी ते त्याच्या लक्षात आले. लिली प्रेमात सापडली. मग त्यात वाईट ते काय? तिने संन्यासिनी होऊ नये म्हणून ना तिला मठातून मी आणले? योग्य पतीशी तिचा विवाह करून देणे हे आता कर्तव्यच होते.वालजीला रडू आले. त्याच्या डोळयांतून पाणी गळू लागले. लिलीचे लग्न लागले म्हणजे मी एकटा. कोण मग मला? वालजी एकटा राहील; परंतु म्हणून का लिलीचा संसार बंद करू? माझ्या सुखासाठी? छे! तिच्या आईच्या स्वर्गस्थ आत्म्याला मी वचन दिले आहे. लिलीचे सारे मला केले पाहिजे. मी एकटा राहीन; परंतु लिलीचे लग्न झाल्यावर मला जगायला तरी कारण काय? लिलीसाठी जणू माझे प्राण आहेत. नाही तर ते कधीच जाते. समुद्रातून मी तरलो. का? तिच्यासाठी. ती एकदा संसारात पडली म्हणजे वालजीचे कृतकृत्य जीवन एकदम समाप्तही होईल! कोणी सांगावे?

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED