कॉलेज संपून तीन महिने झाले होते ... सर्व डिग्री घेण्याकरिता कॉलेजमध्ये आले ... निखिल , रेवा , अनुज , प्रितम ...... मालती सर्व कॉलेजच्या गेट समोरच भेटलीत . एकदाच कॉलेज संपल्यावर असं रोज रोज भेटणं आता कुणालाच शक्य नव्हतं . कॉलेजच्या आठवणी तश्याच ताज्या होत्या , रोजच्या पाणीपुरीची निखिलला आठवण झाली . कॉलेजच्या गेटसमोरून जातानाच त्याचं लक्ष बाजूच्या चारचाकीवर गेलं , आणि त्याने तिथेच साऱ्यांना थांबवून घेत पाणीपुरी खायचा हट्ट केला .... तारुण्यही कधीकधी बालिशपणाने जगायला भाग पाडतं ते असं ....
वाऱ्यावर हलणारा बोर्ड ’ --------- स्पेशल पाणीपुरी सेंटर’ . आणि कॉलेजच्या बाजूला उभी रहाणारी ती चारचाकी , बहुतेकांना आपल्याकडे आकर्षित करून घेत होती . अनुजला तर तिथली पाणीपुरी खाल्याशिवाय कॉलेजमधून घरी जावं वाटतं नव्हतं . पाणीपुरी खायची तर त्याचं चारचाकीवरची नाहीतर , त्या चारचाकीशिवाय दुसऱ्या ठिकाणंच्या पाणीपुरीला कुठली आली तशी चव ....
सर्व ग्रुप तिथे गेल्यावर
गाडीवाला: या भाऊ काय खाणार? भेळ,पाणीपुरी, शेवपुरी, .... (अजुन काय काय नावे घेतली त्याने, पण साऱ्यांचे लक्ष्य एकच पाणीपुरी).
अनुजने ऑर्डर दिला , " काका , पाणीपुरी खिलाओ ....."
तोपर्यंत पाणीपुरीवाल्याने पाचझणाच्या हातात पाच स्टीलच्या प्लेट ठेवल्या आणि त्याने पहिला ’सा’ लावला. एक हाताने गल्ल्यातून सुट्टे पैसे देऊन आधीचे गिऱ्हाईक कटवले दुसऱ्या हाताने सराईतपणे दोन फूट उंचीच्या प्लॅस्टिकच्या पिशवीतून एक पुरी उचलली, चार बोटांवर धरुन अंगठ्याने कर्रकन तिच्या वरच्या पापुद्र्याला भोक पाडले आणि वाटाणा-बटाट्याचे थोडे मिश्रण त्यात भरले.
सर्वांना पाणीपुरी कशी हवी आहे एकदा पाणीपुरीवल्याने विचारून घेतले गोड, तिखट की कमी तिखट?
सर्व ओरडले तिखट पण रेवा म्हणाली , " कमी तिखट ..... " सारे रेवाकडे बघून हसू लागले .
त्याने ती मिश्रण भरलेली पुरी आधी एका चिनीमातीच्या बरणीत हलकेच बुडवली आणि मग एका मडक्यात बुचकळली. बाहेर काढून मडक्यावर दोनदा खालीवर केली. एक्स्ट्रा पाणी त्यात पडले आणि मग काढून पाण्याचे थेंब पाडत प्रितमच्या प्लेटमध्ये ठेवली .
त्याने ती स्वतः न खाता अनुजच्या प्लेटमध्ये ठेवली . अनुजने नाही नाही म्हणत सराईतपणे घाईघाई ती उचलून सरळ तोंडात टाकली आणि गपकन तोंड बंद केले.
दुसरी पाणीपुरी मालतीच्या प्लेटमध्ये पडली तिने ती खाऊन घेतली . पाणीपुरिवाला जणू एकशेदहाच्या स्पीडने पाणीपुरी बनवत प्लेटमध्ये टाकत होता . त्याचा लक्षातच आलं नाही की रेवाने कमी तिखट मागितली . त्याने रेवाच्या प्लेटमध्ये पाणीपुरी ठेवताच तिने घाईने पाणीपुरी उचलत तोंडात कोंबली आतमध्ये हवा आणि पुरीतल्या पाण्याचे असे काही स्फोटक मिश्रण तयार झाले की जणू सुरुंग फुटावा. नाकातोंडात पुरीचा खमंग झाला होता ... डोळ्यातून पाणी. कानातून धूर यायचा तेवढा बाकी होता. असा काही ठसका लागला म्हणता की रेवाला ब्रम्हांड आठवले. रुमाल, प्लेट आणि स्वतःला या सगळ्यांना सावरता सावरता तिची तारांबळ उडाली. काय पण ध्यान आहे अशा नजरेने पाहत त्या गड्याने दुसरी पुरी ठेवली. पण सगळे सावरून स्थिर होऊन तिला हात घालेपर्यंत ती जरा जास्तच भिजली. आणि उचलून खाताना तिचे पाणी प्लेटमध्येच राहिले. हे पुरीचे आवर्तनपण फसले. रेवाकडे प्रितमचं लक्ष जाताच त्याने आधी गालातल्या गालात हसून घेतले नंतर आपल्या बॅग मधून पाण्याची बॉटल काढत रेवा समोर ठेवली .
आता तर रेवा पाणीपुरी खायचं नाव घेणार नव्हती . निखिल , मालती , अनुज खाण्यात मस्त व्यस्त होते . त्याने तिसरी पुरी मांडली. आता जरा अंदाज आला. ही पुरी अगदी व्यवस्थित तिच्या गंतव्य स्थानी पोहचली होती. आता तर सगळे टेकनिकच आत्मसात झाले. त्याने पुरी मांडली रे मांडली की लगेच अनुजनेही झडप घालून उचलली आणि हळूच पुरी तोंडात टाकली .... तिखट लवंगी फटाका, आंबट फुलबाजे, गोड भुईनळे आणि नमकीन रॉकेट्स अशी सगळी आतषबाजी आतल्या आत सुरु होते. ही जी काही सरमिसळ टेस्ट असते ना पाणीपुरीची, ती प्रत्येक पाणीपुरीवाल्याची युनिक आयडेंटिटी असते. जगात कुठेही भटकलात तरी तशी सेम टेस्ट मिळायची नाही. ती टेस्ट एखाद्या ठरल्या प्लेसवरच विसावली असते पण त्याची सवय होते न होते तोच एका प्लेटचा कोटा संपतो पण मन भरत नाही. मग शेवटची पुरी तोंडात घोळवत खुणेनेच ’लगे रहो’ म्हणून रेवाने गाडीवाल्याकडे प्लेट पुढे केली .
खाणं संपल्यावर त्याने आवरायला सुरुवात केली .
किती झाले म्हणून निखिलने विचारलं . पाणीपुरीवाल्याने जेवढे सांगितले तेवढे खिशातून काढून निखिलने त्याच्या हातावर ठेवले . एवढेच का झाले हे विचारण्याचा भानगडीत तो पडला नाही .
निखिल पैसे देऊन मागे वळतोच तर त्याला दूरवरून आदिती येताना दिसते .