१३. प्रवास १
ती लगबगीने पावलं उचलत बस स्थानकच्या दिशेने निघाली... पावलं एकामागे एक जात असता मनात कितीतरी प्रश्न गर्दी करत होते.... रहदारीचे ठिकाण असल्याने रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार
उंच अशोकाची झाडं होती.... तर मध्येच काही अंतराने गुलमोहराची झाडं होती.... झाडाखाली बसायला जागा म्हणून बाक ठेवलेले .... तापत्या उन्हात हे बाक म्हणजे एक सवंगडी ....
सकाळ संध्याकाळ झाली की तिथं गर्दी असते ... तर रोजच्या येण्याजाण्याच्या रस्त्यात येत असल्याने कि काय... या नवीन शहरात आल्यापासून तिला गुलमोहराचं एक वेगळंच आकर्षण वाटतं होतं... तिला मोहून टाकणारी गुलमोहराची झाडं आज वाऱ्यासोबत जणू गप्पा मारत होती.... पण आज त्यांच्याकडे साधी एक नजर सुद्धा तिने फिरवली नाही... जवळच गाडीवाल्यांची रोजच्या प्रमाणे देण्याघेण्याची दैनंदिन जीवनातील व्यवहार सुरु होती... पण तिला आज आजूबाजूला काय चाललं याच काहीही भान उरलं नव्हतं... बसस्थानक च्या आत पोहोचल्यावर तिने चौकशी करून लवकरच बस शोधली. बसवर लावलेली पाटी वाचून ती बसमध्ये चढली आणि खिडकी जवळच्या सीटवर बसली.....
बस निघायला अजून काही वेळ बाकी होता... ती खिडकीतून बाहेर प्रवाश्याची गर्दी पाहत होती.... प्रत्येकजण आपापल्या बॅग सांभाळीत नातेवाईकांना , मुलाबाळांना सोबत घेत बसमध्ये चढत होते.... कुणी परत गावी जात होते तर कुणी शहरात.... काही वेळातच बस सुरु झाली आणि तिच्या प्रवासाला सुरुवात झाली... बसस्थानक मधून बस बाहेर पडली...
उन्ह चांगलंच तापत होत... शहरातून जात असता बस कित्येक गाड्यांना मागं टाकीत सुसाट वेगाने निघाली होती... गाडीतून निघणारे धूर सगळीकडे पसरलेले... वाहनाची कर्कश आवाज ऐकू येत होते.... थोडा आवाजाचा त्रास कमी झाला न झाला तोच रस्त्यात येणारे खड्डे पुन्हा एक त्रासाचं निमित्त बनून बसच्या वाटेत तयार होतेच....
काही वेळाने बस शहर मागे टाकून महामार्गाच्या रस्त्याला लागली तसा गाड्यांचा आवाज आणि मध्येच येणाऱ्या खड्डापासून बसची सुटका झाली...
खिडकी जवळ बसल्याने वाऱ्याची झुळूक हळूच तिला स्पर्शून जात होती.... बसमध्ये गर्दी असल्याने घामाने चिंब झालेल्या चेहरा त्या हळुवार वाऱ्याचा स्पर्श हवाहवासा वाटून ती बाहेर पाहू लागली.... मनात अनेक विचार गर्दी करू लागले... तेव्हा तिने मागे जाणाऱ्या झाडांना बघितले... तशी काही चित्र तिच्या नजरेसमोर नाचायला लागली आणि ती त्यांचा पाठलाग करत कधी भूतकाळात पोहोचली.... तिला कळलं नाही.... कुमार आणि त्याच्या आठवणी ज्यांचा तिला विसर पडला होता...
तिचे डोळे पाणावले... हळूच आसवं पुसून तिने जवळच्या खिडकीत डावा हात आडवा ठेवला... त्यावर हनुवटी ठेवत तिने डोळे मिटले... मनात दाटून आलेल्या आठवणी जणू डोळ्यासमोर येत होत्या.... कुमारशी मैत्री झाली तेव्हापासूनच्या काही पुसट आठवणी मनात गर्दी करु लागल्या... आतापर्यंत जाणवणारा थंडगार वारा तिला सोबत गतकाळाकडे भरधाव घेऊन जात अचानक एका क्षणाला थांबला..... जीवनाच्या त्या वळणावर .... जिथे या नवीन पर्वाला सुरुवात झाली ..... कदाचित... ?
चार वर्ष्याआधी जे काय घडलं ते काहीसं आठवत ती परत एकदा त्यादिशेने वाटचाल करीत होती ...
कुमारच्या आठवणी मनात नव्याने घर करत होत्या ..... जीवनातील जे काही क्षण कुमार सोबत असताना तिने अनुभवले... ते एका मागे एक भरभर नजर चुकवत जात होते.... तोच तिला तो दिवस आठवला....
पदवीचं दुसरं वर्ष...... सोनेरी पहाट उजाळलेली, सूर्यकिरण नभनक्षी करत होते.... रोजच्या प्रमाणे ती आजही सर्वकाही लवकर आटोपून कॉलेजला जायला निघाली .... पाखरांची किलबिल , सकाळ आणखी रमणीय करत होती... गावापासून मूळ रस्ता गाठायला तिला दहा पंधरा मिनिटे जावं लागत असे... रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार झाडांची वस्ती होती..... शेतं शिवार जागी झाली होती...
वाहनांची वर्दळ जरा कमीच ... काही पाच दहा मिनिटांच्या अंतराने जड वाहन ये जा करीत होती... वाहने जवळून जात असता , गार वारा अंगावर शहारे भेट देऊन लगेच पुढच्या प्रवासाला निघून जात होता...
काहीच वेळात घर बरेच मागे सोडून ती मुख्य रस्त्याला पोहोचली ... सकाळचं ते मनमोहक वातावरण तिच्या मनाला भुरळ घालत होत... ती हळूहळू सायकल चालवत जात असता मागे अचानक कुणीतरी ट्रिंग ट्रिंग वाजवत असल्याचं तिनं ऐकल... इतक्या सकाळी , त्यात पूर्ण रस्ता मोकळा असून कोण जाणून बुजून छेड काढत असेल ... म्हणून तिकडे काहीएक लक्ष न देता ती घाई घाईत सायकल जरा जोरात चालवायला लागली... तर पाठीमागून येणारी सायकल आणखी जोरात तिचा पाठलाग करत तिच्या बाजूला येऊन ठेपली...... आणि दोन्ही सायकली सोबतच जायला लागल्या.... तिचं काळीज जरा धडधडू लागलं..... पण दुसऱ्या क्षणी आवाज ऐकू येताच तिच्या काळजाचा ठोका चुकला....
" हॅलो , गुड मॉर्निंग ... "
आवाज ओळखीचा वाटला तसं तिने फक्त डोळे तेवढे दिसतील अश्या कौशल्याने चेहऱ्याभोवती बांधलेला लांब लचक स्कार्फ मधून हलकेच निश्वास सोडला....
" बावळट... तू आहेस तर.... मला वाटलं सकाळी सकाळी कुणी छेड काढत आहे की काय...? किती घाबरले मी ....? "
" अरे मी गुड मॉर्निंग म्हणालो तर त्यावर तू चक्क मला बावळट म्हणतेस... घाबरल्याच सांगतेस ..." तो हसतच म्हणाला..
" खरंच मी खूप घाबरले ... तुला आवाज द्यायला काय झालं होतं .... " जरा नाराज होऊन ती म्हणाली .
" पण इतकं घाबरायला झालं तरी काय ? जरा मस्ती म्हणून वाजवली ट्रिंग ट्रिंग..." पुन्हा हसतच
" तुला सकाळ झाली वाटते मस्ती करायला ... नाही..? "
" बरं सॉरी ... " तो म्हणाला.
" हा हे बाकी छान ... सॉरी म्हटलं की मोकळं व्हायचं ..."
तिच्या स्वरात असलेली नाराजी डोळ्यातून दिसत होती...
थोडावेळ असाच निघून गेला .... दोघेही काही वेळ गप्पच... सायकली कॉलेजच्या दिशेने चालवत दोघेही समोर जात होते.....
" बरं एकदा आणखी सॉरी.... प्लिज मला माफ कर... " पुन्हा त्यानेच पुढाकार घेतला ..
" ओके पण पुन्हा अशी मस्करी नको... मला नाही आवडणार...."
" हो पुन्हा नाही चूक होणार अशी.."
दोघेही कॉलेजला पोहोचले.... सायकल बाजूला लावून आपापल्या वर्गात गेले... तर अजून बरेच विद्यार्थी यायचे बाकी होते... थोड्याच वेळात वर्गात लेक्चर्सला सुरुवात झाली .... लागोपाठ सर्व लेक्चर्स होत मधली बेल वाजली.... सर्व विद्यार्थी कॉलेजच्या परिसरात वावरत गप्पा मारीत बसलेले... डबा जेवत बसलेले... तर कुणी वर्गातच उरलं सुरलं गृहपाठ करीत असता पुन्हा बेल वाजली.... मधल्या सुट्टी नंतरच्या लेक्चर्स ला एकदा नव्याने सुरुवात झाली.... दुपारचे बारा वाजले .. तोच सुटी झाली असं जाहीर करत बेल वाजली... तशी जल्लोष करत काही तरुण मंडळी भराभर बॅग उचलून बाहेर पडली.....
तिने सायकल वर बॅग ठेवून चावी आणि स्कार्फ बाहेर काढला.... चावी लावून सायकलचे कुलूप उघडलं.... बॅग सायकलच्या हॅन्डलला बसवलेल्या पिंजऱ्यात ठेवून स्कार्फ बांधून घेतला .... आणि घरी जायला निघाली...
कॉलेजच्या बाहेर जाणाऱ्या आणि नेमक्या त्याच वेळी दुपारी ज्युनियर कॉलेजचे लेक्चर्स असल्याने आत येणाऱ्या विद्यार्थांच्या गर्दीतून सायकल समोर घेत ती घरी जायला निघाली... कॉलेजच्या गेटजवळ खूप गर्दी झाली होती... ती गर्दीतून वाट काढून मूळ रस्त्यावर आली... दुपारची वेळ असल्याने रस्ता जणू वाहनाची जत्रा आहे की काय असा भासत होता... ती हळू हळू सायकल चालवत होती....
तितक्यात एक सायकल मागून येऊन तिच्या बाजूलाच हळूच ब्रेक लावत.....
" हॅलो... "
तिला कळलं की नेमका तोच असला पाहिजे म्हणून बाजूला मान वळवून...
" हॅलो... बोल... "
" बोलू ना सोबतच चाललो आपण... हे घे आधी..." म्हणत त्याने एका हाताने सायकल पकडत दुसऱ्या हाताने चॉकलेट पुढे केले...
" चॉकलेट ...? आज वाढदिवस आहे तुझा...? " तिने चॉकलेट न घेता आधी प्रश्न विचारला...
" वाढदिवस वगैरे काही नाही , बस सहज... " तो उत्तरला.... अजून चॉकलेट त्याच्याच हाती होते
" सहज म्हणजे ....? " पुन्हा तिचा प्रश्न।
" अरे चॉकलेट द्यायला निमित्त पाहिजे काय ...? इतके प्रश्न... घे आता लवकर... मित्र आहोत ना आपण ! मग मी वाढदिवस असेल तरच तुला काही द्यायला हवं...?" तो म्हणाला..
ती चॉकलेट हाती घेत ...
" तसं नाही पण ...."
त्याने मध्येच तिचं बोलणं थांबवून ...
" बस आता .... चॉकलेट खाऊन घे आधी नाहीतर वितळून खराब होईल ते.." म्हणत त्याने खिश्यातून दुसरं चॉकलेट काढलं आणि तो खाऊ लागला
तिने स्कार्फ सोडून त्याचा डोळ्याखाली बांधलेला भाग बाजूला केला ... चॉकलेट दाताने उघडून , एक लहान तुकडा तोडत ... " अरे वा किती मस्त आहे हे चॉकलेट.."
" आवडलं तुला... " तिच्याकडे क्षणभर टक लावून पाहत तो म्हणाला..
" हो खूपचं चवदार .. पण तू आज अचानक कसं काय मला दिलं ते कळलं नाही."
" म्हटलं तर कारण आहे आणि नाहीसुद्धा ..."
" म्हणजे...? काही कळेल असं सांग कोडं नको... आधीच आज खूप गृहपाठ दिला आहे .... सरांनी.... त्यात तुझ्या कोड्याची भर नको... "
" सकाळी सकाळी आज तुला त्रास झाला ना माझ्यामुळे म्हणून आणि...."
" अरे ते काय ते तर मी केव्हाच विसरले.... त्यात काय एवढं आजची मैत्री आहे काय आपली ...अजून काय म्हणत होता ...? "
जरावेळ थांबून तो म्हणाला.... " एक काम आहे माझं .... जे तुला करायचं आहे .... "
" तुझं कोणतं काम ...? आणि मी कस काय करणार.... बरं ते जाऊ दे आधी सांग काय काम आहे... बाकीचं नंतर बघू ..."
पुन्हा जरावेळ शांत राहून.....
" तू करणार कि नाही ते सांग आधी.... चार वर्ष्यापासूनची आपली मैत्री आहे ना..." त्यानं पुन्हा तिला कोड्यात टाकलं..
आता थोडा विचार करत ती खूप हळू हळू सायकल चालवत ..... " ठीक आहे मी तुझं काम करणार.. बोल काय करायचं आहे...? "
" अरे वा.. निम्म काम तर झालंच तू होकार दिल्याबरोबर ...! तसं तुला काम वगैरे काही करावं नाही लागणार माझी मदत करावी लागेल जरा...."
" माझी मदत हवी तुला ... ? काहीपण तीन वर्ष्यापासून सारखा टॉपर येणारा तू .... तुला काय मदतीची गरज पडली..? "
" आता आली वेळ मदत मागायची , तू करणार ना ? "
" हो नक्की ! तू कितीदा माझी मदत करतोस मग मी का नाही करणार..? बरं सांग काय मदत करू शकते मी ? "
बराच वेळ शांत राहून -
" मला काही सांगाचंय ... "
" बोल ना , पुन्हा मध्येच का बरं थांबला ? "
" हे बघ ... मला ना हि गोष्ट तुला खूप दिवसापासून सांगायची होती.... पण कसं सांगू कळत नव्हतं तू मला समजून घेशील कि नाही हाही एक प्रश्न सतावत होता... मला ... मला ना..."
" अरे पुढं काही बोलणार आहेस का तु...? तुला काहीतरी सांगाचंय ! इतकंच कळलं फक्त..."
" एक आहे कुणीतरी .... मला खूप आवडते पण तिला सांगु कि नको हे कळतं नाही आणि सांगावं म्हटलं तर काय करावे काही सुचत नाही..."
" काय....? म्हणजे तू कोणाच्यातरी प्रेमात तर पडला नाही ना..?" ती हसतच त्याची मस्करी करत म्हणाली...
" मला नाही माहित प्रेम आहे की नाही ते ... मला फक्त इतकं माहित आहे की ती मला आवडते...."
मध्येच त्याला थांबवत ...
" ये सांग ना . कोण आहे ती..? नाव काय आहे तिचं...? प्लिज ...प्लिज ।" अतिउत्साहात
" थांब जरा आधी माझी मदत कर , मी काय करू ते सांग ? तिला हे सांगू कि नाही ..? कि मला ती आवडते ..."
जरावेळ आणखी विचार करत...
" हो सांगून टाक तिला... पण नाव सांग मला तिचं... मी पाहिलं आहे का तिला...? "
" खरंच सांगू तिला....? तिला वाईट तर नाही ना वाटणार.. ? तुला काय वाटते काय म्हणेल ती...? "
" हो रे , बिनधास्त सांगून टाक.... बरं मला काही सांगशील नाव काय .? कोण आहे वगैरे..? "
" नाव नाही सांगत आत्ताच.... पण काही गोष्टी सांगतो तिच्याबद्दल ज्यावरून तूच ओळ्खशील कि ती कोण आहे.... "
" काय हे पुन्हा कोडंच का..? बरं सांग ."
" पहिलं कि खूप सुंदर आहे .... इतकी सुंदर कि मी शब्दात सांगू शकत नाही..."
" हं स्तुती पुरे , आता कामाचं सांग आधी नाव तर सांगणार नाही म्हणे खूप सुंदर आहे अप्सराच जणू...."
सांगतो ऐक, पण तुला माझी मदत करावी लागेल . ...
" मला ती आवडते हे तुलाच तिला सांगायचं आहे ... माझी ती मैत्रीणच आहे आणि माझ्यापेक्षा जास्त तू तिला ओळखते .... रोज नाही दिसत इतक्यात पण नेमकं मला घाई गडबड असते तेव्हा भेटतेच.... ती दिसली नाही ना तर मन बेचैन होऊन जाते अन ती समोर असतांना मन कसं प्रसन्न होऊन जाते.... जरा तिचा विसर पडला की नजरे समोर हजर ... आणि मग फक्त तिचाच चेहरा दिवसभर मनात घर करून असतो... सर्वात महत्वाच असं की तुझ्याशिवाय कुणीही यात माझी मदत करू शकत नाही कारण तूच केवळ तिला हे सांगू शकते..."
" बरं कळलं किती आवडते ती तुला पण मी कशी मदत करणार तुझी , जोपर्यंत तू मला तिचं नाव सांगणार नाही ? "
" मी नाव नाही सांगणार आहे . तुला शोधायचं आहे की ती कोण आहे तुला आतापर्यंत जे काय सांगितलं त्यावरून, शिवाय तू तिला ओळखते ... आणखी एक खूण अशी की ती आपल्याच कॉलेजमध्ये आहे...."
इतक्यात मध्येच बसचालकाने बसला ब्रेक लावला आणि अचानक झटका बसल्याने तिला जाग आली... तिने डोळे उघडून आजूबाजूला पाहिले.... ती भानावर आली , क्षणात तिला कुमार ला भेटायला जात असल्याचं लक्षात आलं.... बॅगमधून मोबाईल बाहेर काढून तिने किती वाजले ते पाहीले... तिच्या मागच्या सीटवर बसलेले गृहस्थ मोबाईल वरून बोलत असल्याचं तिने ऐकलं...
" हॅलो, बसमध्येच आहे . अजून १० - १५ मिनिटं लागतील बस स्थानकाजवळ यायला , पोहोचलो कि फोन करतो हं । बरं ठेऊ मग आता..? ठेवतो...."