दुःखी.. - 7 Sane Guruji द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

दुःखी.. - 7

दुःखी..

पांडुरंग सदाशिव साने

७. तो तरुण

मुंबई शहरात एक सुंदर बंगला बांधून तो जहागिरदार राहात होता. तो आता म्हातारा झाला होता. तरी त्याची तरतरी कायम होती. जुने मजबूत हाडपेर होते. घोडयाच्या गाडीतून तो रोज फिरायला जायचा. अजून मुंबईत मोटारी फार झाल्या नव्हत्या. क्वचित एखादी कोठे नमुना म्हणून असली तर. घोडयांच्या ट्रामगाडया होत्या. श्रीमंत लोक बग्गी ठेवीत.या जहागिरदाराला एक मुलगी होती. एक सरदाराशी त्याने तिचा विवाह केला होता; परंतु 1857 च्या स्वातंत्र्ययुध्दात हा सरदार स्वातंत्र्याच्या बाजूने लढत होता. तो प्रयत्‍न अपयशी झाला. गुलामगिरी झाली. जहागिरदाराचा जावई नाना कारस्थाने करून वाचला. आयुष्य संपले नव्हते म्हणूनच तो वाचला.सासरे-जावयाचे एके दिवशी कडाक्याचे भांडण झाले.'तुम्ही हे क्रांतीचे मार्ग सोडा. आता ज्यांचं राज्य आहे त्यांची सेवा करा. माझं म्हातार्‍याचं ऐका.''तुम्हा जहागिरदारांचं ठीक आहे; परंतु गरिबांचं काय? उद्योगधंदे बसत चालले. बेकारी वाढत चालली. शेतकर्‍यांत तर हाहा:कार उडाला आहे. कुठं कुठं शेतकर्‍याचे उठाव होत आहेत. ते बंड करीत आहेत. त्यांची बाजू कुणी घ्यायची? मी गरिबांसाठी उभा राहीन!' जावई म्हणाला.'तुमचं आमचं पटायचं नाही. तुम्हाला माझी मुलगी देऊन मी फसलो. तिला तुम्ही सुख लाभू देणार नाही. तुम्ही जाल तुरुंगात, अंदमानात. माझ्या मुलीनं काय करावं? तिच्या लहान मुलानं उद्या कुणाच्या तोंडाकडे पाहावं?'

'तुमची मुलगी तुमच्या घरी ठेवा. तुमचा नातू तुमच्याजवळ ठेवा. मी एकटा राहीन. माझं ध्येय व मी. जातो मी.'असे म्हणून जावई गेला तो गेला. तो पुन्हा सासर्‍याकडे आला नाही. त्या जहागिरदाराची मुलगी माहेरीच राहू लागली. तिचा मुलगा तिच्याजवळ होता. म्हातारा नातवावर फार प्रेम करी. सारी इस्टेट तो नातवालाच देणार होता.नातू मोठा झाला. तो शिकू लागला. त्याच्या अभ्यासाची स्वतंत्र खोली होती. त्या खोलीत सुंदर सुंदर वस्तू होत्या. सुंदर चित्रे होती. नातवाचे नाव दिलीप होते. दिलीप रात्रंदिवस वाचीत बसे. आपला नातू खूप अभ्यास करतो, याचे आजोबाला कौतुक वाटे; परंतु दिलीप का अभ्यास करीत असे? त्याला वाचनाचे वेड लागले. विशेषत: इतिहासाची त्याला गोडी लागली. जगातील सर्व देशांचे इतिहास त्याने वाचले. जगातील राज्यक्रांत्यांचे इतिहास वाचले. हिंदुस्थानचा इतिहास तर त्याने नीट अभ्यासला. तरुण दिलीप क्रांतिकारक झाला.तरुणांचे एक मंडळ स्थापिले गेले. त्यात दिलीप प्रमुख होता. दिलीप आर्थिक मदत करी. मंडळाचे ग्रंथालय होते, मंडळाची एक भाडयाची जागा होती. तेथे तरुण जमत, चर्चा करीत. ते तरुण मुंबई शहरातील कामगारांत जात. मुंबईत नवीन गिरण्या सुरू झाल्या होत्या. कामगारांचे हाल होत होते. बेकार लोकांच्या झुंडी खेडयापाडयांतून मुंबईत येत व भटकत. हे तरुण त्यांच्यात जात. त्यांच्यात क्रांतीच्या गोष्टी बोलत.या तरुणांच्या बैठकी कधी कधी रात्रभर चालत. दिलीप मग तेथेच झोपे. दुसर्‍या दिवशी घरी येई.'दिलीप, रात्री कुठं होतास?''आम्ही अभ्यास करीत होता.' तो उत्तर देई.'प्रकृती सांभाळून अभ्यास कर बाळ.' असे म्हातारा प्रेमाने म्हणे.एके दिवशी दिलीपच्या हातात म्हातार्‍याने एक पत्र दिले. दिलीपने ते वाचले. 'माझ्या बाबांचं पत्र.' तो म्हणाला.

'हो. ज्याचं तोंड तू कधी पाहू नयेस असं मला वाटे त्याचं पत्र.''मला आधी का दिलं नाहीत? बाबा जिवंत असतील का? मरताना मला भेटण्याची त्यांना इच्छा होती. माझे बाबा. मी त्यांना कधी पाहिलं नाही. तुम्ही ताबडतोब का दिलं नाही हे पत्र? मरतानासुध्दा का मनात अढी धरायची?'दिलीप ते पत्र घेऊन बाहेर पडला. त्या पत्रातील पत्त्याप्रमाणे तो गेला. तो जिना चढू लागला. त्याच्याने चढवेना. त्याचे प्राण जणू गळून गेले होते. असतील का बाबा जिवंत? तो वर गेला. तो काय? ती खोली रिकामी होती! 'माझे बाबा!' त्याने टाहो फोडला.'तुझे बाबा तुझी आठवण करीत गेले. त्यांचं प्रेत सकाळी नेण्यात आलं. तुझ्यासाठी लिहिलेलं एक पत्र त्यांच्या उशाशी होतं. हे घे ते पत्र.' शेजारचे सदगृहस्थ म्हणाले.दिलीपने ते पत्र मस्तकी धरले. ते पत्र त्याने खिशात ठेवले. तो त्या रिकाम्या खोलीत शून्य मनाने बसला. तो इकडे तिकडे बघत होता. कोठे तरी पिता दिसेल असे का त्याला वाटत होते? बाबा, कोठे गेले बाबा, असे हात वर करून तो म्हणे. त्याने त्या खोलीला साष्टांग प्रणाम केला. त्या खोलीत डोळे मिटून तो बसला. पित्याची काल्पनिक मूर्ती का तो घडवीत होता? मनोमंदिरात ठेवू पाहात होता?शेवटी तो उठला. तो पुन्हा आपल्या आजोबांच्या घरी आला. तो आपल्या खोलीत बसला. त्याने आतून कडी लावून घेतली. त्याने पित्याचे ते पत्र अत्यंत भक्तिभावाने फोडले. काय होते त्या पत्रात?'चिरंजीव प्रिय दिलीप,'बाळ, तुझी माझी भेट होईल की नाही देवाला माहीत; परंतु माझी भेट न झाली तर मरणार्‍या पित्याची शेवटची इच्छा तुला कळवावी म्हणून हे पत्र मी लिहून ठेवीत आहे. तुझ्या पित्याच्या दोन इच्छा आहेत :तू गरिबांची बाजू घेणारा हो. गरिबांसाठी क्रांती करणारा हो. जुन्या रूढी, जुनी समाजरचना यांना मूठमाती देण्यासाठी उभा राहा. क्रांतीचा झेंडा हाती घे.दुसरी गोष्ट म्हणजे मागे स्वातंत्र्ययुध्दात लढताना मी जखमी होऊन पडलो होतो. माझ्या अंगावर अनेकांचे मुडदे पडले होते. त्यांच्या खाली मी गुदमरलो होतो; परंतु मध्यरात्रीची वेळ असेल, कोणी तरी त्या वेळेस आले. माझ्या गळयातील सोन्याची साखळी काळोखात कोणी तरी ओढली. माझ्या अंगावरचे मुडदे त्याने दूर केले. ती साखळी घेऊन तो गेला. तो का चोर होता? कोणी का असेना, परंतु मला हवा मिळाली. माझे प्राण परत आले. हळुहळू उठून मी निसटून आलो. माझे प्राण वाचवणारा तो अज्ञात इसम जर कधी काळी तुला भेटला तर त्याला प्रेम दे. त्याला जरूर पडली तर मदत दे, साहाय्य दे. बाळ, या तुझ्या पित्याच्या दोन इच्छा. आशीर्वाद. गरिबांसाठी झगड. चांगला हो, मोठा हो.'

ते पत्र दिलीपने कितीदा तरी वाचले. त्याने मनाशी काही तरी ठरविले. पित्याच्या सांगण्याप्रमाणे तो वागू लागला. आधीपासूनच तो क्रांतिकारक होता. आता त्याच्या वृत्तीत उत्कटता आली. निश्चितता आली. तीव्रता आली. त्याने कागद, लिफाफे छापून आणले. त्या कागदांवर 'क्रांतीचा जय असो' अशी वर वाक्ये असत. क्रांतीचा झेंडा छापलेला असे. त्याने पित्याचे ते पत्र एका सुंदर चंदनी पेटीत रेशमी रुमालात गुंडाळून ठेवले. त्या पत्रावर तो रोज गुलाबाच्या फुलाच्या पाकळया वाही. त्या पत्राला प्रणाम करी.आजोबाला नातवाच्या वर्तनाचा संशय येऊ लागला. दिलीप अलिकडे घरी फारसा नसे. आजोबांशी किंवा आईशी पूर्वीप्रमाणे तो प्रेमळपणाने बोलत बसत नसे. एके दिवशी आजोबा त्याच्या खोलीत गेले. त्यांनी तेथील पेटी उघडली. तो ते छापलेले कागद, ते छापलेले लिफाफे. 'क्रांतीचा जय असो' वगैरे ती ब्रीदवाक्ये. क्रांतीच्या झेंडयाची ती खूण. आजोबा संतापले. ते बिथरले. त्यांनी त्या कागदांच्या चिंधडया केल्या. ते आणखी पाहू लागले. तो ती चंदनी पेटी. त्यांनी ती उघडली.रेशमी रुमालात ते पत्र. ते पत्र त्यांनी वाचले. त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. जिंवतपणी याच्या बापाला मी करू दिले नाही, ते त्याने मरताना केले. या पत्रामुळे हा पोरटा बिघडला. म्हातार्‍याने ते पत्र फाडले. त्याने ती चंदन पेटी कोपर्‍यात भिरकावली.इतक्यात दिलीप येऊन तेथे उभा राहिला.'आजोबा, तुम्ही हे काय केलंत? हे पत्र फाडलंत! मला प्राणाहून प्रिय असलेलं पत्र तुम्ही फाडलंत. या पत्राच्या नाही तुम्ही चिंधडया केल्यात, माझ्या शरीराच्या केल्यात. का हा दीर्घद्वेष? पित्याची मरताना तुम्ही भेटही होऊ दिली नाहीत. पित्याचं उभ्या जन्मात मला दर्शन होऊ दिलं नाहीत. माझी आठवण करीत माझे बाबा गेले. माझ्यासाठी त्यांचे प्राण घुटमळत असतील; परंतु तुम्ही ते पत्र मुद्दाम उशीरा दिलंत. पितापुत्रांची ताटातूट केलीत आणि पित्याची आठवण म्हणून असलेलं हे एक पत्र, ही पित्याची शेवटची इच्छा, शेवटची आशा- तीही पायांखाली तुडविलीत. दुसर्‍याच्या भावना म्हणजे का कचरा? असे कसे तुम्ही! इतकी कशी तुमची कठोर हृदयं? श्रीमंतीनं, जहागिरीनं अशी दगडासारखी मनं होणार असतील तर आग लागो त्या श्रीमंतीला!'दिलीप थरथरत होता. पित्याच्या पत्राचे तुकडे तो गोळा करू लागला.'दिलीप खाली ठेव ते तुकडे. त्यांना काडी लाव. माझ्या घरात राहायचं असेल तर माझ्या इच्छेप्रमाणं वाग. नाही तर तुला दाही दिशा मोकळया आहेत.' आजोबा करारी आवाजात म्हणाले.'ठीक. मी जातो. हे पत्राचे तुकडे हीच माझी खरी संपत्ती. ही संपत्ती घेऊन जातो. हे अंगातील कपडे असू देत. नेसूचं धोतर असू दे. तितकी भीक घाला. मी जातो.' असे म्हणून दिलीप निघाला. ते पत्राचे तुकडे खिशात घालून निघाला. आजोबा, आई यांना सोडून ध्येयाची पूजा करायला तो बाहेर पडला.आजोबा तेथेच उभे राहिले. त्यांनी बाहेर दारात जाऊन पाहिले. त्यांनी रस्त्याकडे पाहिले; परंतु दिलीप केव्हाच दूर गेला होता.