इश्क – (भाग १९) Aniket Samudra द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

इश्क – (भाग १९)

मेहतांनी ‘ड्रॉ’ ची तारीख एक महीन्यांनी ठेवली होती. तो महीना कबिरसाठी अंत पहाणारा ठरत होता. कबिर अक्षरशः एक एक दिवस मोजुन काढत होता. रतीबद्दल.. तिला भेटण्याबद्दल त्याला उत्सुकता का वाटत होती हे त्यालाच कळत नव्हते, परंतु बर्‍याचदा असं होतं ना की काही व्यक्ती एका भेटीतच ओळखीच्या वाटतात तर काही अनेक भेटींनंतरही अनोळखी. राधाच्याबाबतीत कबीरची ही भावना खुप जास्ती स्ट्रॉंग होती, पण कदाचीत तेंव्हा तो तिला प्रत्यक्षात भेटला होता. रतीशी तर तो फक्त फोनवरच बोलला होता.

त्या दिवसानंतर रतीला पुन्हा फोन करण्याचा त्याला अनेकवार मोह झाला. परंतु त्याचे दुसरे मन त्याला साथ देईना. शेवटी काहीही झालं तरी ह्या घडीला तो एक प्रतीथयश लेखक होता आणि असा फोन करणं त्याला योग्य वाटेना. अनेकवेळा रतीला लावण्यासाठी उचललेला फोन त्याने नाईलाजाने ठेवुन दिला होता.

रती दिसते तरी कशी ह्याची तर त्याला सॉल्लीड उत्सुकता होती. शेवटी त्याने मेहतांना फोन लावला..

“मेहता.. ते फोन रेकॉर्ड्सचे डिटेल्स तुम्हाला मिळतात म्हणाला होतात ना?”
“हो.. का रे? रतीचे डिटेल्स हवेत का?”
“हो.. “, काहीसा ओशाळत कबिर म्हणाला.. “मला तिचा फोटो हवा होता..”
“मला माहीती होतं तु विचारशील.. त्या दिवशी तु तिचा नंबर मेसेज केल्यानंतर लगेचच मी चौकशी केली होती.. पण..”
“पण? पण काय?”
“बहुतेक.. तिचे डिटेल्स नाही मिळु शकणार असं दिसतंय..”
“का? काय झालं?”

“अरे तिने तिचा नंबर प्रायव्हेट म्हणुन नोंदवला आहे.. शिवाय तिचे वडील सैन्यात आहेत.. असे रेकॉर्ड्सची गोपनियता बाळगली जातेच.. आणि त्यातच तिने तिचा नंबर प्रायव्हेट केला आहे.. सो एकुण प्रकार कठीण दिसतोय..”
“पण तुम्ही म्हणालात ना ओळखीची आहेत लोक..”
“आहेत ना.. मी नाकारतच नाहीए.. पण काही गोष्टींना मर्यादा असते कबिर… आणि आजकाल हे `हनी-ट्रॅप’चे प्रकार वाढल्यापासुन फ़ार सावधानता बाळगावी लागतेय त्यांना.. ओपन नंबर असता तर काहीच प्रश्न नव्हता कबिर… पण तरीही मी प्रयत्न करतोय.. मिळाले डिटेल्स की पहीले तुलाच देणार…”
“हम्म.. प्लिज.. थॅंक्स…” असं म्हणुन निराशेने कबिरने फोन ठेवुन दिला…


राधा आणि मोनिका कबिरच्या आयुष्यातुन जणु अदृष्यच झाल्या होत्या. मोनिकाकडुन तरी निदान इतक्यात काही संपर्क होइल ह्याची कबिरला आशा नव्हती.. पण.. पण निदान राधाचा एकदातरी फोन येईल असे त्याला वाटत होते.. त्या ’स्ट्रॉबेरी हॉलीडेजचे’ पुढे काय झाले? नोकरी मिळाली की नाही?, गोकर्ण-पोलिस-स्टेशनमधुन क्लिनचीटचे ऑफीशीअल पेपर्स मिळाले का? अनुरागशी डायव्होर्सचं पुढं काही घडलं का? असे एक ना अनेक प्रश्न त्याला होते. पण ह्या वेळी त्याने राधाला फोन न करण्याचं ठरवलं होतं. आपली तिच्या आयुष्यात काही किंमत असेल तर ती करेलच फोन असाच काहीसा विचार त्याने केला होता.

मार्च उलटुन एप्रील सुरु झाला होता आणि त्या रखरखत्या उन्हाळ्यात कबिरचे आयुष्यही रखरखीत बनले होते.

दिवसांमागुन दिवस जात होते आणि शेवटी तो ड्रॉचा रिझल्ट मेहतांनी ठरल्याप्रमाणे प्रसिध्द केला.

“कबिर.. मला वाटतं तुच तिला फोन करुन ती विजेती असल्याची बातमी सांगावीस..”, मेहता कबिरला म्हणाले होते.. आणि कबिरने ही अगदी पडत्या फळाची आज्ञा मानुन मान्यता दिली होती.
“ठिक आहे मग.. मी ब्ल्यु-डायमंडला करतो बुकींग.. शुक्रवारी संध्याकाळी.. त्यांचा कपल्स-लाऊंज मस्तच आहे…”, मेहता म्हणाले..
“ओके..”, असं म्हणुन कबिरने फोन बंद केला..

“काय रे? काय झालं?”, कबिरच्या चेहर्‍यावरचा आनंद बघुन रोहनने विचारलं.
“डेट.. रतीबरोबर…७.३०.. ब्ल्यु डायमंड.. शुक्रवार…”.. कबिर म्हणाला..

टिक टिक वाजते डोक्यात.. धडधड वाढते ठोक्यात.. अशी कबिरची अवस्था झाली होती.. धडधडत्या हृदयाला दीर्घ श्वास घेऊन त्याने शांत करायचा प्रयत्न केला आणि रतीचा नंबर फिरवला..

“हॅल्लो..”, बराचवेळ रींग वाजल्यावर पलीकडुन तो गोड.. अती गोड आवाज कबिरच्या कानावर पडला…
“रती?”, कबिरने आपला आवाज शक्यतो स्थिर ठेवत विचारले..
“कोण बोलतेय?”, रती..
“रती.. कबिर बोलतोय… माझं क्रेडीट कार्ड आलंय.. कधी भेटायचं?”
“डोन्ट टेल मी… तो ड्रॉ मी जिंकले…??”, एखाद्या लहान मुलीला महागडी बार्बी-डॉल मिळाल्याच्या आनंदात रती म्हणाली..
“येस्स.. यु आर द विनर… शुक्रवारी संध्याकाळी, ७.३०,ब्ल्यु-डायमंड??”

“अम्मं.. ब्ल्यु डायमंड? नको.. त्यापेक्षा.. ‘पाशा’ला भेटुया? जे.डब्ल्यु.मेरीयॉट रुफ-टॉप?”
“चालेल.. कधी गेलो नाहीए मी तिथे.. पण चांगले रिव्ह्युज आहेत.. कधी?”, कबिर..
“परवाच शुक्रवारी? ७.३०?”
“डन..”, कबिर क्षणाचाही विलंब न करता म्हणाला..
“ओके.. भेटु मग…”, असं म्हणुन रतीने फोन बंद केला..

आयुष्यात जणु पहील्यांदाच कुठल्यातरी मुलीशी बोलावं आणि डेट फ़िक्स व्हावी तसं कबिरला वाटत होतं.


शुक्रवारी साधारणपणे ७लाच कबिर मेरीयॉटला पोहोचला.

पोर्चमध्ये उभ्या असलेल्या महागड्या कार्स.. लॉबी सुटा-बुटातले कॉर्पोरेट्स, बिझीनेस मिट्ससाठी आलेले फॉरेनर्स, तोकड्या/ट्रेंडी कपड्यांमध्ये वावरणारे पार्टी-फ़्रिक्सने गजबजुन गेली होती.

कबिरने घड्याळात नजर टाकली.. रतीला यायला किमान अर्धातास होता…
कबिर इतक्या लवकर आल्याबद्दल स्वतःवरच चरफडला. जवळचेच मॅगझीन उचलुन तो लॉबीतल्या सोफ्यावर विसावला. पाच-एक मिनीटंच झाली असतील तोच त्याचा फोन वाजला..

“हॅल्लो.. कबिर?”, पलिकडुन एका स्त्रीचा आवाज आला..
“येस्स.. बोलतोय..”
“सर.. मी ब्ल्यु-डायमंड मधुन बोलतेय.. तुमचं ७.३० ला बुकींग आहे ते कन्फ़र्म करायला फोन केला होता.. शिवाय रेड-वाईन आणि चॉकोलेट्सची व्यवस्थाही केलेली आहे…”

कबिरने स्वतःचीच जीभ चावली.. ब्ल्यु-डायमंडचं बुकींग रद्द करायचंच तो विसरला होता.. पण त्याहीपेक्षा त्याने मेरीयॉटमध्येही बुकींग केले नव्हते…
मेहतांना त्यावेळीच त्याने कल्पना दिली असती, तर त्यांनी बुकिंग बदलली असती.. पण रतीच्या विचारात धांदरट झालेला कबिर पुर्णपणे हे विसरुन गेला होता.

“अं..माफ़ करा.. आजचं बुकिंग रद्द होऊ शकेल का?”, कबिर दिलगीरीच्या स्वरात म्हणाला..
“एनी प्रॉब्लेम सर?”
“अं.. येस.. मला बिझीनेस मिटींगसाठी अचानक बाहेर-गावी जावं लागतंय.. सो शक्य असेल तर.. प्लिज.. ऑनेस्ट रिक्वेस्ट..”
“नो प्रॉब्लेम सर.. पण बुकींगचे पैसे रिफ़ंड नाही होणार..”
“नॉट अ प्रॉब्लेम..थॅंक्यु सो मच…”

एक काम झालं होतं.. आता मेरीयॉटला बुकींग करणं गरजेचं होतं.
त्याने इकडे-तिकडे नजर टाकली.. समोरच रिसेप्शनचं मोठ्ठं डेस्क होतं. कानाल हेडफोन-माईक लावुन एक मरुन-रंगाची साडी घातलेली तरुणी फोनवर बोलत बसली होती. मधुनच ती सहकार्‍यांना खाणा-खुणा करुन कामांच नियोजन करत होती.

कबिर तडक रिसेप्शनपाशी गेला. त्या तरुणीचं फोनवरंच संभाषण होईपर्यंत तो थांबला आणि मग म्हणाला..
“अं.. मॅडम.. पाशाचं बुकींग करायचं आहे.. अ टेबल फ़ॉर टु..”.. आपलं स्पोर्ट्स जॅकेट निट करत तो म्हणाला..
“शुअर सर.. मे आय नो युअर गुड नेम?”, त्या तरुणीने विचारलं…
“कबिर…”

त्या तरुणीने एकवार त्याच्याकडे पाहीलं आणि मग संगणकावर काहीतरी टाईप करायला लागली.. आणि मग अचानक थांबुन परत कबिरला म्हणाली.. “सर.. देअर इज ऑलरेडी अ बुकिंग ऑन युअर नेम..”

“कसं शक्य आहे.. मी तर पुर्ण विसरुन गेलो होतो.. कुणी केलंय बुकिंग?”, आश्चर्यचकीत होत कबिर म्हणाला..
“रतीच्या नावाने बुकींग दिसतं आहे सर..”
“ओह.. दॅट्स ग्रेट.. थॅंक गॉड…”
“सर तुम्ही वर जाऊ शकता.. टॉप फ्लोअर..”, कोपर्‍यातल्या लिफ़्ट्कडे बोट दाखवत ती तरुणी म्हणाली..
“थॅंक्स..”, असं म्हणुन कबिर लिफ़्टकडे जाण्यासाठी वळला..

“ह्या हॉटेल्सवाल्यांना इतक्या सुंदर-सुंदर मुली मिळतात कुठुन..?” असा विचार त्याच्या मनात तरळुन गेला आणि तो लिफ़्टमध्ये शिरला..


‘पाशा’ कबिरला वाटले होते त्याहीपेक्षा सुंदर होते. १६व्या मजल्यावरच्या टेरेसवर ‘पाशा’ सजवले होते. सर्वत्र पांढरे-शुभ्र सोफा आणि खुर्च्या विसावल्या होत्या. टेरेसच्या कोपर्‍यांत डेरेदार फांद्या असलेली झाडं लावलेली होती आणि त्या फांद्यांना रंगीत बॉटल्स लावलेल्या होत्या.. त्या बॉटल्समध्ये सोडलेल्या एल.ई.डी दिव्यांमुळे सर्वत्र मंद प्रकाश पसरलेला होता. त्या बाटल्या जणु अनेक काजवे सामावुन घेतल्याप्रमाणे दिसत होत्या. आकाशात मस्त निळसर रंग पसरला होता. मंद इंन्स्ट्रुमेंटल संगीत वातावरणाची रंगत अजुनच वाढवत होता.

कबिरने घड्याळात पाहीले ७.२५ होऊन गेले होते. कबिरने काऊंटरवर चौकशी करुन बुक केलंलं टेबल जाणुन घेतलं आणि तो तेथे जाऊन बसला.

घड्याळाचा काटा इंचाइंचाने पुढे सरकत होता. कबिर जेथे बसला होता तेथुन एंन्ट्रंन्स स्पष्ट दिसत होता.
७.३० वाजले तसा कबिर सावरुन बसला. केसांतुन हात फिरवुन त्याने हेअर-स्टाईल ठिक केली आणि खुर्चीत रेलुन तो रतीची वाट पाहु लागला.

७.३५…
७.४०…
७.४५ झाले तरीही रतीचा काहीच पत्ता नव्हता. तिला फोन करायची एक प्रबळ इच्छा त्याच्या मनात येऊन गेली पण अजुन ५ मिनीटं वाट पहायचं ठरवुन त्याने हाती घेतलेला फोन खाली ठेवुन दिला.

कबिर कंटाळुन ५ मिनीटं संपायची वाट बघत बसला होता. त्याचं लक्ष वेधलं गेलं ते लॉबी-मध्ये भेटलेल्या रिसेप्शनीस्टकडे. खाली असताना बांधलेले केस तिने आता मोकळे सोडले होते. मरुन रंगाची ती साडी तिच्या कमनीय बांध्याला घट्ट बिलगुन बसली होती. तिथल्या वेटर्सना काही-बाही कामं सांगण्यात ती मग्न होती. कबिर तिच्याकडे बघण्यात गुंग झाला होता.

अचानक तिने मागे वळुन कबिरकडे बघीतलं.. बहुदा कबिर तिच्याकडे बघत होता हे तिला जाणवलं असावं.. तसा कबिर एकदम चपापला..

मिनीटभर त्या वेटरशी बोलुन ती तरुणी वळाली आणि कबिर जिथे बसला होता तेथे येऊ लागली.

कबिरने तिच्याकडे लक्ष नाही असं दाखवुन फोन उचलला आणि रतीचा नंबर फ़िरवणार इतक्यात ती तरुणी कबिरसमोर येऊन उभी राहीली..

आपण तिच्याकडे बघत होतो हे तिच्या लक्षात आलंय आणि आता आपल्याला उपदेशाचे डोस ऐकावे लागणार हे लक्षात येताच त्याचा घसा कोरडा पडला..

“सॉरी.. मला उशीर झाला थोडा…”, ती तरुणी कबिरकडे बघुन हसत म्हणाली…
“एस्क्युज मी?”, गोंधळुन कबिर म्हणाला..
“ओह.. सॉरी.. मी रती…”, आपला हात पुढे करत ती तरुणी म्हणाली..
“तु रती?”, कबिर अजुनही गोंधळलेलाच होता…
“हो.. का? अजुन दुसरी कोणी येणार होती का?”

“नाही म्हणजे.. तु तेथे खाली…”
“मग? मी काम करते इथे.. नको होतं का करायला?”, मिस्कील हसत रती म्हणाली..
“नाही तसं काही नाही..”, कसंनुसं हसत कबिर म्हणाला..

“कबिर.. मी शेक-हॅन्डसाठी दोन मिनीटं झाली हात पुढे केलाय…”, आपले डोळे मोठ्ठे करत रती म्हणाली..
कबिरला आपल्या बावळपणाचा रागच आला…

“ओह येस.. मी कबिर..”, तिच्याशी हातमिळवणी करत कबिर म्हणाला.. “प्लिज.. हॅव अ सिट..”
समोरची खुर्ची कबिरने हाताने मागे ओढुन तिला बसायची खुण केली..

रती काही बोलणार इतक्यात तिचा फोन वाजला..
“एक्स्युज मी.. मला घ्यावा लागेल हा फोन.. जस्ट अ मिनीटं”, असं म्हणुन तिने फोन घेतला.

ती फोनवर बोलण्यात मग्न होती तेंव्हा कबिरला तिला जवळुन बघण्याचा चान्स मिळाला..

डोळ्यांना फिक्क्ट निळसर चंदेरी रंगाचे आयलायनर लाऊन स्मोकी-आईजच्या मेक-अप मुळे तिचे डोळे तिच्या चेहर्‍यावर आखीव-रेखीव भासत होते. ओठांना गुलाबी रंगाचं लिप्स्टीक, गालावर हलकेच केलेला ब्लश तिचे रुप अजुनच खुलवत होता. बोलता बोलता तिने आपले केस कानांच्या मागे सरकवले.

कबिर तिच्या लक्षात येऊ नये ह्याचा प्रयत्न करत तिच्याकडे बघण्यात गुंग झाला होता..

तिचा फोन संपल्यावर कबिर म्हणाला…”अभिनंदन, लकी-ड्रॉ साठी..”
“थँक्यु..”, मान किंचीतशी तिरपी खाली वाकवत रती म्हणाली
“अ‍ॅन्ड थॅंक्स टु मेहता.. त्यांच्यामुळे आपण आज पहिल्यांदा भेटतोय..”, कबिर
“पहील्यांदा? सो मिन कबिर.. आपण भेटलोय आधी…”, हसत हसत रती म्हणाली..

“काय? केंव्हा? कधी? काहीही काय?”, कबिर
“हो.. खरंच.. तुझं ते बुक-लॉंच होतं.. क्रॉसवर्डमध्ये.. मी आणि माझी मैत्रीण आलो होतो तेंव्हा.. तुझी सही असलेलं पुस्तक पण आहे माझ्याकडे..”, रती
“रिअली? पण तेंव्हा आपण काही बोललो होतो असं आठवत नाही..”
“हम्म.. खरं तर माझी मैत्रीण खुप म्हणत होती मला बोल बोल म्हणुन.. पण अरे, खरं तर मी थोडी शाय-टाईप्स आहे.. म्हणजे तेंव्हा तरी होते जरा जास्तच.. आता इथे रिसेप्शनला जॉब घेतल्यापासुन जरा जास्तच बडबडी झालेय मी..”, रती म्हणाली..

“मग तर फ़ारच छान.. मला बडबडी लोकं खुप आवडतात.. आज आपल्याकडे खुप वेळ आहे.. सो…”
“बघ हं.. कंटाळशील.. म्हणशील.. कित्ती बोलते ही…”
“बघुच कोण पहीलं कंटाळतं ते…”, कबिर हसत हसत म्हणाला..
“हरकत नाही.. अ‍ॅपीटायजर ऑर्डर करु आधी..”, असं म्हणुन रतीने वेटरला हात केला..

कबिर आणि रती त्या रोमॅन्टीक वातावरणात एकमेकांशी गप्पा मारण्यात मग्न होते तेंव्हा राधा इंटरनॅशनल-एअरपोर्टवर टुर-ऑपरेटर म्हणुन आपल्या पहील्या-वहील्या असाईनमेंटसाठी एअर-इटलीची वाट बघत उभी होती.. तर रोहन..

रोहनबद्दल नंतर कधीतरी, सध्यातरी फ़क्त आणि फक्त रती आणि कबिरच…