ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 9 Vishal Patil Vishu द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

                                                  वसतीची  गाडी  ...

  • भुलाये न बने

                  भुलाये न बने .......               १९७0/८0 चे...

श्रेणी
शेयर करा

ब्रेकअप नंतरच प्रेम - Part - 9

क्रमशः

या शब्द प्रेमात त्याला लिखाणाची आणि वाचनाची गोडी निर्माण होते. ऑफिसमधील कामानंतर मिळणार सारा वेळ मग आर्यन जास्तीत जास्त या शब्दांचेच सानिध्यात घालवत असे. असेच एक दिवस आर्यन आपल्या खोलीत रात्री काहीतरी लिहीत बसला असताना आर्यनची आई त्याचे समोर एका मुलीचा फोटो आणि माहिती ठेवते.. "आर्यन या मुलीला व तिचे घरच्यांना मी तुझा फोटो आणि माहिती मी पाठवली होती.. त्यांना तू पसंद आहेस.. तेव्हा तू देखील ही माहिती आणि फोटो बघून घे.. मला उद्यापर्यंत सांग तुझा निर्णय.. म्हणजे पुढील गोष्टी बोलता येतील त्यांचेशी.." असे बोलून आर्यनच्या आई निघून जातात. आर्यन मात्र त्या मुलीचा फोटो आणि माहिती न बघता तसेच आपल्या टेबलेचे ड्रॉवरमध्ये ठेवून पुन्हा आपले लिखाण चालूच ठेवतो.

इकडे पाहता पाहता प्रीतीचे कॉलेजची परीक्षा उद्यावर येऊन पोहोचते. मग दुसऱ्या दिवशी पहाटे आपल्या मुलीला प्रतिक्षाला आई बाबांकडे सोपवून प्रीती पुण्याला परीक्षा द्यायला निघते. योगागोगाने प्रीतीचा नंबर हा तिच्याच जुन्या कॉलेजमध्ये पडलेला पडतो. आज प्रीतीचे चेहऱ्यावर तिचे कॉलेजचे परीक्षेचे दडपण कमी आणि त्या जुन्या कॉलेजमध्ये गेलेवर पुन्हा त्या जुन्या आठवणींच्या भेटीचेच जास्त दडपण होते. प्रीती कॉलेजवर परीक्षा देण्यासाठी गेलेवर पुन्हा तिचे कॉलेज मधील त्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि या आठवणींच्या पुस्तकांची प्रत्येक पाने पुन्हा त्याच नावावर येऊन थांबत होती ते नाव म्हणजे आर्यन. तिच्या कॉलेजच्या प्रत्येक आठवणीत ते नाव आपोआपच जोडले जायचं. कॉलेजची अशी कोणतीच आठवण नव्हती की ज्या आठवणीत तिचे सोबत आर्यनचे नाव जोडले गेले नसेल. नंतर संध्याकाळी पेपर सुटलेवर प्रीती पुन्हा त्या जुन्या आठवणी आपल्या सोबत घेऊन घरी साताऱ्याला परत येते.

सागरासारख्या स्वप्नांना

भेटण्यास येणाऱ्या

अपेक्षांच्या नदीवर

मर्यादांचा बांध होता..

स्वप्न सागरात

रोज उसळणाऱ्या

लाटांत मात्र

नदी मिलनाचा ध्यास होता..

इकडे आर्यन जास्ती दिवस आपल्या लग्नाचा विषय टाळू शकत नव्हता. आर्यनचे आईने त्याचे लग्नाचे चांगलेच मनावर घेतले होते यावेळी. आर्यनलाही हा विषय आता फारसा टाळता येण्या सारखा नव्हता. कारण त्याला आपल्या आईचे म्हणणे हळू हळू पटू लागले होते. त्यालाही कोठेतरी मनात वाटू लागले होते.. "आपण किती दिवस राहणार असे स्वप्नांच्या मागे धावत??.. आपली स्वप्ने खरचं होतील का कधी पूर्ण??.. की आयुष्यभर आपण असेच त्या स्वप्नातच गुंतवून ठेवणार स्वतःला??.. आपण वास्तवाला समोर जाणार तरी कधी??.. आणि किती दिवस ही खोटी अपेक्षा मनात ठेवणार की प्रीती अजूनही आपल्यावरच प्रेम करत असेल??.. आणि जर तिने अगोदरच कोणाशी लग्न केले असेल तर??.. तर मग काय??.. काय करणार मी?.. आयुष्य तिच्या आठवणीत जगणार की.. आयुष्यच संपणार मग माझे??.."

आठवणीत तुझ्या-माझ्या

काय आणि किती लिहू..

भाव माझ्या खोल मनातले

या शब्दांत किती रुजवू..

माझ्या प्रेम कवितेला या

शब्दही लागले अपुरे पडू..

शब्दही लागले अपुरे पडू..

-शब्दप्रेमी..

प्रीतीचे आठवणीत अनेक कविता, अनेक चारोळ्या, कथा, लेख लिहून आर्यनची डायरी आता जवळ जवळ भरतच आली होती. इतकेच नव्हे तर फेसबुक, व्हाट्सअप वर देखील त्यांनी त्याचे कविता, चारोळ्या, लेख पोस्ट करण्यासाठी "शब्दप्रेमी" या नावाने एक समूहच चालू केला होता. काही दिवसांतच हजारो लोकांनी त्याचे चारोळ्या, कविता वाचून त्याचा फेसबुक ग्रुप जॉईन केला होते. अनेक लोक त्याचे कविता, चारोळ्या आणि लेख वाचून त्याला भेटण्यास आसुसले होते पण आर्यनला मात्र आजही ओढ होती ती प्रीतीचे भेटीचीच आणि तीच त्याची इच्छा अजूनही अपूर्णच राहिलेली असते. इतके दिवसांपासून मनामध्ये एका वहीत साठवून ठेवलेल्या त्या पहिल्या प्रेमाच्या गोड आठवणी आता हळू हळू धूसर होत चालल्या होत्या. त्या आठवणींना असे किती दिवस जपून ठेवणार कधी तरी त्या सर्व गोड गुलाबी आठवणींच्या वहीची एक एक पाने जीर्ण होत जाणारच होती. त्याचीच ही सुरवात होती कदाचीत म्हणूनच आर्यनच्या मनात आता हळू हळू प्रीतीला विसरून जावं असेच येत होते. जवळ जवळ तीन वर्षे होत आली तरी त्याचा प्रीतीशी काहीच संपर्क, काहीच संवाद झालेला नसतो त्याला तिच्याबद्दल अजूनही काहीच माहिती मिळालेली नसते. आता महाबळेश्वरला जायची त्याची ही तिसरी वेळ जवळ आली होती पण यावर्षी आपण महाबळेश्वरच्या त्या हॉटेलला जायचं, की नाही जायचं याच विचारात त्याचे मन गुंतले होते. प्रीतीची अजून वाट पाहायची?. की आईने पसंद केलेल्या मुलीशी लग्न करून प्रीतीला कायमचे विसरून जायचं?.. याच साऱ्या विचारात आज काल त्याचे मन गुंतले होते, कारण आर्यनची आई देखील आता लग्नासाठी आर्यनचे खूप मागे लागली होती. पण शेवटी राहून राहून पुन्हा त्याचे मनात विचार येतोच यावेळी शेवटचे.. यावेळी जर प्रीती आपल्याला नाही भेटली तर आपण पुन्हा कधीच नाही जायचे महाबळेश्वरला आणि प्रीतीलाही कायमचेच विसरून जायचे.

इकडे प्रीती तिचे कॉलेजच्या शेवटच्या वर्षाचा निकाल तिच्या अपेक्षेप्रमाणे लागलेने खूप खुश असते. तिने तिचा स्पर्धा परीक्षेचाही अभ्यास देखील आता चालू केलेला असतो. त्या अभ्यासासोबतच थोडे फार मनोरंजन म्हणून अधून-मधून ती आपला वाचनाचा छंद देखील तिने जपला होता. प्रतिक्षाही आता दोन वर्षाची होत आली होती, हळू हळू एक एक शब्द बोलू लागली होती, थोडी थोडी चालूही लागली होती त्यामुळे प्रीतीला तिचे अभ्यासाला आता पहिल्यापेक्षा जास्ती वेळही मिळत होता. प्रीती कधी कधी तिचे अभ्यासातून मोकळा वेळ मिळाला की एकांतात आपल्या मुलीला प्रतिक्षाला आपले आणि आर्यनचे जुने फोटो दाखून तिला तिचे बाबांचीही ओळखही करून देत असे. त्या बहाण्याने ती आपल्या मनातील त्या गोड आठवणींनाही उजाळा देत असे. तिने आपल्या मनाशी ठरवल्याप्रमाणे तिलाही आता ओढ लागली होती ती म्हणजे येणाऱ्या डिसेंबर मधील महाबळेश्वर पिकनिकची आणि त्या हॉटेल मधील रूम नं ५०२ ची. तिने आपल्या मनाशी आधीच ठरवलेलं असते यावेळी आपण त्याच रूम नं ५०२ मध्ये राहायचं. प्रीती अशीच एक दिवस तिचे रूममध्ये तिचे लॅपटॉपवर ऑनलाईन काही वाचन करत बसली असता अचानक तिची नजर एका कवितेवर पडते..

अबोल शब्द ..


काही अबोल शब्द

खोल मनात दडलेले ..

ओठांवर कधी न येता

हृदयात खोल वसलेले ..

कधी न व्यक्त करता

स्वतःला सावरणारे ..

तुझ्या स्मित हस्यात

मनाला सुखविणारे ..

शब्द काही अबोल

अबोलच रहावेत ..

न बोलता शब्दातून

भाव मनाचे तू वाचावेत ..

शब्दरूपी भाव डोळ्यातला

अर्थ तुज त्याचा उलगडावा ..


- शब्दप्रेमी..

ती कविता वाचून प्रीती त्या शब्दांचे प्रेमातच पडते आणि त्या शब्द रचनेच्या लेखकाचा शोध घेत घेत प्रीती त्या कवितेचे पेज लिंकवरून पोहोचते ती त्या "शब्दप्रेमी" फेसबुक समूहावर ज्या ग्रुपवर तिला मिळतो तिच्या आवडीच्या चारोळ्या आणि कवितांचा खजिनाच. तिच्या सारखेच अनेक काव्य प्रेमी, साहित्य रसिक त्या समूहावर जॉईन असतात.. मग प्रीतीलाही तो समूह जॉईन करण्याचा मोह आवरत नाही आणि तीही त्या "शब्दप्रेमी" समूहात आपल्या एका नव्या नावाने जॉईन होते ते नांव म्हणजे "शब्दसखी". इतके दिवसांपासून सारखीच थोडक्यात ताटातूट होणारे ते दोन प्रेमी अखेर पुन्हा एकमेकांना अनोळखी नावांने का असेना पण त्या "शब्दप्रेमी" फेसबुक समूहावर येऊन मिळतात आणि ते दोघेही या गोष्टीपासून अज्ञात असतात.

प्रीती आणि आर्यन ते दोघे ज्या महिन्याची अगदी आतुरतेने वाट पहात असतात तो डिसेंबरचा गुलाबी थंडीतील आठवणींचा महिना अखेर उजेडतो. असेच एक दिवस आर्यन मुंबईत आपल्या ऑफिसमध्ये काही तरी काम करत बसलेला असतो आणि त्याच्या मोबाईलवर एक फोन येतो. तो पाहतो तर तो फोन महाबळेश्वरमधील त्या हॉटेलमधील व्यवस्थापकाचा असतो "नमस्कार साहेब.. मी महाबळेश्वर मधून बोलतोय.. तुमचे यावेळचे रूम नं ५०२ चे बुकिंग कन्फर्म करण्यासाठी फोन केला होता तुम्हाला.. त्याच काय झाले, त्या रूम नं ५०२ चे बुकिंगसाठी आताच एका महिलेचा फोन आला होता.. म्हणजे मागील वर्षीही त्या राहिल्या होत्या आमचे हॉटेलवर त्यांचे फॅमिली सोबत.. पण या वर्षी त्यांनी आग्रह धरला आहे की, त्यांना त्याच रूम नं ५०२ चे बुकिंग हवे आहे.. म्हणून आम्ही तुमचे यावेळचे बुकिंग कन्फर्म आहे किंवा नाही हेच विचारण्यासाठी तुम्हाला फोन केला आहे.." असे त्या हॉटेलचे व्यवस्थापक आर्यनला फोनवर विचारत असतात. यावर "हो मी येणार आहे २५ डिसेंबरला महाबळेश्वरला आणि माझे रूम नं ५०२ चे बुकिंगही कन्फर्मच आहे." असे आर्यन त्या हॉटेलचे व्यवस्थापकांना फोनवर सांगतो.

क्रमशः भाग १०

- विशाल पाटील, "Vishu.." कोल्हापूर