पाठलाग – (भाग- ८) Aniket Samudra द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पाठलाग – (भाग- ८)

त्या गजबजलेल्या वस्तीतील एका मोडक्या मेंन्शन मध्ये जमलेल्या त्या तिघा-चौघांच्या नजरा दरवाज्याकडे वळल्या जेंव्हा दरवाज्यातुन एक चिकना तरुण आतमध्ये आला. त्याच्या चालण्यात एक विलक्षण आत्मविश्वास होता. आरमानी जिन्स आणि स्पायकर जिन्सचा अर्धा खोचलेला निळा जिन्सचा शर्ट त्याने घातला होता. हातामध्ये एक स्टीलचे ब्रेसलेट होते, शर्टची वरची दोन बटणं उघडी होती आणि त्यातुन यु.एस.ए चे मराईन्स सोल्जर घालतात तसले एक लॉकेट डोकावत होते. डोळ्यावर गडद रंगाचा गॉगल होता.

जॉनी आतमध्ये आला तसे सर्वांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या. आणि अर्थात त्याचे इथे येणे अपेक्षीतच होते. बॉसच्या मर्जीतला आणि शार्प शुटर जॉनीला बोलावणं धाडण्यात आलं होतं. बॉसचा भाऊ, इस्माईल मारला गेला होता.. माफीया डॉनचा भाऊ.. आणि माफीया शांत बसणं शक्यच नव्हतं.. बॉसच्या इज्जतीचा प्रश्न होता.

जॉनी कुणाशीही न बोलता सरळ खोलीच दार उघडुन आत गेला. खरं तर किती साधी गोष्ट.. खोलीचं दार उघडुन आत जाणं, पण ते दार उघडायला त्याला दारावर नॉक करायची गरजच पडली नाही. इतर कोणी नॉक न करता आत जायचं धाडस सोडा, विचार सुध्दा करु शकत नव्हतं. ह्यावरुनच जॉनी बॉसच्या किती मर्जीतला होता हे स्पष्ट होत होतं.

जॉनी आतमध्ये गेला. समोरच्या टेबलावर काळ्या कोटातला, सिगार फुंकणारा माफीयाचा सर्वेसर्वा मकबुल खान बसला होता. जॉनी आत आल्यावर टेबलाच्या कोपर्‍यात ठेवलेली ब्रिफकेस त्याने जॉनीकडे ढकलली.

जॉनीने एका हाताने त्या बॅगेचा खटका उघडला आणि बॅग उघडली. काही क्षण त्याने आत नजर टाकली आणि परत झाकण बंद करुन टाकले.

“एच-एस प्रिसिजन प्रो सिरीज २००० एच.टी.आर… इस्त्राईल डिफेन्स फोर्स मध्ये मोठ्या प्रमाणात वापरात असलेली लॉंग रेंज स्निपर रायफल..” बॉसच्या नजरेला नजर देत जॉनी म्हणाला…

“गुड…”, बॉसच्या चेहर्‍यावर एक मंद हास्य पसरले..”बस..”, समोरच्या खुर्चीकडे हात दाखवत मकबुल खान म्हणाला..

जॉनीने खुर्ची मागे सरकवली आणि तो त्यावर बसला…

“दीपक..”, मकबुल खान सिगारचा धुर हवेत सोडत म्हणाला..

जॉनी काही क्षण शांत बसला आणि मग तो म्हणाला.. “मला नाही वाटत इक्बालला दिपकने मारले असेल.. त्याची बॉडी मी पाहीली आहे, गोळी खुप लांबुन मारली आहे, नक्कीच लॉग रेंज रायफल असणार. मला नाही वाटत दिपककडे अशी रायफल असावी. ते फायर पोलिसांनीच केलेले आहे..”

मकबुल खान डोळे मिटुन सिगारचा धुर काही क्षण हवेत सोडत राहीला. मग त्याने उरलेला सिगार टेबलावरच्या अ‍ॅश-ट्रे मध्ये विझवला आणि तो म्हणाला, “आय नो दॅट.. पण आपल्याकडे पुरावा नाहीये. शिवाय आता तर दिपकनेच इक्बालला मारल्याचे प्रसारीत झाले आहे, अश्या स्थितीत दिपकला जिवंत ठेवणे आपल्या इज्जतीला शोभणारे नाही.

डझंट मॅटर इफ़ ही रिअल्ली किल्ल्ड इक्बाल ऑर नॉट… किल हिम…”

जॉनीने मान हलवली आणि ती ब्रिफकेस उचलुन तो बाहेर पडला.


दिपक भरभर चालत त्या ट्रक्सच्या जवळ गेला. एखाद्या ट्रकमध्ये चढुन उसांमध्ये चढुन बसणे सहज शक्य होते. क्षणभर दिपक सर्वात मागच्या ट्रकजवळसुध्दा पोहोचला होता. परंतु तो पुन्हा माघारी वळला आणि शेजारच्या झाडीत शिरला.

शत्रुच्या प्रदेशात असताना कुठलाही दुवा मागे सोडायचा नाही हे तो सैन्यात शिकला होता. चुकुन माकुन पोलिस त्याला शोधत त्या मटण-विक्रेत्या चाचांच्या घरी पोहोचले असते आणि त्या म्हातार्‍या चाच्याला मारुन मुटकुन चौकशी केली असती तर शक्यता होती की त्याने उसांच्या ट्रक्सबद्दल आपल्याला दिलेली माहीती पोलिसांना सांगीतली असती आणि त्यानंतरच्या काही तासात इथुन गेलेले ट्रक्स आणि त्यांचे नंबर पोलिसांनी जकात नाक्यावरुन मिळवले असते. मग दिपकला पकडणे केवळ एक औपचारीकताच होती.

दिपकल्या आपल्या हुशारीचे कौतुक वाटले आणि त्याने स्वतःचीच पाठ थोपटुन घेतली आणि तो अधीक दाट झाडीत जाऊ लागला.

काही अंतर आत गेल्यावर हळु हळु रहदारीचे आवाज कमी होत गेले, दाट झाडीमुळे सुर्याचा प्रकाशसुध्दा विरळ झाला होता. दिपक झपझप पावलं टाकत चालत होता.

दिपकचा स्वतःशीच विचार चालु होता. कोल्हापुरच्या जवळ दाजीपुरचे जंगल होते हे तो ऐकुन होता. कदाचीत हेच ते जंगल असावा असा त्याने अंदाज बांधला. जर तो बरोबर दिशेने चालला असेल तर त्याच्या उजव्या बाजुला राधानगरी होते तर डाव्याबाजुने बाहेर पडला तर बेळगाव-गोवा हायवे लागणार होता.

दिपकने आपली दिशा बदलली आणि तो डावीकडे वळला. संध्याकाळ टळुन गेली होती आणि आधीच अंधारलेल्या जंगलात आता बर्‍यापैकी काळोख दाटला होता. अंधारात चालत रहाणे अशक्य होत होते. शिवाय चुकुन एखाद्या मोठ्या खड्यात पडुन हात-पाय मोडण्याची शक्यता होती. तसे झाले असते तर दिपकचे शक्य तितक्या दुर जाणे अवघड झाले असते आणि म्हणुनच त्याने रात्रीपुरता थांबण्याचा विचार केला.

एक मोठ्ठे झाड बघून तो त्याच्या आडोश्याला बसला. भल्या पहाटेपासून तो नुसता धावतच होता. तो सर्व प्रसंग एका-मागोमाग एक करत त्याच्या डोळ्यासमोरून सरकला. भटारखान्यातून उचललेले ते अवजड सिलेंडर, भुकेल्या हिंस्त्र कुत्र्यांची ती गुरगुर आणि नंतर कमी होत जाणारा त्यांचा आवाज, दिव्यांचे प्रकाशझोत चुकवत केलेला तो जीवघेणा आणि दमवणारा प्रवास, घामाने डबडबलेला इस्माईलचा चेहरा, कानठळ्या बसवणारा सिलेंडरचा तो विस्फोट, पोलिसांच्या शिट्या, भिंत फोडताना झालेली गडबड आणि पोलिसांच्या गोळ्या चुकवत जंगलाच्या दिशेने घेतलेली धाव, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला इस्माईल.. सर्व काही..

“युसुफ कुठे असेल?”, एक विचार त्याच्या डोक्यात तरळून गेला? “सुखरूपपणे निसटला असेल? कि पोलिसांनी पकडले असेल? कि तो पण इस्माईलसारखा…….”

दीपकच्या पोटात भुकेचा डोंब उसळला होता, सकाळपासून धावून धावून हात-पाय दुखून आले होते. दिपकने दोने मिटून घेतले. जेनीचा हसरा चेहरा त्याला दिसत होता. वात्स्तल्यपूर्ण नजरेने आपल्या वाढलेल्या पोटावरून ती हात फिरवत होती. दीपकला बघताच पेंग्विन सारखी डुलत डुलत चालत ती दीपकला येऊन बिलगली. तिने दीपकचा हात तिच्या पोटावर ठेवला आणि लगेच पोटातल्या बाळाने लाथ मारली. दीपकला ती लाथ गुद्गुल्यांसारखी वाटली. दीपक स्वतःशीच हसला. “कर्नल साब..” जेनीच्या पोटातील बाळाला तो लाडाने म्हणत होता..”अब जल्दी आजाइये.. पुरी पलटन आपका इंतजार कर रही है!!!..”

असेच काहीसे प्रसंग, काही घडलेले काही न घडलेले त्याला दिसत होते, एक प्रकारचे सुख, आत्मा शांती तो अनुभवत होता आणि अचानक कुठून तरी वेगाने एक जीप आली आणि त्याची धडक बसून जेनी दूरवर फेकली गेली… खूप दूर.. सर्वत्र अंधार होत गेला.. जेनीची किंकाळी क्षीण होत गेली.. आणि सिनेमा संपल्यावर जसा काही क्षण अंधार पसरतो तसा अंधार पसरला…

दीपकची शुध्द हरपली होती…

सकाळी दीपकला जाग आली तेंव्हा उन्हं बर्यापैकी वर आली होती. रात्रीच्या त्या गाढ झोपेने त्याचे ठणकणारे हात पाय बरे झाले होते. सैन्यात राहून दीपकचे शरीर एक मशीन बनले होते. तापलेले मशीन जरा थंड केले कि पुन्हा नव्यासारखे. शरीरातील इम्युनिटी सिस्टीम ने काम चोख बजावले होते.

दीपक उठून चालायला लागला. वाटेत झाडाला लागलेली काही कंद-फळे विषारी नाहीत ना? ह्याची खात्री करून तो तोंडात टाकत होता.. खूप वेळ चालल्यावर अखेर त्याला गाड्यांचे रहदारीचे आवाज येऊ लागले. दीपक सावध झाला. दबकी पावला टाकत तो पुढे सरकत होता.. दूरवर त्याला एक मळकट पिवळ्या रंगाची, पोपडे उडलेली छोटी खोली दिसली. दिपकने आडोशाला राहून चाहूल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणतीच हालचाल दिसत नव्हती. १५-२० मिनिट थांबून कोणी नसल्याची खात्री झाल्यावर दीपक पुढे सरकला.

`दाजीपुर फोरेस्ट डीपार्टमेंट..’, एका मोडक्या पाटीवर लिहिलेले होते. दाराला कुलूप नव्हते म्हणजे इथे नक्कीच कुणाचातरी वावर होता.
दीपकने उघड्या खिडकीतून आत डोकावून पहिले.

खोली रिकामीच होती.

हलक्या हाताने दार ढकलून दीपक आतमध्ये आला.

टेबलावर काही फाईल्स अस्ताव्यस्त पडल्या होत्या. शेजारच्या कपाटातून काही कागद पत्र डोकावत होती. भिंतींवर दाजीपुर-फेमस बायसनचे फोटो लावलेले होते. बाकी इतर ठिकाणी वन्य जीवांची माहिती देणारे फलक जळमट परिधान करून भिंतीना लटकत होते.

दिपकने एक दोन कपाट उघडली आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. एका कपाटात एका फोरेस्ट ऑफिसरचा युनिफॉर्म होता. दिपकने लगेच तो अंगात चढवला. अगदी फिटिंगचा नसला तरी त्याला तो बर्यापैकी बसत होता. खर तर तो युनिफॉर्म चोरी करून जाणे म्हणजे एखादा क्ल्यू सोडण्यासारखेच होते. परंतु इलाज नव्हता. लुंगी-बनियन घालून तो रस्त्यावरून फिरू शकत नव्हता. दिपकने ते कपडे घातले आणि तो बाहेर पडला.

दीपक लवकरच हाय-वे ला येऊन थांबला. कुणाकडून तरी लिफ्ट घेता आली तर बघावी असा विचार त्याच्या डोक्यात होता.

फोरेस्ट-ऑफिसर च्या पेहरावात त्याला खूप सुरक्षित वाटत होते. ती वर्दी त्याला त्याच्या लष्करातील दिवसांची आठवण करून देत होती. शेवटी वर्दी ती वर्दी.. लष्कराची असो नाहीतर अजून कुठली, एक आत्मविश्वास त्याच्या अंगात बळावला होता.

फारसा वेळ न दवडता तो ट्रक्स न लिफ्ट साठी खुण करू लागला. ३-४ प्रयत्नानंतर एक ट्रक थोडा पुढे जाऊन थांबला.

दीपक कसलीही घाई न करता सावकाश त्या ट्रकपाशी गेला आणि त्याने केबिनचे दार उघडले त्याबरोबर आतून गरम हवेचा एक झोत बाहेर आला. ट्रक चा ड्रायवर साधारण चाळीशीचा, गुबगुबीत अंगाचा होता. ट्रक च्या त्या तापलेल्या केबिन मध्ये बसून तो घामाघूम झाला होता. खांद्यावर टाकलेल्या नैप्कीन ने तो सतत चेहरा पुसत होता.

“कुठे जायचे आहे?’, त्याने दीपकला विचारले..
“गोवा..” दीपक म्हणाला..
“मी गोव्याला तर नाही चाललो, मी गोकर्णला चाललोय, पाहिजे तर वाटेत सोडतो..”, तो ड्रायवर दीपकला म्हणाला.

दीपक फारसा विचार न करता आत जाऊन बसला.

“तुमी फारेस्ट हफिसर दिसताय..”, ड्रायवर दीपकच्या वर्दीकडे बघत म्हणाला….
“हम्म…, माझ नाव दीपक..”
“मी थोंमस कुक…”, ड्रायवर म्हणाला…

खर तर त्याच नाव काहीही असू शकत होत, पण `थोंमस कुक’ नाव ऐकून दीपकला हसू आवरले नाही…

“म्हणजे.. माझ नाव थोंमस, पण गोकर्ण ला मी आणि माझी बायको एक छोटे हॉटेल चालवतो.. मी आणि बायको दोघेही तेथे कुक आहोत.. आम्हीच स्वयंपाक करतो म्हणून.. थोंमस कुक….”, थोंमस म्हणाला.
“मागे हॉटेलचाच माल का?”, दीपाने विचारले..

“हो..कोल्हापूर मार्केट मधून एकदमच आणतो… स्वस्त पडते.. शिवाय जाताना गोकार्नेचा कुणाचे न कुणाचे काही सामना कोल्हापूर ला न्यायचे असतेच.. सो जातानाचे पैसे पण निघतात…”

केबिन मध्ये भयानक गरम होत होते.. इंजिनमुळे सीट्स सुद्धा खूपच तापल्या होत्या… शिवाय तो जुनाट ट्रक ४०-५०च्या वर वेग पकडायचे काही नाव घेत नव्हता. आपण असला खड-माड ट्रक पकडून चूक केली कि काय असे दीपकला वाटून गेले.

थौमस-कुक तसा गप्पीस्ट होता. बहुतेक वेळा तोच बोलत असे. त्याचे हॉटेल, तेथील गिऱ्हाइक..जे बहुतेक वेळा हिप्पीच असत, ह्याबद्दलच तो सांगत होता.. एव्हाना संध्याकाळ होऊ लागली होती.

“साहेब, तुम्ही एक काम करा..”, थौमस म्हणाला…”आज तुम्ही गोकर्णलाच चला.. रात्री इथे हाय-वे वर तुम्हाला गोव्यासाठी लिफ्ट नाही मिळणार.. रात्रीचा सहसा कोणी ट्रक लिफ्टसाठी थांबत नाही.. आज रात्री तिकडेच राहा, उद्या तुम्हाला परत हाय-वे वर आणून सोडतो.. रात्रीचे जेवण आमच्या हॉटेल-मध्ये… माझ्याकडून…काय बोलता…?”

त्याचे म्हणणे बरोबर होते, रात्री हायवेवरून पुढे लिफ्ट मिळणे अवघड होते.. शिवाय खाण्याचे वांदे होतेच.. इथे जेवायची पण सोय होत होती.. फारसे आढेवेढे न घेता दीपक ने संमती दर्शवली…

“ठरले तर मग..फिश खाता ना तुम्ही? मग आज अशी फिश-करी बनवतो कि तुम्ही बोट चाटत रहाल…”, खुश होत थौमस म्हणाला…
पुढच्या इंटरसेक्ट वरून थौमस ने गाडी वळवली आणि तो गोकर्णच्या दिशेने निघाला.

संध्याकाळच्या वेळी हाय-वेवरून येणारा बेभान गार वारा आता कमी झाला होता आणि समुद्र-किनारी असतो तसा दमट, खार वारा खिडकीतून आत येत होता. दीपकला मुंबईची, आपल्या घराची आठवण झाली. त्याने तो खरा वर दीर्घ श्वास घेऊन छातीत भरून घेतला..

“काय साहेब, समुद्राचा वास आवडतोय का?.. मला पण लई आवडतो.. खर सांगू तर मला हे हॉटेल मध्ये इतका रस नाही.. समुद्रावर रहाणे हे माझे स्वप्न आहे.. मस्त मासेमारी करायची, रातच्याला नांगर टाकून समुद्राच्या मध्यभागी… अहा हा..मस्त…” स्वप्नात बोलल्यासारखा थौमस बोलत होता…

थोडे पुढे गेल्यावर एक अतिशय छोटा आणि कच्चा रस्ता लागला जेथून थौमसनें गाडी आत वळवली.

“साहेब इथून आपण आपल्या हॉटेल कडे चाललोय.. त्या भागाला `हाल्फ मून बीच’ म्हणतात. चंद्राच्या अर्धाकृती आकारासारखा एक डोंगर दोन्ही बाजूनी समुद्राच्या खूप आत पर्यंत गेला आहे, त्यामुळे त्या आकाराचा हा बीच तयार झाला आहे. बर्यापैकी हा प्रायव्हेट भाग आहे, फार कमी लोकांना माहितेय.. दोन्ही बाजूंनी डोंगर असल्याने हा भाग पटकन लक्षात येत नाही…” थौमास सांगत होता…

थोड्या वेळाने समुद्राच्या लाटांचा आवाज येऊ लागला. एव्हाना पूर्ण अंधार झाला होता.. दूरवर थौमस च्या हॉटेलचे लुकलुकणारे दिवे दिसत होते. बारीक बारीक गाण्यांचा, टाळ्या वाजवण्याचा, गिटार-बेंजो चा आवाज येत होता…

“बोललो होतो ना तुम्हाला.. इकडे हिप्पी लोक खूप येतात.. आता तुम्ही आलाच आहात ना तर बघा मज्जा काय असते..”.. स्वतःवर खुश होत थौमस म्हणाला.

एक छोटे गेट ओलांडून थौमस्ने ट्रक हॉटेल बाहेर थांबवला आणि दोनदा होर्न वाजवला..”माझी खुण आहे हि.. बायकोसाठी.. मी आल्याची…, तुम्ही एक काम करा, आत मध्ये जाऊन बस.. मी जरा हा माल अनलोड करून येतो…” अस म्हणून थौमस खाली उतरला.

दिपकने मान डोलावली आणि तो हॉटेल मध्ये शिरला… आतमध्ये खाद्य पदार्थांचा मस्त सुवास येत होता.. परतलेल्या कांद्याचा वास तर त्याची भूक चाळवत होता…. भुकेल्या पोटावरून हात फिरवत तो त्या छोट्याश्या हॉटेलच्या लोबिमध्ये येऊन बसला..


[क्रमशः]