Aadgaav chi smashanbhumi books and stories free download online pdf in Marathi

आडगाव ची स्मशानभूमी

 आडगावची स्मशानभूमी

आडगाव पाचशेहून अधिक उंबऱ्याच गाव. डोंगराच्या कुशीत वसलेले. गाव तस चांगलं.  अन्य गावांनी आदर्श घ्यावा अस. शासनाच्या सगळ्या योजना राबवण्यात गाव सतत पुढे . गावाला शहरीकरणाचे वार लागलेलं.  गावात सिमेंट काँक्रीटच्या अनेक मजली इमारती. गावचा कारभार पाहण्यासाठी एक छोटीशी  ग्रामपंचायत. गाव छोटं असल्यानं मोजून सहा सदस्य. त्यातबी तीन महिला अन तीन गडी माणस. कैक वर्षांपासून महिपती पाटील सरपंच पदाची खुर्ची अडवून बसलेलं. त्यांना इरोध करायची कुणाची हिम्मत नव्हती.  दर पाच वर्षांनी इलेक्शन व्हायचं. मात्र सरपंच महिपती पाटीलच.

औन्दा मात्र इपरितच घडलं. आरक्षण पडलं अन सरपंचपद महिला राखीव झालं. बाया बापड्यांना बदल पाहिजे हुता. महिपती पाटील दूर होणार म्हंटल्यावर गावात दबक्या आवाजात चर्चा रंगू लागली. उघड बोलायचं कुणाचं धाडस नव्हतं. सुदैवाने महिपतीचा वार्ड महिला राखीव झाला. आता सरपंच कोण? याची चाचपणी सुरू झाली. नाम्या महिपतीचा एकनिष्ठ वजनदार कार्यकर्ता. त्यान महिपतीला सांगितलं की औन्दा चांगला चान्स हाय. संगीता वहिनींना सरपंच करावं असं मला आपलं वाटतंय. सरपंच त्याच्या बोलण्यावर खूषच झालं. खिशात हात घातला अन शंभराची नोट काढली अन बक्षीस म्हणून त्याच्या हातात ठेवली. ते बी रातची सोय झाली म्हणून खुश झालं. समद्या गावात सांगत सुटलं संगिता वहिनी सरपंच हुणार म्हणून. आता सरपंचाच्या बायकोचच नाव पुढं आलं म्हंटल्यावर कोण इरोध करणार? निवडणुका झाल्या अन संगिता बाई सरपंच पदाच्या खुर्चीवर बसल्या.

गावात ग्रामपंचायतीने सोलर दिवे बसवले. मोक्याच्या ठिकाणी मर्क्युरी लावल. व्यायामशाळा बांधली. रस्ते चकाचक केले. गावात आता विकासाच्या नावाखाली कायापालट झाला. कमतरता हुती ती फक्त स्मशानभूमीची. गावात विद्युत दाहिनीची सोय न्हवती. कुणी गचकल की त्याला गावभर फिरवून ओढ्याच्या काठाला असलेल्या जुन्या स्मशानात अग्नी दिला जायचा. महिपतीला ही गोष्ट खटकत हुती. त्यांन ठरवलं काय का होईना पण गावाला चांगली स्मशानभूमी बांधायची. बायकोच सरपंच असल्याने सदस्यांच्या मीटिंगमध्ये ठराव पास करून घेतला. पहिल्या स्मशानभूमी समोर मोकळी जागा हुती. ती हुती गणप्या नावाच्या  कंजूष व्यापाऱ्याची. त्याच्याशी गोड बोलून महिपतीन जागेचा ताबा घेतला. ते बी व्यापारी असल्याने एका अटीवर त्यांन जागा दिली. त्यान ग्रामपंचायतीत ठरावच करायला लावला की नवीन स्मशानभूमीच उदघाटन त्याच्याच हस्ते घ्यायचं.

स्मशानभूमी बांधकाम गतीने सुरू झालं. मोठी शेड उभारली गेली. चिता रचुन अग्नी देण्याची  व विद्युत दाहिनीची दोन्ही सुविधा केल्या. उगाच मागन वाद नको म्हणून काळजी घेतली गेली. अंत्यसंस्कार साहित्य देण्यासाठी एक मोठी खोली बांधली. रंग रंगोटी केली. मृत्यूनंतरचा प्रवास कसा असतो त्याची चित्रे रेखाटली. आसपासच्या परिसरात सर्वत्र स्मशानभूमीची चर्चा रंगू लागली.

ग्रामपंचायत सदस्यांची बैठक झाली. आता उदघाटनाचा मसुदा चर्चेला आला. ज्याचे मयत होईल त्याचे नाव स्मशानभूमीला देऊन त्या गणप्याच्या हस्ते उदघाटन घेण्याचे ठरले. आता सारे जण कोण जातोय व कोणाचे नाव स्मशानभूमी ला दिले जातंय याकडे डोळे लावून बसले.

आठ दिवस गेले पंधरा दिवस झाले तरी कोण जाईना. सरपंच इचारात पडलं. नेमकं त्याच वेळी नाम्या बातमी घेऊन आल. गावाशेजारच्या झोपडपट्टीतील रखमा बाळंतपणात हे जग सोडून गेली. बघता बघता गावात वार्ता पसरली. सवाष्ण गेली अन तिचे नाव आता रखमा अमरधाम असे त्या स्मशानभूमीस देण्याचं ठरलं.

महिपती जरा नाराजच हुत. आपल्या नात्यातला कोणी गेला असता तर  निदान नाव तरी झालं असत अस त्याला सारख मनोमन वाटत हुत. त्यांन नाम्याजवळ तस बोलून बी दाखवलं. नाम्या तस डोसक्यान भारी हुशार. ते म्हणाल, “ तुमी काय बी काळजी करू नका. मी बघतो समध. अगदी तुमच्या मनात हाय तसच करतो.”

झालं इकडं रखमाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. नवीन स्मशानात पहिलाच अंत्यविधी म्हणल्यावर सारेजण येळेत हजर झाले. ते गणप्या, महिपती, नाम्या, पंचायतीचे पदाधिकारी, रखमाचे नातेवाईक यांच्यासह समदा गाव स्मशानभूमीत लोटला. रातीची येळ. लख्ख दिव्याचा प्रकाश पडलेला.  सारेजण बॉडी कधी येते याची वाट बघत बसलेले. रखमेच्या नातेवाईकांनी आक्रोश करतच स्मशानभूमी गाठली. आता अग्नी कसा ध्यायचा याचा विचार सुरू झाला. तेवढ्यात नाम्या उभा राहिला अन म्हणाला,” गावकऱ्यांनो रखमा आपल्या गावची पोरगी. तिला या गावातच दिली हुती. ती गेली वाईटच झालं.  परमेश्वराच्या इच्छेपुढं आपण काय करणार? तीच नाव स्मशानभूमीला द्यावं अस सगळ्यांना वाटत. पण एका बाईच नाव आपण स्मशानभूमीला कस देणार ? तवा माझं अस मत हाय की हीच दहन जुन्याच स्मशानात करावं. अन पुढचं मयत होईल त्यावेळी या स्मशानभूमी च्या उदघाटनाचा कार्यक्रम घ्यावा. “

त्याच म्हणणं सर्वाना पटलं. इरोधक मात्र दंगा करायला लागलं. वादान वाद वाढतच गेल. अखेर नाम्यान दोन तीन इरोधकाना बाजूला घेतलं अन म्हणाला, “आर होय म्हणा तुम्हाला बी संधी हाय की.”

त्याच बोलण ऐकलं अन समध्यांच एकमत झाल. महिपतीला कळना नाम्यान नेमकी काय जादू केली.

झालं पुन्हा समधी मंडळी जुन्या स्मशानभूमित जाणार तोच त्या कंजूस व्यापाऱ्याच्या अंगात आलं. ते म्हणाल, “नाय नाय मी ही संधी सोडणार नाय. माझं बी आता वय झालय. कवा काय हुईल सांगता येत नाय. मी आजच उदघाटन करणार. “

पुन्हा पेच निर्माण झाला. आता काय करायचं म्हणून सारेजण हताश होऊन बसले. तितक्यात नाम्या उठला त्याच डोकं म्हणजे चालता बोलता संगणकच हुता. त्यांन  गणप्या जवळ जाऊन त्याला समजावलं.

 तो म्हणाला,” कधी का होईना तुमच्याच हस्ते उदघाटन हाय”. तस ते खवाळल. “आर पण मी तवर मेलो तर?” त्यांन शँकाब बोलून दाखवली. नाम्या म्हणाला, “ मग तर लईच चांगलं. उद्घाटनाचा मान तुमचाच हाय शिवाय नाव देखील तुमचंच. काय पटतय का?” नाम्याच बोलण त्याला पटलं.

आता कोणाची आडकाठी नव्हती. समध्याना समध मान्य झालं. सारी मंडळी जुन्या स्मशानभूमीत गेली. रखमावर अंत्यसंस्कार केले. सारेजण आपापल्या घरी गेले.

महिपतीच्या पै पावण्यांचा सारा गोतावळा गावातच होता. त्यामुळे तो रोज समध्यांच्या प्रकृतीची चौकशी करायचा. कुणाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेय अस कळलं की जातींन जाऊन विचारपूस करायचा. त्याला ही संधी गमवायची न्हवती. तिकडं ते गणप्या त्याची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी  देव पाण्यातच घालून बसलं हुत.

महिना गेला दोन महिने गेले कोण गचकलेच नाही. एक दिवस सकाळी सकाळी महिपतीची बायको  महिपतीला झोपेतून हलवून हलवून उठवू लागली. ते रातभर इचारात मग्न असल्यानं झोपलच नव्हतं. आत्ता कुठं त्याचा डोळा लागायला लागला हुता. त्यानं झोपेतच इचारल,” काय झाले?” त्याची बायको म्हणाली, “अहो माझ्या भावाला तुक्याला  झटका आलाय. त्याला हॉस्पिटलमध्ये नेलंय. उठा लवकर आपल्याला जायला हवं.” त्यान विचारले,” लई अत्यावस्थ हाय काय?” त्याची बायको हुंदके देऊन रडू लागली. त्यानं वळखल मिशन सक्सेस. ताडकन उठलं अन बायकोला म्हणाल, “ नग काळजी करू समंध आपल्या मनासारखं हुईल. बायकोला वाटलं आपला नवरा आपल्या भावाची किती काळजी घेतोय. ती त्याच्या मिठीत शिरली अन जास्तच डोळे गाळायला लागली. त्यांन कस तरी तिचं सांत्वन केले. दोघ बी त्याच्या घराकडे जायला निघाली.

नेमकं रस्त्यात नाम्या भेटलं. महिपतीला बघताच म्हणाल, “काय आपला अंदाज खरा ठरला का नाही. आता लागलाच बोर्ड म्हणून समजा. “महिपती म्हणाला, “आर थांब जरा त्याला हॉस्पिटलमध्ये नेलंय जगतय का मरतय बघू या की आधी.” तेवढ्यात ते कंजूस व्यापारी आलं. त्यांन सारी माहिती काढून आणली हुती. महिपतीला बघताच म्हणाल, “काय राव हाणला वाडत चांनस. “

आता मेहुणाच गेला म्हटल्यावर महिपतीला शोक अनावर झाल्याचं नाटक करावं लागलं. पण दुसऱ्या बाजूला ते खुश हुत कारण आपला नसना का मेहुण्याचा फलक तरी स्मशानभूमीत लागणार. सरपंच बाईचा भाऊ गेलाय म्हटल्यावर गावानं दिवसभर सुतक पाळलं. पै पाव्हन एकत्र होईपर्यंत रात झाली. समधी व्यवस्था करण्यात आली. मात्र अचानक विद्युत पुरवठा बंद पडला. तास दोन तास समध्यांनी वाट बघितली. पंचायतीच्या गॅस बत्त्या आणल्या. त्या पेटवल्या. हळूहळू अंत्ययात्रा स्मशानभूमीत जायला निघाली. नाम्या अन ते कंजूस व्यापारी  गणप्या समध्याच्या म्होर. नाम्या डोसक्यावरून  फलक घेऊन चाललं हुतं. त्याच्या तंद्रीतच ते हुत.  रस्त्याचा उजव्या बाजूला नवी तर डाव्या बाजूला जुनी स्मशानभूमी होती. समधी माणस उजवीकडे वळली. बघतात तो काय डाव्या बाजूच्या स्मशानभूमीतुन हातात कंदील घेऊन रखमी येताना दिसली. केस मोकळं सोडलेलं, कपाळभर मळवट, रौद्ररूप धारण केलेले. ती हातवारे करून समध्याना जुन्या स्मशानात जाण्यास सांगत हुती.  समदीच घाबरली.

नाम्यान ते दृश्य बघितलं. त्याची बोबडीच वळली. त्याने खांद्यांवरचा फलक तिथंच टाकला अन 100 च्या वेगानं धावत सुटलं. त्याच्या समवेत असलेले ते कंजूस व्यापारी धोतर सावरत सावरत वाट दिसेल तिकडं धावत गेलं. प्रसंगाच गांभीर्य ओळखून समध्यांनी जुन्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. सारा विधी होईपर्यंत रखमी उभीच हुती. चिता पेटली अन रखमी जोरजोरात भेसूरपणे हसायला लागली. कधी एकदा तिथून जातोय अशी समध्यांची स्थिती झाली. कवटी फुटते का नाही हे बघायला बी कोणी थांबलं नाय.

समधा गाव आपापल्या घरी जाऊन झोपी गेला. सकाळ झाली. उजडतच नाम्या महिपतीच्या घरी आला. त्यांन सांगितलं की नव्या स्मशानभूमीत कसला तरी फलक दिसतोय. पुन्हा महिपती, नाम्या, पंचायत सदस्य तिथं आले. बघतात तो गेटवरच फलक लावलेला. रखमा अमरधाम आडगाव. सारेजण चकितच झाले.  आता तो फलक रखमीन लावला म्हटल्यावर तो काढायचा कोणाचं धाडस हुईना.

गावात इपरितच घटना घडली होती. रखमीचा आत्मा हडळीच्या रूपाने स्मशानात फिरत हुता. ज्या ज्या वेळी गावातील कोणाचाबी अंत्यसंस्कार करण्याची वेळ यायची त्यावेळी ही बया दत्त म्हणून नवीन स्मशानभूमी च्या गेटवर हजर असायची. त्यामुळे गपगुमान जुन्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करावे लागत हुते. कैक वर्षे झाली नवीन स्मशानभूमीत कोण सुदिक गेलं नाय. पंचायतीचा पैसा पाण्यात गेला. आजही गावात रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन स्मशानभूमी आहेत. नवीन स्मशानभूमी पडून आहे  तर जुन्यातच अंत्यविधी होतात.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED