मात भाग ५ Ketakee द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मात भाग ५

"प्रतीकला खरंच काही माहीत नाही की तो आपल्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहे? पण नेमके काय? 

तो बोलताना चाचरत का होता? असे काय असावे की तो प्रतीक जो सुहास चुकल्यावर त्याचे कान पिळायलाही मागेपुढे पाहायचा नाही.. जो आपल्याला नेहमी आधार द्यायचा.. भांडणात बऱ्याचदा मध्यस्थी करायचा.. तो ही आपल्या मित्राच्या बाजूने त्याच्या लपवाछपवीत सामील असावा.. काय चालू काय आहे नक्की या दोघांचे.."

रेवतीला काही सुचत नव्हते..

प्रतीकची आणि तिची पहिली भेट तिला आठवली.. सुहासने त्या दोघांची एकमेकांशी ओळख करून दिली होती.. अगदी मोघम पाच मिनिटं बोलणं झाले असेल त्या वेळेस..

पण त्यानंतर हळूहळू प्रत्येक भेटीगणिक प्रतीकशी वाढत गेलेली रेवतीची मैत्री.. तिला प्रतीकमुळे निखळ आणि निस्वार्थ मैत्रीचा प्रत्यय आला होता.. त्यांची निखळ मैत्री वरचेवर इतकी घट्ट झाली की नंतर नंतर तर रेवती हे देखील विसरली होती की आधी तो सुहासचा मित्र होता आणि मग तिचा..

ती अगदी सहजगत्या त्याच्या जवळ आपले मन मोकळे करायची.. अगदी सुहासची तक्रार देखील ती हक्काने.. अगदी लीलया.. त्याच्याकडे करू शकत होती.. वेळ पडली तर प्रतीक सुहासचा कान पिळायला पण कमी करायचा नाही.. रेवतीला ही बऱ्याचदा तिच्या चुका निदर्शनास आणून द्यायचा तो.. त्याच्या वागण्यात आणि विचारांत अतिशय पारदर्शक होता तो..

पण मग आज प्रतीकला काय झाले होते.. पारदर्शकते वर हे कसल्या धुक्याचे आवरण..

त्याच्या अश्या वागण्यामागे नक्की काय कारण असेल? आणि तो मला खरे का सांगू शकत नसावा.. किंवा सत्य बोलण्यापासून काय अडवत असेल त्याला..

प्रश्न प्रश्न आणि फक्त प्रश्न.. उत्तर कशाचेच मिळत नव्हते..

बरेच दिवस असेच चालू होते.. विचारांची गर्दी आणि त्या गर्दीतून वाट शोधू पाहणारी.. त्या वाटेच्या दिशेने प्रयत्न करत करत चाचपडणारी रेवती..

रेवतीची आशा दिवसेंदिवस धूसर होत चालली होती.. आपल्या आणि सुहासमध्ये आजवर जे काही होते ते सगळे संपत चालले आहे किंवा कदाचित एव्हाना संपले आहे का असे विचार तिच्या डोक्यात येत होते..

तिने ठरविले होते आज काही झाले तरी बाहेर पडायचे.. थोडे त्या विचारांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडता यावे म्हणून.. डोक्याला विश्रांती मिळावी म्हणून.. नकारात्मक विचारांना बाजूला सारून.. नवीन सकारात्मक विचारांना वाट मोकळी करून देता यावी म्हणून..

गाडीवरून मनसोक्त फेरफटका.. शॉपिंग.. चटपटीत खाणे.. भरपूर सेल्फीज.. अगदी मनाला हवा तसा.. हवे ते करत.. रेवतीने वेळ खर्च केला..

मनावरचा ताण तसेच विचारांवर चढलेली मरगळ दूर झाल्यासारखे तिला वाटत होते..

ती घरी परतीच्या प्रवासाला निघाली आणि तिचे मन दुसऱ्या बाजूचा विचार करण्याचा कौल देऊ लागले..

"आपण फक्त आपलाच विचार करत आहोत? नाण्याची दुसरी बाजू तर आपल्याला माहितीच नाही..

ती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केला पण त्यात यश आले नाही..

पुन्हा नव्याने प्रयत्न करण्याची गरज आहे.."

ती मनाशी हाच विचार करत दुचाकीवरून जात असतानाच तिची नजर रस्त्याच्या विरुद्ध बाजूला गेली.. 

तिला सुहास आणि प्रतीक दुचाकीवरून विरुद्ध दिशेकडे जाताना दिसले..

रेवतीला काही समजायच्या आतच तिची गाडी विरुद्ध दिशेला वळलेली हाती.. मनात तेच विचार नव्या जोमाने सुरू असल्यामुळे.. तिच्या नकळतच ही कृती घडली होती..

पण दुचाकीवरून जाण्यात धोका होता.. म्हणून रेवतीने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या पार्किंग झोन मध्ये पार्क केली.. आणि समोरून येणाऱ्या रिक्षाला हात केला. 

तिने रिक्षा वाल्याला त्या दुचाकीचा पाठलाग करायला सांगितला..

रेवतीची दुचाकी सुहास आणि प्रतीक दोघेही ओळखत होते.. म्हणून सत्य उलगडण्यासाठी समोरून चालून आलेली सुवर्णसंधी तिला गमवायची नव्हती.. म्हणून तिने रिक्षाने जाण्याचा निर्णय घेतला..

रिक्षावाल्याला तिने दुचाकीपासून एक सुरक्षित अंतर ठेवून तिचा पाठलाग करायला सांगितले होते..

रेवातीचे हातपाय थरथरत होते..