Mala Kahi Sangachany - Part - 3 - 4 books and stories free download online pdf in Marathi

मला काही सांगाचंय.... - Part - 3 - 4

३. अघटित


आता सर्व जागीच स्तब्ध झालं होतं. वाहनांची गर्दी आता रस्त्यावरून कुमार पडला त्याठिकाणी व्हायला लागली होती. सगळे लोक काय झालं ? कसं झालं ?

एकमेकांना विचारत होते तर काही जवळ जाऊन त्याला बघत होते....


डोक्याला मार लागल्याने भळभळा रक्त वाहत होते. कुमार मात्र डोळे बंद करून पडून होता इतक्यात कुणीतरी फोन करून रुग्णवाहिका बोलावली...


काही वेळांत पोलीस हि अपघातस्थळी आले आणि पंचनामा करायला लागले सगळं कसं अचानक घडलं होत. ...


लोक आपसात कुजबुज करत होते ...

कोण आहे हा तरुण ? कसा घात केला नशिबानं ! काय होईल देव जाणे ! कुणी म्हणत होत खूप रक्त गेलं आहे काय माहित जगणार कि नाही ?

वाचला तर वाचला सुदैवाने ...


एवढं असं चाललं असतांना ज्या ट्रक ने धडक दिली होती त्या ट्रकचा चालक तर केव्हाच फरार झाला हे कुणाच्याही लक्षात आलं नाही...


पोलिसांनी विचारणा केल्यावर तो पळून गेल्याचं कळालं ... रुग्णवाहिका कुमार ला घेऊन जात होती आणि लोकांची गर्दी हळूहळू कमी होत होती तर

काही अजूनही तिथं नेमकं काय झालं ? त्याचा विचार करत दुचाकी धडक लागल्यावर कशी बाजूला पडली ते न्याहाळत होते तेव्हाच कुणीतरी ....


"अरे हा मोबाईल कुणाचा पडला इथे?"


त्या गृहस्थाला या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही म्हणून त्याने तो मोबाईल पोलिसांना दिला...


"साहेब , बहुतेक त्या तरुणाचा आहे हा मोबाईल.."


आता सूर्य जवळजवळ मावळला होता, काहीशी पुसट प्रकाशकिरण फक्त तेवढी बाकी होती ..... जसा कुमारचा शेवटचा श्वास, त्याच्या हृदयाचा शेवटचा ठोकाच।

तशी रस्त्यावरची गर्दी आता पूर्ण कमी झाली होती आणि सगळे आपल्या वाटेने निघाले होते...


थोड्या वेळापूर्वी घडलेल्या अघटित अपघाताने सर्व तिथे थांबलेले लोक मनात काही प्रश्न घेऊन घरी जात होते. तर पाखरांचे थवेही आज जरा उशिराच घरट्यात पोहोचले होते .

कुमार मात्र रोजचा ठरलेला दिनक्रम सोडून आज न सांगताच नेहमीसाठी सर्व इथेच टाकून परतीच्या प्रवासाला निघाला होता की काय?


रुग्णवाहिका वेगाने दवाखान्यात पोहोचली, इमर्जन्सी वॉर्ड मध्ये लगेच कुमारला दाखल करण्यात आले , तिथे सर्वांची धावपळ सुरू झाली. डॉक्टर आपसात खूप रक्त वाहून गेलं

असं म्हणत त्याला अतिदक्षता विभागाकडे घेऊन गेले आणि उपचाराला सुरुवात झाली. .....


काही वेळाने डॉक्टर पोलिसांना सांगायला लागले की रुग्णाची स्थिती खूप वाईट आहे आणि त्याची शुद्ध हरपली आहे अद्याप काहीएक सांगता येणार नाही .

तरी तुम्ही त्याच्या कुटुंबियाना कळवा आपण थोड्या वेळाने भेटू।

आय शुल्ड लिव्ह नाऊ .मे आय? असे म्हणत डॉक्टर आपल्या कामाला लागले आणि पोलीस आपल्या...


सूर्य मावळून दिवे लागण्याची वेळ झाली, चरायला गेलेली गुरं ढोरं सुद्धा जंगलातून घरी परत येऊन बराच वेळ झाला होता .

आज खूप वेळ झाला पण कुमार अजून घरी न आल्याने त्याची आई दाराच्या पायरीवर उभी राहून दारासमोरून सरळ जाणाऱ्या रस्त्याकडे पाहत त्याची वाट बघत होती

तर कुमारला अपघात झाल्याचं अजून पर्यंत घरी कुणालाच माहित नव्हतं आणि इतक्यात आवाराच गेट बाजूला सारत कुणीतरी आत आल्याचं तिला समजलं .....


तोवर ती घरातून बाहेरच्या पायरीपर्यंत ये-जा करत होती पण आता गेट सरकवल्याचा आवाज येताच तिला वाटलं की कुमार आला ...

म्हणून त्याला रोजच्याप्रमाणे "आलास बाळ " एवढं विचारण्या जणू ती पायरी जवळ येऊन थांबली तर तिचा दुसरा मुलगा हातातील बॅट हवेत फिरवत समोर उभा होता.

तू आहेस ? मला वाटलं तुझा दादाच आला ती प्रशांत कडे पाहत म्हणाली. ..


त्यावर आई कडे पाहत तो विचारू लागला दादा अजून आला नाही आज? रोज तर 6 वाजताच घरी हजर असतो. आता तर 7 वाजत आले ! मी फोन करून बघतो त्याला का उशीर झाला ते,

असं म्हणतच पायातील बूट काढत त्याने मोबाइल वरून भावाला फोन लावला तर कुमारचा फोन लागत नव्हता. त्यांना काय कल्पना कि कुमारला अपघात झाला .......

४. पूर्वकल्पना


प्रशांत पुन्हा पुन्हा फोन लावून पाहत होता पण त्याचा काहीएक उपयोग होत नव्हता .... सायंकाळचे 7 वाजून गेले आता रस्त्याच्या बाजूचे लाईट लागले


थोडा अंधार पडायला सुरुवात झाली होती आणि तिकडे दवाखान्यात इन्स्पेक्टर पाटील व कॉन्स्टेबल वानखडे कुमारचा मोबाइल सुरु करायचा प्रयत्न करत होते ....

पण रस्त्यावर पडल्याने तो सुरु होत नव्हता म्हणून अद्याप त्यांना कुमारच्या घरी काहीही निरोप देता आला नव्हता..


प्रशांत फोन लावतच होता तर त्याची आई अजून कुमार का परतला नाही म्हणून व्याकुळ होऊन त्याची वाट पाहत होती आणि दर दोन मिनिटांनी दुचाकी आली काय दारात ,

कुमारला घेऊन पाहण्यासाठी ये जा करत होती शेवटी अधीर होऊन ती प्रशांतला म्हणाली....


त्याच्या कुणा मित्राचा नंबर असेल तर विचारून बघ कुठे आहे? किती वेळ लागणार घरी यायला ? एवढं बोलून ती देवघरात जायला लागली अन वाऱ्याच्या हलक्या झुळूक वाहायला लागल्या

आणि त्यांची गती वाढत जाऊन जोरदार वारा सुटला जणू अघटित घडल्याची पूर्वकल्पना तो देत होता तर कुमारची आई या वेळी सर्वकाही विसरून देवघरात खाली बसून देवाला नमस्कार करून

" माझ्या मुलाला सुखरूप घरी येऊ दे म्हणत दिवा लावून मनोभावे पूजा करत होती ..."


वारा जोरात सुरू असल्याने दिव्याची ज्योत कमी जास्त होत होती तर ती दोन्ही हात लावून दिवा विझणार नाही याची काळजी घेत होती.

शेवटी आईचे मन हे आपल्या मुलासाठी इतरांपेक्षा जास्त तुटतं, काळजी करतं ...


आता तिला असंख्य विचारांनी विळखा घालायला सुरुवात केली होती ... कितीतरी विचार, प्रश्न तिला घेरा घालून होते तरी ती मन शांत ठेवण्याचा यत्न करत होती ...

देवापुढे लावलेला दिवा मोठ्या कष्टाने प्रकाशित ठेवू पाहत होती पण वाऱ्याचा वाढता ओघ त्या माऊलीची जणू परीक्षा घेत होता की तिला तिच्या मुलापासून आज नियतीनं हिरावून नेण्याचा डाव मांडला याची पूर्वकल्पना देत होता ... हे फक्त त्याला, सृष्टीला अन निर्मिकालाच ठाऊक होते असे सर्व सुरु असता प्रशांत चा मोबाईल वाजायला लागला....


खूप प्रयत्न करूनही कुमारचा मोबाईल सुरु होत नव्हता म्हणून सरतेशेवटी इन्स्पेक्टर पाटील यांनी कुमारचं सिमकार्ड स्वतःच्या मोबाईल मध्ये टाकलं आणि सिमकार्ड मधील पहिलाच नंबर डायल केला. तो नंबर होता प्रशांतचा....


प्रशांतच्या हातीच मोबाईल असल्याने त्याने लगेच कॉल घेतला ...


"हॅलो दादा कुठे आहेस तू ?आणि इतका उशीर का झाला आज? किती वेळ आहे अजून? "


असे एकामागे एक प्रश्न त्याने विचारले...


असं मोबाइल वरच बोलणं ऐकून कुमारची आई लगेच बाहेर आली आणि त्याला विचारायला लागली ...


"काय म्हणाला तुझा दादा ? किती वेळ आहे म्हणाला अजून घरी यायला? कुठे आहे तो आणि सोबत आहे का कुणी त्याच्या ? "


त्यावर प्रशांत उत्तरला - आई थांब थोडं ; दादाला बोलू तर दे मग सांगतो.


असा हा संपूर्ण संवाद पाटील यांनी ऐकला आणि त्यांना कळून चुकलं कि मोबाईल वर दुसऱ्या बाजूला अपघात झालेल्या तरुणाचा लहान भाऊ आणि आई बोलताहेत ..

तेव्हा पाटील यांनी जास्त वेळ न घेता लगेच बोलायला सुरुवात केली....


" हॅलो मी इन्स्पेक्टर पाटील बोलतोय ."


त्यापुढे पाटील काही बोलणार तोच प्रशांत मध्येच बोलला कोण इन्स्पेक्टर आणि सोबतच त्याची आईपण काय..? पोलीस ? का बरं ? काय झालं आणि दादाचा मोबाईल तुमच्याकडे कसा काय ?"


पाटील म्हणाले शांतपणे आधी मी काय म्हणतो ते ऐकून घ्या. हा मोबाईल कुणाचा हेच शोधत आहोत आम्ही, कुणालातरी हा मोबाईल सापडला त्याने माणुसकी म्हणून पोलीस स्टेशनला जमा केला तेव्हा मी त्यासाठीच तुम्हाला फोन केला ..... तर तुम्ही जास्त वेळ वाया न घालता जमेल तितक्या लवकर पोलीस स्टेशनला या. ठीक आहे समजलं तुम्हाला. बर मी ठेवतो फोन . या तुम्ही .असं बोलून पाटील यांनी फोन ठेवला...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED