Fulacha Prayog.. - 16 books and stories free download online pdf in Marathi

फुलाचा प्रयोग - 16

फुलाचा प्रयोग

पांडुरंग सदाशिव साने

१६. ती काळरात्र

सैतान व माधव हवेतून दौडत येत होते. त्यांनी आपली गती जरा मंदावली. ‘ठक ठक’ आवाज कानावर आला. कोठून येत होता तो आवाज? ठक ठक. कोण काय ठोकीत होते? कोण काय दुरुस्त करीत होते? इतक्यात माधवाला दोनचार माणसे दिसली. ती माणसे काही तरी उभारीत होती.‘काय रे, काय चालले आहे तेथे?’ माधवाने विचारले.‘तुला काय करायचे आहे?’ सैतान म्हणाला.‘ठकठक आवाज येतो आहे. कशाची तयारी? काय उभारताहेत?’‘अरे, एका अभागी जिवाला उद्या सकाळी येथे फासावर द्यायचे आहे. त्यासाठी ही तयारी. त्यासाठी तो वधस्तंभ.’‘कोण आहे असा अभागी जीव?’‘तुला काय करायचे आहे?’‘सांग त्याचे नाव. काय त्याने केले?’‘नाव सांगितले तर तुला वाईट वाटेल.’‘का बरे? माझ्या ओळखीचा आहे तो जीव ? ‘नुसत्या ओळखीचा नाही, तर प्रेमाचा.’‘प्रेमाचा? कोणावर केले मी प्रेम? जगात अशी कोणती वस्तू आहे, कोणती व्यक्ती आहे की, जेथे माझे आतडे गुंतले आहे? हा माधव अनासक्त आहे’.‘वाहवा रे अनासक्ती!’‘सांगतोस की नाही नाव?’

‘सांगू?’‘अरे, तिला फाशीची शिक्षा झाली आहे.’‘तिला म्हणजे कोणाला?‘तुम्ही माणसे फार विसराळू, अरे, ती.’‘ती म्हणजे कोण?’‘जिच्याशी तू माकडचेष्टा केल्यास, प्रेम प्रेम करून जिला बिलगलास मिठया मारल्यास....’‘कोण? मधुरी?’‘हो.’‘का बरे?’‘तिच्यावर तीन आरोप आहेत.’‘कोणते बा?’‘आईला विष घालून मारल्याचा; प्रियकराकडून भावाला मारविल्याचा आणि स्वत:चे मूल गुप्तपणे नदीत सोडून दिल्याचा.’‘अरेरे! काही करता नाही येणार?’‘उपाय नाही.’‘मधुरीला वाचवलेच पाहिजे.‘ती तुरूंगात आहे. दारे बंद आहेत. सर्वत्र पहारे आहेत.’‘मला सबबी सांगू नकोस. मधुरी वाचलीच पाहिजे. मृत्यूच्या दाढेतून तिला ओढून काढले पाहिजे. उपाय सांग, मार्ग दाखव.’‘तुझी इच्छा पूर्ण करण्याचे मी वचन दिले आहे. जा. त्या तुरूंगात जा. सारी कुलपे गळून पडतील. पहारेकरी घोरत पडतील. तू आज जा. तिला आण सोडवून. पहाटेचा कोंबडा आरवण्यापूर्वी बाहेर या. कोंबडा आरवेपर्यत माझी सत्ता. मग नाही. कोंबडा आरवल्यावरही जर आत राहिलास तर तूही पकडला जाशील. ध्यानात धर. जा. लौकरच रात्र पडेल.’

बाहेर रात्र झाली. माधव तुरूंगाच्या त्या भीषण दरवाजाजवळ आला. दरवाजा आपोआप उघडला. पहारेकरी झोपी गेले. माधव आत शिरला. मधुरीचा शोध करीत निघाला. फाशी जाणारे कैदी कोठे ठेवतात? तो पाटया वाचीत निघाला. तो ‘फाशी - कोठा’ अशी पाटी दिसली. तो आत आला तो त्याला मधुरी दिसली.दु:खी, कष्टी, निराश मधुरी. तिचे ते मधुर हास्य कोठे आहे? आज तोंडावर प्रेतकळा आहे. ती पेंढयावर पडली होती. मध्येच उठे, मध्येच निजे, तिचे केस पाठीवर मोकळे सुटले होते. तेथे एक दिवा मिणमिण करीत होता. पाण्याचे मडके होते.माधवाला ते दृश्य बघवेना; परंतु तो जवळ गेला. दार मोकळे झाले. ‘मधुरी, चल. तुला न्यायला मी आलो आहे. चल ऊठ मधुरी!’ असे तो भराभर बोलू लागला. मधुरीने त्याच्याकडे दीनवाण्या दृष्टीने पाहिले. ती भ्रमात होती. जणू वातात होती.‘आता न्यायला आलेत! आता रात्री देणार फाशी! सकाळी ना फाशी देणार आहात? मग लौकरसे आलेत? आणखी चार घटका जगू दे. आता नका रे नेऊ मांगांनो. दया करा. उद्या मी मरणार, इतक्या तरूणपणी मरणार. हे तारूण्य मातीत जाणार. हे सौंदर्य फुकट जाणार. हया सौंदर्याने तर सारा घात केला. हे सौंदर्य नसते तर कोणी माझ्याकडे ढुंकूनही पाहिले नसते. मग हया गोष्टी का झाल्या असत्या? कशाला मिळाले हे सौंदर्य. फाशी देणारे सौंदर्य. पाप. मला वाटत होते की, हे पाप आहे. तरी मी ते केले. किती सुंदर रूप धारण करून पाप समोर उभे राहाते! हे पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याच्या मोहात पडतो. मोहक सुंदर पाप. साप थंडगार वाटला तरी सापच तो. पाप सुंदर दिसले तरी मानेला शेवटी फास लावते. परंतु सकाळी लावा रे फास. आता रात्री देणार? अशा थंडीत? नका रे. जा माघारे. सकाळी या, सूर्याचे किरण पडतील. थोडी ऊब मिळेल. मरताना ऊब.’मधुरी असे बडबडत होती, माधव अधीर होता.‘अग मधुरी, मला ओळखले नाहीस का? मी माधव. तुझा मी. मांग नव्हे. तुझा प्रियकर माधव तो मी. चल. लौकर ऊठ. तुला न्यायला मी आलो आहे. धर माझा हात.’‘तुम्ही मांग नाही?’‘नाही नाही.’‘मग कोण?’‘मी तुझा प्रियकर.’‘हो. हो.’‘पाहू दे तुमचा हात?’

तिने त्याचा हात आपल्या हातात घेतला. तिने क्षणभर डोळे मिटले. ‘छे; प्रियकराचा हात असा नसतो. हा हात थंडगार आहे. हयात ऊब नाही. काही नाही. गार गार हात, मेलेला हात, का मारणारा हात! बघू? होय. हे पाहा रक्त तुमच्या हातावर आहे. माझ्या आईच्या प्राणांचे, भावाच्या प्राणांचे आणि त्या चिमुकल्या प्राणांचे, सर्वांचे रक्त तुमच्या हातावर. भयाण भेसूर हात. दुष्ट दुष्ट हात. हा का प्रियकराचा हात? नाही. नाही’‘मधुरी!’‘काय?’‘तू अशी भ्रमिष्टासारखी काय करतेस? वेळ नाही; ऊठ माझ्याबरोबर चल. मी माधव. तू ओळखीत नाहीस? ज्याची वाट बघत असतेस तो मी.’‘माधव?’‘होय. ऊठ, मधुरी ऊठ. असे काय करतेस?’‘हं, ओळखले. काल आलेत वाटतं? सर्वनाश झाल्यावर दर्शन दिलेत.’‘अर्जुन सर्वनाश झाला नाही. मी आलो आहे वाचवायला. ऊठ, नीघ.’‘बोलण्याची आता इच्छा नाही. सारा खेळ खलास. आता कशात राम नाही; परंतु आलेत, एका अर्थी बरे झाले. मी आता सांगते ते नीट ऐका, त्याप्रमाणे करा. नाही म्हणू नका. हे बघा, उद्या मला फाशी देतील. मी मरेन. माझे प्रेत तुम्ही मागा आणि मला अग्नी द्या. कोठे बरे द्याल? आईला दिलेला आहे तिथेच द्या. आईच्या अगदी जवळ नको. कारण मी पापी आहे; परंतू आईचा आधार असू दे. भाऊलाही तिथेच दिलेला आहे. आईच्या कडेला मला अग्नी द्या. आणखी एक सांगते गावाबाहेर ती नदी आहे ना? तिच्या तीरातीराने बघत जा. कोठे तरी लव्हाळयात सापडेल. माझे बाळ सापडेल. जन्मताच ते मी सोडून दिले. नदीच्या स्वाधीन केले. तरी सापडेल. सापडेल त्याचा सांगाडा. त्याला आणा आणि माझ्या स्तनांवर त्याला ठेवा. त्याला एकदासुध्दा नाही हो पाजले. स्तन भरून येत; परंतु बाळ कोठे होता? आणा हो त्याला शोधुन आणि माझ्या जवळ ठेवून, माझ्या स्तनाशी त्याला ठेवून, दोघांनाही एकदमच अग्नी द्या. हे काय, रडायला लागलेत वाटते? कर्म करताना हसावे, मग रडावे; परंतु डोळे पुसा, ऐका नीट. कर्तव्य कठोर असते. ते केलेच पाहिजे. कराल ना?’‘मधुरी, असे का तू म्हणतेस? तू मरणार नाहीस. तू वाचशील. आपण दोघे एकत्र राहू. सुखात नांदू. चल ऊठ. धर हात. वेळ नाही. नीघ.’‘नका अशी ओढू. मला मरू दे. कशाला आता जगायचे? आणि समजा तुमच्याबरोबर आले तर पुन्हा पकडतील. पुन्हा तीच शोभा. खरे ना?’

‘परंतु आपण लांब लांब जाऊ. दुसर्‍या देशात जाऊ. तेथे कोण येईल धरायला, कोण येईल पकडायला? ऊठ.’‘दुसर्‍या देशात हया देशातील पोलीस येणार नाहीत. त्यांचा ससेमिरा चुकेल. पण....’

‘पण काय? ऊठ.’‘माझ्या हदयातील सदसद्विवेकबुध्दीचा पोलीस कसा दूर होणार? कोठे पाताळात गेल्ये तरी हे मनातील विंचू दंश करीत राहाणारच. नको आता जाणे नको. आता मरणेच श्रेयस्कर. पश्चाताप झाला आहे. मरणाने मी मुक्त होईन! प्रभू मला जवळ घेईल, मी तुमची तेथे वाट बघत बसेन. माझ्या पश्चातापाने तुम्हीही पवित्र होऊन याल. तेथे भेटू.’‘मधूरी, ऊठ.’ तो तिची बकोटी धरून म्हणाला.‘नको, खरेच नको.’ ती म्हणाली.बहेरून सैतान हाका मारू लागला.’ लौकर या बाहेर. वेळ संपत आली. कोंबडा आरवेल. आटपा झटपट.’‘चल, मधुरी ऊठ. वेळ नाही. ऊठ.’‘नको, खरेच नको.’‘लौकर या. वेळ भरत आली. चला झटपट नाही तर अडकाल.’‘मधुरी!’‘जा तुम्ही. मी वर वाट बघेन.’‘चलो. वेळ झाली. चलो.’‘मधुरी!’‘स्वर्गात आता मधुरी भेटेल. तेथे सारे गोड होईल.’‘चलो. कोंबडा आरवणार. एक क्षण. चलो.’‘नही येत तर नाही. मर जा.’ असे म्हणून माधव झटपट बाहेर निघून गेला. पहारेकरी जागे झाले. चाराचे ठोके पडले. ‘आलबेल बराबर है.’ अशा गर्जना झाल्या.‘काय माधव?’‘चल, कोठे तरी लांब ने.’सैतान हसला. माधव काही बोलला नाही.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED