पॅरिस - १ Aniket Samudra द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पॅरिस - १

“काय मग? कसं होतं पॅरिस?”, नुकतीच पॅरिसला काही दिवस सुट्टी एन्जॉय करुन परत आल्यावर अनेकांनी विचारलं

पॅरिस कसं आहे? हे एका शब्दात सांगणं कठीण आहे, खरं तर पॅरिस कसं आहे हे शब्दात सांगणंच कठीण आहे. पॅरिस हा एक अनुभव आहे आणि तो अनुभवायला हवा. तरी पण माझ्या परीने प्रयत्न करून बघतो…

आपण आपल्या आयुष्यात अचानक एक्झीट घेणारी अनेक लोकं बघतो. “अरे! काल परवा पर्यंत तर चांगला होता की..” असं म्हणून आपण हळहळतो आणि आपल्या कामाला लागतो.

श्रीदेवीच्या अकाली मृत्यूने आपण सगळेच हळहळलो आणि आयुष्य किती क्षणभंगुर आहे ह्याची पुन्हा एकदा जाणीव झाली. त्यावेळी पैसा, प्रसिद्धी काही कामी येत नाही. त्यावेळी जाणवलं कि आपण किती तरी गोष्टी बघू नंतर म्हणून भविष्यात ढकलून देत असतो, आयुष्यात करायच्या अनेक गोष्टींची बकेट-लिस्ट नुसतीच बनवत बसतो.

दोन वर्षांपूर्वी ‘मिडनाईट इन पॅरिस’ नावाचा एक चित्रपट बघितला होता. चित्रपट जितका सुंदर होता, तितकंच सुंदर पॅरिस त्यात दिसलं होतं आणि मनात कुठंतरी “जायला पाहिजे एकदा” येऊनही गेलं होतं. त्यानंतर ‘बेफिक्रे” नावाचा हिंदी चित्रपट.. त्यातही पॅरिस काय सुंदर दिसलं होत.. कदाचित ‘मिडनाईट इन पॅरिस’ पेक्षाही सुंदर. त्यावेळी खरं पॅरिस डोक्यात बसलं.

मार्च महीना सुरु झाला तरीही बकेट-लिस्ट मधलं पॅरिस डोळ्यासमोरून हलेना. एप्रिलमध्ये पोरांच्या परीक्षा संपत होत्या, एप्रिलमध्येच माझाही एक प्रोजेक्ट संपत होता, ८-१० दिवसांची सुट्टी मिळू शकत होती. त्यावेळी पॅरिस दर्शन केलं तर? अर्थात घरी अजून कुणाला ह्याबद्दल बोललो नव्हतो आणि मग सुरु झाली शोध मोहीम.. किती पैसे लागतील, आपल्या बेचक्यात किती आहेत, एफ.डी. किती मोडाव्या लागतील?, मे महीना तिथे जायला योग्य आहे का? प्रवास किती तासांचा?.. हो, हा प्रश्न फार महत्वाचा आहे.. कारण मला तसं विमान-प्रवासाचं फारच वाकडं आहे. रोड-ट्रिप खरं किती छान असते. विमान म्हणजे सारखी आपली ती कुर्सी-कि-पेटी बांधी रखायची, हवेचा दबाव कमी होऊन ऑक्सिजन मास्क आले तर आपली सहायता आधी करायची, पाण्यात पडलो तर ते पिवळं लाईफ-जॅकेट शिट्टी वाजवून उघडायचं आणि इतर वेळी टर्ब्युलन्स नामक भयाण प्रकार असताना गचके सहन करायचे.. असो

पॅरिसला बायकोची मावस-बहीण गेली दहा वर्ष राहतेय, ती सुद्धा मनापासून या कि इकडे म्हणत होती, पण एक तर तो ८१रुपये = १ युरो डोक्यातून जात नव्हता, त्यात चौघांचं विमानभाडं ह्यामुळे आकडा फुगायचा. पण ह्यावेळी ठरवले आता माघार नाही, एक बार कमिटमेंट कर दी .. वगैरे मनाला बोलून दाखवले.

मे महिन्यात ‘कबीनी-रिव्हर-रिसॉर्टचा’ प्लॅन आधी केला होता, सुट्टी हि मंजूर झाली होती, पण काही कारणांमुळे तो प्लॅन बारगळला होता. मग त्याच सुट्टीच्या काळात पॅरिसवारी करायचं ठरवलं आणि कागदोपत्रांची जमवाजमव सुरु केली.

गुगल-काकांनी भरपूर ठिकाणं दाखवली. युरोपमधील सगळे देश अगदी जवळ जवळ, ४-५ तासांच्या अंतरावर. आधी विचार केला कि चाललोच आहोत तर इटली किंवा स्विझर्लंडपण करावं का? पण गुगलने जे मनोहर दर्शन पॅरिसचा करवलं ते २-३ दिवसात उरकणे अशक्य होते, शिवाय उगाच धावाधाव करून एक ना धड करायची माझी बिलकुल इच्छा नव्हती.

एप्रिलमध्ये बायकोचा वाढदिवस असतो तेंव्हा तिला सरप्राईझ द्यायचं ठरवलं, पोरांच्या परीक्षा असल्याने त्यांनाही काही बोललो नव्हतो. मग सुरु झाली व्हिसासाठीची गडबड, ढीगभर कागदपत्र, फॉर्म्स, अपॉइंटमेंट उरकलं, बँकेत आवश्यक माया जमवली आणि मग बायकोला म्हणालो..

“LET’s GO PARIS”

********

शेनझेन व्हिसा प्रक्रिया तशी सोप्पी होती. काही आठवडे कष्ट करुन जमवलेली पोतंभर कागदं देऊन आणि ३-४ तास घालवून व्हिसा ऑफीस मधून आम्ही घरी परतलो. नशिबावर पूर्ण भरोसा असल्याने कुठे तरी नक्की माशी शिंकणार आणि व्हिसा रिजेक्ट होणार असेच वाटत होते. पुढचे दोन दिवस फ्रांस एम्बसीच्या व्हिसा स्टेटस पेज दर अर्ध्या तासाने रिफ्रेश करण्यात घालवले आणि शेवटी अर्धवट माहिती दिसत असतानाच व्हिसा घरी पोहोचला सुद्धा.

हे सगळं चालू असतानाच आईने सुद्धा मैत्रिणीबरोबर थायलंडला जायचं पिल्लू सोडलं, मग आमचं राहील बाजूला आणि त्याची कागपत्र, पैसे जमवाजमव चालू झालं. मुलांच्याही परीक्षा सुरु झाल्या होत्या.. माझा प्रोजेक्टच रिलीज जवळ असल्याने त्याचीही जोरदार काम सुरु होती.. दिवस भराभर जात होते. शेवटी एकदाच्या परीक्षा आणि रिलीज झालं आणि थोडी उसंत मिळाली.

आता वेळ होती शॉपिंगची. तिकडचं हवामान.. अर्थात युरोपचंच हवामान फार बेभरवश्याच. आयुष्यभर श्रावण असल्यासारखे. ‘क्षणात येते सर सर शिरवे…क्षणात फिरून‌ी उन पडे’ बर ऊन तर ऊन, पण ते ऊन पण कधी उकडवणारे तर कधी थंड वारा सुटला असेल तर कोवळं भासणारे. शेवटी ऊन, थंडी आणि पाऊस ह्या सगळ्यासाठी लागणारे कपडे घेऊन जायचे ठरले. सामान आणि खर्च दोन्ही वाढणार होते, पण पर्यायच नव्हता. शनिवार-रविवार नुसती धावाधाव. पुण्याचा एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात.. कधी अगदी एखाद छोटूस दुकान तर कधी एखादा मोठ्ठा मॉल.. काहीही सोडलं नाही.. “होऊ दे खर्च..” म्हणत शॉपिंग एकदाच पूर्ण केलं.

आता वेळ होती हाती असलेल्या मोजक्या दिवसांना पॅरिस मध्ये सत्कारणी कसं लावायचं हे ठरवण्याची. तिथे जाऊन सकाळी उठून आज कुठे जायचे म्हणणे मुर्खपणाचे होते. आधी ठरवले कि एखादी ट्रॅव्हल एजंसी पकडावी अन ते सांगतील तसं फिरावं. पण लवकरच त्यातील फोलपणा लक्षात आला. ही लोक स्वतः फारसं काहीच करत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ त्यांची एखाद्या दिवसाची आयटेनरी अशी असायची. हॉटेल पासून ‘क्ष’ ठिकाणी तुमचं तुम्ही जा, तेथे तुम्हाला अमुक-अमुक बस मिळेल, त्याचे हे तिकीट.. त्या बस मध्ये बसलात कि ते तुम्हाला फिरवतील आणि पुन्हा ‘क्ष’ ठिकाणी आणून सोडतील, तेथून हॉटेलला परत तुमचं तुम्हीच. आता ह्यात ह्या कंपनीचा काय मोठेपणा. बस / ट्रेन / ट्राम मेट्रोच तिकिटं घरबसल्या ऑनलाईन मिळतात, तेथे फिरवणारी बस हि तिथल्या ट्रॅव्हल कंपनीची, ती सुद्धा आपण बुक करू शकतो. एका अनोळखी शहरात मला मदत काय हवी असेल तर ती बस ज्या ‘क्ष’ ठिकाणावरून सुटते तेथे कसे जायचे हे मला शोधायला न लागता, तुम्ही सांगितलेत किंवा बेस्ट म्हणजे हॉटेल-टु-हॉटेल टुर ऑर्गनाईझ करून दिलीत तर. नाहीतर तुम्हाला भरमसाठ पैसे देऊन शेवटी सगळं मलाच बघावं लागणार असेल तर फायदा काय?

शेवटी तो नाद सोडून दिला आणि मग पुन्हा गुगलकाकांना सोबतीला घेऊन प्रत्येक दिवशी काय काय बघायचं, त्याचे घरापासूनचे अंतर, लागणार वेळ वगैरेची जोडणी सुरु केली. एखादा दिवस पावसाने वाया गेला तर कसं काय वगैरेंची रिस्क-मॅनेजमेंट आणि कन्टेंजन्सी प्लॅन वगैरे पण तयार केला. बरोबरीने त्या त्या तारखेचे वेदर-फोरकास्ट वगैरे न्याहाळणे चालू होतेच. ह्या सगळ्या गोंधळात प्रत्येकाच्या तब्बेतीचं काही ना काहीतरी चालूच होते. दोन आठवडे आधी मला अचानकच गरगरायला लागले, शुगर कायच्या काही खाली गेली होती पण नशिबाने डायबेटीस नै म्हणले डॉक्टर. ‘ताटभर आंबे खा, बरं वाटेल’ म्हणून बोळवण केली. अर्थात ते गरगरणे काही कमी झाले नव्हते.

अजून वेळ आहे म्हणता म्हणता शेवटी तो दिवस उजाडलाच. विमान सकाळी ५ वाजताच होते, पण मुंबईवरुन. पुण्यावरुन मुंबईला जायचे म्हणजे एक यक्ष प्रश्न असतो. कधी काय कारण घडेल आणि एक्स्प्रेस-वे ब्लॉक होईल ही भीती नित्याचीच. शेवटी लवकर पोचलो तर एअरपोर्ट वर टाईम-पास करु, पण उशीर नको म्हणून ६.३०लाच कॅबने निघालो. ड्रॉयव्हरही अगदी विकेंड राईडला चालल्यासारखा मस्त सावकाशीत चालला होता. एक्स्प्रेस-वे क्लिअर मिळाला आणि १०.३० लाच एअरपोर्टला पोहोचलो.

टी-२ तसं सुस्तावलेलेच होते, फारशी गर्दी नव्हती, बरेचसे काउंटरही रिकामे होते. चेक-इन जेथुन होणार ते काउंटर शोधले आणि जवळपासच खुर्च्यांवर पसरलो. सायलेन्ट एअरपोर्ट असल्याने कसल्या अनाउन्समेंट नव्हत्या, चेक-इन सुरु व्हायलाही चांगले चार तास होते. एक्सीटमेंट तर खुपच होती, शेवटी मिडनाईट-इन-पॅरिस सिनेमाची सुरुवात बघितली टॅब वर. त्यात दाखवलेली बहुतेक सर्व ठिकाणं अर्थात आम्ही नंतर फिरलोच, पण ज्या पद्धतीने हा सीन शुट केलाय तो केवळ अप्रतिम. कुणालाही पॅरिसच्या प्रेमात पाडणारा.. नक्की बघा..

Youtube URL --> https://youtu.be/JABOZpoBYQE

शेवटी त्यातला ‘ओवेन विल्सन’चा डायलॉग आणि ज्या आर्ततेने त्याने तो म्हणालाय.. लैच भारी –

This is unbelievable – look at
this. There’s no city like this in
the world. There never was.

त्यावर Inez म्हणते,

I admit it’s pretty but so are so
many other places I’ve visited.

Gil सहमत होत नाही, तो म्हणतो,

I’m thinking of a painting by
Pisarro I’ve seen of Paris in the
rain. Can you picture how drop
dead gorgeous this city is in the
rain? Imagine this town in the
twenties – Paris in the twenties –
in the rain – the artists and
writers – I was born too late. Why
did God deliver me into the world
in the 1970’s

Paris is so romantic, when it’s just getting
dark – the lights go on – or at
night – it’s great at night – or
no, sunset on the Champs Elysees

If I had stayed here and written novels..
This is where all the artists came to live, to work – the writers, the painters

स्वप्नात रमलेला Gil पुढे म्हणतो –

I’d drop the house in Beverly
Hills, the pool, everything – in a
heartbeat. Look – this is where
Monet lived and painted – we’re
thirty minutes from town. Imagine
the two of us settling here. If my
book turns out we could do it – you
could just as easily make jewelry
here…

नुसतं ऐकूनच इतकं छान वाटतं… तर आजवर चित्रांमधून, चित्रपटांतून, जाहिरातींतून पाहिलेलं हे पॅरिस प्रत्यक्षात कसं दिसत असेल, कसं वाटत असेल हे जाणून घ्यायला आम्ही सगळेच खूप उत्सुक होतो.. पण त्याआधी होता ९ तासांचा कंटाळवाणा विमान प्रवास आणि त्या विमानात बसायलाही अजून शिल्लक होते.. ७ तास…..

[क्रमशः]