मनापासून पानापर्यंत - शेवटची मिठी Sadhana v. kaspate द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मनापासून पानापर्यंत - शेवटची मिठी


शेवटची मिठी

सायंकाळचे ४ वाजले आहेत. माधव माने दोन्ही हातात सामानाच्या पिशव्या घेऊन धापा टाकत सोसायटीच्या गेटच्या आत मध्ये पाय ठेवतात. तोच त्यांची नजर समोर ढाराढूर झोपलेल्या वॉचमन कडे जाते. तसा त्यांच्यातील अधिकारी जागा होतो. आणि ते रागाने खेकसतात. ' यादव.. इथे झोपा काढायचा पगार मिळतो का रे तुला?' हे ऐकताच तोंडावर ठेवलेली टोपी डोक्यावर चढवत वॉचमन झोपेतून खडबडून जागा होतो आणि समोर थांबलेल्या माधव रावांना 'सलाम साब.. ' म्हणतो. 'कसला डोंबल्याचा सलाम. 'वो गलतीसे आँख लग गई थी..!' अरे गलतीसे इथे चोर चोरी करके निघून जाईल पण तुला कळणार नाही. आणि म्हणे वॉचमन !' वॉचमनला काय बोलावं कळत नाही. विषय बदलण्यासाठी तो माधव रावांना बोलतो, लाओ आपकी थैलीयां दे दो मै ले चलता हूँ ! त्यावर माधवराव खेकसतात.. तुला काय मी म्हातारा वाटलो काय रे ? साध्या दोन पिशव्या मला आवरणार नाहीत वाटतं का तुला ? वय जरी ५० असल ना तरी रक्त तरुणाचं आहे. हो बाजूला. वॉचमन बाजूला होतो. माधवराव लिफ्ट जवळ जातात.लिफ्ट बंद दिसते. वॉचमनला काही विचारणार तेवढ्यात वॉचमन स्वतःच सांगतो ' साहब.. अभी लिफ्ट बंद हो गयी है. ५ मिनटं पहले ही मेकॅनिक को कॉल किये है..बस आते ही होंगे.' 'हम्म.. ही लिफ्ट पण तुझ्यासारखीच आहे..सारखी झोपा काढते.' म्हणत माधवराव हातातल्या पिशव्यांकडे दुःखा ने बघतात पण आता वॉचमनला मदतीला बोलावू शकत नाही कारण काही क्षणापूर्वीच आपण त्याला धुडकावलंय हे ही त्यांना माहीत आहे. एक नजर रागाने वॉचमन कडे बघून ते पायऱ्या चढायला सुरुवात करतात. 

चार मजले चढून माधवराव घामाघुम होतात. तेवढ्यात समोरून दिलीप येतो. आणि काकांना पाहून आनंदाने बोलतो, काका.. द्या त्या पिशव्या इकडे म्हणत पिशव्या घेतोही. 'अरे दिलीप.. तू कधी आलास अमेरिकेवरून ?' रात्रीच आलो. आणि दोघेही मजले चढू लागतात.'बरं झालं आलास..नाहीतर माझा जीव गेलाच होता पायऱ्या चढून. आता किती दिवसांचा मुक्काम आहे?' ' आहे एक महिनाभर. आईने सांगितलं मला काकूंबद्दल... वाईट वाटलं.' यावर माधवकाका मोठा उसासा टाकून बोलतात, परमेश्वराच्या समोर कोणाचं चालत का ? बरं असो.. चल माझ्या हाताचा मस्त चहा घे.' नाही काका रात्री निवांत जेवायलाच येईन तुमच्याकडे.. आत्ता मित्रांना भेटून येतो. म्हणत पिशव्या काकांच्या दारासमोर टेकवतो. बरं रात्री ये निवांत.. मी वाट बघेन. हो नक्की म्हणत दिलीप निघून जातो. 

माधवराव घाम पुसत दारावरची बेल वाजवतात. पुन्हा थोड्या वेळाने वाजवतात. पण आतून कोण दार उघडतंच नाही. वाट बघून ते कंटाळतात आणि आवाज देतात... गौरी.. गौरी..? आणि काही वेळाने दरवाजा उघडला जातो. समोर गौरी थोड्या विस्कटलेल्या अवतारात दिसते. केस आणि कपडे विस्कटलेले दिसतात. आणि भपकन सिगारेट चा वास येतो. तसे माधवरावांच्या डोक्यात शंकेची पाल चुकचुकते. आत जाऊन दरवाजा लावून घेतात आणि तिला विचारतात. इतका वेळ का लागला दरवाजा उघडायला ? आणि हा सिगारेट चा वास कसा येतोय ? कोण आलं होतं घरात? आणि तुझे केस का विस्कटलेत? आणि इकडे तिकडे शोधू लागतात. पण कोणी दिसत नाही. त्यावर गौरी ईच्छा नसतानाही उत्तर देते. बाबा.. शेजारच्या काकूंनी मिश्री भाजलीये त्याचा वास आहे तो. आणि मला झोप लागली होती म्हणून आवाज नाही आला. आणि आल्यावर मी तशीच उठून आले म्हणून हा असा अवतार आहे. हे ऐकून माधवरावांना थोडं हायस वाटतं. अच्छा असं होय.. म्हणत ते बेडरूम मध्ये निघून जातात. 

गौरी मात्र लाकडी खुर्चीवर बसून डुलु लागते. तेवढ्यात भिंतीवर दोन पाली भांडण करू लागतात. चक चक आवाज येऊ लागतो. आणि त्यातील एक पाल ठपकन भिंतीला लागून टेबलवर ठेवलेल्या रेडिओ वर पडते. आणि रेडिओ च बटण अर्धवट दाबलं जातं. आणि खर्रर्रर्र खर्रर्रर्र आवाज येऊ लागतो. आणि पूर्ण बटण दाबलं जातं .अचानक गाणं वाजायला लागतं ... ' सौ बार जनम लेंगे..' आणि गौरी झटकन डोळे उघडते आणि गाणं बंद करते.

दिलीप माधव काकांच्या हातचा चहा प्यायला आला आहे. मस्त झालाय काका चहा. अरे मी बनवलाय म्हटल्यावर भारीच असणार. आणि दोघेही हसतात. काय रे परवा माझ्या हातच जेवण कसं झालं होतं ते सांगितलं नाहीस. इतकं मस्त झालं होतं ..कि ते खाण्याच्या नादात त्याला कॉम्प्लिमेंट द्यायचंच विसरून गेलो. आणि या वाक्यावर पुन्हा हसतात. आणि दिलीप थोडा गंभीर होत बोलतो. काका..गौरी च काय चाललंय हल्ली? काय सांगू रे.. एकुलती एक पोर. आई गेल्यापासून एकटी पडलीये. फार काळजी वाटते तिची. काका एक बोलू.. राग येणार नसेल तर. बोल ना. काका काल रात्री मी गौरी ला सिगारेट ओढताना पाहिलं. हे ऐकताच काकांचे कान आणि डोळे लाल होतात. दिलीप.. काहीही बोलू नकोस. मी माझ्या मुलीला काय संस्कार दिलेत हे सर्वाना चांगलं माहित आहे. माझी गौरी असल कधीच आणि काहीच करणार नाही. तू चार वर्ष अमेरिकेत राहून आलास म्हणजे इथल्या पोरींनाही तसेच समजायला लागलास का ? नाही काका तुमचा गैरसमज होतोय. मी जे पाहिलं तेच सांगतोय. काय पुरावा आहे तुझ्याकडे ? पुरावा..नाही माझ्याकडे, पण मी स्वतः पाहिलंय. एकदा डोळे तपासून घे दिलीप. आणि पुन्हा असं काही बोलण्याआधी हजारवेळा विचार कर.एवढं बोलून रागाने माधवराव निघून जातात. दिलीपही दुखी मनाने निघून जातो. 

रात्रीचे १२ वाजले आहेत. आणि दिलीप त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारत पायी चालत आहे. अचानक त्याच लक्ष समोरील एका टपरीवर जातं. गौरी त्याला स्मोक आणि ड्रिंक करताना दिसते. सोबत एक दोन मुलंही असतात. ते पाहून दिलीप ला वाईट वाटतं . आणि लगेच काकांना फोन करून सांगू असा विचार करून मोबाइल खिशातून काढतो पण लक्षात येतं कि काकांनी मागच्या वेळी पुरावा मागितलेला. म्हणून तो गौरी चे गुपचूप फोटो काढतो. आणि काकांना फोन करतो. माधवराव झोपेतच डोळे चोळत उठून फोन घेतात. दिलीप झालेला प्रकार सांगतो. माधवराव परत चिडतात पण दिलीप त्यांना गौरी घरात आहे का ते चेक करायला सांगतो. ते चेक करतात तर गौरी घरात नसते. त्यांना धक्का बसतो. दिलीप त्यांना whatsapp ला फोटो पाठवतो. फोटो पाहून माधवराव कोसळतात. त्यांना स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही. ते गौरीची वाट पाहत भिंतीला खेटून बसून राहतात. आणि त्यांना झोप लागते. 

गौरी रेड वन पीस घालून खुर्चीवर ऐटीत बसली आहे. एका हाताने स्मोक करत आहे, आणि एका हातात वाईन चा ग्लास आहे. सिगारेट चे कश वर कश घेत आहे. मधूनच वाईन चे घोट घेत आहे. रात्रीचे दोन वाजले आहेत. रेडिओ वर हळू आवाजात गाणे सुरु आहे. 'नशे सी चढ़ गई ' अचानक वडिलांना जाग येते. आणि तिच्याकडे रागाने पाहतात. मात्र गौरी मध्ये काहीच फरक पडत नाही. वडील रागाने रेडिओ बंद करतात. वडिलांचा पारा चढतो. भयानक शांतता.. कुठे गेली होतीस ? गौरी कडे काहीच उत्तर नाही. तू स्मोक आणि ड्रिंक्स करतेस ? आणि हे काय कपडे घातलेस ? माधवराव जाब विचारतात. काय विचारतोय मी ? तू स्मोक आणि ड्रिंक्स करतेस ? हो किंवा नाही मध्ये उत्तर हवंय. गौरी उत्तर देते 'हो'. माधवराव काडकन कानाखाली मारतात. तशी गाल चोळत गौरी ओरडते बाबा. खबरदार जर पुन्हा बाबा म्हणून हाक मारलीस तर. काय संस्कार दिले होते मी तुला. कधी काही कमी पडू दिलं नाही. प्रत्येक गोष्ट मागण्यापूर्वीच हजर केली. साऱ्या गावाला सांगत फिरायचो माझी गौरी अशी माझी गौरी तशी. केवढा अभिमान होता तुझ्याबद्दल. शिक्षक म्हणून हजारो विद्यार्थी घडवले पण स्वतःच्या मुलीला घडवायला कमी पडलो असं वाटतंय. माझी मुलगी रात्री अपरात्री घरी येतेय.. स्मोक ड्रिंक करतेय.खोटं बोलतेय. असले अर्धवट कपडे घालतेय.बाप म्हणून हारलो मी. माझा विश्वास तोडलास तू.बरं झालं तुझी आई हे सर्व बघण्याआधी गेली. नाहीतर खूप त्रास झाला असता. काय कमी पडलं होतं ? का पितेस ? का स्मोक करतेस ? कारण काय ? 

कारण त्याला विसरण्यासाठी. हे बोलताना गौरीचे डोळे भरून येतात. त्याला ? कोणाला ? वडील आश्चर्याने विचारतात ? माझ्या प्रियकराला. माधवराव शॉक होतात. म्हणजे तू ? त्यांचं वाक्य पूर्ण होण्याआधी गौरी बोलते. हो प्रेम केलय मी. प्रेम. धक्का बसला ना. (आणि कसनुसं हसते ) तुमच्या सो कॉल्ड संस्कारांच्या लिस्ट मध्ये हे येत नाही ना. तू मुलगी आहेस. मुलांना बोलायचं नाही . प्रेमात पडायचं नाही. छोटे कपडे घालायचे नाही. रस्त्याने मान वर करून चालायचं नाही. भली मोठी लिस्ट. हे करू नको ते करू नको. आयुष्यभर तुमचं ऐकलं. प्रत्येक गोष्ट. पण एक दिवस अचानक ऑफिस मध्ये अभय आला. पाहताच काहीतरी जाणवलं. पण स्वतःला समजावून सांगितलं, की नाही आपल्याला बाबा ने सांगितलंय प्रेमात पडायचं नाही. आणि स्वतःला त्याच्यापासून दूर ठेवायचे. पण बाबा तुम्हाला माहितीये जस एखाद्या व्यक्तीवर ठरवून प्रेम करता येत नाही तसच ठरवून एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात न पडणे हि जमत नाही. शेवटी जीव जडलाच. त्याने लग्नासाठी विचारलं होतं . बाबांशी बोलतो म्हणाला होता पण मी स्पष्ट नकार दिला. नकार ऐकून निर्माण झालेलं त्याच्या निस्वार्थ डोळ्यातलं बोचरं दुःख मला जिव्हारी लागलं होत. म्हटलं फक्त मैत्री ठेवू. त्याने माझ्या प्रेमापोटी ते ही मान्य केलं. त्याचा वाढदिवस होता. त्याची इच्छा होती माझ्यासोबत बाईक वर मनसोक्त फिरायची. पण मला माहित होते माझे संस्कार.मी नाही म्हणाले. मग मला घरी सोडायला येतो म्हणाला बाईक वर. मी म्हटलं नको बाबा रागावतील. म्हणाला अंतर सोडून बस.. पण नाही म्हणू नको. त्यादिवशी ते बाईक वरचे ३० मिनिटं खूप सुंदर होते. 

असं वाटलं मिठी मारावी त्याला आणि सांगावं माझं ही खूप प्रेम आहे तुझ्यावर.

' श्वास माझा गोठलेला तुला पाहताना.. 

भावना ओथंबलेल्या तू जवळ येताना 

घुटमळलेली पाऊले हात हाती देताना 

थरथरलेला देह तुला मिठीत घेताना. 

पण संस्कार बाबा संस्कार. नाही मारली मिठी. आणि तो गेला. जाताना वाटेतच त्याचा अपघात झाला आणि जागेवर गेला. गेला तो बाबा. ... आणि रडते. तुमची संस्कारांची चादर माझ्या भोवती विणलेली नसती ना.. तर कमीत कमी त्याला एक शेवटची मिठी तरी मारली असती. एकदा बेधडकपणे डोळ्यात साठवून तर घेतलं असतं . त्याचा हात हातात घेऊन थोडा वेळ बसले तरी असते. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून एखाद स्वप्न तरी बघितले असते. त्याच्या डोळ्यात पाहून सांगितलं असतं त्याला कि माझंही त्याच्यावर खूप प्रेम आहे. पण हे संस्कार जपले ना मी. फक्त एकदा बोलवा ना त्याला फक्त ५ मिनिटांसाठी. एक शेवटची मिठी हवीय मला. शेवटची मिठी. आणि जोरजोरात रडते. बाबा तुम्ही आई च्या विरहातून बाहेर पाडण्यासाठी पिता. मी आई आणि त्याच्या विरहातून बाहेर पाडण्यासाठी पिते. पण मला नाही जमतंय बाबा. नाही जमत . भयानक शांताता. माधवराव एक वडील म्हणून हारले होते. संस्कार म्हणजे बंधन नसतं . काय करायचं आणि काय नाही याची लिस्ट नसते. संस्कार म्हणजे आपल्या मुलांना चूक , बरोबर , चांगलं वाईट ओळखण्याची क्षमता देऊन, त्यांच्या पंखांना मातीची ओढ आणि बळ देऊन मोकळ्या आकाशात उडण्यासाठी स्वातंत्र्य देणं असतं . हे माधव रावांना कळून चुकतं . हताशपणे आपल्या तुटलेल्या मुलीकडे बघत ते बसून राहतात. गौरी आकांताने रडत राहते. भिंतीवरची पाल रेडिओ वर पडते. आणि अर्धवट बटण दाबलं जातं . खर्रर्रर्र आवाज येतो . आणि अचानक गाणं लागतं . तेरे बिना जिंदगीसे कोई... शिकवा तो नही...