गण्याचं हॉस्पिटल रुपी गॅरेज Pradip gajanan joshi द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गण्याचं हॉस्पिटल रुपी गॅरेज

गण्याचं हॉस्पिटल रुपी गॅरेज

गणेश साने नावाप्रमाणेच हुशार होता. त्याच नावच गणेश असल्याने तो सर्व व्यवसायात पारंगत होता. त्याच्या वडिलांची इच्छा होती की गण्यानं मेडिकलला जाऊन गावात स्वतःचे हॉस्पिटल सुरू कराव. जनसामान्यांची सेवा करून समाज ऋणातून मुक्त व्हावं. आपल्या ज्ञानाचा उपयोग सर्वार्थाने पीडित लोकांसाठी करावा. गण्याची देखील तीच इच्छा होती. त्यासाठी तर त्यांन तालुक्याच्या गावाला जाऊन एका मोठ्या कॉलेजात प्रवेश घेतला. त्यांन प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण नशिबानं त्याला साथ दिली नाही. मेडिकलच काय जमना म्हटल्यावर त्यांन त्याचा नाद सोडला. त्याच मन राहून राहून त्याला त्याची बोचणी देत होत. गण्या पण काय कमी न्हवत. त्यांन माणसाचं डॉकटर व्हायला जमत न्हाय अस दिसल्यावर गाड्यांचं डॉकटर व्हायचं ठरवलं. नावपुढं डॉकटर पदवी झाली म्हणजे झालं यातच अखेर त्यांन समाधान मानलं.

गण्या तस लई हुशार होत. त्याच्या बापानं पिढीजात गावात जागेची मोठी इस्टेट करून ठेवली होती. त्याचा अचूक वापर करण्याची कल्पना त्याला सुचली. त्याने एखाद्या हॉस्पिटल सारखी बांधकामाची रचना केली. डॉकटर होता आलं नाही पण गाडी दुरुस्ती करणारा मिस्त्री झालो याची त्यांन कधी खंत बाळगली नाही. दोन्ही व्यवसायाचा सुरेख संगम साधण्याचे त्याने ठरवले.

गाड्यांचा दवाखाना असा भला मोठा फलक त्यांन लावला. गावातल्या लोकांना काय समजना. माणसाचा, जनावरांचा दवाखाना असतो पण गाड्यांचा दवाखाना ही काय भानगड आहे आणि ते पाहण्यासाठी गाव त्याच्या दवाखान्याकड घिरट्या घालू लागल. काहींनी आत जाऊन पाहणी केली तर स्वागत कक्ष, शस्त्रक्रिया विभाग, तपासणी केंद्र, औषधालय, शवागर असे वेगवेगळे फलक लावलेले दिसले. समधी आ वासून पहातच राहिली.

स्वागत कक्षात गाडीच्या मालकाला बसायची व्यवस्था केली होती. समोरच एलईडी होता. त्यावर सर्व दुचाकी वाहनांची माहिती दिली जात होती. तपासणी केंद्रात वाहने तपासली जात होती. शस्त्रक्रिया विभागात वाहनांची दुरुस्ती होत होती. औषधालय विभागात गाड्यांचे पार्ट विकत मिळत होते. ज्या गाड्यांची दुरुस्ती होणार नाही अशा गाड्या शवागरात पाठवल्या जात होत्या. अशी सगळी रचना करून गण्या सज्ज झाला होता.

अखेर गण्या गॅरेजरूपी दवाखान्यात सर्व तयारीनिशी उतरला. आज दवाखान्याचा शुभारंभ होता. गण्यानं त्याच्या बायकोच्या गंगीच्या हस्तेच दवाखान्याची सुरवात केली. समदा परिसर पताका लावून सजवला होता. एका मोठ्या बोर्डावर मोपेड गाडीचे मोठं चित्र काढलं होत. त्याच्या भागांना मानवी अवयवांची नाव दिली होती. गाडीचे दोन हँडल म्हणजे दोन हात. पुढचा दिवा व साईडचे इंडिकेटर म्हणजे गाडीचे डोळे, पेट्रोलची नळी म्हणजे रक्तवाहिनी, गाडीच्या आतील वायरिंग म्हणजे रक्तवाहिन्या, पेट्रोलची टाकी म्हणजे पोट, गाडीची दोन चाके म्हणजे दोन पाय, गाडीचा कार्बोरेटर म्हणजे हार्ट अशी अफलातून योजना त्यांन आखली होती. लोकांना कळावं म्हणून त्यांन ते चित्र गॅरेज कम दवाखान्याच्या दर्शनी भागात लावल होत.

लोकांना आता प्रत्यक्ष कामकाज बघायचं होत. दुसऱ्या दिवशी सकाळी भली मोठी गर्दी झाली. गियरच्या, बिनगिअ रच्या गाड्या दुरुस्तीसाठी माणस जमा झाली. गण्या येण्यापूर्वी त्याच सहकारी आपापल्या जागेवर येऊन बसल. समध्यांनी निळा शर्ट निळी पँट घातली होती. गळ्यात ओळखपत्र अडकवले होत. केसपेपर काढण्याच्या कौंटरवर एक नर्स सारखा पेहराव केलेली सुंदर पोरगी येऊन बसली होती. ती सारखी मेकअप करण्यात मग्न होती.

जमलेल्या वाहनचालकांना तिची गम्मत करण्याची हुकी आली. एकाने कौंटरवर जाऊन विचारले, “डॉकटर साहेब कधी येणार?” तिने घड्याळात पहात सांगितले,”येतीलच दहा मिनिटात” माणसांना गम्मत वाटायला लागली. तेवढयात कोणतरी म्हणाले,”डॉकटर आले” कौंटरवरची पोरगी बाहेर आली. डॉ. गणेश साने यांचे आगमन झाले. तिने पुढे जाऊन गण्याच्या हातातील बॅग घेतली. गुड मॉर्निंग म्हणून स्वागत केले. डॉकटरच्या गळ्यात स्टेथास्कोप असतो तसा गण्यानं आपल्या गळ्यात गाडीचे वेगवेगळे पाने अडकवले होते. माणस त्याच्याकडे बघतच राहिली.

डॉ गणेश साने उर्फ गण्या आपल्या केबिनमध्ये जाऊन बसला. ती पोरगी पुन्हा बाहेर आली.” वसंत काळे कोण आहेत? तुम्ही चला तुमच्या पेशंटला घेऊन आतमध्ये. “ तिने सांगितले. वसंत काळे आपली लुना घेऊन आत गेले. गण्यानं बसण्याची खूण केली. पेशंटला स्टँडवर उभे केले. गण्या म्हणाला,” बोला काय तक्रार आहे?” वसंताने सांगितले” गाडीची लाईट रात्री लई अंधुक पडतीयां. समोरच काय बी दिसत नाय”

गण्या उठला गाडीजवळ गेला. पाना, स्क्रुड्रायव्हर घेऊन तो आपल्या खुर्चीतून उठला. गण्यानं दोन्ही इंडिकेटर, पुढचा दिवा खोलला. गाडीची म्हणजे पेशंटची तपासणी केली. पुन्हा खुर्चीवर येऊन बसला व म्हणाला” मोतीबिंदू किंवा काचबिंदूची शक्यता वाटते. पेशंट चार दिवस ठेवावा लागेल. दोनशे रुपये खर्च येईल. काय करता?” गाडीचा मालक तयार झाला. गण्यानं या पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घ्या असे सुनावले.

ती पोरगी पुन्हा बाहेर आली. गणपत माने असे नाव तिने पुकारले. गणपत जुनी खूप वर्षांपूर्वीची एम एटी घेऊन आत जायला निघाला. गण्यानं गाडीकडे पाहिलं अन म्हणाला,” बराच वयोवृद्ध दिसतोय पेशंट. बोला काय तक्रार आहे?” गणपत म्हणाला,” गाडीला पेट्रोलचा नीट सप्लाय होत नाही. त्यामुळे गाडी मध्येच बंद पडते. ढकलत न्यावी लागते.” गण्या खुर्चीतून उठला मोठा स्क्रू ड्रायव्हर घेतला. पेट्रोलची पाईप इकडे तिकडे करून बघितली अन म्हणाला,” कसा सप्लाय होणार. तीन चार ब्लॉकेजीस आहेत. तातडीने ते काढावे लागतील. अन्यथा पेशंट कायमचा घरी बसेल. मॅडम सध्या परगावी आहेत. त्यांना तातडीने बोलावतो. त्या येतील ब्लॉकेजीस काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यासाठीचा खर्च हजार रुपये आहे. पाचशे ऑपरेशन पूर्वी व पाचशे नंतर भरावे लागतील. गणपत तयार झाला. पेशंटला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले.

रखमा पवार पुढच नाव पुकारलं गेलं. रखमा आपल्या टिव्हीएस गाडीला घेऊन आत गेली. गण्या म्हणाला, “ काय कस काय चाललंय. नोकरी करतेस ना? जरा जाड झालीस. व्यायाम वगैरे करत जा. बोल काय तक्रार आहे पेशंटची?” ती म्हणाली,” कार्बोरेटरच सारख काम निघत. गाडी फार आवाज देते.” गण्यानं कार्बोरेटर पहिला त्यात खूप घाण साचली होती. तो म्हणाला,” पेट्रोल एकाच पंपावर भरत नाही वाटत. पेशंटला रोज वेगवेगळ्या ठिकाणचे खाण दिल की त्याच बिघडणारच की. कार्बोरेटरचे प्युरीफिकेशन करावं लागलं. पेशंट ठेवून जावा. “

तपासणीची वेळ आता संपत आली होती. गण्यानं एक शेवटचा पेशंट पाठवण्याची सूचना केली. गण्या दिवसाला चारच शस्त्रक्रिया करत होता. रामदेव चव्हाण शेवटचा पेशंट घेऊन आत शिरला. गण्यानं उठून त्याला नमस्कार केला कारण तो अट्टल गुंड होता. गण्या म्हणाला,” बोला साहेब काय सेवा करू?” रामदेव त्याच्या अगदी जवळ येऊन कानात बोलू लागला. तो म्हणाला,” गण्या कोरा करकरीत माल आहे. कालच मुंबईच्या चोर बाजारातून आणलाय. नंबरप्लेट, रंग सार बदलून घ्यायचंय. काम जोखमीचे आहे पैसे तू मागशील तेवढे”

गण्या म्हणाला” आलं लक्षात, थोडक्यात काय तर पेशंटचे अबॉर्शन करायचंय. साहेब आता लई कडक नियम झाल्यात. तरीपण करतो. कुठं बोलू नका. “

गण्यानं दिवसाचा पेशंट तपासण्याचा कोठा पूर्ण केला. समध्याना जेवणाची सुट्टी केली. त्यांन बी दोन घास खाऊन घेतलं. एकेका पेशंटची सोडवणूक करण्यात तो मग्न झाला. गण्याला कोण भेटायला आलं की ती पोरगी सांगायची चार मेजर ऑपरेशन आहेत डॉकटर संध्याकाळच्या सुमारास भेटतील.

बघता बघता गण्याच्या हॉस्पिटलचा लौकिक साऱ्या परिसरात झाला. शेजारच्या गावात त्यांन हॉस्पिटल कम गॅरेजची शाखा सुरू केली. आदमी झुकता है झुकानेवला चाहीये हे वाक्य गण्यानं आपल्या प्रत्यक्ष कृतीतून सार्थ करून दाखवले.

प्रदीप जोशी विटा

मोबाईल..9881157709