Fulacha Prayog.. - 15 books and stories free download online pdf in Marathi

फुलाचा प्रयोग - 15

फुलाचा प्रयोग

पांडुरंग सदाशिव साने

१५. दु:खी मधुरी

‘आईला देऊ हे औषध?’ मधुरीने विचारले ‘दे. पेलाभर पाण्यात हया बाटलीतील चमचा दोन चमचे औषध घाल. गाढ झोप लागेल. खोकला उसळणार नाही. तू येशील ना रात्री?’‘हो.’मधुरी औषधाची बाटली घेऊन गेली.‘आज रात्री गंमत आहे एकूण!’ सैतान म्हणाला.‘चूप. खबरदार असे काही बोलशील तर!’ माधव चिडून बोलला.रात्र झाली. मधुरीचा भाऊ घोरत होता. तिची आई खोकत होती.‘आई, तुझ्यासाठी आज औषध आणले आहे, विसरले मी सांगायला. विसरले मी द्यायला. घेतेस का?’‘कोणी दिले बाळ औषध?‘एका उदार माणसाने. त्या औषधाने दमा जातो, खोकला थांबतो. गाढ झोप लागते.’‘आता कायमचीच झोप लागू दे; परंतु तुझे एकदा लग्न झाले असते म्हणजे; बरे; परंतु नसेल माझ्या नशिबी तुमचा संसार पाहण्याचे. आण औषध. घेऊ दे घोट. वाटेल बरे तर ठीक. जरा डोळा तरी लागेल.’मधुरीने फुलपात्र घेतले. त्यात तिने दोन चमचे औषध घातले. मग त्यात पाणी घालून चमच्याने ढवळून तिने आईच्या हाती दिले. आई औषध प्यायली.‘पड आता. झोप लागेल.’ मधुरी म्हणाली.‘तूही पड. दिवसभर तुला काम करावे लागते. धुणी धुवावी लागतात. दळण दळावे लागते. नीज हो मधू. ये.’ आई प्रेमाने म्हणाली.आईला झोप केव्हा लागते हयाची वाट पाहात मधुरी अंथरूणावर पडली. थोडया वेळाने आई खरोखरच घोरू लागली. भाऊही घोरत होता. मधुरी हळूच उठली. तिने दाराची कडी अलगद काढली. ती बाहेर पडली. आपल्या प्रियकराला भेटायला गेली.

अद्याप कोंबडा आरवला नव्हता. कोण येत आहे ते काळोखातून? मधुरी. ती मधुरी आहे. ती हळूच घरात शिरली. तिने कडी लावली. डोक्यावरुन पांघरूण घेऊन ती निजली, परंतु तिला झोप आली का!भोंगा झाला. भाऊ उठला. आई घोरत होती. आईला आज झोप लागली आहे हे पाहून भावाला बरे वाटले. त्याने प्रातर्विधी केले. स्नान करून तो कामाला गेला. आता चांगलेच उजाडले. घरात उन्हे आली. मधुरीलाही झोप लागली होती; परंतु ती जागी झाली. ती उठली. आई अद्याप अंथरूणातच होती; परंतु आता घोरण बंद होते. मधुरीने तोंडंबिड धुतले. ती आईजवळ गेली. आईचा हात तिने हातात घेतला. तो तिला थंडगार लागला. मधुरी घाबरली. आई, आई तिने हाका मारल्या. आईला शुध्द ना बुध्द. सारी हालचाल थांबली होती. आई का मेली? तो विचार मधुरीच्या मनात आला. ती दचकली. तिने किंकाळी फोडली. शेजारचे लोक आले.‘मेली म्हातारी. मिटला खोकला,’ ते म्हणाले.‘आता आम्हाला झोप येत जाईल. म्हातारीचा खोकला सार्‍या आळीला झोपू देत नसे. देवाला दया आली.’ एक दुष्ट म्हणाला.‘मधुरीची आता मजा आहे.’ कोणी तरी हसून बोलले.मधुरीची आईची सारी क्रिया झाली. भाऊ व बहीण दोघे राहिली. एके दिवशी मधुरीची भाऊ कामावरुन येत होता. इतर कामागारांजवळ त्याचा वाद चालला होता.‘अरे जा, माहीत आहे. घरोघर मातीच्याच चुली.’‘घरोघर असतील; परंतु माझे घर अपवाद आहे. माझी बहीण तशी नाही. ती धुतल्या तांदळासारखी आहे.’‘तू घरी नसतोस तिचे थेर पाहायला. तू कामावर असतोस व ती प्रियकराला मिठया मारीत असते. घरी आता आईचीही अडचण नाही.’‘तोंड सांभाळून बोल, माझ्या बहिणीची अब्रू-तिचे का धिंडवडे मांडले आहेस?’‘तुझ्या बहिणीची मात्र अब्रू. इतर मायबहिणींवर टीका करतोस तेव्हा रे? तेव्हा कसे तोंड चुरचुर चालते तुझे?’असे भांडत ते जात होते. इतक्यात सैतान व माधव तिकडून आले. बाहेर काळोख पडला होता. मधुरीचे घर जवळ होते. सैतान माधवला म्हणाला. ‘हाच तिचा भाऊ मार सोटा. काढ काटा, हाण.’

‘मला नाही धैर्य.’ माधव म्हणाला. ‘भितुरडा.’ असे म्हणून सैतानाने मधुरीच्या भावाच्या डोक्यता सोटा हाणला.‘अरे, हा बघ तुझ्या बहिणीचा जार.’ बरोबरचा कामगार म्हणाला.परंतु भाऊ खाली पडला होता. सैतान व माधव अंधारातून पसार झाले. भावाची किंकाळी मधुरीने घरातून ऐकली. ती दिवा घेऊन आली, तो भाऊ रस्त्यात पडलेला. डोक्यातून भळभळ रक्त वाहात होते. ती भावाचे डोके मांडीवर घेऊन बसली.‘येथे रस्त्यात कोठे बसतेस? त्याला घरी नेऊ.’ शेजारी म्हणाले.भावाला घरी नेण्यात आले. मधुरी वारा घालीत होती. डोक्याला तिने फडके बांधले. ‘भाऊ, भाऊ, ती हाका मारीत होती. तिला रडू आले. बराच वेळ झाला. भावाने डोळे उघडले. जवळ बहीण होती.‘तू दूर हो. माझ्या अंगाला हात लावू नकोस. तू पापी आहेस. दुष्ट आहेस. तू व्यभिचारिणी आहेस. वेश्या आहेस. हो दूर. मरताना तरी पापी माणसाचे दर्शन नको. तुझ्या माकडचेष्टांसाठी आईला विष देऊन मारलेस. तू तुझ्या भावाच्या डोक्यात आज सोटा मारवलास. तू डाकिण आहेस. हो दूर. नको लावू हात.’ भाऊ त्वेषाने म्हणाला.‘भाऊ, नको रे असे बोलू, मी नाही हो अपराधी. मी का वेश्या? मी फक्त एकाला प्रेम दिले. बघ हे हृद्य फाडून. बहिणीला वाटेल ते कसे रे बोलतोस? नाही आमचे अद्याप लग्न झाले; परंतु ते लावणार आहेत. त्यांचे प्रेम आहे माझ्यावर माझे त्यांच्यावर. निर्मळ प्रेम म्हणजे का व्यभिचार? म्हणजे का वेश्याव्यवसाय? भाऊ, कसे रे बोलतोस असे? का अशी आग पाखडतोस? कोण आहे मला?’

‘तू दूर हो सांगितले ना? माझ्याजवळ प्रेमाच वर्णन करतेस, लाज नाही वाटत? लग्न म्हणे लागेल. लागल्यावर मारायच्या होत्यास मिठया; परंतु आधीच? पापिणी, चांडाळणी, दूर हो. हात नको लावू मला. धर्म बुडवी. कुळाला काळिमा लावलास. घराची अब्रू दवडलीस. मला गिरणीत मान वर करू देत नाहीत; परंतु तुझी बाजू घेऊन मी भांडत असे. माझी बहिण निर्मळ म्हणत असे; परंतु तू तर नरकात बुडया मारीत आहेस. नाच आता पोटभर त्या नरकात. आईची अडगळ गेली. भावाची अडचणही दूर झाली. दाही दिशा तुला मोकळया. दूर हो. हो दूर.’

‘भाऊ, असेन मी पापी. असेन मी कुलटा. पाप्यावर प्रेम करील तोच खरा. चांगल्यावर सारेच प्रेम करतील. खरे प्रेम ते जे पाप्यावरही दया करील. भाऊ, सारे जग दूर लोटील; परंतु तू नाही लोटता कामा. तू माझे अपराध पोटात घातले पाहिजेस. तुझे प्रेम असे मोठे नाही? ते प्रेम का संकुचित, क्षुद्र आहे? बहिणीची सारी पापे विसरून जाण्याइतके तुझे प्रेम सहनशील नाही? भाऊ, ते मोठे प्रेम मला दे. मला कोणी नाही.’

‘तुझा प्रियकर आहे. काय करायचा भाऊ, काय करायची आई? मी आता थोडाच वाचणार आहे? शक्ती संपत आली. झापड आली डोळयांवर. एकच तुझ्याजवळ मागणे. मरताना मला हात नको लावू. तुझा स्पर्श नको. कुळाला काडी लावणारी तू. हो माझ्या डोळयांआड, हो दूर.’मधुरी दूर झाली. ती बाजूला रडत बसली; परंतु तिला आता रडूही येईना. ती केवळ शून्य दृष्टीने बघत होती. शेवटी भावाने प्राण सोडले. मधुरी जगात एकटी राहिली.काही दिवस मधुरी घरातून बाहेर पडली नाही. विहिरीवरून पाणी आणण्यासाठी हळूच एकटी जाई. जगाचे दर्शन नको असे तिला वाटे. ती रडत बसे एके दिवशी ती विहिरीवर गेली तो तेथे बायका बोलत होत्या.‘ऐकलंत का? ती चिमणी म्हणे पळून गेली.’‘खरंच का?’‘हो. सार्‍या गावात बभ्रा झाला आहे.’‘का ग मधुरी, तुला आहे ना ती चिमणी माहीत?’‘हो. आहे. ती का गेली?’हो. आईबाप घरात आहेत. त्यांच्या नावाला काळिमा, अलिकडच्या मुली फारच हो अगोचर वागू लागल्या एकूण.’‘जे जे ऐकावे ते ते थोडेच.’त्या बायका गेल्या. मधुरी घागर घेऊन तेथेच उभी होती. घागर भरलेली होती. डोळयांच्या घागरीही भरून आल्या. चिमणीवर होणार्‍या टीकेत तिनेही भाग घेतला; परंतु तिला काय अधिकार? ती चिमणीसारखीच नव्हती का? ती चिमणी तर ही मैना. काय होता फरक? मधुरीचे मन तिला खात होते. शेवटी घागर घेऊन ती घरी आली. दारे लावून ती रडत बसली. मधुरीची आई गेली, भाऊ गेला; परंतु प्रियकर होता. परंतु तो बरेच दिवसांत डोकावला नाही तोही का सोडून गेला? त्याने का फसविले? प्रेम म्हणजे क्षणभर शरीराची करमणूक असे का त्याला वाटले? नाही, असे तो करणार नाही. येईल, तो येईल. कसा दिसे, कसा हसे, त्याचे कसे चालणे, कसे बोलणे माझा राजा, येईल माझ्या प्राणांचा प्राण.अशा आशेने मधुरी जगत होती. ती चरखा चालवी. तोंडाने गाणे म्हणे. प्रियकराच्या वर्णनाचे गाणे. प्रियकाराच्या प्रेमाचे गाणे. चरखा गूं गूं करी. तिच्या गाण्याला साथ देई. ‘येईल. गूं गूं. येईल प्रियकर येईल. गूं गूं’ असे जणू तो चरखाही बोले.दिवसामागून दिवस चालले. मधुरी वाट पाहात होती. दिवसा ती दारे लावी. रात्र झाली, मध्यरात्र झाली की, उघडी टाकी. तो दिवसा यायला लाजत असेल रात्री येईल. दारे उघडी असू देत; परंतु तो आला नाही. कोठे गेला तो? तो का फसवील? मला सोडून जाईल? नाही. तो असे करणार नाही. तो माझ्याजवळ लग्न लावील. माझी अब्रू सांभाळील. मला प्रेम देईल. येईल. तो खात्रीने येईल. दु:खी कष्टी मधुरी. किती फिक्कट दिसते, परंतु आशेने आहे.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED