Mala Kahi Sangachany - Part - 12 books and stories free download online pdf in Marathi

मला काही सांगाचंय.... - Part - 12

१२. शेवट कि सुरुवात ?


ती घराच्या आवाराचे गेट उघडून आत शिरलीे. आवाराचे गेट लोटून आत जाताच कुणाचीही नजर पडेल अशी अतिमोहक गुलाबाची फ़ुलं हवेत डुलत होती....

आवाराच्या भिंतींना लागूनच लहान लहान पान असणाऱ्या कलमांची मोठ्या मेहनतीने लागवड केलेली.... अंगणाच्या मध्यात सम्पूर्ण अंगण झाकणार इतकं विशाल बदामाचे झाडं...!

जवळच थोडं दूर एका कोपऱ्यात असणारा मोगरा हि त्याचा सुगंध उधळत त्याच् अस्तित्व जपून होता.... अशीच आणखी बरीच झाडे तिथलं वारावरण प्रसन्न ठेवण्याची जबाबदारी अगदी

प्रामाणिक पणे बजावत होते.....


आवाराच्या गेट जवळून अगदी चार पाच पावलं चालत जाताच दारासमोर तुळशी वृन्दावन... या सर्व देखाव्यावरून शहरात कमी जागा असल्याची आणि त्यातही कमी जागा असूनदेखील

निसर्गाच्या सानिध्यात कसे राहता येईल याची साक्ष जणू देत होती...


तिने दाराजवळ पिशवी ठेवून कुलूप उघडले.. ती घरात गेली... पिशवी टेबलावर ठेवून घामाने चिंब झाल्याने हात पाय धुवून चेहऱ्यावरचे पाणी टॉवेलने टिपत खुर्चीवर बसली...


'बाप रे बाप काय उन्ह तापत आहे?' स्वतःशीच बोलत , पंखा सुरु करुन ती खुर्चीत जरा मागे सरकून डोळे मिटून घामाने चिंब झालेल्या शरीराने थंड वारा घेत सुखावली....

दोन्ही पाय एकावर एक ठेवून पाठ खुर्चीला टेकवून केसाची वेणी समोर घेऊन शांतपणे बसली.... तेव्हा नुकतेच गुलाबाचे फूल उमलावे इतका सुंदर निरागस तिचा चेहरा दिसत होता.

5 -10 मिनिटानंतर तिने उठून भाजीची पिशवी किचनमध्ये नेऊन ठेवली आणि टीव्ही सुरु करुन तिने किती वाजले बरं? असं स्वतःला विचारत मोबाईल हाती घेतला तर

तिला 10 वेळा आलेले फोन त्यामध्ये दिसले. कुणाचे फोन बघण्या म्हणून तिने मोबाईल वर पाहिले तर एकाच नंबर वरून फोन आल्याचे तिला समजले तेव्हा तिने त्या नंबरवर फोन केला

आणि दुसऱ्या बाजूने 'हॅलो' असा आवाज ऐकू येताच ...


तिने "हॅलो, आपण कोण? काही वेळापूर्वी या नंबरवरून फोन आला होता " विचारले


त्यावर दुसरीकडून...


"हॅलो मी सुजित बोलतो आहे " तिला असं उत्तर मिळालं.


जरा विचार करून ती फोनवर बोलू लागली " माफ करा , मी आपणास ओळखलं नाही "


त्यावर " मी कुमारचा मित्र सुजित बोलत आहे "

असा प्रतिसाद तिला मिळाला ...


तिने आश्चर्याने "हॅलो ! सुजित ..सॉरी सॉरी अरे बऱ्याच दिवसांनी तुझा आवाज ऐकला ना ... म्हणून ओळख नाही पटली बोल ना कसा आहेस तू आणि अचानक मला कसा काय फोन केला ..? "


आता सुजित थोडा अडखळत बोलत होता ...


"काम होत एक ... " इतकं बोलून तो गप्प झाला .


" हॅलो सुजित बोल ना गप्प का झाला ? काय काम आहे ?"


सुजित बोलू लागला " तू कुठे आहे सध्या ? काल... काल ... कुमारचा अपघात झाला ...."


त्यावर ती एकदम दचकून


"काय ? कुमारचा अपघात झाला ...! कधी ? केव्हा ? अन कसा झाला ? तो ठीक तर आहे ना.."


त्यावर "काल झाला अपघात जवळपास 6 वाजता ..." सुजित म्हणाला ..


" अरे पण कालच तर तो माझ्याशी बोलला ... मला बर्थ डे विश केलं त्यानं... कुठे आहे तो आता ? "


"आपल्या गावाजवळच्या जिल्हा रुग्णालयात त्याला दाखल केले आहे... "


" मी येत आहे त्याला भेटायला ... तू आहेस ना त्याच्यासोबत..?" तिने विचारले ...


त्यावर सुजितने होकार दिला ....


"तो ठीक तर आहे ना ? ती पुन्हा पुन्हा विचारत होती ...


तेव्हा सुजितने तिला कुमारची अवस्था सांगितली ..

" जमलं तितक्या लवकर तू ये ... तुला मला काही सांगायचं आहे .... " तो असं बोलून त्याने फोन ठेवला.


तिला हे ऐकून एकदम धक्का बसला आणि ती खाली बसली... काही वेळ तिला सर्व जणू जागीच थांबलं असं वाटत होतं.... प्रत्येक दिशा सारखीच जाणवत होती...

तिच्या नजरेसमोर अंधार पडायला सुरुवात झाली ... तिचं मन मानायला तयार नव्हत की कुमार ला अपघात झाला .. तिला राहून राहून काल तो जे काय फोनवर बोलला ते आठवत होतं...

मी तर जबाबदार नाही ना कुमारच्या अपघाताला ..? अस तिला वाटून गेलं , अन विचारांच्या वादळाने तिला घेरायला सुरुवात केली ...


कालच तर तो बोलला माझ्या सोबत , तेही अचानक चार वर्षांनंतर ..... का त्याने इतक्या दिवसांनी मला फोन केला फक्त बर्थ डे विश करायला कि अजून काही ...? काल अचानक मध्येच बोलता बोलता त्याचा फोन बंद झाला होता... माझ्याशी बोलत असतांना तर त्याचा अपघात झाला नसेन ना.... मी तर कारणीभूत नाही ना त्याच्या या अवस्थेला... ती मनातच असे विचार करत स्वतःला दोष देत असता तिला कुमार आणि त्याच्या पुसट आठवणी , ज्या चार वर्ष लोटून गेल्यानं नीट आठवतं नव्हतं... तर काहीसं आठवत होतं....


शेवटी मानवाचा स्वभावविशेष आहे की जे काय जीवनात घडतं ते आपण कालांतराने विसरून जातो.... ठराविक काही क्षण सोडून....अति आनंदाचे किंवा दुःखाचे क्षण ...... तेच मनात कायम आपलं अस्तित्व टिकवून असतात .


ती आठवत होती ते सारं... जे तिच्या मनात आजही कुठेतरी घर करून होतं.....


कुमार सोबत ओळख झाली तो दिवस.... मैत्री झाली तो क्षण... एक मित्र म्हणून त्याने निभावलेलं त्याच प्रामाणिक नातं आणि बरेच काही... ती आज आठवत होती.. ...

कुमार ने कसं तीच आयुष्य अगदी व्यापून टाकलं होतं.... एक वेळ होती की कुमार आणि ती म्हणजे जणू काही कोण्या दुसऱ्या दुनियेत सफर करत असल्याच त्यांनाही जाणवत होतं...

मग अचानक तिला शेवटी ज्यादिवशी कुमार भेटला तो दिवस आठवला... आणि वेळ पुन्हा एकदा तिथंच थांबून आहे असं तिला वाटून गेलं... नकळत तिच्या डोळ्यात आसवं चमकली...

पापण्या ओल्या झाल्या......


ते क्षण आठवल्यानं कि काल कुमार चा अपघात झाला यामुळे ती वास्तवाचं भान विसरून खाली ओघळणारे आसवं तसेच गालावरून फरशीवर ढाळत बसली होती...


बराच वेळ असाच निघून गेला.... पण ती कुमारचा अपघात झाला असे कळल्यावर त्या आकस्मिक धक्क्याने जशी खाली बसली तशीच होती.... फोन लावला तेव्हा तिने टीव्ही चा आवाज बंद करून ठेवला होता ... त्यावर येणारे मूक चित्र तसेच बदलत होते... टी व्ही च्या बाजूला ठेवलेली शोभेची फुलं आधीच निर्जीव होती... भिंतीवर लावलेली छायाचित्र बोलकी वाटत होती पण तो केवळ भास होता... जवळच टिक टिक करणार घड्याळं तेवढं शांत नव्हतं... तर ती फोन लावण्याआधी ज्या खुर्चीवर बसून होती आता त्याच खुर्चीवर एक हात ठेवून .... दोन्ही पाय मागे करून.... झटक्याने अचानक खाली बसल्याने तिची लांबलचक वेणी मागे जाऊन फरशीला स्पर्श करीत... भान हरपून बसलेली... बाजूला असलेल्या सोफ्यावर टीव्ही रिमोट तसंच पडलेलं... अस काहीसं चित्र तिथं रेखाटलं होतं .


सगळीकडे शांतता पसरली होती.... फोनवर मेसेज आल्याने ती भानावर आली... आजूबाजूला नजर फिरवत तिने गालावरची आसवं पुसली..... स्वतःला सावरत ती खुर्चीचा आधार घेत उभी झाली... खुर्चीवर बसून जरा वेळ मन शांत करत तिने रिमोटने टीव्ही बंद केला.... मग मोबाईल हाती घेऊन तिने मेसेज पाहिला तर तो कस्टमर केयर कडून आल्याचं तिला कळलं.... जरा वेळ निघून गेला मग तिने टीव्ही चं बटन बंद केले... किचनमध्ये जाऊन थंड पाणी पित बॉटल तशीच हाती घेऊन सोफ्यावर येऊन बसली...


आता तिला बरं वाटतं होतं , ती विचार करत होती... काय चाललंय हे चार वर्षानंतर... ? कशाचा शेवट आहे ना..? जे नव्हतंच कधी जीवनात त्याचा शेवट .... कि जे काय बाकी आहे त्याची नवीन सुरुवात....? काही कळत नाही...!


असे विचार तिला सारखे सतावत होते... मग मन आवरून ती उठून उभी झाली आणि स्वतःशीच पुटपुटली...


" मला भूतकाळात काय झालं हे विसरून मैत्रीच्या नात्याने कुमारला एकदा भेटायला जायला हवं...! जर माझ्यावर अशी वेळ आली असती तर.... तर... कुमार नसता का आला .... नक्कीच आला असता ..! "


स्वतःशीच सुरु असलेला संवाद पूर्णविराम देत तिने संपवला आणि ती त्याला भेटायला जायचं म्हणून घाईतच तयारी करू लागली.... जास्त वेळ वाया न घालता तिने सर्व पटापट आवरून अंगावर होती त्याच कपड्याने सोबत एक हॅन्ड बॅग घेऊन बाहेर पडली ... दार बंद केलं... दाराला कुलूप लावलं आणि बस स्थानक जवळच असल्याने ती पायीच बस स्थानकाकडे जायला लागली....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED