शासनानं दारूबंदी केली. गावात पिणारी मुबलक असूनबी गावानं त्याच स्वागतच केलं. शासनानं नसबंदी केली. गावातल्या बायांचा जीव भांड्यात पडला. त्यांनी त्याच बी स्वागत केलं. शासनानं उघड्यावर शौचास बंदी केली. घराघरात शौचालये बांधली गेली. हातात तांब्या घेऊन जागा शोधणारांना जरा हायस वाटलं. आता शासनानं प्लॅस्टिक पिशव्यांची बंदी केली अन बनगरवाडीत एकच गलका सुरू झाला. त्याला गावकऱ्यांची बी काय चूक नव्हती. गावाचा आज पातुर प्लॅस्टिक पिशव्या जीव की प्राण हुता.
त्या दिवशी सकाळी सकाळीच गणप्यांन गावात बातमी आणली की उद्यापासन प्लॅस्टिक पिशव्या बंद होणार. ते जरा चार बुक शिकलेलं हुतं. गावातल्या बाया बापड्याना काई बी कळना. घरातील चुलीपातुर प्लॅस्टीक पिशव्या बंदीची चर्चा मातूर रंगली हुती. प्लॅस्टीकच्या पिशव्या आता मिळणार नाहीत म्हटल्यावर गावावर आकाशाची कुऱ्हाड कोसळल्यागत झालं.
सकाळचं दहा वाजलं. ग्रामपचायतीसमोर मोठा फलक लागला. त्यात लिवल हुत की आजपासन प्लॅस्टीकच्या पिशव्या कुनीबी वापरायच्या नाईत. जर कुणी वापरताना दिसला तर 500 रुपये दंड केला जाईल. समध्यांनी कापडी पिशव्यांचा वापर करावयाचा हाय. शासनाचा असा आदेशच हाय. त्याच समध्यांनी पालन कराव.
समद्या गावात आता जो तो याच इशयावर बोलू लागला. पारावर चार पाच म्हातारी बसली हुती. एकांन इशय काढला. रघुआण्णा म्हणाल, आर तुमचं ठीक हाय. मी आता चुना तंबाखू कशी खाणार? बायको पोरांनी इरोध केल्यावर प्लॅस्टिक पिशवीत मळून ठेवलेली तंबाखू हळूच चोरून खात हूतो. आता आली का पंचायत. गण्यानं हे ऐकलं.त्यांन गप्प बसावं का नाही. ते म्हणालं,” रघुआण्णा काय बी काळजी करू नका. शासन तुमाला मळलेली तंबाखू पुरवणार हाय.हे ऐकल्यावर रघुआण्णाला जरा धीर आला.
गावात तरण्या पोरा पोरींचं टोळकं याच इशयावर बोलत हुत. कुणी निर्णयाचं समर्थन करत हुत तर कुणी त्याला इरोध दर्शवत हुतं. दुधकेंद्र, किराणा दुकान, भाजी व फळ विकणारे, फुलवाले समधी याच इशयावर बोलत हुते.
पार्वतीबाईची समस्या येगळीच हुती. प्लॅस्टिक पिशव्या बंद झाल्यान दुधाचं काय याचाच ती इचार करत हुती. कापडी पिशवीतन दूध कस आणणार याचच तिला कोड पडलं. एकीन तिची समजूत काढली. ती म्हणाली,” लई नको काळजी करू. कोलापुरात नाई का म्हशी घरापुढे आणतात. धारोष्ण दूध पितात. तस आपल्या गावात शासन घरापुढं म्हशी आणून उभ्या करील की? “ हे ऐकल्यावर पार्वतीला थोडा धीर आला.
इकडे मारुतीच्या मंदिरात इचार इनीमय करण्यासाठी महिला मंडळाची एक सभा झाली. महिला मंडळाच्या अद्यक्षा सखुबाई म्हणाल्या, “ प्लॅस्टिक पिशव्या बंदीमुळ पुरुषापेक्षा महिलांचेच हाल अधिक होणार हायत. आपला कोण इचारच करत नाय. आपल्याला सतत मळमळत. पुरुषांना काय? प्लॅस्टिक पिशव्यांची खरी गरज आपल्याला भासते. एस.टी. तुन प्रवास करताना उलट्या होतात. प्लॅस्टिक पिशवी शिवाय वाहनात बसताच येत नाय. प्लॅस्टिक पिशव्या बंद केल्यावर कापडी पिशवीत उलटी करायची का?
तिचा प्रश्न रास्त होता. सर्वांनी माना डोलावल्या. तोडगा मात्र काहीच निघाला नाही. महिलांनी इरोध केला तर शासन नमतं घेत हा आजवरचा अनुभव असल्यानं महिला मंडळानं शासनाच्या यनिर्णयाला इरोध करण्याचं ठरवलं.निवेदन तयार करण्यात आलं. गावातल्या समद्या बायांनी त्यावर अंगठे उठवले.
सरपंच होत सत्तारूढ गटाच. त्याला ही बातमी कळली. ते घाम्याघुम होत धावतच महिलांच्या सभेच्या ठिकाणी आलं. त्यांना म्हणाल,”जरा तरी डोसक्याचा वापर करत जावा की? शासन आपलं. सत्ता आपली अन आपनच इरोध करायचा व्हय? ते काय नाय. हा निर्णय बराबर हाय. फाडून टाका ते निवेदन. घरला जावा अन स्वयंपाकाचं काय ते बघा. आल्या मुठ्या राजकारणी? “
सरपंचाच्या बोलण्याने समद्या बाया नाराज झाल्या. त्यांनी आपल्या मताची कदर न केल्याने रागानेच काढता पाय घेतला. आपले अस्तित्व काय फक्त चूल अन मूल. असे त्यांनी मत व्यक्त केले. प्रदीप जोशी विटा