Pathlag - 26 books and stories free download online pdf in Marathi

पाठलाग (भाग-२६)

“अर्रे व्वा! खुद्द दिपक कुमार हजर झालेत…”, डिसुझा हसत हसत म्हणाला.. “हे तर म्हणजे असं झालं अंधा मांगे एक, भगवान दे दो!, काय राणा??”

“येस्स सर.. खरं आहे…”, राणा हसण्यात सामील झाला

“बसा.. दिपक कुमार.. बसा.. खुप पळापळ झाली ना.. दमला असाल बसा..”, समोरच्या खुर्चीकडे बोट दाखवत डिसुझा म्हणाला..

दिपककडे दुसरा कुठलाच मार्ग नव्हता. तो शांतपणे खुर्चीत जाऊन बसला.

“राणा, बेड्या घाला त्यांना आधी.. काय आहे ना, फौजी तालीम आहे.. आपल्याला उगाच कॅज्युलिटीज नकोत..”, डिसुझा

राणाने दिपकचे दोन्ही हात खुर्चीच्या मागे ओढले आणि त्याला बेड्या ठोकल्या.

“राणा.. तुझ्या माणसांना बाहेर थांबायला सांग.. आपल्याला जरा महत्वाचं बोलायचं आहे..”, डिसुझा

राणाने बाकीच्या पोलिसांना बाहेर थांबायची खुण केली तसे सर्वजण बाहेर निघुन गेले. खोलीत फक्त दिपक, राणा आणि डिसुझा..

“आम्हाला वाटलं नव्हतं सरळं तुच आमच्या हाती लागशील. वाटलं होतं कोणीतरी सोम्या गोम्या येईल.. त्याला तरी ताब्यात घेऊन चौकशी करावी. पण हे तर डायरेक्ट मोठ्ठा मासाच गळाला लागला..”, डिसुझा

दिपक काहीच न बोलता शांत बसुन होता..

“ओह.. बाय द वे, मी माझी ओळखच करुन नाही दिली.. मी सि.आय.डी. इन्स्पेक्टर डिसुझा, मुंबई ब्रॅन्च.. आणि हे इन्स्पेक्टर राणा, दमण स्टेशन..”, डिसुझाने शेख-हॅन्ड्साठी हात पुढे केला आणि मग दिपकच्या हातातल्या बेड्या बघुन हसत हसत परत खुर्चीत बसला.

“सो? दिपक कुमार? पुरावा नष्ट करायला आला होता? हम्म?..”.. डिसुझा अजुनही हसतच होता..

दिपकच्या कपाळावरच्या शिरा संतापाने ताणल्या गेल्या होत्या..

“आम्हाला तर वाटलं होतं तुम्हाला शोधायला फार शोधा शोध करावी लागेल. तुमच्यासाठी कित्ती कष्ट घेतले आम्ही.. राणा दाखवा जरा ते आपलं एन्व्हलोप..”, डिसुझा

राणाने ब्राऊनपेपरच्या एन्व्हलोपमधले दिपक कुमारचे विवीध रुपातील फोटो काढुन टेबलावर पसरले.

“बघा.. तुम्ही कुठल्या रुपात असाल.. माहीत नव्हतं आम्हाला.. म्हणुन हा प्रपंच..”, डिसुझा फोटोंकडे हात दाखवत म्हणाला..

“बरं बोला.. गुन्हा इथेच कबुल करणार? का राण्यांच्या स्टेशनात जायचं?”, डिसुझा

“मी तो पुरावा आणि बाकीची माहीती विकत घ्यायला तयार आहे..”, बराच वेळ शांततेत गेल्यावर दिपक म्हणाला

“काय?” राणा जवळ जवळ ओरडलाच, पण दिपकने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.

“प्रत्येक गोष्टीला किंमत असते..नाही का सि.आय.डी. इन्स्पेक्टर डिसुझा.. तुमची किंमत बोला…”, दिपक शांतपणे म्हणाला

“ए.. काय बोलतोय तु कळतं का तुला??”, राणा

“किती देऊ शकशील..?”, राणाला शांत करत डीसुझा म्हणाला..

“पण सर..”, राणा

“बोल दिपक, किती देऊ शकशील? आपण सिग्नल तोडला म्हणुन चिरीमीरीची भाषा करत नाहीये.. कळतय ना तुला? फार मोठ्ठी किंमत लागेल ह्याला..”, डिसुझा

“तुम्ही फक्त किंमत बोला.. बाकीचं मी बघुन घेइन..”, दिपक

“राणे.. बेड्या काढा त्याच्या..”, डिसुझा आरामशीर खुर्चीत रेलुन बसत म्हणाला..

“सर.. तुम्ही विकले जाताय!!”, राणा

“राणा.. अहो काय हरकत आहे त्यात? कित्ती दिवस तो फालतु पगार सांभाळत बसायचा. संधी मिळत असेल तर मस्त रिटायर होऊन आयुष्य जगण्यात काय वाईट आहे.. तुम्ही काळजी करु नका, तुमचा कट मिळेल तुम्हाला..”, डिसुझा

नाईलाजाने इ.राणाने दिपकच्या हातकड्या काढल्या.

“पन्नास लाख..”,डिसुझा म्हणाला. “मला बाहेर थांबलेल्या लोकांची तोंड बंद करावी लागतील.. शिवाय ही केस दाबुन टाकायची झाली तर.. माझ्यावर सुध्दा काही लोकं आहेतच की.. सो..”

“ओके.. मला एक दिवस द्या.. मी पैश्याची व्यवस्था करतो…”, डिसुझाचं वाक्य मध्येच तोडत दिपक म्हणाला

“पळुन जायचा प्रयत्न केलास तर??”, डिसुझा

“जर सरळ मार्गी तोडगा निघत असेल, तर कश्याला पळुन जाऊन पुन्हा पोलिसांचा ससेमिरा मागे लावुन घेऊ?”, दिपक

“ठिक आहे, उद्या संध्याकाळी हार्बरलाईनवर तो बार आहे एक..राणा काय नाव त्याचं?”, डिसुझा

“सर.. मेनका बार..”, राणा

“हम्म.. उद्या संध्याकाळी ८.३० ला मेनका बार, पैश्याची व्यवस्था करुनच ये..”, डिसुझा

“पैसे तयार रहातील..”, दिपक

“गुड.. राणा, तुमच्या माणसांना सांगा ह्याला जाऊ द्या..”, डिसुझा राणाला बघुन म्हणाला

दिपकने आणि डिसुझाने काही क्षण एकमेकांकडे पाहीले आणि दिपक तेथुन निघुन गेला

“सर..काही कळलं नाही मला.. ह्याला सोडुन का दिलंत?” राणा

“राणा.. मी म्हणालो ना.. ह्याला कुणाचा तरी नक्कीच पाठींबा आहे. मला वाटतं हा छोटा मासा आहे, आपल्याला मोठ्ठा मासा पकडायचा आहे..”, डिसुझा

“तुम्ही बघीतलंत, पन्नास लाखासाठी किती सहज तयार झाला. ह्याच्याकडे कुठुन असणारेत इतके पैसे?”, डिसुझा

“हो बरोबर सर..”, राणा

“राणा एक काम करा.. ह्याच्यामागे एक माणुस चौविस तास लावुन द्या. हा कुठे जातो? कुणाला भेटतो? काय करतो.. मला पुर्ण रिपोर्ट हवाय..”, डिसुझा

“येस्स सर..”, असं म्हणुन राणा लगेच बाहेर पडला.


दिपक लगबगीने तेथुन बाहेर पडला. दिपक पण इतका दुधखुळा नव्हता. डिसुझाचा प्लॅन त्याच्या तेंव्हाच लक्षात आला होता. परंतु तेथुन बाहेर पडणं आवश्यक होतं आणि म्हणुन खोटं का होईना त्याने नाटकं केलं होतं आणि तो बाहेर पडला होता.

“काहीही झालं तरी आत्ता मायाला कॉन्टॅक्ट करायचा नाही..”, त्याने मनोमन ठरवले होते. एकदा का डिसुझाला दिपकबरोबर कोण आहे हे कळलं असतं की त्याने क्षणाचाही विलंब न करता दोघांनाही अटक केली असती.

दिपक सहजच म्हणुन बुटाची नाडी बांधायला खाली वाकला आणि त्याने पट्कन मागे बघुन घेतलं.

दुरवरुन एक काळी आकृती दिपकच्या मागे मागे येत होती. दिपक थांबलेला बघताच ती आकृती पट्कन एका झाडामागे लपली.

दिपक स्वतःशीच हसला आणि पुन्हा झपझप चालु लागला.

काही अंतर चालुन गेल्यावर कॉर्नरला एक बस-स्टॉप होता तेथे तो जाऊन थांबला. त्याचा पाठलाग करणारी आकृती पण काही अंतर चालुन थांबली. बहुदा दिपकशेजारी बसस्टॉपवर थांबावे का दुरुनच त्याचे निरीक्षण करावे अश्या द्विधा मनस्थीतीमधे ती व्यक्ती होती.

दिपकला बसस्टॉपला थांबलेलं पहाताच त्या व्यक्तीने एक वॉकीटॉकी सदृश्य वस्तु काढुन बोलत असल्याचे दिपकने हळुच पाहीले. बहुदा पुढील इन्स्ट्रक्श्न्सची ती व्यक्ती वाट पहात असावी.

थोड्यावेळाने दुरुन एक मोटर कार येऊन त्या व्यक्तीपाशी येऊन थांबली आणि ती व्यक्ती त्या कारमध्ये जाऊन बसली. परंतु कार मात्र दिवे बंद करुन जागेवरच उभी होती.

आपला पाठलाग केला जात आहे ह्यावर एव्हाना दिपकने शिक्कामोर्तब केले होते. परंतु अश्या लोकांना चकवणे दिपकच्या डाव्या हाताचा मळ होता.

तो शांतपणे बसस्टॉपवर बसची वाट बघत उभा राहीला. बराच वेळ वाट पाहील्यावर एक बस धुळ उडवत येऊन स्टॉपला थांबली तसा दिपक बसमध्ये चढला. त्याबरोबर लांब थांबलेली ती मोटरकार सुध्दा सुरु झाली आणि बसच्या मागोमाग येऊ लागली.

दिपकला आता थोडा विचार करायला वेळ मिळाला होता. कसंही करुन मायाशी कॉन्टॅक्ट होणं महत्वाचं होतं. पण कसा? त्याने बरोबर मोबाईलवगैरे आणला नव्हता. केवळ मोबाईलच्या लोकेशन्सवरुन कित्तेक गुन्हे पकडले गेल्याचं त्याला माहीत होतं आणि म्हणुनच त्याने असले कोणतेही गॅजेट बरोबर आणले नव्हते.

गावाबाहेरच्या इंडस्ट्रीयल इस्टेटला जाणारी बस एव्हाना चांदनी चौक उतरुन घाट चढत होती. दिपकने हळुच मागे बघीतले. ती मोटरकार अजुनही काही अंतर राखुन बसच्या मागोमाग येत होती.

दिपकने बाहेर पाहीले. वस्ती बर्‍यापैकी मागे पडली होती आणि बाहेरचा भागही दिव्यांच्या अभावी बर्‍यापैकी अंधारातच बुडालेला होता.

तो सावकाश उठला आणि बसच्या दरवाज्यापाशी जाऊन उभा राहीला.

एका वळणदार चढावर बसचा वेग किंचीत कमी झाल्याचं पाहुन त्याने चित्याच्या वेगाने उडी मारली आणि क्षणाचाही विलंब न करता तो जेथे पडला तेथेच जमीनीला लागुन झोपुन राहीला.

हे सर्व इतक्या विलक्षण वेगाने घडले की त्या मोटरकारमधील इसमांना सोडा, बसमधील अर्धवट पेंगलेल्या प्रवाश्यांनासुध्दा कळले नाही.

दिपक निपचीत जमीनीला लगत पडुन राहीला. त्याने आपला चेहरा शक्य तितका जमिनीत खुपसला होता.

बस वळण पार करुन धुरळीचा एक मोठ्ठा लोट निर्माण करत पुढे निघुन गेली. पाठोपाठ ती मोटरकारही काही क्षणात दिपकच्या इथुन पुढे निघुन गेली. दिपकने कार पुढे गेल्यावर हळुच पाहीले तेंव्हा शेजारी बसलेली व्यक्ती सतत वॉकी-टॉकीवर बोलण्यात मग्न होती.

गाड्यांचे आवाज नाहीसे होईपर्यंत दिपक पडुन राहीला आणि मग पट्कन उठुन तो शेजारच्या झाडीत शिरला.

“अहो काय बोलताय तुम्ही कळतंय का तुम्हाला?”, डिसुझा जवळ जवळ ओरडतचं म्हणाला.. “तुम्हाला कश्याला पाठवले होते मागावर? रिकामी बसं बघायला? दिपक जर मध्ये कुठे उतरला नाही, जर बसं कुठे थांबली नाही, तर मग शेवटच्या स्टॉपवर दिपक नव्हताच ह्याचा अर्थ काय???”

“सर.. जरं दिपक आपल्या हातातुन निसटला कळलं तर..आपल्याला हे प्रकरण फ़ार महागात पडु शकतं.. “, राणा डिसुझाला म्हणाला

“हम्म. पण मला वाटतं लगेच पॅरॅनॉईड होण्यात अर्थ नाही. कदाचीत तो उद्या पैसे घेउन येईल सुध्दा.. आपण थोडी वाट बघुयात. पण त्याच वेळी सगळी लोकं दिपकच्या मागावर लावा. त्याला पकडु नका.. फक्त लक्ष ठेवा त्याच्यावर.. आणि दुसरी गोष्ट…सगळ्या बॅंकांमध्ये फोन करुन कळवा. पन्नास लाखाची रोकंड कुठुनही, कोणीही विड्रॉ करत असेल तर पोलिसांना लगेच खबर करायची तंबी देउन ठेवा..”, डिसुझा एकावर एक सुचना सोडत होता इतक्यात एक कॉन्स्टेबल मुंबई कमीशनरचा फोन असल्याचा निरोप घेऊन आला.

“येस्स सर… हो सर.. ओके सर..बघतो लगेच..”, असं म्हणुन डिसुझा राणाकडे वळले, “राणा, लॅपटॉप आणा तुमचा, कमीशनर साहेबांनी शेखावतची फाईल पाठवली आहे..”

राणा लगेच जाऊन लॅपटॉप घेउन आले. डिसुझाने आपले इ-मेल अकाऊंट उघडले आणि शेखावतची फ़ाईल डाऊनलोड करुन तो वाचु लागला.


माया आपल्या लिव्हींग रुममध्ये अस्वस्थपणे येरझार्‍या घालत होती. दिपकला जाऊन पाच तासांहुनही अधीक काळ लोटला होता. बाहेर सकाळ व्हायला लागली होती, परंतु त्याचा अजुनही काहीच पत्ता नव्हता.

तासभर होऊन गेला असेल आणि अचानक मागचे दार उघडुन दिपक आतमध्ये आला. तो पुर्ण धुळीने माखुन गेला होता. चेहर्‍यावर आणि हातावर बारीक-सारीक खरचटल्याच्या खुणा होत्या.

“दिपक??”, त्याला पहाताच आनंदाने माया म्हणाली… “कुठे होतास तु?? काय झालं नक्की? पुरावा नष्ट झाला का?”

“एक मिनीटं.. मला जरा बसु देत… “, दिपक खुर्चीत रेलत म्हणाला..शेजारचा पाण्याचा जग त्याने तोंडाला लावला आणि मग काही वेळ तो डोळे मिटून बसुन राहीला..

“काय झालं आहे, सांगशील का? पुराव्याचं काय झालं?”, माया

“ईट वॉज ट्रॅप माया…”, दिपक बोलु लागला..”मी म्हणालो होतो ना, मला नाही वाटतं पोलिसांकडे काही पुरावा आहे.. तो एक सापळा होता. त्यांना खात्री होती की पुरावा नष्ट करायला नक्की कोणी तरी येईल आणि त्यांच्या तावडीत सापडेल..”

“म्हणजे.. तेथे पोलिस होते?”, माया

“हो..मी त्या रेकॉर्डरुममध्ये शिरलो आणि पोलिसांच्या हातात सापडलो..”, दिपक

“मग? सुटलास कसा काय?”, माया

मग दिपकने एक एक करत सर्व हकीकत मायाला सांगीतली. माया डोळे विस्फारुन त्याचं बोलणं ऐकत होती.

“पोलिसांना काही संशय की तुझ्याबरोबर मी सुध्दा इन्व्हॉलव्ह आहे?”, दिपकचं बोलण झाल्यावर मायाने विचारले

“मला नाही वाटत की त्यांना यातुझ्याबद्दल काही संशय आहे, पण माझ्याबरोबर अजुन कोणीतरी आहे ह्याची त्यांना खात्री आहे..”, दिपक

“हम्म, पण तुला शंभर टक्के खात्री आहे का की त्यांच्याकडे पुरावा नाही”, माया

“हो.. कारण त्यांच्याकडे पुरावा असता तर त्यांनी सापळाच रचला नसता. आज नाही तर उद्या ते आपल्या पर्यंत येऊन पोहोचलेच असते. इनफ़ॅक्ट मला पहाताच त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. सो येस.. मला खात्री आहे की त्यांच्याकडे पुरावा नाही..”

“हम्म.. मग ठिक आहे..”, थोडं रिलॅक्स होत माया म्हणाली.

“पण मग आता काय करायचं”, दिपक

“म्ह्णजे??”, माया

“म्हणजे.. पोलिसांना हे तर कळलं आहे की मी जिवंत आहे आणि इथे दमणमध्ये आहे. पोलिस पुर्ण तपास चालु करतील आणि आज नाही तर उद्या ते माझ्यापर्यंत येऊन पोहोचतीलच..”, दिपक.. “आज पर्यंत मी पिक्चरमध्येच नव्हतो त्यामुळे माझी केस जवळ जवळ बंदच झाली होती. पुन्हा पोलिस.. पुन्हा माफिया माझ्या मागे कुत्र्यासारखे लागतील..”

“हम्म.. आणि एकदा का तु पोलिसांना सापडलास की त्यांना माझ्यापर्यंत पोहोचायला असा कितीसा वेळ लागणार आहे..”, माया

“पण मग आता आपण करायचं काय?”, दिपक

“आपण नाही.. तु!!”, माया

“मी? मी काय करायचं?”, दिपक

“तु….. तु मरायचंस दिपक.. तुला मरायलचा हवं.. नाही तर तुझ्या नादाने मी सुध्दा पकडले जाईन”, माया

“काय मुर्खासारखं बोलते आहेस तु माया, कळतयं का तुला?”, दिपक

“मला व्यवस्थीत कळतंय दिपक.. तुला मरायलाच हवं..”, हातात व्हिस्कीचा एक ग्लास घेत माया म्हणाली.

“मला वाटतं तु विसरती आहेस माया, त्या दिवसासारखं आज तुझ्या हातात पिस्तोल नाही. पण माझा नाईफ़ माझ्यापासुन फक्त काही सेकंद दुर आहे..”, हसत दिपक म्हणाला..

“तुला मारायला मला रिव्हॉल्व्हर घ्यायची गरजच काय दिपक?”, माया सुध्दा हसत म्हणाली..

“म्हणजे..??”, गोंधळुन दिपक म्हणाला…

मायाने दिपकच्या मागे बोट दाखवलं आणि म्हणाली, “मागे बघ दिपक…”

दिपक सावकाश मागे वळला.

त्याच्यापासुन काही फुट अंतरावर दिपकवर पिस्तोल रोखुन युसुफ उभा होता…….

[क्रमशः]

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED