प्रिती.. तुझी नी माझी – भाग १ Aniket Samudra द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रिती.. तुझी नी माझी – भाग १

निखिल सकाळी ६.३० ला ऑफिसपाशी पोहोचला. थोडीफार लोक आधीच येऊन थांबली होती. एक-एक करत सगळे येऊन निघायला ७.३० वाजले. इतके दिवस प्रचंड काम केल्यानंतर शेवटी तो दिवस येऊन ठेपला होता. आज ऑफिसची ट्रीप होती. एक आठवडा मस्त मौज करायची, कामाची कटकट नाही, तारखांचे गणीत नाही की मीटिंग्ज ची कंटाळवाणी बडबड नाही. आठवडाभर मस्त आराम आणि धिंगाणा.

गप्पा, गाणी, ओरडा-आरडी यामध्ये अलिबाग कधी आले कळलेच नाही. अथांग पसरलेला समुद्र किनारा पाहून सगळ्यांचाच प्रवासाचा थोडाफार आलेला शीण निघून गेला. आणि राहण्यासाठी घेतलेले हॉलिडे-रिसॉर्ट पाहून तर त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. सगळेजण आनंदाने बेभान झाले होते.
संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर दंगा-मस्ती, पाण्यात डुंबून सगळेजण हॉटेलवर परतले. खोलीतून आवरून बाहेर पडतात-न-पडतात तोच त्यांच्या कानावर जोरजोरात वाजणाऱ्या गाण्यांचा आवाज पडला. हम्म.. डि.जे आहे तर .. निखिल स्वतःशीच बडबडला.

पुढचा १ तास पूर्णं धिंगाणा घालण्यात गेला. नवीन हिंदी-इंग्लिश गाणी, रिमिक्स यावर सगळ्यांची पावलं नुसती थिरकत होती. शरीरातून घामाच्या धारा वाहायला लागल्या तसे एक एक जण कमी होऊ लागले. पण निखिल मात्र पूर्णं जोषांत होता. इतक्या दिवसाचा मानसिक थकवा घालवायला नाचणे हाच योग्य उपाय होता, आणि नृत्य तर निखिलचा छंदच मग तो कसला थांबतोय. हळू हळू करत गर्दी कमी होत गेली आणि निखीलला ती दिसली. Blue Stripe चा Top, Black Skirt, सोनेरी कलर केलेले केस, पाणीदार डोळे.. आपल्या मैत्रिंणींबरोबर देहभान विसरुन ती नाचतच होती. पण थोड्यावेळात तिच्या मैत्रिणी पण थकल्या आणी शेवटी floor वर उरले फक्त निखिल आणी ‘ती’.

दोघेही अगदी बेभान होऊन नाचत होते. आणि अचानक काय होतेय हे कळायच्या आतच ‘ती’ निखिलच्या अंगावर कोसळली. दोन मिनिट कुणालाच काही कळले नाही काय झाले ते. निखिलही पुरता भांबावून गेला. थोड्याच वेळात तिचे मित्र-मैत्रिणी धावत आले, त्यांनी तिला सावरले आणि बाजूला घेऊन गेले. निखिलही मग आपल्या मित्रांमध्ये जाऊन जेवायला बसला. पण त्याचे सगळे लक्ष ‘त्या’च टेबलाकडे होते. ‘ती’ आता बऱ्यापैकी सावरली होती. तिच्या मैत्रिणी तिला ज्यूस, पाणी वगैरे देत होत्या. ‘ती’ मात्र आपला चेहरा तळहाताने झाकून रडत होती.

थोड्यावेळाने ‘ती’च्या मैत्रिणी तिला घेऊन निघून गेल्या. निखिलही मग जेवण उरकून आपल्या रूम मध्ये निघून गेला. दिवसभराचा थकवा आणि रात्रीचा नाच यामुळे बिछान्यात पडल्यापडल्या झोप लागेल ही निखिलची अपेक्षा फोल ठरली. डोळे मिटले तरी संध्याकाळचा तो प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हता. तिचा तो सुंदर चेहरा, संगीताच्या तालावर लयबद्ध नाचणारे तिचे शरीर, आणि अचानक अंगावर वीज कोसळावी आणि अंगाला प्रचंड धक्का बसावा असा तिचा त्याला झालेला तो स्पर्श. छे!! प्रयत्न करूनही झोप लागेना तसा निखिल बिछान्यातून उठला आणि रूमच्या बाहेर पडला. हवेतला गारवा वाढला होता. बाहेर बऱ्यापैकी सामसूम होती.

रिसॉर्ट मध्ये एका कोपऱ्यात शेकोटी पेटलेली दिसली म्हणून निखिल तिकडे वळला. जवळ गेल्यावर त्याला दिसले की त्याच्या अंगावर कोसळलेली ‘ती’ आणि तिची एक मैत्रीण एकमेकींशी बोलत होत्या. निखीलने तेथीलच एका झाडाचा आडोसा घेतला आणि तो त्यांचे बोलणे ऐकू लागला. ‘ती’ची मैत्रीणच बऱ्याच वेळ बोलत होती.

“For God sake Shreya, I don’t belive you were drunk. काय झालेय तुला? Control Yourself. जे झाले ते बरेच झाले नाही का? गेली १० वर्ष जे चालले होते ते शेवटी संपले. You should feel better now.”
बराच वेळ शांततेत गेला. निखिल स्वतःशीच काय झाले असेल याचा विचार करत होता. “May be break-up झाला असेल”, निखिल स्वतःशीच पुटपुटला. तेवढ्यात त्याच्या कानावर तिचा, श्रेयाचा, आवाज आला:

“जब भी किसीको करीब पाया है
कसम खुदा की वही धोखा खाया है
क्यो दोष देते है हम काटॊं को
जख्म तो हमने फुलोंसे पाया है”

व्वा व्वा..निखिल ला जोरात दाद द्यावीशी वाटली पण त्याने स्वतःला सावरले. एक तर आपण लपुन ओळख नसतानाही कुणाचे तरी बोलणे ऐकतोय, आणी ही वेळ ही योग्य नाही कुणाच्या शायरीला दाद देण्याची असा विचार करुन आपल्या रूम वर परतला.

रात्री झोप नीट अशी लागलीच नाही. रात्रभर तो काय झाले असेल याचाच विचार करत राहिला. सकाळी जाग आली तेव्हा निखिल एकदम फ्रेश झाला होता. समुद्रकिनाऱ्यावर जाऊन मस्त जॉगींग करायचा विचार त्याच्या मनात येऊन गेला. मग पायात शूज अडकवून निखिल ६.३० लाच शेवटी बाहेर पडला. Canteen मधून फ्रेश लाईम ज्यूस पिऊन निखिलने समुद्र किनारी धाव घेतली. सूर्योदय अजून व्हायचा होता. निखीलने शूज काढून ठेवले. पायाला गार मातीचा स्पर्श सुखावत होता. पायावर समुद्राच्या लाटा झेलत निखीलने दीर्घ श्वास घेतला आणि धावायला सुरुवात केली. समुद्राचे त्याला फार कौतुक वाटे. एवढा मोठा अथांग समुद्र, पण त्याला त्याच्या मोठेपणाच अजिबात गर्व नाही. तुम्ही कधीही त्याला भेटायला या, तो तुम्हाला त्याच जागी कधीही भेटेल. तुम्ही त्याच्या जवळ गेलात की तोच धावत तुमच्या भेटीला येईल आणि तुमच्या पायावर लोळण घालेल. निखिल आपल्याच विचारात धावत होता आणि त्याला श्रेया दिसली. समुद्राच्या पलीकडे काय आहे हे शोधण्याच्या प्रयत्नात असलेली व्यक्ती कशी दिसेल तशीच नजर लावून ती कुठेतरी बघत बसली होती. पुढे जावे की इथूनच मागे फिरावे? पुढे गेलोच तर ओळख दाखवावी का दुर्लक्ष करून जावे अशा विचारात निखीलने आपला वेग कमी केला. तेवढ्यात श्रेयाचे लक्ष निखीलकडे गेले. दोघांची नजरानजर झाली. निखीलने तिच्याकडे बघून एक मंद हास्य केले.

तिच्या चेहऱ्यावर मात्र शून्य भाव.!!

निखीलला एक क्षण आपण Bowling खेळतोय असेच वाटले. Bowl तर टाकलाय आता स्ट्राईक होणार का कडेच्या गटर मधून जाऊन Miss Hit होणार अशा विचारातच जसे काही क्षण जातात तसेच हे क्षण त्याला वाटले आणि अचानक श्रेयाच्या चेहऱ्यावर मंद हास्याची एक लकेर उमटली. निखीलला बघून ती जरा सावरून बसली.

“Hi !!”, निखिल
“Hi !!” , श्रेया
“You Okay??”, निखिल
“हम्म. !!” श्रेया

निखीलला पुढे काय बोलायचे हेच समजेना म्हणून मग त्याने आपला वेग वाढवला आणि पळायला सुरुवात केली.
तेवढ्यात श्रेयाने हाक मारली, “एक मिनिट..!”
निखिल जागच्या जागी थबकला. मागे वळून पाहिले तेव्हा श्रेया उठून त्याच्याच दिशेने येत होती. नुकताच सूर्योदय होत होता. सूर्यांच्या कोवळ्या किरणांत तिचे केस अधिकच सोनेरी भासत होते. चेहऱ्यावर आलेल्या केसांच्या बटा वाऱ्याच्या झुळकीने हलकेच उडत होत्या. त्या सावरताना हातातील ब्रेसलेटची किणकीण त्याला समुद्राच्या घनगंभीर आवाजात सुद्धा ऐकू येत होती.

“श्रेया !!”, तिच्या आवाजाने तो भानावर आला..
“अम्मं??” निखिल..
“श्रेया..!! माझे नाव !” असे म्हणत तिने आपला हात पुढे केला.
“ओह्ह .. निखिल” असे म्हणून निखीलने आपला हात तिच्या हातात मिळवला.

तिच्या स्पर्शाने आपल्या पायाखालची वाळू समुद्राच्या लाटेने सरकते आहे? का आपल्याला तसा भास होतोय ! हेच निखीलला कळेना.

“Thanks, and sorry about yesterday”, श्रेया.
“Oh.. Don’t be, it was a reflex action”, निखिल
“Awee, if your reflexes were bad, i would have fallen!!”, असे म्हणून श्रेया हसायला लागली.

एक सेकंद निखीलला आपल्याच बोलण्याची लाज वाटली. “काय मूर्ख आहे मी !”, असे स्वतःशीच बोलून निखिल तिच्या हसण्यात सामील झाला. नंतर ५-१० मिनिट इकडच्या तिकडच्या गप्पा मारून दोघांनीही एकमेकांचा निरोप घेतला.

[क्रमशः]