maat - 11 books and stories free download online pdf in Marathi

मात - भाग ११



रेवतीने त्याला घरी सोडले. डॉक्टर काय म्हणाले ते सुहासच्या आई-बाबांच्या कानी घातले. सुहासच्या आईने देवा समोर साखर ठेवली.

सुहास दोन दिवसांनी परत डॉक्टरांकडे गेला... गोळ्यांनाही त्याचे शरीर चांगला प्रतिसाद देत होते. डॉक्टरांच्या कृतींमधूनही आता खूप सकारात्मकता जाणवत होती. डॉक्टरांनी त्याला आता पुढील तीन महिन्याचा आराखडा लिहून दिला. गोळ्या, औषधे, पथ्य-पाणी आणि डॉक्टरांना भेटण्याच्या वेळा...

सर्व ठरल्याप्रमाणे चालले होते. अडीच महिन्यात सुहासने तब्बेत सुधारण्या बाबत बरीचशी प्रगती दाखविली... डॉक्टरांनी तो सर्व आराखडा अजुन १ महिना राबवला...

१ महिन्यात परत जवळ जवळ पूर्ववत होणाच्या कक्षेत आलेल्या सुहासला त्रास होऊ लागला... डॉक्टरांनाही अचानक काय झाले याचा अंदाज येईना...

सुहासची तब्बेत आता वरचेवर खालावत चालली होती... त्याला अंथरुणावरून स्वतःहून उठणे तसेच हालचाल करणे अतिशय अवघड आणि वेदनादायी ठरत होते.

किमोथेरपी झाल्याने तो अतिशय अशक्त दिसत होता... डोक्यावरचे केस पूर्ण झडले होते... रेवतीला त्याला या अवस्थेत बघणे फार कठीण जात होते...

खाण्यापिण्यात त्याला काडीचाही रस उरलेला नव्हता, थोडे फार द्रवपदार्थ पोटात जात होते तेवढेच काय ते...

त्याचे कशात लक्ष्य लागत नव्हते... आजूबाजूला काय चालले आहे याचे भान नव्हते...

हळूहळू माणसेही ओळखायची बंद झाले होते त्याचे...

या सगळ्याने रेवती फार खचत चालली होती... तिला आपलाही सुहाससोबत शेवटाकडे प्रवास सुरु झाल्याचे आतून जाणवत होते... पण तिचे मन तो विचार झुगारून, परत आशा पल्लवित करण्याचा भाबडा प्रयत्न करत होते...

सुहास थोडा बोलायच्या परिस्थितीत होता तेव्हा रेवती जवळ त्याने आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली होती...

"रेवा.. आपल्याकडे पैसे होते.. तू, आई-बाबा होतात म्हणून आपण चांगल्यातील चांगले उपचार घेऊ शकलो... तेही प्रयत्न कदाचित अपुरे पडत आहेस असे दिसत आहे... राहून राहून मनात एकच विचार येतोय ग.."

खरेतर सुहासचे मनोधैर्य खचताना पाहून रेवतीला खूप त्रास होत होता... पण आपण खचलो तर सुहासचे उरले सुरले अवसानहि गळून पडण्याची शक्यता लक्षात घेता, ती जास्तीत जास्त धैर्य एकवटून सुहासचे बोलणे ऐकण्याचा प्रयत्न करत होती...

“आपल्याकडे साधने आणि ती वापरण्याकरिता लागणारा पैसा उभा करण्याची ताकद असूनही आपले प्रयत्न आयुष्य वाचवायला कमी पडत आहेत...

ज्यांना पैश्याअभावी किंवा इतर अडचणींमुळे या साधनांना ऍक्सेस मिळत नाही त्यांचे काय होत असेल... खरेच विचारही करवत नाही ग रेवा..."

रेवतीला सुहासचा हाच स्वभाव फार आवडत होता... मागेही गरज नसताना चाकूच्या हल्ल्याचा शिकार झाला होता...

त्याचे मन सतत सामाजिक बांधिलकी जपत विचार आणि त्या अनुषंगाने कृती करण्याचा प्रयत्न करत असे... आताही मृत्यूच्या शय्येवर असताना इतरांचा विचार करत होता...

रेवतीच्या भावना आता मात्र उफाळून आल्या होत्या आणि इतकावेळ सामंजस्याने सुहासचे बोलणे ऐकणारी ती सुहासच्या हातावर डोके टेकवून बराच काळ रडली...

सुहास त्राण कमी झालेल्या दुसऱ्या हाताने तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत होता... बहुधा त्यालाही त्याचा नजीकचा भविष्यकाळ ठळक दिसू लागला असावा...

भावनांच्या आवेगाला बांध घालणे प्रत्येक वेळेस माणसाच्या हातात असतेच असे नाही... बऱ्याचदा माणूस आवेगाच्या भरतीच्या लाटेवर त्याच्या नकळतच स्वार होतो आणि काही काळासाठी वेगळ्याच प्रदेशात वावरत असतो...

सुहासची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली होती... हळूहळू गोळ्या, औषधे आणि उपचारालाही त्याच्या शरीराने प्रतिसाद देणे बंद केले...

आणि १५ दिवसांतच सुहासने या जगाचा निरोप घेतला...

रेवती अपेक्षेप्रमाणेच सुरवातीला पार कोलमडून गेली होती. तिला जरी शेवटी शेवटी होणाऱ्या गोष्टीची कुणकुण लागली होती... तरीही प्रत्यक्षात ती गोष्ट घडल्यावर मान्य करणे फार कठीण जात होते...

माणूस बराच काळ आठवणींच्या गाठोड्याला उराशी कवटाळून गेलेल्या माणसाच्या सोबतच वावरत असतो...

प्रतीकही हे सारे पाहत होता.. तो देखील फार खचून गेला होता... पण कोणीतरी रेवतीचे लक्ष्य सुहासच्या ध्येयाकडे ओढणे गरजेचे होते...

प्रतीक थोडे दिवसांनंतर सुहासच्या ध्येयासाठी आपल्याला काय करावे लागेल या संदर्भात रेवतीशी बोलला... तिला असह्य वेदनेतून खेचून बाहेर काढून, तिचे लक्ष सुहासच्या ध्येयाकडे ओढणे गरजेचे होते..

ते काम प्रतीकने चोख पार पाडले...

आता त्या दोघांना सुहासचे ध्येय खुणावत होते...

अर्थातच हॉस्पिटल उभे करणे ही सामान्य माणसाच्या अवाक्यापलीकडची गोष्ट होती... त्यासाठी कोणत्या तरी सेवाभावी (एनजीओ) संस्थेशी जोडले जाऊन त्या दृष्टीने पाऊले उचलणे गरजेचे होते...

त्याप्रमाणेच "ध्यास" या सेवाभावी संस्थेशी जोडले जाऊन... तब्बल ७ वर्षांच्या अथक मेहनतीनंतर.. प्रतीकच्या मदतीने... रेवतीने त्याच्या शेवटच्या इच्छेला हॉस्पिटलच्या रूपात साकार केले होते...

या हॉस्पिटलचा उद्देश रुग्णांना कमीत कमी खर्चात गरजेच्या साऱ्या सुविधा उपलब्ध करून देणे होता.

सुहासच्या सामाजिक बांधिलकीचा अमूल्य ठेवा रेवती इथून पुढे आजन्म जपणार होती...

"आज सुहास असता तर..." या विचाराने तिच्या डोळ्यात पाणी तरळले...

सगळ्या विषम परिस्थितीवर मात करत रेवती आणि सुहासच्या प्रेमाने आज उच्चांक गाठला होता असे म्हटले तर वावगे ठरणार नाही...

“प्रेम नाव न फक्त सहवासाचे...

ती भावना, जी व्यक्त करायला
कमी पडतात समुद्र शब्दांचे...

प्रेम नाव न फक्त सहवासाचे...

हृदयात मूर्तिमंत करून एकमेकांना,
आयुष्यभर एकमेकांच्या ध्येयासाठी जगण्याचे...”

सुहासच्या आठवणींच्या कवडश्यातून बाहेर पडून हॉस्पिटलमधील माणसांच्या गर्दीत रेवती सामील झाली...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED