Ramacha shela..- 6 books and stories free download online pdf in Marathi

रामाचा शेला.. - 6

रामाचा शेला..

पांडुरंग सदाशिव साने

६. आशा-निराशा

सरला त्या अनाथालयातून बाहेर पडली. ती चंद्रभागेच्या तीरी गेली. तिने स्नान केले. तिने पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि शेवटी स्टेशनवर आली. ती अत्यंत दु:खी होती. कृश झाली होती. जीवनाचा तिला वीट आला होता. परंतु तिला जीवनाचा नाश करवत नव्हता. तुझा उदय तुला भेटेल, असे कोणीतरी तिला मनात म्हणत होते.

ती आगगाडीत बसली. परंतु ती कोठे जाणार, कोठे राहणार? पुण्यास जाणार का? वडिलांकडे जाणार का? वडील काय म्हणतील? त्यांनी विचारले तर काय सांगायचे? वडिलांना कळवू का? उदय येऊन गेला असेल का? पुढे आला तर? वडील त्याला काय सांगतील? एक का दोन, कितीतरी विचार तिच्या डोक्यात थैमान घालीत होते. मनात कोणताही निश्चय होत नव्हता.

ती पुणे स्टेशनवर आली. घरी जावे असे तिला वाटले. परंतु तिला धैर्य झाले नाही. पुन्हा ती निघाली. तिने कल्याणचे तिकीट काढले. उदय जळगावला राहात असे. तिकडे जाणारे कोणी भेटेल, काही हकीगत कळेल, असे तिला वाटले. कल्याणला उतरून मग ठरवू कोठे जायचे ते, असे तिने ठरविले. ती बायकांच्या डब्यात बसणार होती. परंतु एखादे वेळेस कदाचित उदय दिसायचा या आशेने ती पुरुषांच्या डब्यात बसली. त्या डब्यात फारशी माणसे नव्हती. तिच्याकडे कोणाचे विशेष लक्ष नव्हते.

गाडी निघाली. आपापल्या जागी सारी मंडळी बसली. कोणी वर्तमानपत्रे वाचीत होते. कोणी पुस्तक काढून वाचीत होते. कोणी गप्पा मारीत होते. सरला काय करीत होती? ती खिन्नपणे खिडकीजवळ बसली होती. शून्य दृष्टीने पाहात होती.

इतक्यात तिच्या कानांवर संवाद आला. कोणाचे तरी हळू बोलणे तिच्या कानांवर आले. त्या बोलण्यात उदयचा उल्लेख होता.
“आई, उदयचे सुध्दा म्हणे लग्न झाले होते.”

“काही तरी ! त्याने तुझी थट्टा केली. तुझे लग्न ठरलेले पाहून त्याला ईर्षा वाटली असेल. त्याचे तुझ्यावर प्रेम होते.”

“मुळीच नव्हते. मी पाठवलेली कविता त्याने फाडून टाकली होती. परंतु आई, उदयचे डोळे खरेच सुंदर होते, नाही का?”

“नलू, तुझे आता लग्न झाले आहे. तुला काय करायचे त्याच्याशी? आणि आईपाठोपाठ उदयही देवाकडे गेला की काय, ते तरी कोणाला माहीत?”

“त्याच्या आईचे त्यावर किती प्रेम? आजारीपणात सारखी उदय, उदय करायची. परंतु त्याची भेट झाली नाही, दोन दिवस आधी येता तर भेट झाली असती. परीक्षा झाली तरीही तो लौकर आला नाही. आई आजारी हे माहीत, तरी तो पुण्यातच राहिला. आई, त्याच्या त्या सरलेमुळे तो राहिला असेल.”

“कोणाला माहीत? परंतु घरी गेला तो आईचे प्राण गेलेले ! आणि आईचा देह जळत असता तो चितेत उडी घेणार होता. परंतु त्याच्या मामांनी त्याला खसकन ओढले म्हणून बरे. नाही तर जीव देता.”

“त्याचे मन त्याला खात असेल. त्याच्या मनाला मोठा धक्का बसला असेल. नाही आई?”

“त्याची शुध्द गेली म्हणतात. स्मृती गेली म्हणतात. काही तरी बडबडतो. त्याचे मामा त्याला घेऊन गेले. तो “सरला, सरला” असे म्हणे असे सांगतात. खरेखोटे देवाला माहीत. परवा जळगावहून ते वासुदेवराव आले होते, ते नव्हते का सांगत?”

“आपण जळगावला गेलो की सारे कळेल.”

“परंतु त्याचे मामा त्याला घेऊन गेले.”

“वर्‍हाडात ना ग आई त्याचे मामा असतात?”

“द्वारकाबाई असे म्हणत खर्‍या. भाऊ पोलिस खात्यातला. बहीण अशी गरीब स्वयंपाकीणबाई. परंतु त्याने तिचे सारे केले. पोटचा मुलगा आला नाही. परंतु पाठचा भाऊ धावून आला.”

“आई, त्याची खरेच का ग कोणी सरला असेल?”

“आपल्याला काय माहीत?”

“परंतु तो मला म्हणाला. ते खोटे नसेल. त्या सरलेचे काय होईल? उदय असा स्मृतिहीन झालेला. त्याची सरला रडत असेल.”

“अगं, तिच्या आईबापांनी तिचे कोणाजवळ लग्नही करून टाकले असेल. कॉलेजमध्ये होता. असेल कोणी सरला. परंतु अशा सरला का खरेच मिळत असतात? तुझे नाही का आम्ही लग्न करून टाकले?”

“आई, कशाला ग माझे इतक्या लवकर लग्न केलेस?”

“त्या सरलेसारखे रडत बसायला लागू नये म्हणून. नल्ये, तू वेडी आहेस. आता सुखाचा संसार कर. काय आहे ग कमी? केवढा त्यांचा वाडा, केवढी इस्टेट.”

“आई, मला लगेच परत पाठवणार?”

“करू तुझी शेवटची मंगळागौर व पाठवू. आता का माहेरी फार दिवस राहायचे? आताच ते पाठवीत नव्हते. परंतु शेवटी त्यांनी दिला होकार. राहा आठ-पंधरा दिवस नि मग जा. पुढे बाळंतपणाला ये.”

“इश्श, तुझे आपले काहीतरीच.”

“नीज जरा.”

“मी नाही निजत. मला नाही झोप येत.”

असे मायलेकींचे हळूहळू बोलणे चालले होते. मध्येच एखादा शब्द मोठा येई.

“नल्ये, खरेच नीज. इकडे ये वाटले तर.”

“नको बाबा. मी येथेच बसत्ये.”

“हे पुस्तक हवे तुला वाचायला?”

“बंडू, मला काही नको. आता तूच वाच, माझे संपले वाचन. बाबांनी बी.ए. पर्यंतसुध्दा वाट नाही पाहिली.”

“नल्ये, तुला का नोकरी करायची आहे कुठे? काय आहे सासरी कमी? घरी वाटेल तितके वाच. त्यांच्या घरी केवढी लायब्ररी आहे ! किती मासिके, वर्तमानपत्रे येतात ! वाच लागेल तेवढे. कामाला किती गडीमाणसे-स्वयंपाकाला बाई. तुम्ही बसा दोघे राजाराणी. वाचा, खेळा.”

“बाबा, आपली नलीच त्यांना शिकवील.”

“हो, शिकवीन हो. चिडवू नकोस बंडू. पुरूषांनीच बायकांना शिकवावे असे नाही काही. बायकांनीही शिकवावे.”

“आई, नली एव्हापासूनच त्यांची बाजू घेऊन भांडत आहे बघ.”

“पुरे करा रे. तुम्ही कोणी नसाल पडत तर मी जरा पडत्ये.”

“आई, तू नीज. मी इकडे बसत्ये. म्हणजे तू पाय लांब केलेस तरी चालतील. यांना मग लागणार नाही.” असे म्हणून नली सरलेजवळ बसली तिची आई झोपली.

“तुम्हांला कोठे जायचे?” सरलेने विचारले.

“जळगावला. तुम्ही कोठे जाता?”

“मी कल्याणला उतरणार आहे.”

“जवळच जायचे. एकटयाच आहात वाटते?”

“एकटीच जात आहे.”

“तुम्हांला कोठेतरी पाहिल्यासारखे वाटते?”

“कोठे पाहणार?”

“तुमचे नाव काय?”

“सरला.”

“नाही. मग नाही तुम्ही. परंतु तुमच्यासारखाच तिचा तोंडावळा होता. तिचे नाव सरला नव्हते एवढी नक्की.”

“तुम्ही मघा कोणाविषयी बोलत होता?”

“कोणाविषयी म्हणजे ! माझे दोन महिन्यांपूर्वी लग्न लागले. मी माहेरी जात आहे. थोडया दिवसांनी पुन्हा सासरी जायचे.”

“परंतु कोणा स्वयंपाकीणबाईंविषयी तुम्ही बोलत होता.”

“आमच्याकडे होती एक स्वयंपाकीणबाई. फारच चांगली बाई. मरावे व तिच्या पोटी यावे. किती मायाळू ! आणि तिचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्यासाठी ती सारे करी. त्याची परीक्षा पास व्हावी म्हणून जप करी. त्याची प्रकृती बरी असावी म्हणून संकष्टी चतुर्थी करी. परंतु मेली. तिचा मुलगा नुकताच बी.ए.ला बसला. त्याचे लग्न करीन, त्याच्या रोजगारावर मी जाईन असे ती माउली म्हणे. एकदा उदयचा संसार नीट पाहिला म्हणजे डोळे मिटले तरी चालतील असे ती म्हणे. परंतु तिच्या नशिबी नव्हते. मुलाची बी.ए.ची परीक्षा संपते न संपते तोच तिचे आयुष्य संपले? मुलग्याची परीक्षा बुडू नये म्हणून तिने स्वत:चे आजारीपण त्याला कळविलेही नाही. परीक्षा संपली असे पाहून मग तिने कळविले. परंतु माय-लेकरांची भेट झाली नाही.”

“तिचा तो मुलगाही का वारला?”

“नक्की माहीत नाही. आम्ही आज दीड-दोन महिने तिकडे नव्हतो. लग्नाला आलो तो इकडेच होतो. परंतु परवा वडिलांचे एक मित्र तिकडून आले ते सांगत होते की, त्या मुलाची शुध्द गेली आहे. तो कोणाला ओळखीत नाही.”

“आणि त्या मुलाचे का लग्न झाले होते?”

“आम्ही माझ्या लग्नासाठी तिकडून इकडे येत होतो. कल्याण स्टेशनवर तो भेटला होता. आईकडेच जात होता. तेव्हा तो म्हणाला की, “नल्ये, माझेही लग्न झाले आहे.” मी म्हटले, “कोणाशी?” म्हणाला, “सरलेशी.” “

“माझेच नाव.”

“परंतु ती थट्टा असेल. आईला कळविल्याशिवाय का तो लग्न करील? उदयचा स्वभाव मला माहीत आहे. मोठा स्वाभिमानी. आमच्याकडे कधी जेवायला यायचा नाही. एकदा त्याच्या आईने माझ्या भावाचे जुने कपडे त्याच्यासाठी नेले तर त्याने ते फेकून दिले. त्याच्या आईने त्याला किती मारले ! माझ्या बाबांनी शेवटी सोडविले.”

“गरिबांची मुले का अधिक स्वाभिमानी असतात?”

“परंतु तो गरीब ना होता, दरिद्री ना होता?”

“गरीब असला तरी त्याचे डोळे श्रीमंत होते. सारे त्रिभुवन त्याच्या डोळयांवरून ओवाळून टाकावे असे वाटे? किती सुंदर डोळे !”

“जे आपल्याला आवडते ते सुंदर दिसते. तुम्हांला ती लैला-मजनूची गोष्ट आहे का माहीत? मजनूला कोणी म्हणाले, “लैला का इतकी सुंदर आहे?” तो म्हणाला, “मजनूच्या डोळयांनी बघ म्हणजे ती तुला स्वर्गातील परी दिसेल.” प्रेमाच्या डोळयांना प्रिय वस्तूचे सारे सुंदर दिसते. प्रेमाचे डोळे काही निराळेच असतात.”

“तुम्ही ते डोळे पाहिलेत नाही म्हणून. तुम्हीसुध्दा वेडया झाल्या असतात. मी त्या डोळयांवर कविता करीत बसे. उदयला पाठवीत असे.”

“ते पाठवीत का तुम्हांला पत्र?”

“त्याने कधी पाठवले नाही. माझ्या कविता तो फाडी. जगात असेच आहे ! आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो आपल्यावर करतोच असे नाही. जगात ओढाताण आहे. दोघाही जीवांचे परस्परांवर प्रेम असणे ही एक दुर्मिळ वस्तू आहे; नाही?”

“परंतु आपल्याला प्रेम करायला कोणी मिळाले यातच आपण कृतार्थता मानावी. प्रेमाची हुरहूर, प्रेमाच्या वेदना म्हणजे अमोल ठेवा वाटतो. ज्याच्यासाठी हृदय रडत असेल, डोळे ओले होत असतील, प्राण कासावीस होत असतील, असा कोणीतरी मिळणे म्हणजे भाग्य, नाही?”

“परंतु तो आपणास झिडकारीत असेल.”

“झिडकारू दे. खरे प्रेम निरपेक्ष असते. ते शेवटी काही मागत नाही. ते मुके असते. प्रिय वस्तूच्या आनंदात समाधान मानते व स्वत:चे दु:खही शेवटी विसरते. तो सुखी असो, असे ते प्रेम म्हणत राहाते.”

“तुम्ही कोणावर केले आहे प्रेम?”

“तुम्हांला काय वाटते?”

“मी काय सांगू?”

“माझे डोळे बघा. कसे दिसतात?”

“कसे म्हणजे?”

“कोठे तरी ते भरपूर प्रेम प्यायले आहेत असे दिसतात का? माझे डोळे प्रेमळ आहेत का कठोर आहेत?”

“मला ते काही समजत नाही. मी प्रेमाच्या जगात फार वावरल्ये नाही. प्रेमाच्या समुद्रात खोल जाण्याचे धैर्य मला कधी झाले नाही. उदयवर माझे प्रेम होते. परंतु त्याच्यासाठी घरदार सोडावे, आईबाप सोडावे असे मला वाटले नाही. उदयवर माझे थोडेसे प्रेम आहे असे कळताच बाबांनी झटपट माझे लग्न लावून टाकले. आणि मी आता एकाची पत्नी झाल्ये. आता संसार करायचा. राहायचे. मी साधी मुलगी आहे. जे मिळाले तेच आता गोड करून घ्यायचे.”

एकाएकी सरलेचे डोळे भरून आले. तिने तोंड फिरविले. ती खिडकीतून बाहेर पाहू लागली. तिने अश्रू पुसले. ती गंभीर झाली.

“काय झाले हो?”

“काही आठवणी आल्या.”

“तुम्ही दु:खी आहात. खरे ना?”

“जगात सुखी कोण आहे?”

“परंतु सुख मानून नको का घ्यायला?”

“मानीव सुखात काय अर्थ? सुखाचा झरा हृदयात निर्माण झाला पाहिजे. कृत्रिमतेत काय अर्थ? खर्‍या सुखाचा अखंड झरा लाभला पाहिजे.”

“मानवी जीवनात हे अशक्य आहे.”

“तर मग हे दु:खच बरे. कृत्रिम सुखापेक्षा, दु:ख पुरवले. खोटेच वरपांगी हसणे, खोटेच आनंदी स्वरूप दाखवणे, ते किती विद्रूप दिसते !”

“तुम्ही कल्याणहून कोठे जाणार?”

“मला नागपूरकडे जायचे आहे.”

“मग चला की आमच्याबरोबर. जळगावला आमच्याकडे राहा एक दिवस. मग जा. तुमच्याविषयी मला आस्था वाटते. काही तरी वाटते.”

“माझे अश्रू पाहून तुम्हाला कीव आली असेल.”

“काही असो. तुमच्याजवळ बोलावे, मनातले सांगावे, असे वाटते. मी कॉलेजमध्ये शिकत होत्ये. पुष्कळ मैत्रिणी होत्या. परंतु आम्ही वरवर हसत असू. मी मनातील सुखदु:ख कधी कुणाजवळ बोलल्ये नाही. तुमच्याजवळ आता किती बोलल्ये ! तुम्हाला आश्चर्य वाटले असेल.”

“माझ्या डोळयांमुळे तुम्हाला विश्वास वाटला असेल.”

“मग येणार ना आमच्याबरोबर?”

“कल्याण स्टेशनवर जर कोणी भेटले नाही तर येईन.”

“कोण येणार आहे?”

“एक मित्र.”

सरला व नलू दोघी मैत्रिणी झाल्या. नलूची आई उठली.

आणि आता घाटातून गाडी जात होती. पावसाळयाचे दिवस. अपार सृष्टिसौंदर्य दिसत होते. कधी कधी खाली खोल दर्‍यांत काहीच दिसत नसे. मेघांचे बुरखे घेऊन त्या दर्‍या उभ्या आहेत असे वाटत होते. दूर मध्येच डोंगर दिसत. जरा मेघपटले विरळ असली की सुंदर प्रवाह डोंगरांतून पडताना दिसत. किती पाहिले तरी तृप्ती होत नव्हती. खिडकीतून पाणी आत येऊ लागले. सर्व लोक खिडक्या लावू लागले. सरला व नली उघडया खिडकीशी तशाच होत्या.

“नल्ये, खिडकी लाव. पाणी बघ आत आले.” आई म्हणाली.

“असू दे ग उघडी.” नली म्हणाली.

“सारे केस भिजताहेत, बघ.”

“भिजू देत.”

“तू ऐकायची नाहीस.”

परंतु पाऊस जरा थांबला. सर्वत्र हिरवेगार दिसत होते. मध्येच बोगदा आला म्हणजे वाईट वाटे.
“सरलाताई, कशी आहे सृष्टी?”

“सुंदर आहे. सृष्टी नित्य नवीन आहे. सृष्टीचे स्वरूप बाराही महिने उजाड असे कधी नसते. परमेश्वर झाडांना, वृक्षवेलींना नवीन पालवी आणतो, त्यांना नटवतो, फुलवतो. सारी सृष्टी तो हिरवी हिरवी करतो. परंतु मानवी जीवन वर्षानुवर्ष कधी कधी उजाड असते.”

“मधून मधून आनंद नाही का मिळत?”

“कोणाच्या नशिबी कायमचेच दु:ख असते !”

“मला नाही असे वाटत. तुम्हाला कधी सुखाचे क्षण नाही मिळाले? एखादे वेळेस आपण सुखाच्या स्वर्गात आहोत असे वाटते. क्षणभर का होईना सुखाची हवा येते. जीवनाला टवटवी येते. केवळ दु:खमय असे जीवन असूच शकणार नाही. गरिबांतला गरीब घ्या. त्यालाही काही आनंद असतो. मुलांजवळ दोन शब्द बोलेल, आईबापांचे सुख असेल, एखादा मित्र असेल, तुम्हाला नाही माझे बोलणे पटत? खरे सांगा.”

“होय. मलाही सुखाचे क्षण मिळाले आहेत. आणि त्यामुळेच मी जिवंत आहे.”

नली तिकडे तिच्या वडिलांनी बोलावले म्हणून गेली. ते तोतापुरी मद्रासी आंबे फोडायला सांगत होते.

“बाबा, या आंब्यात किडा असतो हो.”

“तू खाऊ नकोस.”

“मला तर आवडतो आंबा. बाठीत आळी असते. ती म्हणे उडून जाते. गंमत आहे, नाही बाबा?”

“काप आधी. उगीच वटवट. जरा नीज म्हटले तर तिकडे बोलत बसली.”

“बाबा, ती माझी मैत्रीण आहे.”

“आगगाडीतली ना?”

“नाही काही. पूर्वजन्मीची.”

“तुझ्या आईला उठव.”

नलीची आई उठली. नलूने सर्वांना फाकी दिल्या. तिने सरलेलाही दिल्या. हात धुऊन नली पुन्हा सरलेजवळ बसली. परंतु सरला जरा दु:खगंभीर होती. बोलण्याच्या मन:स्थितीत ती नव्हती. तिच्या हृदयात अपार दु:ख होते. कालवाकालव होती. तिचे दु:ख त्यांना काय कळणार?

आणि कल्याण आले. सारी मंडळी उतरली.

“सरलाताई, येता का आमच्याबरोबर? तुमचे कोणी आले आहे का?”

“दिसत तर नाही कोणी.”

“मग चला आमच्याबरोबर. उद्याचा दिवस राहा व मग जा नागपूरला. ओळख दृढ होईल.”

भुसावळकडे जाणारी गाडी आली. गाडीत अपरंपार गर्दी होती.

“बाबा, मी व या सरलाताई बायकांच्या डब्यात जातो.”

“नको हो नल्ये.” आई म्हणाली.

“जाऊ दे. भीती कसली? जा एक वळकटी घेऊन.” वडील म्हणाले.

“आई, तू पण येतेस?”

“मी नाही येत.”

“आम्ही जातो.”

सरला नि नली बायकांच्या डब्यात बसल्या. थोडया वेळाने गाडी सुरू झाली. “सरलाताई, तुमचे दु:ख मला सांगता?”

“कसे सांगू? स्वत:चे दु:ख कोणाला सांगू नये.”

“आपल्याविषयी ज्याला सहानुभूती आहे त्यालाही सांगू नये का?”

“आपण आगगाडीत भेटलो. पुन्हा कोण कोणाला भेटणार आहे?” कशाला सांगू माझे पुराण? माझ्या जीवनात राम नाही. तुम्ही जरा पडा. तुमची आई म्हणत होती की कालचेही तुम्हाला जागरण आहे.”

“तुमच्या डोळयांवर झोप आहे.”

“माझी झोप कधीच उडून गेली आहे. मी तुमच्याबरोबर का येत आहे, मला समजत नाही. परंतु एकदा वाटते की, तुमच्याकडे स्वयंपाक करणार्‍या त्या बाईची खोली बघावी. रात्रंदिवस कष्ट करून आपल्या मुलाला वाढवणारी ती माता ! अशा मातेहून थोर दैवत कोणते?”

“उदयचे काय झाले तेही तेथे कळेल. उदय नि त्याची आई यांच्यावर एक गोष्ट लिहावी असे माझ्या मनात येते.”

“गोष्ट लिहिणार की काव्य लिहिणार?”

“बघू पुढे. मनात येते खरे.”

“परंतु उदय जिवंत असेल तर ! गोष्ट लिहिण्यासाठी तो मेलेला हवा ना !”

“लेखक म्हणजे खरा ब्रम्हदेव. वाटेल त्याला तो निर्मील, वाटेल त्याला मारील. केवढी इच्छासृष्टी ! नाही का?”

“मला त्याचा अनुभव नाही. या मायलेकरांची खरेच एक गोष्ट लिहा. मला ती आवडेल.”

“तुम्हांला मी ती पाठवीन. परंतु तुमचा पत्ता?”

“वर्तमानपत्रात तुमच्या पुस्तकाची जाहिरात येऊ दे. मी ते विकत घेईन.”

“मी भेट म्हणून पाठवीन.”

“तुमचे पुस्तक प्रसिध्द होऊ दे. मग तुमच्याकडे मी मागेन. तुमचा माहेरचा व सासरचा पत्ता देऊन ठेवा म्हणजे झाले.”

“गोष्टीत उदयचा फोटो घालीन. त्याला ती गोष्ट अर्पण करीन.”

“तुमच्याकडे त्याचा फोटो आहे वाटते?”

“एकदा तो आमच्याकडे आला होता. तेव्हा मी नकळत हळूच त्याचा फोटो काढून काढून घेतला होता. पुढे तो मोठा करून घेतला.”

“तो तुम्ही सासरी नेणार असाल?”

“दादाच्या खोलीतच असू दे. सासरी नको.”

“का?”

“त्यांना दुसरे काही वाटायचे.”

दोघी मैत्रिणी बोलत बसल्या होत्या. नली आता झोपली. सरला एकटी जागी होती. त्या डब्यात सारी झोपली होती. गाडी झपाटयाने जात होती. एखादे वेळेस सरलेच्या मनात खाली उडी टाकावी असे येई. एकदा तर ती उठली. ती दरवाज्याजवळ गेली. तिने दार उघडले. वारा जोराने वाहात होता. आणि घाटात पाऊस पडत होता. बाहेर अंधार होता. मध्येच खोल दरी येई. सरलेने दार पुन्हा मिटले. ती आपल्या खिडकीजवळ येऊन बसली. उदय भेटेल असे तिचे हृदय तिला सांगत होते. तिला बाळाची आठवण येत होती. तिने बाळाचे नावही ठेवले नव्हते. अनामिक बाळ ! बाळ रडत असेल. त्याला रात्री कोण आंदुळील? मुलावर आईचे प्रेम असते तितके कोणाचे असेल? तिच्या सहनशीलतेइतकी सहनशीलता कोणाजवळ असेल? सरलेचे स्तन दाटून आले. त्यांना जणू कळा लागल्या. परंतु कोणाला पाजणार ते दूध? ती रडू लागली. इतक्यात नली जागी झाली.

“हे काय? रडताशा तुम्ही?”

“आठवणी येतात. वाईट वाटते.”

“तुम्ही पडा जरा. खरेच पडा. माझ्या अंथरूणावर पडा.”

“माझी वळकटी आहे ती उघडते.”

सरलेने आपली वळकटी सोडली. आणि ती पायखान्यात गेली. इकडे नली सरलेची उशी नीट ठेवीत होती. तो त्या उशीवर तिला काय दिसले? सुंदर वेल. वेलीवर फुले नि दोन पाखरे ! एवढेच का तेथे होते? नाही. तेथे आणखी काही होते. तेथे दोन नावे होती ! उदय नि सरला !!

“म्हणजे? ही सरला कोण? उदयचीच की काय?” नली आश्चर्यचकित झाली. सरला आली. तो नलीच्या हातात ती उशी ! आणि अभ्य्राचा तो भाग वर ! सरला उभी राहिली. नली तिच्याकडे पाहात होती. सरलेचे डोळे भरून आले. ती अंथरुणावर बसली.

“सरलाताई?”

“काय?”

“तुम्ही कोण?”

“मी एक अभागिनी आहे. मला अधिक विचारू नका. दु:खाला जास्त खणू नये. जखमेला टोचू नये.”

“परंतु जखम बरी व्हायला हवी असेल तर?”

“काही जखमा दु:ख देणार्‍या असल्या तरीही त्या बर्‍या होऊ नयेत असे वाटत असते. काही दु:खे आपण विसरू इच्छीत नाही. ती सदैव ताजी असावीत, हिरवी असावीत असे वाटते. द्या ती उशी. मी पडते.”

“तुम्ही का माझ्या उदयच्या?”

“उदय का तुमचा आहे?”

“नाही, मी त्याच्यासाठी घरदार सोडले नाही. मी दुसर्‍याला माळ घातली. परंतु तो तुमचा आहे का?”

“हो. त्याच्यासाठी मी घरदार सोडले आहे. त्याला धुंडीत आहे. कोठे आहे तो? त्याला मी मनाने वरले आहे. त्याने मला वरले आहे. कोठे आहे तो?”

“जळगावला आपण त्याचा पत्ता काढू. त्याची स्मृती गेली आहे. मामा त्याला घेऊन गेले आहेत. परंतु कोणते गाव ते मला माहीत नाही. जळगावला कळेल. उदयची आई ज्या खोलीत राही, त्या खोलीच्या शेजारच्या लोकांना माहीत असेल. आपण काढू पत्ता. म्हणून वाटते तुम्ही नागपूरकडे जात आहात? म्हणून वाटते तुम्ही त्या स्वयंपाकीणबाईची चौकशी केलीत? हो ना? आता पाहू तुमचे डोळे? पुण्याकडून येताना म्हणालात, “माझे डोळे बघा प्रेम केल्यासारखे ते वाटतात का बघा.” बघू दे.”

असे म्हणून नलीने सरलेकडे प्रेमाने पाहिले. सहानुभूतीने पाहिले. सरलेचा हात तिने हातात घेतला.

“तुमच्या उदयची स्मृती गेली असली तर?”

“मला पाहताच त्याला स्मृती येईल. परंतु तो भेटला पाहिजे. दिलसा पाहिजे. तुम्ही त्याची व माझी भेट करवा.”

“मी कशी करवू भेट? बघू पत्ता कळला तर.”

“नलू, तू उदयचे नुसते डोळे पाहिलेस. मी त्याचे सारे जीवन पाहिले. अंतर्बाह्य पाहिले. नुसते पाहिले नाही, तर चाखले. माझा अणुरेणू त्याने व्यापला आहे. तुम्हाला काय सांगू?”

“तुम्ही भाग्यवान आहात.”

“होय? खरेच भाग्यवान. उदय न सापडला तरीही मी भाग्यवान आहे. त्याने मला अपार दिले आहे. मी स्वत:ला कशाला भाग्यहीन समजू? त्याच्या अनंत स्मृती माझ्याजवळ आहेत. त्याने मला प्रेमाचे शत स्वर्ग दाखविले. नंदनवनातून फिरविले. अमृताच्या समुद्रात आम्ही डुंबलो. परोपरीचे खेळ खेळलो. रडण्याचे, हसण्याचे खेळ. रुसण्या-रागवण्याचे खेळ. मी त्याला म्हणायची, “उदय, तुझे माझ्यावर प्रेम असेल तर गालावर चापट मार.” आणि तो हळूच मारी. मी त्याच्या नाकावर टिचकी मारी. गंमत किती तुम्हाला सांगू? शब्द अपुरे पडतील. हे पहा अंगावर रोमांच उभे राहिले. जणू माझ्या जीवनात तो नाचत आहे. माझा अणुरेणू फुलवीत आहे. हे काय नलू? तुला वाईटसे वाटले? तुला का माझ्या प्रेमाचा मत्सर वाटला? प्रेम मत्सरी असते, परंतु नलू, माझा मत्सर नको करूस. उदय सहज आला व माझ्या जीवनाचा राजा झाला. ना प्रयत्न ना काही. जणू आम्ही अनेक जन्मींची एकमेकांची होतो. इतक्या दिवस एकमेकांस धुंडीत होतो. जणू जागा चुकलो होतो परंतु परस्परांस आम्ही पाहिले व मिळून गेलो. नलू, तूही एक स्त्री, मीही एक स्त्री. स्त्रीला स्त्रीने नको का सहानुभूती दाखवायला? मी जन्मजात दु:खी आहे. तुला काय सांगू? उदयचा माझ्या जीवनात उदय झाला, नि माझ्या जीवनात प्रकाश आला. माझे नष्टचर्य आता संपले असे मला वाटले. जीवनाची अश्रुतपश्चर्या फुलली, फळली असे वाटले. परंतु दुर्दैव अद्याप पाठीशी आहे. उदय येतो असे सांगून गेला. परंतु ना त्याचे पत्र, ना पत्ता. मी कावरीबावरी झाल्ये. मी घरातून बाहेर पडल्ये आहे. भेटली प्रेममूर्ती तर ठीक नाही तर हा देह नर्मदा-तापीला, गंगे-गोदेला कोठे तरी अर्पण करीन. मला ते धैर्य येवो.”

“सरले !”

“काय?”

“पड जरा. माझ्या मांडीवर डोके ठेवून पड. मी नाही हो मत्सर करणार. मी कशाला मत्सर करू? मी त्याग केला असता तर मत्सर केला असता. माझ्या प्रेमाची गंगा ढोपरभरसुध्दा खोल नव्हती. तुझा प्रेमसागर आहे. धो धो करीत तो उचंबळत आहे. तू कसे वर्णन करीत होतीस? जणू कवयित्री झाली होतीस. तुझे अनुभवाचे बोल होते. खरे प्रेम तू चाखले आहेस आणि म्हणूनच घरदार सोडून बाहेर पडण्याचे धैर्य आले आहे. प्रेमाचे परमामृत चाखल्यामुळेच तू मरायलाही तयार होशील. कारण एरव्ही सारे जीवन तुला फिके वाटेल. जो एकदा अमृत प्यायला, तो का पुन्हा ओठाला कांजी लावील? जो उंच गगनात विहार करायला शिकला, तो का धुळीत लोळेल? सरले, तुझे प्रेमाचे निधान तुला मिळो. तुझा उदय तुला भेटो. दुसरे मी काय इच्छू? सुखी व्हा.”

दोघी मैत्रिणी स्तब्ध होत्या.

“सरले, नीज जरा. मी तुला थोपटते. तू उदयची होतीस म्हणून का मला तुझ्याविषयी काही तरी वाटे? जणू तुझ्या रोमरोमांत भरलेला उदय नकळतपणे मला दिसत होता. मला तुझ्याकडे ओढीत होता. तू केवळ सरला नाही उरलीस. उदय नि सरला या दोघांची मिळून तू मूर्ती बनली आहेस. उदयचे डोके माझ्या मांडीवर घेण्याचे भाग्य मला नाही. परंतु जिच्या मांडीवर उदयने डोके ठेवले असेल तिचे डोके तरी या मांडीवर मला घेऊ दे. ही मांडी कृतार्थ होऊ दे. ये सरले, नीज. तुला मी थोपटते.”

आणि नलीने सरलेला निजविले. तिने तिचे डोके आपल्या मांडीवर घेतले. ती तिला थोपटीत होती. गाणे गुणगुणत होती. आणि सरलेला झोप लागली. नलूने तिच्याकडे पाहिले.

“किती सरळ मुलगी ! खरेच सरला आहे. मनात ना मत्सर ना संशय. माझ्या हातात उशी पाहून संतापली नाही. चिडली नाही. तिला सारे प्रेमसुख आठवले. भराभरा सांगू लागली. जीवनात ओतप्रोत भरलेले मधुर, सुंदर प्रेम ! सरले, तू दु:खी असलीस तरी अभागिनी नाहीस. तुझ्याजवळ असे काही आहे की, ते कोणाला फारसे मिळत नाही. असे उत्कट प्रेम कोठे दिसणार, कोठे पाहायला मिळणार? अशा प्रेमाचे दर्शन म्हणजे दिव्यता आहे. अंधारातील झलक आहे. संसाराच्या बाजारातील ही उदात्तता आहे. स्वार्थी गोंगाटातील हे मधुर, मंगल संगीत आहे. सरले, सरलाताई, झोप हो. तुझा उदय तुला मिळेल हो.”

सरलेकडे तिने पाहिले. सरलेच्या मुखावर अपार कोमलता होती. ते पाहा ओठांवर स्मित. सरला का स्वप्नात आहे? गोड स्वप्न का पाहात आहे?

“ये राजा, तुला घेते हं. लबाडा, हसू नको. आधी पोटभर पी. नको रडू. मी तुला टाकून नाही हो जाणार.” असे शब्द ती स्वप्नात बोलत आहे. आणि तिच्या स्तनांतून दुधाच्या धारा सुटल्या. सरला जागी झाली.

“गेले बाळ ! कोणाला पाजू हा पान्हा?” ती म्हणाली.

“सरले ! सरलाताई !”

“काय?”

“काय झाले? स्वप्न का पाहिलेत?”

“माझे बाळ का केवळ स्वप्नमय ठरले? स्मृतीरूप झाले? आहे हो माझे बाळ. आणि त्याला सोडून मी जात आहे. त्याच्या पित्याला शोधायला. नलू, नलू, तुला काय सांगू? माझ्या बाळकृष्णाला मी पंढरपूरला ठेवून आल्ये आहे. उदयला शोधायला मी निघाल्ये आहे. नलू, माझी कीव कर, करुणा कर. माझे डोके पापी नाही हो. उचलू का डोके? का असू दे मांडीवर?”
“असू दे.”

“ही बघा दुधाची गळती ! कोठे आहे बाळ? स्वप्नात त्याला जवळ घेतले आणि दूध भरभरून आले. मुलाचा त्याग करणार्‍या कठोर व निर्दय मातेच्या स्तनांत कशाला दूध? दुधा, जा रे आटून.”

“सरले, दु:ख नको करू.”

“नलू, तू झोप आता.”

“आपण दोघी झोपू. तुझ्या उशीखाली माझी उशी ठेवते. आणि त्यावर डोकी ठेवून आपण दोघी पडू.” नलीने आपली उशी आणली. तिच्यावर सरलेची उशी तिने ठेवली. दोघी पडून राहिल्या. त्यांना झोप लागली.

चाळीसगाव स्टेशन आले होते. नलूचे वडील बायकांच्या डब्याशी आले. त्यांनी तिला हाका मारल्या. ती उठली.

“काय बाबा?”

“आता पाचोरे येईल. मग जळगाव. जाग्या राहा हा.”

गाडी सुटली. सरलाही आता उठली. दोघी मैत्रिणी हातात हात घेऊन बसल्या होत्या. आता एकमेकींकडे मध्येच पाहून मुक्यानेच त्या बोलत होत्या. दोघी पुन्हा जरा लवंडल्या. पाचोरे गेले. आणि जळगाव आले.

“नलू, जळगाव ग. ऊठ.”

“आले का?”

“हो.”

दोघींनी पटकन वळकटया बांधल्या. सारी मंडळी उतरली. सरलाही अर्थातच उतरली. घोडयाची गाडी करून सर्व मंडळी घरी आली. अद्याप रात्र होती. हातपाय धुऊन, चूळ भरून, अंथरूणे घालून सारी पुन्हा झोपली. सरला व नलू एकत्र झोपल्या होत्या.

सकाळ झाली. हळूहळू मंडळी उठली. नलू उठली. सरला झोपली होती. नलूने तिला उठवले नाही. आठ वाजले.

“सरलाताई !”

“काय ग?”

“ऊठ आता. उशीर झाला.”

“किती दिवसांनी इतकी झोपले.”

सरला उठली. तोंडधुणी, अंगधुणी झाली. सरलेने नीट कुंकू लावले.

“नलू, हे कपाळ पांढरे होते. उदयने त्यावर प्रथम कुंकू लावले.”

“ते कुंकू जन्मसावित्री होईल.”

दोघी मैत्रिणी द्वारकाबाईच्या खोलीकडे गेल्या.

“काय नलू, आलीस लग्न लावून?”

“होय रंगूताई.”

“तुझ्या लग्नात द्वारकाबाई नव्हत्या. तुम्हालाही चुकल्यासारखे झाले असेल. इतके दिवस तुमच्याकडे काम करीत होत्या. परंतु आजारी पडल्या आणि वारल्या. मुलाचीही भेट झाली नाही.”

“फार वाईट झाले. उदय उशिरा आला; होय ना?”

“हो. प्रेत न्यायला होता. परंतु तो स्मशानात घेरी येऊन पडला. त्याला शुध्द येईना. त्याचे मामा त्याला घेऊन गेले.”

“कोठे असतात त्याचे मामा?”

“तिकडे वर्‍हाडात, कोणते गाव बाई?”

“उमरावती, अकोले, खामगाव?”

“नाही. असे नाही.”

“मग कोणते?”

“थांबा, आठवले. पांढरकवडा. विचित्र नाव. तेथे ते पोलिसखात्यात आहेत.”

“तुम्ही बर्‍या आहात ना?”

“हो. आणि या कोण?”

“माझी मैत्रिण सरलाताई.”

“बसता का जरा?”

“नको, रंगूताई, पुन्हा येऊ.”

“कुंकू लावून जा हो, अशा नका जाऊ.”

रंगूबाईंनी दोघींना कुंकू लावले.

“यांचे अजून लग्न नाही वाटते झाले? मंगळसूत्र नाही.”

“मंगळसूत्र तुटले आहे.”

“अगं, आधी ओवा ते. अशा आधी हिंडायला काय निघाल्यात? तुम्ही नवीन मुली ! मंगळसूत्र तुटले तर ते ओवून पुन्हा गळयात घालीपर्यंत आम्ही जेवत नाही. जा आधी घरी. ओवा मंगळसूत्र.”

दोघी मैत्रिणी गेल्या. घरी आल्या. सरला नलीच्या खोलीत बसली होती. इतक्यात नली उदयचा फोटो घेऊन आली.

“हा बघा फोटो.”

“उदय ! माझा उदय !” असे म्हणून सरलेने तो फोटो हृदयाशी धरला. नली निघून गेली. सरला तो फोटो हृदयापाशी धरून पडून राहिली.

“सरले, चल जेवायला.”

“पोट भरले. खरे भोजन दिलेस. सुधारसाचे, अमृताचे.”

“असे नको करूस. दोन घास खा. मग आपण दोघी झोपू.”

दोघी मैत्रिणी जेवल्या.

“सरले, सुपारी हवी?”

“काही नको.”

“उदयला विडा खाता येत नसे. त्याचा विडा रंगत नसे. म्हणायचा, पुढे शिकेन.”

“आणि खरेच शिकला. मी विडा दिला की असा रंगायचा !”

“विडा रंगे की तो रंगे?”

“आम्ही दोघे रंगत असू.”

“आता पडायचे का जरा?”

“नलू, हा फोटो मला देशील? माझ्याजवळचे फोटो, सारी पत्रे मी चंद्रभागेत सोडून आल्ये. देशील का?”

“तुझ्या हृदयात रंगीत फोटो आहे.”

“परंतु भूक नाही शमत. बाहेरही काही दिसायला हवे असते. देशील का?”

“देईन. तुझ्याजवळ तो शोभेल.”

“मी आज रात्री जाऊ ना?”

“उद्या उजाडत गाडी आहे. तिने जा. पांढरकवडयास त्याच्या मामाकडे जा. पोलिसांजवळ चौकशी कर. टांगा करून सरळ पोलिसचौकीकडे जा. तेथे विचार. पत्र पाठव. तुझा उदय तुला भेटो. सुखी व्हा. त्याच्या आईचे आशीर्वाद का फुकट जातील?”

दुसर्‍या दिवशी सकाळच्या गाडीने सरला गेली. नलू निरोप द्यायला आली होती. गाडी सुटताना दोघीचे डोळे भरून आले. सरलेला आशा वाटत होती. उदय भेटेल. त्याला स्मृती येईल असे वाटत होते. परंतु त्याचा मामा काय म्हणेल? त्या मामाला आवडेल का? उदयने मला ओळखले की, माझे काम झाले. परंतु आधी सुखरूप भेटू दे. या डोळयांना तो दिसू दे.

आशा-निराशांवर हेलकावत ती जात होती. पांढरकवडयास कसे जायचे वगैरे सारी माहिती तिने घेतली होती. शेवटी पांढरकवडयास ती आली. तिने एक टांगा केला. टांगेवाल्याला उदयच्या मामाचे घर माहीत होते. त्याने नेमका टांगा केला. सरला त्याला म्हणाली, “टांगा जरा येथेच थांबव.” टांगेवाला थांबला होता. सामान टांग्यातच होते.

मामांची मुले बाहेर आली. मामी बाहेर आल्या.

“कोण पाहिजे तुम्हांला?”

“येथे उदय आहेत ना?”

“उदय गेला.”

“कोठे?”

“पुण्याला गेला.”

“ते आजारी ना होते? त्यांची स्मृती ना गेली होती?”
“परंतु अकस्मात स्मृती आली. तो एखादे वेळेस सरला सरला म्हणे-शेवटी आम्ही त्याची ट्रंक उघडली. तो तीत फोटो, पत्रे. तो फोटो त्याला दाखवताच तो ताडकन उठला. त्याला स्मृती आली. सारे त्याला आठवले. आश्चर्यच झाले.”

“ते केव्हा गेले?”

“ते त्याला जरा रागे भरले. आई इकडे आजारी असता तिकडे प्रेमात रंगला होतास असे बोलले. त्याला सहन झाले नाही. तो सामान घेऊन निघून गेला.”

“प्रकृती बरी होती का?”

“अशक्तता खूप होती. त्याला किती सांगितले की असा रागावून जाऊ नकोस. तरी तो गेला. तुम्ही कोण?”

“मी सरला.”

“अगबाई ! तुम्ही का त्या?”

“हो आई. यांचाच फोटो होता, त्यात.”

“मी जाते.”

सरला टांग्यात जाऊन बसली. केव्हा एकदा पुण्यास जाईन असे तिला झाले आहे. तो आता नक्की भेटणार. तिला आशा आली. ती आता वाटेत जळगाव वगैरे कोठेही उतरली नाही. सरळ पुण्याकडे निघाली. पुणे स्टेशन जवळ येत होते. परंतु उतरल्यावर कोठे जायचे? उदय कोठे असेल? त्या खोलीवर असेल का? त्या खोलीवरच प्रथम जाऊ असे तिने ठरवले. पुणे आले. तिने टांगा केला. ती त्या खोलीवर आली. तो विद्यार्थी खोलीत नव्हता. तेथे भैय्या होता.

“भैय्या, ते उदय येथे आले होते का?”

“आले होते, येथे सामान ठेवून गेले. पुन्हा आले व सामान घेऊन गेले.”

“किती दिवस झाले?”

“महिना झाला असेल.”

“कोठे गेले?”

“तुमच्या घरी गेले असतील. दुसरीकडे कोठे जाणार?”

सरलेला काय करावे कळेना. घरी जायचे का? उदय नक्की घरी गेला असेल. बाबांचे व त्याचे बोलणे झाले असले पाहिजे. बाबांना सारे कळले असेल. जाऊ या घरी. व्हायचे असेल ते होईल. तिने त्या टांगेवाल्याला थांबायला सांगितलेच होते. त्याच टांग्यात ती पुन्हा बसली व निघाली आणि घरी आली.

रमाबाई झोपल्या होत्या. विश्वासराव वाचीत पडले होते. सरला हळूच आत आली. पित्याने पाहिले.

“बाबा !”

“येथे का आलीस?”

“तुमची मुलगी म्हणून.”

“माझी मुलगी मेली !”

“बाबा, मुलीला क्षमा करा.”

“तुझे काळे तोंड मला दाखवू नको. तुझ्या जाराकडे तू जा.”

“बाबा काय बोलता? उदय माझा पती आहे.”

“चालती हो ! का मारू खेटरे?”

“बाबा, उदय कोठे आहे?”

तो मेला. तू मर.”

“सांगा कोठे आहे तो? तुम्ही त्याला काय सांगितलेत?”

“तुझ्या सरलेने जीव दिला असे सांगितले.”

“अरेरे ! बाबा, काय हे केलेत?”

“तूही लौकर जीव दे जा. त्याने जीव दिला असेल. म्हणाला, सरला नसेल तर मी तरी कशाला जगू? मी त्याला म्हटले, लौकर जीव दे. ती तुझी वर वाट पाहात असेल. मर लौकर. पडा नरकात, मारा मिठया.”

“बाबा !”

“नीघ येथून ! नीघ ! चांडाळणी, नीघ !”

“जाते बाबा. तुमचे पितृहृदय एक दिवस विरघळेल व “सरला, सरला” म्हणून टाहो फोडील.”

सरला घरातून बाहेर पडली. रमाबाई व विश्वासराव वरून बघत होती. कोठे जाणार सरला?

***

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED