मात भाग ८ Ketakee द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मात भाग ८

रेवती अगदी बधीर झाली होती ते सगळे ऐकून.. प्रतीकला रेवतीची अवस्था पाहून खरे तर काय करावे ते सुचत नव्हते.. फार मोठा आघात झाला होता तिच्या मनावर.. हेच टाळण्याचा प्रयत्न तो आणि सुहास गेल्या कित्येक दिवसांपासून करत होते..

"सांभाळ स्वतःला.. चल निघू या का?" प्रतीक

अंगात बळेच अवसान आणून कसेतरी रेवती तिथून बाहेर पडली..

प्रतीक गेल्यावर रेवती तिच्या गाडीजवळच शुन्यात.. विचारांच्या गर्तेत हरवलेल्या अवस्थेत उभी होती.. खरंतर तिला जे ऐकले त्यावर विश्वास बसत नव्हता.. किंबहुना तिला त्यावर विश्वास ठेवायचा नव्हता असे म्हणावे लागेल.. तिच्या गाडीच्या शेजारी उभी असलेली गाडी पार्किंग मधून बाहेर काढत असणाऱ्या माणसाने हॉर्न वाजवल्यावर रेवती भानावर आली..

तिला काही केल्या होस्टेलवर जाण्याची इच्छा नव्हती.. तिला या घडीला थोडीशी मनःशांती आणि निवांतपणा हवा होता..

गाडी तिथेच ठेवून ती फुटपाथवरून चालू लागली.. थोडेच अंतर चालल्यावर रेवतीला डाव्या हाताला एक छोटेखानी उद्यान दिसले.. तिचे पाय नकळतच उद्यानाकडे वळले.. ती आत जाऊन इकडे तिकडे पाहत होती.. बसण्यासाठी निवांत.. कमी गर्दीचे ठिकाण शोधत होती.. तिला उद्यानात एका बाजूला बसण्यासाठी दगडी बेंचेस दिसले.. तिथे बऱ्यापैकी गर्दी होती.. मधे पादचाऱ्यांसाठी राखुन ठेवलेला पादचारी मार्ग होता.. फिरायला आलेले बरेच वयस्कर लोक त्या पादचारी मार्गावरून फिरत होते.. तर उद्यानाच्या दुसऱ्या बाजूला हिरवळीने अंथरलेला गालिचा तिच्या नजरेस पडला.. तिथे एका बाजूला लहान मुले त्यांच्या पालकांसोबत खेळत होती.. त्या लहान मुलांना आपल्याच विश्वात रमलेले पाहून.. त्यांना दुडूदुडू धावताना पाहून रेवतीला किंचितसे आल्हाददायक वाटले..

दुसरीकडे एक संपूर्ण हिरवळीचा पट्टा.. त्या उद्यानातील इतर ठिकाणांच्या मानाने थोडा रिकामा आणि शांत दिसत होता.. तिथे लोकांची जास्त रेलचेलही नव्हती..

त्या कोपऱ्यात.. त्या हिरवळीवर जाऊन रेवती बसली..

समोर पडलेली झाडाची काडी उचलून गवताळ जमिनीवर रेघोट्या मारल्या सारखे करत करत तिचे विचारांचे घोडे परत चौफेर उधळू लागले ..

आपण काय विचार करतो.. आणि खरी परिस्थिती काय असू शकते.. आपले विचार आणि सत्य परिस्थिती यात जमीन आसमानाचे अंतर असू शकते.. आपल्या विचारांना खरेच आपण किती संकुचित बनवून ठेवतो..

तिला प्रतीकने काय सांगितले यावर विश्वास बसत नव्हता.. सुहासच्या मागे जणू साडे सातीच लागली होती..

आक्सिडेंट मधून बरा होऊन फक्त ८ महिने झाले होते.. आणि परत हे असे.. देव एखाद्याची परीक्षा बघतो ती किती..

देवा मला परिस्थितीला सामोरे जाण्याचे बळ दे..

रेवती बराच वेळ उद्यानात बसून.. विचारांच्या प्रवाहात होती.. काय करावे.. काय नको.. सुहासला काय वाटेल.. आणि एवढी मोठी गोष्ट त्याने का लपवली..

उद्यान बंद करण्याची शिटी वाजली तसा तो प्रवाह थांबला.. आणि ती तिथून निघाली.. 

दुसऱ्या दिवशी रेवतीने सुहासला भेटायला जायचे ठरविले.. तिने फोन केल्यावर नेहमी प्रमाणे त्याने उडवा उडवीची उत्तरे द्यायला सुरूवात केली.. तो कसा बिझी आहे.. त्याला किती काम आहे वगैरे वगैरे..

पण ती आज त्याचे काहीच ऐकणार नव्हती.. तिने त्याला आपल्या शब्दांत अडकवून.. शेवटी भेटायला येण्यासाठी भाग पाडलेच..

सुहासला पाहिल्या वर रेवतीला हुंदका आवरता आला नाही.. रडायलाच सुरूवात केली.. सुहासला काही कळण्यास मार्ग नव्हता..

पण तिने स्वतःला सावरले.. आणि थेट प्रश्नालाच हात घातला.. "तू काल हॉस्पिटल मधे काय करत होतास.. मी काय विचारते आहे.. तू आणि प्रतीक काल हॉस्पिटलमध्ये काय करत होता.." रेवती

आता मात्र सुहासला शंका येऊ लागली होती की कदाचित रेवतीला सत्य परिस्थितीची जाणीव झाली असावी की काय.. पण कसे शक्य आहे.. नक्की काय झाले असावे..

नेमका परिस्थितीचा अंदाज न येऊन सुहासने नेहमी प्रमाणे या ही वेळेस सत्य लपवण्याचा प्रयत्न केला.. तो तिला म्हणाला की तो एका नातेवाईकाला भेटायला गेला होता..

रेवती दोन मिनिटं त्याच्या कडे एकटक बघत होती.. दुसऱ्याच क्षणी तिने त्याच्या एक सनसनित कानाखाली ठेवून दिली..