मला काही सांगाचंय.... - Part - 15 Praful R Shejao द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला काही सांगाचंय.... - Part - 15

१५. मैत्रीचं नातं ...


इकडे जिल्हा रुग्णालयात ...

प्रशांत आई वडिलांची वाट पाहत होता . त्याला भावाची झालेली अवस्था बघवत नव्हती तरी तो 5-5 मिनिटांनी ICU च्या त्या गोलाकार काचेतून कुमारला जाग आली की नाही ते पाहत होता .

प्रत्येक वेळी तो निराश होऊन दाराजवळून परत येत होता ..... खरं तर त्याचं मन मानायला तयार नव्हत कि कुमारचा अपघात झाला आहे . कुमार स्वतः इतरांना वाहन हळू चालव म्हणून बजावत होता आणि स्वतः जबाबदारीनं दुचाकी हळूच चालवायचा . मग असं अचानक कसं काय होऊ शकत ? हा प्रश्न त्याला बेचैन करीत होता ... का म्हणून असं व्हावं ? का दादाच्या नशिबी हा अपघात

यावा ? का असं अनपेक्षित घडावं ? असे अनेक विचार मनात घोळत असता त्याने डोळे मिटून बाकाला पाठ टेकवली ....


आकाशचे वडील अधूनमधून कुमारला तपासायला येणाऱ्या प्रत्येक नर्स आणि डॉक्टरला विचारपूस करत होते . कसा आहे आता कुमार ? काही सुधार आहे का त्याच्या तब्येतीत ?

शुद्धीवर आला का तो ? आकाश आणि प्रशांत हे बालपणीचे मित्र , त्यामुळे एकमेकांच्या घरी ये जा सुरूच असल्याने कुमार त्यांना मुलासमान वाटायचा ... असा अचानक त्याचा अपघात झाला याचा धक्का त्यांनाही बसला...


या सर्वांपेक्षा सर्वाधिक विचारात कुणी होतं तर तो म्हणजे सुजित , त्याला कारण ही तसंच होतं ... पहिलं म्हणजे कुमारचा असा अनपेक्षित अपघात ज्याची तो कल्पनाही करू शकत नव्हता कि कुमारचा कधी अपघात होईल .... बऱ्याचवेळा दोघे मिळून फिरायला जायचे पण कधी गंम्मत म्हणून सुद्धा कुमारने जोरात दुचाकी चालवली असं कधीच झालं नाही...


दुसरं म्हणजे कुमारची डायरी ... त्यामुळे सुजितला जरा जास्त धक्का बसला होता . कितीतरी दिवसापासून मित्र असून त्याला हे गुपित माहित नव्हतं आणि भलत्याच वेळी ती डायरी नजरेस पडली ... तो आज या अवस्थेत आहे त्यामुळेच हे सगळं माहित झालं . त्याचा अपघात झाला हे चांगलं झालं की वाईट ? काय म्हणावं याला , इतके दिवस लपवून ठेवलेलं रहस्य या अश्यावेळी कळावं याचा अर्थ काय ? नियतीचा काय लपंडाव चाललाय कुणास ठाऊक ...?

स्वतःशीच पुटपुटत तो बाहेर पायरीवर बसून होता ...


विचारात मग्न असतांना त्याचा मोबाईल वाजला . त्याने मोबाईल खिश्यातून बाहेर काढला . मोबाईलच्या स्क्रीनवर, आर्यन नावाने कुमारच्या सिमवर Incoming call दिसला . कुमारच्या खास मित्रांपैकीच एक - आर्यन , सुजित त्याला ओळखत होता . त्याने कॉल घेऊन....


" हॅलो ..."


" हॅलो कुमार ... अरे तु कुठे आहेस ? काल रात्री किती तुला वेळा फोन केला पण तुझा मोबाईल नंबर बंद आहे असंच उत्तर मला मिळालं ... "


" हॅलो ... मी ..." पुढे सुजित काही बोलणार तोच तिकडून मध्येच आवाज आला.. सुजित ऐकू लागला.


" तुला वेळ आहे का जरा , तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे , मला तुला काही सांगाचंय .... " आर्यन घाईतच बोलला.


" हॅलो प्लिज थांब आर्यन , मी सुजित बोलतोय ..."


" कोण ? सुजित .... हं ओळखलं , अरे कुमारला दे ना जरा मोबाईल मला त्याच्याशी खूप महत्त्वाचं काम आहे ... प्लिज .. प्लिज जरा लवकर "


" आर्यन , कुमार ... कुमार ..." सुजित ला गहिवरून आलं पुढे त्याला बोलवत नव्हतं .


" कुमार नाही का तिथे ? आल्यावर प्लिज मी कॉल केला होता म्हणून सांग त्याला .... आठवणीने नक्की सांगशील " तिकडून होकार मिळण्याची वाट बघत तो म्हणाला .


" अरे , कुमारचा काल अपघात झाला . "


" काय ? काय म्हणाला तू सुजित ? कुमारचा अपघात ? कधी ? केव्हा ? कुठे ? आणि कसा ? "


मग सुजितने थोडक्यात त्याला सांगितलं की अपघात कधी आणि कसा झाला , कालपासून कुमार अजून बेशुद्ध आहे . कुमारचं ऑपरेशन होणार ... जमलं तर तू ये ...


" जमलं तर ! काय म्हणतोस तू सुजित अरे कुमार बेस्ट फ्रेंड आहे माझा ... निघालोच मी तिथं पोहोचल्यावर तुला कॉल करतो ..."


" बरं ये मी वाट बघतो "


" काळजी करू नकोस काही होणार नाही त्याला , अरे इतरांना जगणं शिकवणारा कुमार , नेहमी मदत करणारा ... सर्वांना समजून घेणारा ... त्याच वाईट कसं रे होणार .... चल ठेवतो मी , लवकरच भेटू .... "


" हो आल्यावर मला कॉल कर " सुजित म्हणाला .


आर्यन सोबत बोलून त्यालाही जरा मन हलकं झाल्यासारखं वाटलं . कुमारला खरंच खूप जिवाभावाचा मित्र मिळाला असं मनात आलं आणि त्याला अनिरुद्ध ची आठवण झाली . अनिरुद्ध म्हणजे कुमारचा बालपणीचा मित्र , अगदी लहान असताना ते मित्र बनले . कुमार बऱ्याच वेळेस त्याची आठवण काढायचा , मग लहानपणी केलेल्या गमती सांगायचा . तो बालपणीचे किस्से सांगायला लागला कि खूप खुश व्हायचा.... सुजित या विचारात हरवला ... काही वेळानंतर त्याला जाणवलं की कुमार बद्दल अनिरुद्धला सांगायला हवं ... त्याने कुमारच्या सिमकार्ड मधील कॉन्टॅक्ट लिस्ट मधून अनिरुद्धचा मोबाईल नंबर शोधून काढला आणि घाई घाईत त्याच सिमवरून डायल केला ...


" हॅलो कुमार ... 100 वर्षे आयुष्य आहे बघ तुला , तुझाच विचार करत होतो आणि तुला फोन करणार होतोच तर तुझाच कॉल आला . "


सुजित मनातल्या मनात , अरे यार चुकून कुमारच्या सिमवरून कॉल लागला ... अन काहीसं पुटपुटला ...


" हॅलो ... हॅलो अरे आवाज येत नाही काय म्हणाला ? "


" मी सुजित बोलत आहे . ओळखलं का ? "


" सुजित ? हा ओळखलं . पण कुमार कुठे आहे ? "


" तो ... तो ... दवाखान्यात आहे ."


" काय झालं त्याला ? कुमार ठीक तर आहे ना ? "


" कुमारचा अपघात झाला काल . "


" कसा झाला अपघात ? कुमार कसा आहे ? कुठं आहे तो आता ? "


पुन्हा सुजितने थोडक्यात त्याला सांगितलं ...


" मला कालपासून कुमारची आठवण येत होती . काल रात्री मी त्याला फोनसुद्धा केला होता पण त्याचा मोबाईल नंबर लागतच नव्हता ... "


" अपघातात त्याचा मोबाईल पण फुटला, आज सकाळी मी त्याचं सिमकार्ड माझ्या मोबाईल मध्ये टाकलं ... "


" धन्यवाद मला तु सांगितलं त्याबद्दल . बरं मी फोन ठेवतो आणि बस लगेच निघतो , तिथं आलो की तुला कॉल करतो .."


" ठीक आहे . बाकी तू इथं आल्यावर बोलू ..."


" हो चल ठेवतो फोन ..."


असं म्हणत दोघांनी फोन कट केला ... एका क्षणाला त्याच्या मनात विचार आला .... मैत्रीचं नातं किती निराळं असत ना अगदी काहीएक संबंध नसतांना फक्त काही दिवसांच्या ओळखी , संपर्क येऊन कुणा अनोळखी व्यक्ती सोबत आवडी निवडी जुळतात . नकळत एका नवीन नात्याचा जन्म होतो . कधीकाळी आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो तर साधी ओळख नव्हती आणि कुमारशी मैत्री झाली तशी आर्यन , अनिरुद्ध यांच्याशी ओळख झाली ... मैत्रीचं नातं कसं जुळलं ते कळलं नाही ... अनिरुद्ध तर कुमारचा बालपणापासून मित्र आहे , मग त्याला तरी त्या डायरी बद्दल नक्की माहित असेल ... कदाचित तिच्याबद्दल सुद्धा ...

खाली पायाकडे पाहत तो विचार करत पायरीवर बसला असता .... कुणीतरी त्याच्या पाठीवर हात ठेवल्याचं जाणवलं तसं त्याने मान वर करून वर पाहिलं तर त्याचे वडील , आकाश आणि कुमारचे आई वडील तिथं आल्याचं त्याला दिसलं ...


" बाबा , कधी आलात तुम्ही सगळे ?"


" आत्ताच आलो आम्ही . तू इथं बाहेर काय करत आहे ? "


त्यावर " काही नाही .सहजच ..." असं उत्तर त्याने दिलं .


" कुमार कसा आहे आता ? जागा झाला की नाही अजून ? " मध्येच तिने विचारले


" काकू , अजून बेशुद्धच आहे तो . " सुजित म्हणाला .


" चला आत जाऊया " सुजितचे वडील म्हणाले


मग सगळे सोबतच पायऱ्या चढून सरळ ICU कडे गेले . कुमार कसा आहे ते पाहायला ... दुरूनच आकाश चे वडील तिथेच दाराच्या काचेतून त्याला पाहत असल्याचं त्यांना दिसून आलं ... काही क्षणात तेही दाराजवळ पोहोचले ... निदान ऑपरेशन करण्या पूर्वी तरी तो शुद्धीवर यावा या आशेने एकदा कुमारला मनभरून तिने पाहिले ... तिचे डोळे भरून आले अन आसवं गालावरून खाली ओघळले ... ती अनावर होऊन जास्त भावूक होत होती मग तिला सावरत त्यांनी बाकावर बसविले . प्रशांत तिच्या जवळ बसून तिला धीर देत होता ... आकाश आणि सुजित बाजूलाच उभे राहून प्रशांतला मदत करत होते...


कुमारचे वडील दाराच्या काचेतून त्याला पाहत होते .... एक नजर त्या माउलीला पाहून त्यांच मन भरून आलं पण त्यांनी स्वतःला सांभाळलं ... त्यांना ठाऊक होतं की असं खचून कसं निभवणार , वास्तविकता मान्य करून त्यावर मात करणे हाच एकमेव उपाय आणि जीवन जगत असता हेच सूत्र योग्य आहे ... मागे वळून पाहिलं तर आकाशचे वडील बाजूलाच त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले ....


" सगळं ठीक होईल . तुम्ही मुळीच चिंता करू नका "


डोळ्यात आलेले पाणी दिसू न देता त्यांनी मानेनं प्रतिसाद दिला ...


" तुम्ही यायच्या आधी डॉक्टर त्याला तपासून गेले . तुम्हाला परत आल्या नंतर केबिनमध्ये येऊन भेटायचं हा निरोप दिला होता .... " आकाशचे वडील म्हणाले .


स्वतःला सावरत " का ? कश्यासाठी केबिनमध्ये भेटायचं डॉक्टरांना ? "


" ते नाही सांगितलं , पण काहीतरी बोलायचं आहे असं डॉक्टर म्हणाले . "


" चला तर मग डॉक्टरांना भेटून घेऊ "

आतापर्यंत हे सारं बोलणं ऐकत बाजूलाच उभे सुजितचे वडील म्हणाले ..


तिघे डॉक्टरला भेटायचं म्हणून केबिनच्या बाहेर थांबून ...

" डॉक्टर साहेब आम्ही आत येऊ का ? " परवानगी घेत त्यांनी केबिनचं दार हळूच आत लोटलं .


" हो . प्लिज तुम्ही आत या ." डॉक्टर ने परवानगी देत त्यांना आत बोलावलं ...


तिघेही आत येऊन डॉक्टरांच्या टेबल समोर उभे राहिले ....


" तुम्ही उभे का ? प्लिज खुर्चीवर बसा "

तिघेही डॉक्टर आता काय म्हणणार आहे या विचारातच खुर्चीवर बसले ...


" डॉक्टर , तुम्ही काहितरी बोलायचं आहे म्हणालात ? " सुजीतच्या वडिलांनी पुढाकार घेत विचारले .


" हो मला तुम्हाला काही सांगायचं आहे "


" काय झालं डॉक्टर ? कुमार बरा होईल ना ? " कुमारचे वडील काळजीनं म्हणाले


" ऑपरेशन झालं की तो नक्की बरा होणार . आवश्यक ते सर्व रिपोर्ट आलेले आहेत सगळं नॉर्मल आहे , आपण त्याच ऑपरेशन करू शकतो .... " एवढं बोलून डॉक्टर थांबले .


जरावेळ समाधानाने तिघे एकमेकांकडे पाहत ...


" मग आता बाकी काय आहे ? " आकाशच्या वडिलांनी विचारलं


एक नजर कुमारच्या वडिलांकडे पाहून ... " आपण इथेही कुमारचं ऑपरेशन करू शकतो पण याठिकाणी काही गोष्टींची उणीव आहे तर वेळेवर कोणत्या प्रकारची इमर्जन्सी आल्यास अडचण निर्माण होऊ शकते म्हणून मी तुम्हाला एक सुचवू का ? "


जरा चिंतेचा विषय होता पण जरा वेळ विचार करून ते म्हणाले...

" बोला डॉक्टर साहेब काय म्हणणं आहे तुमचं "


" माझं मत असं आहे की कुमारचं ऑपरेशन खाजगी दवाखान्यात करायला हवं . तिथं त्याची पूर्ण सोय केली जाईल कोणतीही इमर्जन्सी असो किंवा इतर काही अडचणी आल्या तरी सगळ्या सुविधा उपलब्ध असणार ..."


आता चिंता आणखी वाढली कारण पहिली गोष्ट अशी की कुमारला शुद्ध नव्हती त्यात दुसऱ्या दवाखान्यात हलवणं ... दुसरी गोष्ट म्हणजे खाजगी दवाखाना म्हटलं की खर्च जास्त येईल ...


आता काय करावं त्यांना काहीएक सुचत नव्हतं ... जरावेळ शांतता पसरली ...


" तुम्ही जास्त विचार करू नका माझ्या मित्राचाच उत्तम दवाखाना आहे , डॉक्टर देवांश वैद्य त्याच नाव शिवाय मी त्याच्याशी कुमारच्या ऑपरेशन बद्दल आधीच बोललो आहे... मी बरोबर असेलच कि ऑपरेशन करतेवेळी आणि तुम्ही पैश्याची काळजी करू नका मी तुम्हाला आधी जितका खर्च सांगितला होता तेवढाच येईल .... "


हे ऐकून त्यांना बरं वाटलं ... चेहऱ्यावर आलेली चिंतेची छाया हळूहळू नाहीशी झाली ...


" ठीक आहे डॉक्टर साहेब मला तुमचं म्हणणं पटलं " कुमारचे वडील म्हणाले


" हा फॉर्म भरून घ्या आणि येथून जाण्याची तयारी करा , मदतीला आपली रुग्णवाहीका असेलच ... "


त्यावर होकार मिळताच ...

डॉक्टर खुर्चीवरून उठून त्यांच्या बाजूला येऊन उभे राहिले आणि खांद्यावर हात ठेवून ...

" ठीक आहे . आणखी काही मदत लागली तर मी आहेच ... काळजी करू नका . ओके ..."


असा संवाद संपताच ते सर्व केबिनबाहेर पडले ... मग ते तिन्ही वडील मंडळी ICU जवळ आले ... डॉक्टर जे म्हणाले ते सर्व कुमारच्या आईला आणि त्या तिघांना सांगितले...


सुजित फॉर्म हाती घेऊन वाचू लागला ... त्यात रुग्णाचे नाव , पत्ता , मोबाईल नंबर , वॉर्ड क्रमांक ,आजार इतर काही गोष्टी अशी काही माहिती भरावयाची होती तर दुसऱ्या पानावर , स्वतःच्या मर्जीने , जबाबदारीने रुग्णाला दुसऱ्या दवाखान्यात हलवण्याची हमी घेणाऱ्या पालकाची किंवा नातेवाईकांची सही करून हमीपत्र लिहिलेलं होतं ...


सुजितने एकदा ते त्यांना वाचून सांगितलं ... थोडा वेळ विचार करत शेवटी काही उपाय नाही असं म्हणत कुमारच्या वडिलांनी त्या फॉर्म वर सही केली आणि तो फॉर्म भरून योग्य त्याठिकाणी जमा केला ... काही वेळातच वॉर्डबॉय आणि नर्स हवी ती औपचारिकता संपवून कुमारला स्थलांतर करण्याच्या कामाला लागले ... रुग्णवाहिकाही दवाखान्याच्या बाहेर पायरीजवळ उभी करण्यात आली ... ते सर्व ICU बाहेर उभे असतांना कुणी आवाज दिल्याचं ऐकू आलं ...

" रुग्णाचे वडील कुठे आहेत ? " नर्स


समोर येत कुमारचे वडील म्हणाले " काय झालं ? मॅडम मी इथं आहे "


" तुम्ही चला माझ्यासोबत नोंदवहीत तुमची सही घ्यायची राहून गेली . " नर्स


नर्ससोबत जाऊन त्यांनी हवी तिथं सही केली आणि ते परत आले ... जातेवेळी नर्सनी त्यांना सर्व गोष्टी आठवणीने सोबत घेऊन जायचं बजावलं ... असं बोलतं असता सुजितचे लक्ष बॅगकडे वळले ...


स्वतःशीच बोलत तो नजर इकडे तिकडे फिरवत - कुठे बरं ठेवली ती बॅग ? शोधाशोध करत बाजूला त्याच्याच मागे भिंतीला टेकवून ठेवलेली त्याला दिसून आली लगेच उचलून त्याने पाठीवर घेतली .. नंतर घाईत विसर पडू नये म्हणून ... आकाशकडे पाहत तो म्हणाला .


इतक्यात एक वॉर्डबॉय हाती फाईल घेऊन आला ... सांगू लागला ...

" हि फाईल जपून ठेवा यात पेशन्टचे सर्व रिपोर्ट आहेत ... कळलं ... हं घ्या आणि सांभाळून ठेवा ..."


असं म्हणत ती फाईल त्याने जवळच असलेल्या प्रशांतला दिली ... वॉर्डबॉय कडे एकटक पाहत तो काहीतरी बोलला .. पण ते कुणालाच कळलं नाही मग सुजितने पुढं होऊन ती फाईल घेतली आणि बॅगमध्ये ठेवली .... तिथं आणलेल्या सर्व गोष्टी सोबत घेत ते जायच्या तयारीस लागले ... सुजितला मोबाईल वाजला ... घाई घाईत कुणाचा फोन आहे हे न पाहता लगेच उचलून त्याने मोबाईल कानाला लावला ...


" हॅलो ... "


" हॅलो सुजित मी पोहोचले . बस स्थानक आहे ना तिथे उभी आहे ."


" तू आलीस का ? ... " जरावेळ विचार करत कि आता काय करावं


" हो 5 - 10 मिनिटं झाली असतील , बरं दवाखाना कुठे आहे ते म्हणजे मला ऑटोने येता येईल .."


" तू तिथंच थांब , मीच तुला घ्यायला येतो तिथं "


" ठीक आहे " म्हणत तिने फोन ठेवला

सवयीप्रमाणे मोबाईल वर बोलत तो कधी बाहेर आला त्यासुद्धा कळलं नाही ... परत जायला निघाला तर समोरून कुमारला दोघेजण धरून आणतांना त्याला दिसले . क्षणात त्यांनी कुमारला सलाईन आणि ऑक्सिजन मास्क सकट रुग्णवाहिकेत ठेवले ... लगेच त्यांच्या पाठोपाठ कुमारचे आई वडील आणि बाकी सर्व तिथं आले . कुमार सोबत कुणीही दोन व्यक्ती जाऊ शकत होते म्हणून त्याचे आई वडील जातील असं ठरलं पण त्याची आई आणखी दुःखी होऊन रडेल ... यामुळे सुजितचे वडील सोबत जातील असे ठरविले ... रुग्णवाहिका कुमारला घेऊन निघाली ... आता प्रश्न हा होता की पाच जण दोन दुचाकीवर कसे जाणार त्यात भर पडली ती अशी की सुजितला बस स्थानक ला जावं लागणार होतं म्हणून ...


" तिघे एका दुचाकीवरून जाणं काही बरोबर नाही , ट्राफिक पोलिसांनी पकडलं तर नसती उठाठेव करावी लागेल म्हणून ऑटोने जायला हवं .." सुजित म्हणाला


त्यावर आकाशचे वडील " मी घरी जाऊन यायचं म्हणत होतो .." तेव्हा एक दुचाकी घेऊन ते घरी तर कुमारची आई , प्रशांत आणि आकाश ऑटोने दवाखान्याकडे जायला निघाले .... सुजित बसस्थानकाकडे ....