गोष्ट एका बजेटची Pradip gajanan joshi द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गोष्ट एका बजेटची

गोष्ट एका बजेटची

हुबालवाडी गावात एक मध्यमवर्गीय कुटुंब होते. तस पाहिलं तर जेवून खाऊन सुखवस्तू असणाऱ्या पैकी हे एक कुटुंब. स्वतःचे तीन खोल्यांचे राहत घर. शासकीय अनुदानातून शौचालय बांधून घेतलेलं.  दोन मुलं त्यांच्या बायका, दोन मुली अन गण्या व गंगी अस आठ जणांचं दणदणीत कुटुंब.  घरात टीव्ही, डायनिंग टेबल, वॉशिंग मशीन या साऱ्या सुविधा. दोन्ही मुलं कमावती. दोन मुली कॉलेजमध्ये शिकणाऱ्या. पैका अमाप मात्र खर्चाच्या बाबतीत कुणाचा कुणाला पायपोस नव्हता. गण्या व गंगी इचार करायची की इतका पैका मिळून तो पुरत कसा नाय.
एक दिवस त्यांना याच उत्तर सापडलं. तो दिवस देशाचं बजेट जाहीर करण्याचा होता. सारेजण टीव्ही समोर बसून रुपया येतो कसा व जातो कसा हे पहात होते. बघता बघता गण्या व गंगी इचार करू लागले आयला एवढा मोठा देश ही माणसं चालवत्यात अन आपल्याला एक घर कस काय चालवता येत न्हाय. देशाचे बजेट  ऐकता ऐकता त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. आपण जमा खर्चाचा मेळच घालत नसल्यानं हा घोटाळा होतोय हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मनोमन ठरवलं आपण बी घराचं बजेट मांडायचं.
गण्या कुटुंब प्रमुख असल्याने घरातील अर्थखात सांभाळत होता तर गंगी गृह खात्याची जबाबदारी पार पाडत होती.  समध्यांच पगार गाण्याकडे जमा होत असत त्यातून तो खर्चाचे नियोजन करत हुता. झालं गण्यानं अन गंगीन घरातल्या समद्या सदस्यांची मिटींग बोलावली. त्यात गण्या वर्षातील खर्चाच बजेट मांडणार हुता.
जेवण करून समधी मंडळी एकत्र जमली. आधी जेऊन घेतलं कारण वादावादी झाली तर जेवणावर कुणी राग काढायला नको. गण्यानं तपशील वार नियोजन मांडलं. पहिला विषय पॉकेटमनी आला. आजवर प्रत्येकाला वेगवेगळा पॉकेटमनी दिला जात होता. गण्यानं सबका साथ सबका विकास या न्यायाने पॉकेटमनी ची रक्कम सर्वांची एकसारखी केली. घरात प्रत्येकाच्या आवडीच्या वेगवेगळ्या भाज्या केल्या जात होत्या. भाज्यांचे वाढते दर पाहून गण्यानं रोज एकच भाजी करण्याची सूचना केली. ज्या भाजीचा दर कमी असेल तीच भाजी बाजारातून आणायची असा नियमच घालून दिला. डाळीचं दर वाढल्यानं भातावर वरण आमटी याच्यात काटछाट करण्याची सुचनाच त्याने दिली.
घरातील आजारी माणसांचे प्रमाण विचारात घेऊन गण्यानं फळे व दुध यात मात्र वाढ करण्याचे जाहीर केले. किरकोळ आजारात दवाखान्यात न जाता घरच्या घरी उपाय करून खर्चात कपात करण्याचे त्याने सुचवले.  सर्व सदस्य 25 वर्षापुढील असल्याने कॉस्मेटिक्स वर खर्च कमी करण्याचे त्याने सूचित केले. मूळच्या रंगात फारसा फरक पडत नसल्याने स्नो पावडरवर खर्च न करता महिन्यातून एकदा चेहरा डाळीच्या पीठाने धुवावा असे त्याने जाहीर केले. मुलींनी व सुनांनी त्यास विरोध केला मात्र अर्थ व गृहमंत्री एक झाल्याने हा विरोध मोडून काढण्यात आला.
चहा कॉफीचा खर्च वाढत चालल्याने त्यावर मर्यादा आणण्याचे ठरले. एक तर कॉफी करायचीच नाही. ज्यांना कॉफी पिण्याची इच्छा होईल त्यांनी शेजाऱ्याकडे जाऊन चहा पित नसल्याचे सांगायचे तेथे कॉफी पिऊन यायचे. सकाळी वापरलेली चहा पावडर दुपारच्या चहासाठी वापरायची त्याची वाच्यता कोठेही करायची नाही. आलेल्या पाहुण्यांना पूर्ण बिस्कीट पुडा न देता दोनच बिस्किटे द्यावयाची.  नोकरीसाठी जाणारानी ऑफिसमध्ये च चहा पिऊन घरी यावयाचे व खर्चाची बचत करायची.
ज्वारी गहू याचे बाजारातील दर बघून गृहमंत्री यांनी भाकरी करायची की पोळी करायची ते ठरवावे. कोणी कितीही आग्रह केला तरी त्यात बदल करू नये. एखाद्या महिन्यात तांदूळ स्वस्त असतील तर साधा भात, खिचडी, मसाले भात, पुलावा असे बदलून बदलून जेवण करावे.
बाहेर जाण्यासाठी चांगले कपडे परिधान करावेत. घरात एकच वेष कायम परिधान करावा. बायकांनी साड्यांचा अकारण साठा करून ठेवू नये. बदलून बदलून साड्या एकमेकींनी वापराव्यात. पुरुषांनी शक्यतो बनियन व बर्मुड्यावर घरात असताना बसावे. त्यामुळे कपड्याच्या खर्चात बचत होईल. गण्याची ही कल्पना सर्वाना मान्य झाली. गंगीने मात्र वाढदिवस दिवाळी पाडवा आशा वर्षातून किमान दोन साड्या तरी घेण्याचा आग्रह धरला.
गण्यानं आणखी एक मौलिक सूचना मांडली. ज्या लग्न पत्रिकेवर आपली उपस्थिती हाच आहेर असे नमूद केले असेल त्या लग्नाला शक्यतो सर्वांनी जायचे. सीमांत पूजनापासून लग्नापर्यंत सर्व विधीला उपस्थिती दाखवली तर बोलावणाराला देखील आनंद होतो. एकमेकांकडे आल्यागेल्याशिवाय आपलेपणा कसा वाढेल. गण्याचे हे विचार सर्वानाच पटले. आहेर घेणाराच्या कार्याला केवळ शुभेच्छा धाडून मोकळे व्हायचे अशी पळवाट त्याने काढली.
दोन मुलींच्या लग्नाचा विचार गंगीने बोलून दाखवला. गण्या स्पष्टवक्ता होता. साखरपुडा, हुंडा, जेवणावळी या गोष्टी त्याला मान्यच न्हवत्या. त्याने मुलींना सरळ सरळ प्रेमविवाह करण्याचा सल्ला दिला. मुलांना आकर्षित करण्यासाठी त्यांना फक्त सौन्दर्य प्रसाधने वापरण्याची मुभा देण्यात आली. त्याला पण एक वर्षाचे बंधन घालण्यात आले. एक वर्ष तरी चैन असे समजून मुलीच्या चेहऱ्यावर आनंद दिसला.
घरात सर्वांचेच मोबाइल होते. गण्यानं घरातील बायकांना मोबाइलची गरज काय असा प्रश्न उपस्थित केला. त्याला सर्वांनी व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली कडाडून विरोध केला. आमाला पण खाजगी जीवन आहे. आमाला पण चॅटिंग करावे वाटते. आमचं पण फ्रेंड सर्कल आहे असा पवित्रा महिलांनी घेतल्यावर गण्याचा नाईलाज झाला. अखेर त्यान प्रत्येकी महिना 100 रुपयांचा रिचार्ज मारला जाईल असे सांगून वादावर पडदा टाकला.
त्या दिवसापासून आपला मोबाइल न वापरता दुसऱ्याचा मोबाइल चोरून वापरण्याचं प्रमाण वाढलं. त्यामुळे प्रातर्विधी, आंघोळीला जाताना देखील जो तो आपला मोबाइल बरोबर घेऊन जाऊ लागला. रात्री झोपताना आपला मोबाइल जवळ न ठेवता तो गळ्यात अडकवूनच जो तो झोपू लागला.
आठवड्याला हॉटेलमध्ये जेवायला जाणार कुटुंब आता घरीच जेवू लागले. भेळ, बटाटेवडे, भजी घरीच केले जाऊ लागले. निम्मा खर्च वाचू लागल्याने गण्या व गंगीला आनंद झाला. चालण्याने आरोग्य कसे सुधारते हे गण्यानं आठ दिवस घरातील मंडळींना पटवून दिले. हळूहळू वाहनावर होणारा तेलाचा खर्च कमी केला.
वर्ष संपले. गण्यानं आढावा घेतला. काटकसरीमुळे खर्चाची मोठी बचत झाली होती. गण्या व गंगीला आनंद झाला. रात्री सारी मंडळी घरी आली अन त्यांचा आनंद क्षणात मावळला. त्यांच्या मुलांनी गण्याच्या बजेटला कंटाळून वेगळा राहण्याचा निर्णय जाहीर केला. पदरी पडले पवित्र झाले या न्यायाने मुली हात धरून निघून गेल्या. गण्या व गंगी दोघेच राहिले. आयुष्यात मन मारून जगण्यात काय मजा असा विचार करून त्यांनी बजेट गुंडाळून ठेवले. घराचे रुपच पालटले. पैसा आला कसा गेला कसा याचा विचार देखील त्यांनी कधी मनात आणला नाही.
प्रदीप जोशी विटा
मोबाईल…. 9881157709