गन्या विसरला की त्याला कंदिलाच्या मागे जायचे होते जो उजव्या बाजूला थोड्या लांब अंतरावर होता .
पुढे चालू ....
मन्या व गण्या राम्याला घेऊन जात होते .त्या मशालीच्या पाठोपाठ . राम्या अजूनही बेशुद्ध होता . त्यामुळे दोघांनी मिळून राम्याला उचललं होतं . राम्याच्या ओझ्यामुळे त्यांची चाल मंदावली होती . मशाल असली तरी तिचा थोडा थोडका प्रकाश काळोखात हरवून जात होता . त्यातच वाटही व्यवस्थित नसल्याने सारखे धड-पडत होते दोघेही . ठेच लागून त्यांच्या पायाला जखमा झाल्या होत्या . खोलीतून येताना भांड्याचं झाकण खाली पडलं होतं . त्यामुळे अजूनही थोडं थोडं रक्त उडत-उडत जाऊन तिथे पडत होतं . मात्र याची जाणीव त्यांना अजिबात नव्हती . त्यांना फक्त एवढंच वाटत होतं की आपण येथून बाहेर पडणार.....।
" गन्या लगा तुझ्यामुळे आपण इथं फसलो , नाही तर लागा आतापतुर आपण ऑर्केस्ट्रात धमाल मस्ती करून घरी झोपलो असतो .....
" मन्या लगा मला तर काय माहित असं काय असेल म्हणून..
मात्र अचानक पुढे असलेली मशाल गायब झाली . दोघांच्याही काळजाचा ठोका चुकला . इतका वेळ उजेडाला सरावलेले डोळे अचानक आलेल्या अंधारामुळे काही सेकंदासाठी आंधळेच झाले . मग हळूहळू थोड्या अंतरावर जत्रेसाठी लावलेले दिवे , गावातील घरातील प्रकाशाचा झगमगाट दिसू लागला आणि त्यांना हायसे वाटले . त्यांनी आपला वेग वाढवला व पटापट गावाकडे सरकू लागले . त्यांच्या जीवात जीव आला . त्यांनी देवाचे व त्या मुलीचे जिने स्वप्नात येऊन मार्ग दाखवला ,दोघांचेही मनापासून आभार मानले.
आता त्यांची खात्री पटली होती की भूत नावाची गोष्ट असते व त्याची भीती कितीही नाही म्हटलं तरी आपोआपच वाटते . पण आता ते सुरक्षित होते . जंगलातून बाहेर आल्यावर समोरच थोड्या अंतरावरती देऊळ होते . तिथेच बाजूला बसायला एक कट्टाही होता . त्याच कट्ट्यावर त्यांनी राम्याला झोपवले व दोघेही बसले.
" मन्या जा रं चांगलं बादली भरून पाणी आण, कसलं बेशुद्ध झालयं राम्या , त्याला शुद्धीवर आणायला पाहिजे .
" थांब गण्या . दोन मिनिटात आणतो .
मन्याने पाणी आणल्यावर त्याचा सपकारऱ्याने राम्याच्या तोंडावर मारले . तेव्हा राम्या शुद्धीवर आला .
गण्या म्हणाला "लेका राम्या तुला माहित हाय का आपण कसलं बेकार भुताच्या तावडीत सापडलो होतो .."
राम्या " पण पाद्री तर चांगलं भुत होत होतं ना
मुक्त झाला का ती पाद्री...."
मण्या " अरे कसला मुक्त होतोय तो . त्याचाच डाव होता सारा . दोन थेंब म्हणून किती रक्त काढलं बेशुद्ध करून कुणास ठाऊक ? "
राम्या " पण त्याला मारायचं तर त्यांना तेव्हाच आपल्याला मारलं नसतं का ? बेशुद्ध करून रक्त काढायचा काय उपयोग ?? "
गण्या " काय माहित काहीतरी प्रथा असेल बळी द्यायची वगैरे "
राम्या " अरे पण मग आपण वाचलो कसे ? "
मण्या " अरे गाण्याच्या स्वप्नात एक पोरगी आली बेशुद्ध असताना तिने सांगितलं काय करायचं ते ."
राम्या " कुठली पोरगी ?
गण्या " ते मला पण माहित नाही पण तिनं सांगितलं तसं केलं म्हणूनच आपण वाचलो . "
राम्या " गण्या रुमाल कशाला बांधलाय हाताला काय लागलं का काय ? "
गण्या " अरे बाबा काय सांगायचं तुला रक्ता वरती सुद्धा भुताटकी चालत होती रक्त हवेत उडत होतं .."
मण्या " गण्या जरा नीट बघ अजून पण रक्त पडतेच आहे..
अजुनही रक्त वाहत होतं जंगलाच्या दिशेने.
मन्या म्हणाला " पण ते कसं काय शक्य आहे ? आपण तर गावात आलो ना ? जंगलाच्या बाहेर "
राम्या म्हणाला " आपण कोणीतरी जाणकार माणूस गाठायला पाहिजे "
गण्या म्हणाला " आपण गावात आलोच नाही . गावात देऊळ कधी रिकाम नसतं . दोन-चार म्हातारी बारा महिने पडीक असतात देवळात . पण आता कोणीच नाही . "
" होय लगा आज ऑर्केस्ट्रा आहे पण कुठल्याच गाण्याचा आवाज येत नाही " मन्या म्हणाला
" अरे ती गोष्ट सोड कुत्रा , मांजर , किडा-मुंगी काय तरी दिसतय का तुला ..? " राम्या
" अरे तुम्ही सगळं सोडा रातकिड्यांची किरकिर सुद्धा ऐकू येत नाही . किती विचित्र आहे ...? " गण्या म्हणाला
" गण्या , मन्या दोस्तांनो ही चकवा तर नसेल ना चकव्यातून बाहेर कधीच जाऊ शकत नाही माणूस " राम्या
" चला आपण देवळात जाऊन मग कुठलं भुत देवळात येतंय ? " मन्या
" अरे येडाय काय तू ? ही देवळपण भुतानाचं बनवलेलं असणार ...? " गण्या
राम्या म्हणाला " मग आपण करायचं तरी काय ? आपण वाचणार तरी कसं ? "
पण अचानक कोलाहाल वाढला . चित्र-विचित्र आवाजा बरोबर अनेक मितीमध्ये अनेक घडामोडी सुरू झाल्या . पण त्यांच्या मानवी डोळ्यांना एवढंच दिसत होतं की सारे काही नष्ट होत होतं . व त्यांच्याकडे गोलाकार आकारात मध्ये येत होता तो काळोख , मिट्ट काळोख . तो काळोख त्यांच्याभोवती गोलाकार पसरत गेला होता . तो काळोख , त्यात काय होतं काय माहित ? पण जे काही होतं ते अमानवी , पाशवी आणि क्रूर होतं . जी काही शक्ती होती ती मानवी डोळ्यांना , मनाला , बुद्धीला न समजणारी होती . जे काही त्यांच्या मानवी ज्ञानेंद्रियांना जाणवत होतं ते त्या शक्तीचा थोडासा भाग होता . ज्याच्या पुढे मानव हतबल होता . इतका वेळ पुढे सरकणारा तो गोलाकार काळोख थांबला . कोलाहलाचा स्वर उच्च कोटीला पोहोचला . कोणतही हिंस्र श्वापद शिकारीला खाण्यापूर्वी मौज म्हणून तिच्याशी खेळ करते तोच खेळ आता त्या तिघांबरोबर होणार होता .
काळोखातून चित्र-विचित्र गलिच्छ स्वर उमटत होते . जे तिघांच्याही कानाला कर्णकर्कश्य वाटत होते . जो प्रसंग तिघांवर ओढवला होता तो अकल्पनीय होता . अचानक काळोखातील आवाज थांबला व त्याच बरोबर त्यांच्या आजूबाजूला एक भयानक दुर्गंधी पसरली . थंडी हळूहळू वाढू लागली व त्यांचे दात कडकडू लागली . नक्कीच काळोखातून कुणीतरी पुढे आलं होतं . त्यांच्यासोबत खेळ करण्यासाठी . आता हे शिकार करणार होतं . शिकारी ची मजा घेणार होतं . तिघांनीही एकमेकांचे हात घट्ट पकडले . त्यांना समोर एक भयानक , क्रूर , निर्घुन , बिभत्स मृत्यू दिसत होता . एक वेळ मृत्यू बरा पण हा अघोरी नरक होता . मृत्यू नंतरही अमर्याद काळासाठी दास्यत्व व भयानक वेदना.
भयानक शांतता जीवघेणी होत होती . त्यांच्या काळजाच्या ठोक्याच्या आवाजाने सुद्धा ते घाबरत होते . अचानक गण्याच्या हाताला हिसका बसला . त्याने पाहिलं राम्या काळोखाकडे खेचला जात होता .
" मन्या राम्याला ओढ "
मन्या जागचा हलला नाही . त्याच्यापर्यंत आवाज पोहोचला नाही . तो स्तब्ध होता . एकाच अवस्थेत , पुतळ्यासारखा , आणि राम्या हवेत खेचला जात होता त्या काळोखाकडे . राम्याला मृत्यू समोर दिसत होता तो जिवाच्या आकांताने किंचाळत होता , ओरडत होता , वाचवा म्हणत होता पण एकटा गण्या काय करू शकत होता ?
अशाच वेळी मानवी भावनांचे रूपांतर होतं शक्ती मध्ये शस्त्रा मध्ये . तीच शक्ती , तीच शस्त्रे मानवाला बळ देतात कशाशीही युद्ध करण्याचे , कशाशीही लढा देण्याचे , तेच बळ गण्याच्या अंगी साकारले . त्याने एक जोरात हिसका देऊन राम्याला खाली ओढून घेतले . तेव्हा काळोखात एकच कल्लोळ माजला . नेहमी जिंकणाऱ्या खेळाडूला हरवल्यानंतर निघतो तसा आवाज असावा .
पुन्हा एकदा एक मोठी किंकाळी ऐकु आली आणि पुन्हा निरव शांतता . या वेळी पुन्हा राम्या हवेत उडाला . ज्याप्रमाणे लोखंड चुंबकाकडे धाव घेते तसा राम्या काळोखाकडे ओढला जाऊ लागला . मात्र यावेळी गण्याची ताकद कमी पडली . राम्या काळोखात विलीन झाला आणि गणाच्या हातात राहिला त्याचा मनगटापासून तुटलेला हात . जो राम्याने गच्च आवळला होता गण्याच्या हाताभोवती . त्याच्यातून रक्त ठिपकत होतं .
पुन्हा एकदा काळोखात गलका झाला आता पुढची शिकार होणार होती गण्याची किंवा मन्याची ....
.
क्रमशः..
तुम्हाला काय वाटतं गण्या व मन्या वाचतील का त्यांचीही शिकार होईल व मृत्यू पावतील राम्याप्रमाणेच ? प्रतिक्रियेमध्ये अवश्य सांगा।