रामाचा शेला.. - 11

रामाचा शेला..

पांडुरंग सदाशिव साने

११. सनातनींची सभा

येत्या रामनवमीस अस्पृश्य बंधुभगिनी नाशिकला सत्याग्रह करणार अशी वार्ता सर्वत्र पसरली होती. वर्तमानपत्रांतून ती आली होती. आणि ती गोष्ट खोटी नव्हती. अस्पृश्यांचे पुढारी नाशिक जिल्हयातील खेडयापाडयांतून हिंडत होते. सत्याग्रहाचा ते प्रचार करीत होते. महाराष्ट्रातील इतर जिल्हयांतूनही त्यांचा प्रचार सुरू झाला होता. शेकडो अस्पृश्य स्वयंसेवक येणार. सत्याग्रह करणार.

कशासाठी सत्याग्रह? राममंदिरात प्रवेश मिळावा म्हणून. रामरायाच्या रथाला हात लावता यावा म्हणून. अस्पृश्य म्हणजे का माणसे नाहीत? त्यांना देवाजवळ जाण्याचा हक्क नसावा? त्यांना सार्वजनिक ठिकाणी इतरांप्रमाणे का जाता येऊ नये? त्यांना स्पृश्यांच्या घरी का जाता येऊ नये? का बैठकीवर बसता येऊ नये? का पानसुपारी इतरांबरोबर खाता येऊ नये?

हा सारा चावटपणा आहे. हा धर्माला कलंक आहे. परंतु आमच्या लोकांच्या अद्याप ध्यानात येत नाही. जोपर्यंत आपण ही गुलामगिरी नष्ट करीत नाही, तोपर्यंत आपले पारतंत्र्य तरी कसे नष्ट होणार? अस्पृश्यांना स्पृश्यांविषयी का आपलेपणा वाटेल? हे अस्पृश्य परकी सत्तेला मिळतील. आणि स्पृश्यांनी केलेल्या जुलमाचा सूड उगवतील.

अस्पृश्य जनतेत सत्याग्रहाचा प्रचार होत होता, तर इकडे सनातनी मंडळींत हा सत्याग्रह हाणून पाडलाच पाहिजे म्हणून प्रचार होऊ लागला. हे धर्मावर संकट आहे. सरकारने धर्मरक्षण केले पाहिजे, आम्ही मरू परंतु अस्पृश्यांना रथाला हात लावू देणार नाही, मंदिरात येऊ देणार नाही अशा घोषणा सनातन्यांच्या सभांतून होऊ लागल्या.

वर्णाश्रम-स्वराज्य-संघाने मोठीच चळवळ सुरू केली. महाराष्ट्र प्रांतिक वर्णाश्रम-स्वराज्य-संघाची मोठी परिषद भरण्याचे ठरू लागले, आणि नाशिकलाच ती परिषद व्हावी असे सारे म्हणू लागले. विचारविनिमय झाला आणि नाशिकच ठरले. परंतु अध्यक्ष कोणाला करायचे? गब्बूशेटांचे नाव अनेकांनी सुचविले. रामभटजींनी त्या नावाचा फार जोराने पुरस्कार केला. ते म्हणाले,

“गब्बूशेटांसारखा मनुष्य मिळणे कठीण. किती उदार, किती धर्मशील ! दर महिन्याला नाशिकला येतात. रामरायाचे दर्शन घेतात. नवीन अलंकार प्रभूच्या अंगावर घालतात. फार थोर मनुष्य ! हजारांनी देणग्या त्यांनी दिल्या आहेत. स्वत:चा प्राणही देतील. ते प्रसिध्दीपराड्:मुख आहेत. परंतु गब्बूशेट म्हणजे झाकले माणिक आहे. अस्पृश्य सत्याग्रह करणार हे ऐकून त्यांच्या पायाची आग मस्तकाला गेली आहे. “या गोष्टीला आळा पडलाच पाहिजे. प्रतिकार झालाच पाहिजे. प्रचंड चळवळ केली पाहिजे” असे ते म्हणाले. ते अध्यक्ष होतील. आपल्या चळवळीस भरपूर मदतही देतील. चळवळ म्हटली म्हणजे पैसे हवेत, पैशांशिवाय काही चालत नाही.”

शेवटी गब्बूशेट अध्यक्ष ठरले. त्यांना तसे कळविण्यात आले. परिषदेची तयारी जोराने सुरू झाली. भव्य मंडळ घालण्यात आला. विद्युद्यीपांची व्यवस्था झाली. विद्युत्पंखेही होते. आणि स्वयंसेवकपथके तयार झाली. त्यांना भगव्या टोप्या देण्यात आल्या. नाशिक शहर गजबजून गेले. तिकडे हरिजनवस्तीतही रोज सभा होत होत्या. त्यांनीही प्रांतिक सत्याग्रह परिषद नाशिकला भरविण्याचे ठरविले. इकडे सनातनींची सभा; तिकडे अस्पृश्यांची. दोन्ही बाजूंस तयारी होत होती.

गब्बूशेट आज मुंबईहून येणार होते. त्यांची मोठी मिरवणूक निघायची होती. त्यांच्या बंगल्यापासून तो अधिवेशनस्थानापर्यंत ही मिरवणूक होती. शेटजींच्या बंगल्याजवळ ती पाहा गर्दी. ती पाहा धार्मिक पागोटी ! गंधे, भस्मे, यांची गर्दी आहे. शेटजींची मोटार आली. “सनातन धर्म की जय” म्हणून आरोळी झाली. शेटजींस हार-तुरे घालण्यात आले. एका शृंगारलेल्या मोटारीत त्यांना बसवण्यात आले. बँड वाजू लागला. सनातनी मंडळी निघाली. वाटेत गब्बूशेटांच्या गळयात हार पडत होते. नमस्कार करून त्यांचे श्रीमंत हात दुखू लागले.

मिरवणूक संपली. शेटजी परत आपल्या बंगल्यावर आले. तेथे रामभटजी होतेच.

“भटजी, मला जरा बरे वाटत नाही. विषयनियामक मंडळाची सभा तुम्हीच तिकडे घ्या. कोणीतरी तात्पुरता अध्यक्ष करा. मी फक्त उद्या अध्यक्षीय भाषण करणार आहे. ते एका विद्वानाकडून नीट लिहून घेतले आहे. वर्णाश्रमधर्माचे त्यात मंडण आहे. सनातन धर्माची बाजू त्यात उत्कृष्टपणे मांडलेली आहे. खरेच एक राहिले. रामरायासाठी एक अत्यंत मूल्यवान शेला मी आणला आहे. प्रभूच्या अंगावर तो घाला. प्रभूची मूर्ती त्याने किती सुंदर दिसेल ! आज रात्रीच्या पूजेच्या वेळी तो शेला प्रभूच्या अंगावर झळकू दे. मी येईनच.”

“आणि आज रात्री तिकडे येणार का?”

“काय तिकडे येऊन करायचे? नुसते दर्शन आता पुरे. हे काय थोतांड त्या पोरीने चालविले आहे? कसली जीव देते नि काय? आज जर ती माझी झाली तर परिषदेस पाहा कसा जोर येईल तो. मी रात्रंदिवस तिच्यासाठी झुरतो आहे. तुम्ही मला अध्यक्ष केलेत. परंतु मी मनाने जणू मेलेला आहे. त्या सुंदरीचे अधरामृत मिळाल्याशिवाय माझ्यात चैतन्य येणार नाही. तुम्ही वाटेल ते करा. तिचा धाक घाला. लालूच दाखवा. परंतु आज मनोरथ पूर्ण करा. म्हणजे तुमची परिषद यशस्वी झालीच समजा.”

“आज माझी सारी पुण्याई मोजतो. मीच जरा सबुरीने घ्या म्हणत असे. तेथली मंडळी तर अधीर आहेत. दोन थोबाडीत दिल्या की आता नरम येईल.”

“द्या थोबाडीत. मी मग त्यावर मलम लावीन.”

“जातो. शेला कोठे आहे?”

रामभटजींजवळ. तो शेला देण्यात आला. ते गेले. शेटजी जरा थकले होते. ते गादीवर पहुडले. तिकडे विषयनियामक मंडळाची बैठक जोरात सुरू होती. धर्ममार्तंडांची भाषणे सुरू होती. आमच्या धर्मात ढवळाढवळ होता कामा नये. इंग्रज सरकारने आजपर्यंत धर्मरक्षण केले. परंतु यांच्या राज्यात आता सनातन धर्मावर गदा येणार असेल, तर आम्ही पवित्र बंड उभारू. त्यासाठी धर्मसेना उभारू. तुरुंगातच काय, मृत्यूच्या दारातही जावयाची आमची तयारी आहे वगैरे शब्द ठरावांवर भाषणे होताना उच्चारले जात होते. कोणते ठराव घ्यावयाचे ते एकदाचे ठरले.

इकडे सनातनींची अशी गर्दी होती. तिकडे अस्पृश्यांचीही जोराची हालचाल होती. त्यांचेही अध्यक्ष आले होते. त्यांचीही मिरवणूक निघाली होती. नाना वाद्ये होती. त्यांनीही बँड आणला होता, म्हारकी वाद्ये होती. लेझीम होती त्यांचाही उत्सव अपूर्व होता. मिरवणुकीनंतर त्यांचीही विषयनियामक मंडळाची बैठक सुरू होती. आणि सरकारनेही तयारी ठेवली होती. ठायी ठायी पोलिस होते. सशस्त्र तुकडया हिंडत होत्या. आमच्या भांडणावरच परकी सत्ता कशी जगते ते दिसून येत होते.

 दिवस संपला. रात्र आली. शेटजी राममंदिरात गेले. तो अमोल शेला रामरायाच्या अंगावर झळकत होता. विद्युत्प्रकाशात तो फारच सुंदर दिसत होता. किती नयनमनोहर दिसत होते प्रभूचे ध्यान ! हजारो लोक बघत होते, हात जोडीत होते. ती मूर्ती अस्पृश्यबंधूंनी पाहिली असती तर का ती विटाळली असती? सूर्याकडे पाहिल्याने का सूर्य बाटतो, विटाळतो? अडाणी लोक !

शेटजी दर्शन घेऊन बंगल्यात आले. त्यांनी थोडा फलाहार केला. नंतर त्यांनी फारच सुंदर पोषाखा केला. नाना अलंकार त्यांनी अंगावर घातले. कपडयांना अत्तराचा वास येत होता. शेटजी नवरदेवाप्रमाणे नटून बसले होते. परंतु अद्याप रामभटजी का येत नाहीत? ते कोठे गुंतले?

ते त्या कुंटणखान्यात गेले आहेत. पूजा आटोपताच ते गेले. ते पाहा सरलेजवळ ते बोलत आहेत आणि ती दुष्ट दांडगी बयाही तेथे आहे.

“तुम्ही निमूटपणे ऐका. आजपासून सुरू करा धंदा. आजचा दिवस चांगला आहे. कसले व्रत नि काय? आम्ही काय बोळयांनी दूध पितो? आज शेटजी येतील. हसले पाहिजे. त्यांना जवळ घेतले पाहिजे. हा शेला अंगावर घे. बघ तरी तो शेला. त्याच्यावर दृष्टी ठरत नाही ! अग पोरी, तुझ्यासाठी रामरायाच्या अंगावरचा हा शेला मी आणला आहे. या शेल्याने तुझी मूर्ती अधिकच शोभेल. घे तो शेला. तुझे भाग्य उगवले. तुला कसला तोटा पडणार नाही. तो शेटजी नुसता वेडा झाला आहे तुझ्यासाठी. आमच्यासारख्याची गोष्ट सोड. परंतु असा लक्षाधीश तुझे पाय चेपायला येत आहे. समजलीस?”

“भटजी, नका हो असे बोलू. मला वाचवा. मला येथून न्या. मला गंगेत जीव देऊ दे.”

“येथे डोके फोडून जीव दे. जीव द्यायची तयारी असती तर येथे कधीच देतीस. चावट कुठली ! ठमाबाई, हिला तयार ठेवा. दोन द्या थोबाडीत. तो शेला तिच्या अंगावर असू दे.”

“तुम्ही जा. मी करत्ये तिला तयार अन् ठेवत्ये नीट समजावून. नाही तर आहे वेताची छडी ! मी कधीची म्हणत होत्ये की चौदावे रत्न दाखवावे. चाबकाने फोडून काढली असती की केव्हाच पलंगावर बसली असती. जा तुम्ही.”

“सरले, हट्ट नको करूस. आजपर्यंत मी तुझी बाजू घेतली, तुला निरनिराळया वस्तू आणून देत असे. तू त्या दूर फेकीत असस. हा रामरायाचा पुजारी खरा तुझाच पुजारी आहे. रामाची पूजा करताना मला तूच दिसतेस. आज रामाच्या अंगावर हा शेला घालताना तुझी ही नाजूक मूर्ती डोळयांसमोर येई. रामाचे सारे तुला देईन. रामरायाचे अलंकार तुझ्या अंगावर घालीन. त्या दगडाच्या मूर्तीला अलंकारांचा काय आनंद? खरे ना? तू माझ्यावरही प्रसन्न हो. आधी शेटजी. परंतु मागून तरी मी. नाही म्हणू नकोस. मी जातो. गुण्यागोविंदाने नटून तयार राहा.”

 भटजी गेले. आणि त्या दुष्टेने खरेच सरलेच्या थोबाडीत मारल्या. सरला रडत होती. परंतु एकदम सरला गंभीर झाली. कोठून तरी तिला धैर्य आले. ती अश्रू पुसून म्हणाली, “काय काय करू सांगा. सारे करायला मी तयार आहे.”
“अश्शी. आता कशी ताळयावर आलीस. चल, तुला नटवते. चल.”

सरलेला तेथील पध्दतीप्रमाणे शृंगारण्यात आले. केसांत फुलांचे गजरे होते. तिच्या अंगावर तो शेला देण्यात आला होता आणि मंचकावर ती बसली होती. तिने विडा खाल्ला. ओठ लाल झाले. सरला एखाद्या अप्सरेप्रमाणे दिसत होती.

“तो शेट सारी इस्टेट तुझ्यावरून ओवाळून टाकील. नीट हस. नीट वाग. वेडीवाकडी वागलीस तर याद राख. उद्या चामडी लोळवीन. फोडून काढीन. समजलीस? पुष्कळ लाड झाले. यापुढे सोंगेढोंगे बंद ! तुझ्याकडे मोठे गिर्‍हाईकच येत जाईल. परंतु काही केले पाहिजे की नाही?”

असे दरडावून ती ठमा गेली. सरला तेथे बसली होती. तिच्या तोंडावर अपार तेज होते. कोठून आले ते तेज? का तिच्या आत्म्याचे तेज होते? तिच्या पवित्र निश्चयाचे तेज होते? पहा तरी तिच्या मुखाकडे. जणू एखादी देवता दिसत आहे. तिच्या तोंडावर दृष्टी ठरत नाही. दृष्टी दिपून जाते व तिच्या चरणांकडे वळते.

भटजी शेटजींकडे आले.

“चला शेटजी. शंभर टक्के फत्ते काम !”

“तर मग आता तुमची परिषदही यशस्वी होणार.”

“चला. उशीर नको.”

“माझी तयारी आहे. केव्हापासून सजून बसलो आहे. जय देवा !” आणि मोटार आली. भटजी व शेटजी आत गेले. एक मैफल तेथे चालली होती. गाणे, बजावणे, नाचरंग चालू होता. परंतु शेटजींचे बडे काम होते. रामभटजी त्यांना थेट आत घेऊन गेले. त्या शृंगारलेल्या खोलीत ते आले. तेथे सरला होती.

“हे शेटजी सरले, हे लक्षाधीश आहेत. यांना खूष कर.” भटजी म्हणाले.

“भटजी, तुम्ही जा.” शेटजी म्हणाले.

भटजी गेले. ती बया गेली. शेटजींनी दार लावून घेतले. ते त्या मंचकावर बसले. सरला स्तब्ध होती.

“असा रूसवा का? बोला.”

“शेटजी, काय बोलू?”

“गोड गोष्टी बोला. जवळ या. किती वेळ दूर बसणार? ही घ्या पट्टी. पंचवीस रुपयांची नुसती ही पट्टी आहे. घ्या.”

 “शेटजी मी तुमची मुलगी आहे. का वेडेवाकडे बोलता? माझ्या मनात नाही हो काम. मी येथे संन्यासिनी आहे. मला येथे फसवून आणण्यात आले. मी रात्रंदिवस रडत आहे. तुम्हाला नाही दया येत? पाहा बरे माझ्या तोंडाकडे, पाहा माझ्या डोळयांकडे. आहे का तेथे विषयवासना? मी या पलंगावर नाही बसल्ये, जणू निखार्‍यांवर बसल्ये आहे. परंतु हे सामर्थ्य कोणी दिले ते आहे का माहीत? या मंचकावर आज मी बसल्ये, श्रध्देने व विश्वासाने बसल्ये. माझ्याकडे येणार्‍या शेटजींना मी परावृत्त करीन, पवित्र करीन, अशा निश्चयाने मी येथे बसल्ये. कोठून आला हा निश्चय? सांगू? ऐका. हा पहा शेला. किती सुंदर व नाजूक शेला ! परंतु हा कोठून आला माहीत आहे? हा रामाच्या अंगावरचा शेला. ते भटजी मघा आले व हा शेला देऊन गेले. म्हणाले, “रामरायाच्या अंगावर तो नाही शोभत. तुझ्या अंगावरच शोभेल.” शेटजी, तो भटजी रामरायाचा पुजारी आहे. दिवसा रामाची पूजा करतो आणि रात्री येथे येतो. कधी मला भीती घालतो, कधी गोड बोलतो. “रामरायाचे सारे अलंकार तुझ्या अंगावर घालीन” असे म्हणाला. काय हे पाप ! काय हा अधर्म ! शेटजी, परंतु हा शेला आला व मला धीर आला. जणू माझी अब्रू वाचवण्यासाठी या शेल्याच्या रूपाने प्रभूच आला असे वाटले. प्रभू मला तारणार, मुक्त करणार, अशी आशा वाटली. मी हा शेला अंगावर घेतला. माझा अणुरेणू जणू पवित्र होत होता. सारे अंग रोमांचित होत होते. थरारत होते. जणू सारे मालिन्य जळून जात होते. रामरायाच्या अंगावरचा शेला ! शेटजी पाहा, या शेल्याकडे पाहा. तुमची दृष्टी निवळेल. तुम्ही पवित्र व्हाल. घेता हातात? हा घ्या.”

असे म्हणून तिने तो शेला शेटजींच्या अंगावर टाकला शेटजींनी तो शेला नीट न्याहाळून पाहिला. त्यांनी क्षणभर डोळे मिटले. पुन्हा त्यांनी तो शेला नीट पाहिला.

“शेटजी पाहा, नीट पाहा. जरा अंगावर घ्या. तुमचे डोळे निवळत आहेत. तुमची चर्या बदलत आहे. वासना जळून विवेक तुमच्या जीवनात येत आहे. होय ना? पाहा. त्या शेल्याकडे नीट पाहा. रामरायाच्या अंगावरचा पवित्र शेला ! प्रभूच्या स्पर्शाने पुण्यवंत झालेला !” 

“हा शेला रामभटजींनी आणून दिला?”

“हो. तुम्ही येण्यापूर्वी दिला आणून. मला म्हणाले, “ते शेटजी येतील तेव्हा अंगावर घेऊन बस. नुसती रंभा दिसशील.”

“हा शेला रामरायाला मीच आज दिला होता. सायंपूजेच्या वेळेस प्रभूच्या मूर्तीच्या अंगावर तो मी पाहिला होता. किती रमणीय दिसत होती प्रभुमूर्ती !”

शेटजी तुम्ही दिला होतात हा शेला? रामाला दिला होतात? प्रभूला अर्पिला होतात?”

“होय. शंकाच नाही. तोच हा शेला.”

“शेटजी, काय आहे हे सारे? तुम्ही रामाला शेला देता आणि पुन्हा या कुंटणखान्यात येता? तुम्ही सायंकाळी प्रभूची मूर्ती पाहून आलेत. या तुम्ही दिलेल्या शेल्यात नटलेली प्रभूची मूर्ती पाहून आलेत. आणि आता माझी ही माती पाहायला आलेत ! शेटजी हा धर्म की अधर्म? हा दंभ आहे. ही वंचना आहे. स्वत:ची व जगाची ! तुम्ही धार्मिक म्हणून मिरवत असाल, देवाचे भक्त म्हणून मिरवत असाल; परंतु तुमचे खरे स्वरूप किती ओंगळ आहे? घ्या. तो शेला जवळ घ्या. हृदयाशी धरा. हृदयातील खळमळ जळून जावो.”

 शेटजी तेथे विचार करीत बसले. तो शेला त्यांच्या हातात होता. अजामीळाच्या उध्दाराचा क्षण आला होता. शेटजींच्या जीवनात क्रांती होण्याची वेळ आली होती. परमेश्वर हा सर्वांत मोठा क्रांतिकारक आहे. तो केव्हा, कशी, कोठे क्रांती करील त्याचा नेम नाही. कधी एखादे फूल दाखवून तो क्रांती करील; कधी एखादे निष्पाप बालक दाखवून तो क्रांती करील; हजारो साधने. हजारो मार्ग. प्रत्येक क्षणाला प्रत्येकाच्या जीवनात क्रांती, उत्क्रांती होत आहे. परंतु काही क्षण महाक्रांतीचे असतात. एकदम मोठी उडी असते. जणू नवजन्म होतो. कायापालट होतो. माकडाचा एकदम मानव होतो. तो महान क्रांतिकारक दिसत नाही. त्याला स्थानबध्द करता येत नाही. फाशी देता येत नाही. परंतु त्याचे महान क्रांतिकार्य या अखिल विश्वात सारखे चालू आहे.

तो आता रंगमहाल नव्हता. ते काम-मंदिर नव्हते. खरोखरच प्रभूचे ते मंदिर बनले. प्रभूचा शेला तेथे होता. त्या शेल्याच्या दर्शनाने, स्पर्शनाने दोन जीव मुक्त होत होते.

“शेटजी, विरघळलेत तुम्ही? तुमच्या डोळयांतून गंगा-जमुना वाहात आहेत. तुम्ही शुध्द होत आहात. तुमचे मोह झडून जात आहेत. मला तुमची मुलगी माना. मला येथून न्या. या नरकातून मला मुक्त करा. अद्याप मी निष्कलंक आहे. आजपासून अध:पातास आरंभ होणार होता. परंतु प्रभू धावून आला. त्याने आपला शेला पाठवला. त्याने वाचवले. आता तुम्ही मला कायमची वाचवा. मी तुमच्या पाया पडते. मला कोणी नाही. मला धर्मकन्या माना. नाही म्हणू नका. मला पदरात घ्या.”

सरलेने शेटजींचे पाय धरले.

“माझे पाय नको धरूस. हे पापी पाय आहेत. त्या प्रभूचे पाय धर. सरले, तू माझी मुलगी हो. तू मला मुक्त केलेस. तू सन्मार्ग दाखवलास. तू माझी गुरू आहेस, सद्गुरू आहेस. कामलीलेसाठी आलो. तू रामलीला दाखवलीस. मला जागे केलेस. प्रकाश दिलास. यापुढे तरी जीवन निर्मळ होवो.”

“तुम्ही मला येथून नेता ना?”

“आताच नेतो. बरोबर घेऊन जातो असे सांगतो.”

शेटजी उठले, त्यांनी दार उघडले. ते त्या मैफलीकडे आले. रामभटजी उठून आले.

“आनंद मिळाला की नाही?”

“अपार आनंद ! असा आनंद कोणाला कधी मिळाला नसेल ! भटजी, तिला माझ्या मोटारीतून बंगल्यावरच नेतो. पहाटे परत पाठवितो.”

“तुम्ही अध्यक्ष आहात. बंगल्यावर कोणी येईल, जाईल. फजिती व्हायची !”

 “कोणी येत नाही, जात नाही. आणि लोकांना का माहीत नाही? मोटार येथे येते ते का ठाऊक नाही? परंतु पैशाने पापावर पांघरूण पडते. नेऊ का? जातोच घेऊन. तिच्या संगतीचा आज भरपूर आनंद लुटू दे. परंतु येथल्या गलबल्यात नको.”

“जा घेऊन. मी सांगतो.”

रामभटजी काही बोलणेचालणे करून आले. शेटजींनी खिशातून हजाराची नोट काढून दिली.

“इतके कशाला शेटजी?”

“घ्या हो. लाखाची नोटही असती तरी दिली असती !”

सरला निघाली. शेटजींच्या पाठोपाठ तो शेला अंगावर घेऊन निघाली. खाली मोटार होती. मोटारीत बसून दोघे गेली. बंगला आला. शेटजी व सरला गच्चीत बसली होती. आकाशातून अनंत तारे प्रेमाने त्यांच्याकडे पाहात होते. सरलेने शेटजींना सारी हकीकत सांगितली आणि शेवटी म्हणाली,

“मला तुमची मुलगी माना. मुंबईस कोठे काम द्या. मी शाळेत शिकवीन आणि माझा बाळ पंढरपुराहून घेऊन येईन. बाळ वाट पाहात असेल.”

“तुझी सारी व्यवस्था करीन. माझ्याच मुलींना तू शिकव. राहायला स्वतंत्र जागा देऊ. तुझ्या बाळाला घेऊन येऊ. सरले, उद्या आमची परिषद आहे. वर्णाश्रम परिषद. काय तेथे सांगू, काय बोलू? एक शब्दही माझ्याने बोलवणार नाही. कसला हा धर्म ! शिवाशिवीचा धर्म ! श्रेष्ठ-कनिष्ठपणाचा, भेदांच्या बुजबुजाटाचा धर्म ! आम्ही अशी पापे करीत आहोत, आणि पुन्हा धार्मिक म्हणून मिरवत आहोत ! अस्पृश्य बंधू देवाच्या दर्शनाला येऊ इच्छितात. आणि आम्ही त्यांना विरोध करणार. आणि आमच्या देवांचे रामभटजींसारखे पुजारी, आणि माझ्यासारखे भक्त ! आमच्यापेक्षा ते अस्पृश्य शतपटींनी पवित्र असतील. त्यांच्यात दंभ, असत्य, अहंकार, आळस कितीतरी कमी असेल. जगात कोणी अस्पृश्य व्हायला लायक असतीलच, तर ते आम्ही. वरचे प्रतिष्ठित वर्ग. पापे करून वर पुन्हा धार्मिक म्हणून मिरविणारे ! लोकांना लुबाडून लाखोंची कमाई करून रामरायाला शेला देणारे ! आयाबहिणींची अब्रू घेऊन “रामा हो” म्हणून ओरडणारे ! सरले, तू माझ्या डोळयांत अंजन घातलेस. तुझे पाय धरू दे.”

“शेटजी, मी तरी कोठे अगदी निर्दोष आहे ! आपण सारी चुकणारी माणसे. आपण प्रभूचे पाय धरू. आणि तुमच्यातही काही चांगुलपणा आहेच. तुम्ही केवळ कामांध असता तर हा शेला पाहून का विरघळलेत; मी निमित्तमात्र. प्रभूचे आभार मानू, त्याच्या पाया पडू.”

“उद्या परिषदेत हे तोंड कसे दाखवू?”

 “शेटजी, तुम्ही तेथे जा आणि थोडया वेळाने मीही येईन. मला तुम्ही तेथे येऊ द्या. मी तेथे बोलेन. तुमच्या आधी बोलेन. तुम्ही परवानगी द्या. आणि मागून तुम्ही बोला. सांगा की राममंदिरात जायला आपणच लायक नाही. लायक कोणी असलेच तर ते अस्पृश्य आहेत. आणि परिषद संपवा.”

“तू म्हणतेस तसेच करावे. अत:पर माझ्या आयुष्याला निराळे वळण लागो. खरा धर्म जीवनात येवो. सरले, तू आता जरा झोप, तुला एक स्वतंत्र खोली देतो. तू आता माझी धर्मकन्या आहेस. निश्चिंत राहा. सारे चांगले होईल.”

“शेटजी, मी येथेच जरा बसते.”

“परंतु तुझी व्यवस्था करून ठेवतो. झोप आली म्हणजे तुझ्या खोलीत जा. चल, तुला दाखवून ठेवतो.”

सरला आपली खोली पाहून आली. आणि त्या गच्चीत ती बसली. सभोवती सारे शांत होते. वरती तारे होते. तिने प्रभूचे आभार मानले. तिचे डोळे भरून आले. तो शेला तिच्याजवळ होता. तो शेला ती मस्तकी धरी, हृदयाशी धरी. मुक्ती देणारा शेला ! नरकातून बाहेर काढणारा शेला ! रामरायाच्या अंगावरचा शेला !

“आणि आता बाळ आणीन, त्याला वाढवीन, उदय, तू रे कोठे आहेस? खरेच का तू या जगाला सोडून गेलास? का असशील कोठे? का मधूनमधून हृदयात आशा बोलते? तू का नकळत माझा सांभाळ करीत आहेस? तू का सर्वांना प्रेरणा देत आहेस? उदय, आता तू येऊन भेट. म्हणजे सारे मंगल होईल. मग सरलेचे भाग्य खरेच खुलेल. ती अभागिनी नाही राहणार, विषवल्ली नाही राहणार. देवा, दे रे माझा उदय ! माझे शील राखलेस, माझे सौभाग्य नाही का राखणार?”

असे ती मनात म्हणत होती. शेवटी ती उठली व अंथरुणावर येऊन पडली. परंतु भावना इतक्या उसळल्या होत्या की झोप लागणे शक्य नव्हते. सकाळच्या सभेत काय सांगायचे याचा ती विचार करीत होती. तिला जणू शत जिव्हा फुटल्या होत्या. तिच्या प्रतिभेला पंख फुटले होते. अंथरूणात पडल्या पडल्या ती व्याख्यान देत होती. परंतु ते सारे सकाळी आठवेल का? आणि एकाएकी पुन्हा तिला बाळ आठवला. “तो मोठा झाला असेल. रांगू लागला असेल. चालूही लागला असेल. परंतु कोण शिकवील त्याला चालायला? कोण धरील त्याचे बोट? आणि आई, बाबा असे म्हणायला कोण शिकवील? कोणी केले असेल त्याचे उष्टावण? त्याला कधीच अन्न द्यायला लागले असतील. तेथे दूध किती कोण पुरवणार? आता भेटेल माझे बाळ. आईला ओळखील का तरी? त्याला पाहताच पुन्हा दूध येईल का? पाजीन का मी त्याला?” अशा विचारात ती रमली. पहाटे तिचा डोळा लागला आणि गोड स्वप्न पडले- “उदय, जवळ येऊन उभा आहे. हळूच येऊन पाठीमागून डोळे झाकीत आहे.” सुंदर स्वप्न. ती जागी झाली. पहाटेची स्वप्ने खरी होतात ना? तिने आजूबाजूस पाहिले. कोठे आहे उदय? तिकडे सूर्योदय होण्याची वेळ होत आली होती, शेटजी उठले होते. ते सरलेकडे आले.

 “ऊठ बेटी. आली होती का झोप?”

“शेटजी, पहाटे पडलेले स्वप्न खरे होते ना?”

“देवाच्या मनात असेल तर सारे खरे होते. कसले स्वप्न पडले?”

“माझा उदय आल्याचे.”

“येणार असेल. दु:खापाठीमागून दु:खे येतात, त्याप्रमाणे सुखापाठीमागून सुखेही येतात. जीवनात असे हंगाम कधी कधी येतात. सारखे सुखाचे हंगाम ! सारखे दु:खाचे हंगाम ! कोठला वारा कधी येईल त्याचा काय नेम? कधी वासंतिक वारा तर कधी गारठून टाकणारा शिशिर ऋतूतील वारा ! काल माझ्या आत्मचंद्राचे ग्रहण सुटेल अशी होती का मला कल्पना? आणि तू मुक्त होशील अशी तुला तरी होती का कल्पना? जगात आश्चर्ये आहेत; योगायोग आहेत. पुण्य करायला जावे तर हातून पाप होते. पाप करायला जावे तर उध्दाराची वेळ येते. ऊठ बेटा. तू येथेच राहा. सभेला मागून थोडया वेळाने ये. हे तुझेच घर. बागेत हिंड, फीर.”

“परंतु कोणी परत नेणार तर नाही?”

“त्याची नको काळजी. तू निश्चिंत राहा.”

शेटजी गेले. आणि सरलाही उठली. प्रातर्विधी करून तिने मंगल स्नान केले. तिने केस नीट विंचरले. प्रसन्न कुंकू लावले. आज तिच्या मुख-मंडळावर अपूर्व पावित्र्य दिसत होते. एक सात्त्वि सौम्यता तेथे फुलली होती. प्रात:काळी फुले कशी मंदमधुर फुललेली असतात ! तशी ती दिसत होती. ती आपल्या खोलीत गेली. प्रभू रामचंद्राचे तिने ध्यान केले. आज आठ महिने तोच तिचा आधार होता. त्यानेच तिला वाचवले होते. धीर दिला होता. तिला आज आश्चर्य वाटत होते. ते पापी इतके दिवस आपल्या वाटेस का गेले नाहीत? मी जीव देईन किंवा वाघीण होईन, नागीण होईन, चावा घेईन, दंश करीन, असे खरेच का त्यांना वाटे? काय असेल हे सारे? प्रभूची कृपा. खरेच त्याची कृपा. सरलेने डोके टेकले. विश्वंभराची निराकार मूर्ती तेथे तिला दिसत होती. त्या मूर्तीकडे डोळे मिटून ती पाहात होती.

शेटजींना नेण्यासाठी मंडळी आली. रामभटजीही आले. शेटजी मोटारीत बसून गेले. सकाळची साडेआठ वाजण्याची वेळ होती. नऊ वाजता प्रकट परिषदेस सुरुवात होणार होती. सभामंडप भरून गेला होता. सारी सनातनी पुण्याई तेथे जमली होती ! सारे सनातनी पावित्र्य तेथे होते. तेथे जरीचे रूमाल होते. काही श्रीमंत सरदार सरदारी पोशाखांत होते. काही पेन्शनर वेताची पागोटी घालून आले होते. काहींच्या सुंदर पगडयाही होत्या. काळया टोप्या घातलेलेही कोणी धर्मवीर होते. कोणाचे बंदाचे लांब अंगरखे होते. कोणाच्या अंगावर उपरणी होती. कोणाच्या अंगावर शालजोडया होत्या. गंधे झळकत होती. कानांतील रूद्राक्ष कोठे कोठे शोभत होते. तपकिरीच्या डब्या कनवटीस होत्या. कोणी विडे खाल्ले होते. कोणाच्या हातांत चंच्या होत्या. कानांतून भिकबाळया, बोटांतून सोन्याची पवित्रके, सल्लेजोडया होत्या. मोठा प्रतिष्ठित देखावा ! अनेकरंगी, विविधाकार आणि स्वयंसेवक सभोवती होते. शिटया होत होत्या. मंडप गजबजून गेला होता.

 अध्यक्ष आले. सारे पाहू लागले. कोणी उठू लागले. स्वयंसेवक त्यांना बसा बसा म्हणत होते. बँडच्या तालावर सनातनी पुढारी आले. मंडपात कोणी म्हणाले, “हा बँड कशाला ! चौघडा का मेला? सनई का मेली?” कोणी उत्तर दिले, “अहो काळाचा महिमा आहे. बँड असला म्हणून काय बिघडले? आपल्या स्वयंसेवकांचाच आहे तो.” मंडपात अध्यक्ष शिरले. सारी सभा उभी राहिली. “सनातन धर्म की जय” असे जयघोष झाले. टाळयांचा कडकडाट झाला. मंडपात लावलेले विद्युत-पंखे सुरू झाले. ब्रम्हवृन्दास आनंद झाला. तरीही कोणी आपल्या उपरण्याच्या फलकार्‍यानेच खास स्वदेशी व सनातनी वारा घेत होते. विजेचा वारा कशाला? कोणी ताडपत्री पंखे आणले होते. कोणाजवळ बांबूची विझणे होती. परंतु गर्दीत वारा घेता येईना.

“अहो, त्या विजेच्या पंख्यांचा वारा येत असताना हे पंखे कशाला नाचवता?”

“आम्हाला तो वारा नाही खपत. वारा विंझण्याने घ्यावा असे श्रुतिवचन आहे.”

तेथे जरा गडबड होऊ लागली. स्वयंसेवक धावून आले. त्यांनी सारे शांत केले आणि नाकात तपकिरी कोंबल्या जात होत्या. शिंकांचा रोग फारच फैलावत होता. ध्वनिक्षेपकावरून स्वयंसेवक-सेनापतीने सांगितले, “आता तपकिरी बंद ठेवा. परिषदेच्या कार्यास लवकरच सुरूवात होईल.” परंतु तिकडे महिलामंडळींत गोंगाट सुरू झाला. कोणाची मुले रडू लागली. सारा गोंधळ !

“मुले घेऊन कशाला येतात येथे?” एक सनातनी म्हणाले.

“अहो, घरी कोण सांभाळणार?” दुसरे म्हणाले.

“स्त्रियांनी सभेत येऊच नये.” तिसरे म्हणाले.

“अहो, कथा-पुराणांना नाही का येत? ही सभा म्हणजे धर्माची आहे. काँग्रेसच्या सभेस जाऊ नये. परंतु येथे स्त्रियांनीही आलेच पाहिजे. सर्व प्रकारच्या धर्मकर्मात स्त्रियांचा सहकार हवा.” चौथे म्हणाले.

परंतु तिकडे स्वागत-गीत सुरू झाले. कार्याला एकदाचा आरंभ झाला. नंतर सनातन धर्माची महती गाणारे एक गीत झाले. आणि मग स्वागताध्यक्ष भाषणार्थ उभे राहिले. परंतु ती तिकडे कसली गडबड? सर्वांचे डोळे तिकडे लागले. कोण आहे तेथे उभे? अरे, ही तर सरला. तो शेला अंगावर घेऊन ती तेथे आली आहे. स्वयंसेवक तिला येऊ देत नाहीत. अध्यक्षांची मला परवानगी आहे, असे ती सांगत आहे.

“अरे या धर्मपरिषदेत ही कशाला?”

“माहीत आहे का कोण ती?”

“कधी कधी त्या खिडकीत दिसत असे. परंतु तिची दृष्टी खाली असे. विनयशील वेश्या.”

“हाकला तिला येथून. येथे का बाजार आहे?”
गडबड थांबेना. अध्यक्षांनी काय आहे असे विचारले. त्यांना सारे सांगण्यात आले.

 “येऊ द्या त्यांना. धर्म सर्वांना जवळ घेतो. येऊ द्या. येथे माझ्याजवळ त्यांना घेऊन या. येथे खुर्चीत त्या बसतील. म्हणजे गोंधळ होणार नाही.”

अध्यक्षांनीच सांगितले तेव्हा कोण विरोध करणार? कोणी रागावले. कोणी “हा अधर्म आहे” असे म्हटले. अहो, शेटजींचीच कोणी असेल, असे हळूच कोणी म्हणाले. स्वयंसेवक सरलेला घेऊन आले. त्या सौंदर्यमूर्तीकडे सर्वांचे डोळे लागले. स्त्री-पुरूष सर्वांची दृष्टी त्या मुखचंद्राकडे होती. सरला जवळ येताच शेटजी उभे राहिले.

“हया खुर्चीत बसा.” ते म्हणाले.

“आपली आभारी आहे.” असे म्हणून प्रणाम करून सरला बसली.
स्वागताध्यक्ष गारठूनच गेले. त्यांनी सनातनधर्माचे महिम्नस्तोत्र लवकर आटोपते घेतले. शेवटी म्हणाले, “असे हे नाशिक क्षेत्र. प्रभू रामचंद्राच्या वास्तव्याने पवित्र झालेले. येथे का धर्म रसातळाला जावा? आर्यांच्या यज्ञधर्माचा उच्छेद करू पाहणार्‍या असुरांचा प्रभू रामचंद्रांनी येथे संहार केला. आम्हीही धर्माचा नाश करू पाहणार्‍यांस क्षमा करणार नाही. आम्ही सारे सहन करू; परंतु धर्मावर कोणी आघात केला तर तो आम्ही सहन करणार नाही. आपण आपला निर्धार उद्धोषिला पाहिजे. थोर अध्यक्ष लाभले आहेत. ते सकलगुणमंडित आहेत. संपत्तीने कुबेर आहेत. विद्वत्तेने बृहस्पती आहेत. सरकारदरबारी त्यांची प्रतिष्ठा आहे. त्यांच्या निर्दोष नेतृत्वाखाली आपण धर्मपरित्रार्णार्थ संघटित होऊ या. सनातनधर्माचा आत्मा निष्कलंक राखू.”

अध्यक्षांच्या गुणवर्णनपर आणखीही काही भाषणे झाली. रामाचे सुप्रसिध्द पुजारी वेदमूर्ती रामभटजी यांचेही संस्कृतप्रचुर भाषण झाले. अध्यक्ष स्थानापन्न होऊन भाषणासाठी उभे राहिले. सर्वत्र शांतता होती. त्यांचे भाषण ऐकण्यास सारे उत्सुक होते.

“धर्मप्रिय बंधु-भगिनींनो,

हा एवढा समाज धर्माच्या प्रेमाने उपस्थित झालेला पाहून मला अत्यंत आनंद होत आहे. माझे भाषण तुम्हांस ऐकावयाचे आहे. परंतु त्याच्याआधी माझी एक प्रार्थना आहे. या सरलाबाई येथे आल्या आहेत. रामरायाची त्यांच्यावर कृपा आहे. ज्याच्यावर प्रभुकृपा झाली त्याहून थोर कोण? सरलाबाईंना थोडे बोलावयाचे आहे. त्यांना लौकर जावयाचे आहे. म्हणून माझ्या आधी त्या बोलतील. त्यांचे भाषण झाल्यावर मी माझे अध्यक्षीय भाषण करीन. तुम्ही सनातन धर्मास शोभेशा शांततेने त्यांचे भाषण ऐकून घ्याल अशी आशा आहे.” आणि सरला उभी राहिली. तिच्या अंगावर तो शेला झळकत होता. जणू देवता येऊन उभी आहे असे तिला वाटत होते आणि मंडपाबाहेरही आता खूप गर्दी झाली. अ-सनातनींची ती गर्दी होती. तरूणांची गर्दी होती. उदार भावनांचा, त्यागाचा धर्म पाळणार्‍या परंतु रूढीचा धर्म भिरकावणार्‍या तरूणांचे जथेच्या जथे लोटत होते. सरलेने एकवार सर्वत्र पाहिले आणि ती त्या ध्वनिक्षेपकासमोर उभी राहिली. तिचे भाषण सुरू झाले:

 “अध्यक्षमहाराज, प्रिय बंधु-भगिनींनो,

तुम्ही धर्माचा विचार करण्यासाठी सारे जमला आहात. धर्मावर येणार्‍या संकटांचा कशा रीतीने परिहार करावा त्याचा विचार करण्यासाठी तुम्ही एकत्र आला आहात. खरोखरच धर्मावर संकट आहे. परंतु ते निराळे आहे. आणि ते आजच आले असे नाही. ते कधीच आले आहे. हिंदुधर्माचा प्राण गुदमरत आहे, कासावीस होत आहे. आपली लाखो बाळे रडताना पाहून धर्माला का आनंद होईल? हिंदुधर्मातील स्त्रियांची स्थिती पाहा. त्या केवळ असहाय अबला आहेत. मुलींची लग्ने कशी होतात ती पाहा. मुलीचे एखाद्या तरूणावर प्रेम असले व त्या तरूणाचे तिच्यावर असले तर आईबापांचा धर्म आहे की त्या प्रेमाला आशीर्वाद द्यावा. परंतु असे होत नाही. मला अशी कितीतरी उदाहरणे माहीत आहेत की जेथे मुलींच्या भावना लक्षात न घेता त्यांना कोठेतरी देण्यात आले. त्या सासरी रडत असतील. त्यांचे हृदय किती दु:खी असेल? आणि बालविधवांची स्थिती पाहा. अजून अशी सनातनी मंडळी आहेत की ज्यांना बालविधवांचा पुनर्विवाह ही अधर्म्य गोष्ट वाटते. मी स्वत:चाच अनुभव सांगते. लग्न होऊन पंधरा दिवस नाही झाले तो माझा पती वारला. पांढर्‍या पायाची अवदसा म्हणून सासू-सासर्‍यांनी म्हटले; मला माहेरी पाठवण्यात आले. मी बाबांना एखादे वेळेस विचारी की सारे आयुष्य कसे कंठू? तर म्हणत, शिवलीलामृत वाच. शिवलीलामृतातील सीमंतिनीचा पती परत आला. माझा का येणार होता? माझ्या बाबांनी स्वत: उतारवयात लग्न केले. माझी आई निवर्तल्यावर काही दिवस ते एकटे राहिले. परंतु पुन्हा त्यांनी संसार मांडला. आपली बालविधवा मुलगी घरात डोळयांसमोर असता पुन्हा स्वत:चा संसार त्यांनी सुरू केला ! आणि मी? मला का भावना नव्हत्या ! मला का भुका नाहीत? आणि एका तरूण विद्यार्थ्यावर माझे प्रेम जडले. त्याचेही माझ्यावर. आमचा संबंध आला. तो लौकरच माझ्याशी रजिस्टर्ड रीतीने विवाह लावणार होता. परंतु त्याची आई आजारी पडली म्हणून तो गेला. तो परत आला नाही. त्याचे काय झाले मला कळले नाही. मला दिवस गेलेले. त्याने आपल्या हाताने मला कुंकू लावले होते. विश्वव्यापी प्रभूसमोर आम्ही पतिपत्नी म्हणून राहण्याचे व्रत घेतले. परंतु तो गेला ! आणि मी? वडिलांना सांगण्याचे धैर्य होईना. जीव देण्याचे धैर्य नाही. पंढरपूरला गेल्ये. तेथे मी बाळंत झाल्ये. आणि बाळाला तेथे ठेवून मी बाहेर पडल्ये. लहान अर्भकाला सोडून निघाल्ये. स्तन दुधाने भरून येत होते. कोणाला पाजणार? रडत निघाल्ये. कोठे नोकरी धरीन, माझे बाळ परत आणीन, या आशेन निघाल्ये. कल्याण स्टेशनवर मी होते. तेथे नाशिकचे एक सनातनी सज्जन भेटले. ते म्हणाले, “नाशिकला तुमची व्यवस्था करतो. आमची संस्था आहे.” मी विश्वास ठेवला. मी त्यांच्याबरोबर निघाल्ये. आणि पुढे काय झाले? अरेरे ! माझी कथा कशी सांगू? त्या गृहस्थाने मला कुंटणखान्यात कोंडिले. मी वेश्या व्हावे म्हणून तेथे माझे हाल करण्यात आले. तेथे माझ्या थोबाडीत मारीत. चाबकाने फोडून काढू अशी धमकी देत. परंतु प्रभूची दया ! मी सुरक्षित राहल्ये. आणि आज बाहेर आल्ये. कोणी आणले बाहेर ! कोणता उध्दारकर्ता भेटला? सांगू? हा पाहा माझ्या अंगावरचा शेला. अमोलिक शेला ! खरेच या शेल्याची किंमत करता येणार नाही. हा शेला कोठून आला सांगू? ज्या रामाच्या रथाला अस्पृश्य बंधूंचे हात लागू नयेत म्हणून ही परिषद तुम्ही भरविली आहे, ज्या रामरायाच्या मंदिरात अस्पृश्यांनी शिरता कामा नये म्हणून येथे तुम्ही जमला आहात, त्या रामरायाच्या अंगावरील हा शेला ! प्रभूच्या पवित्र मूर्तीच्या अंगावरचा हा शेला ! या अभागिनीची अब्रू सांभाळायला हा शेला आला. रामरायाने हा शेला पाठवला. माझ्यावर कृपेचे पांघरूण घालायला. हा शेला मी अंगावर घेतला नि मला धैर्य आले. या शेल्याने मला वीरांगना बनविले. नरकातून मी बाहेर आल्ये आणि तुमच्यासमोर ही उभी.

 “बंधूंनो, माझ्या भगिनींनो ! हा शेला माझ्याजवळ कसा आला माहीत आहे? ते पाहा वेदमूर्ती रामभटजी तेथे बसले आहेत. प्रभू रामरायाचे पुजारी म्हणून ते प्रसिध्द आहेत. परंतु ते केवळ रामाचे पुजारी नाहीत; ते कामाचेही पुजारी आहेत ! ते रोज राममंदिरात जातात, त्याप्रमाणेच विलासमंदिरातही जातात. रामाचे पाय धुतात नि वारांगनांचे पाय धरतात ! रामाचे अलंकार, रामाची वस्त्रेभूषणे ते वेश्यांच्या चरणी अर्पण करतात. ते नेहमीप्रमाणे काल त्या कुंटणखान्यात आले व म्हणाले, “हा घ्या शेला. आता नाही म्हणू नका. का दु:ख भोगता? आम्हांला सुख द्या व तुम्हीही सुखी व्हा. लक्षाधीश शेटजींना तुमच्याकडे आणीन; आणि नंतर आम्हा भटजींचीही भूक दूर करा.” आज सहा-सात महिने हे पुजारी माझ्याकडे येत आहेत. काल मला त्यांनी धमकीही दिली. परंतु रामरायाच्या शेल्याने मला अपार धैर्य आले. मी त्या कुंटणखान्यातून मुक्त होऊन आल्ये आहे. केवळ रामभटजीच असे आहेत असे नाही. येथे जमलेल्या सनातनी बंधूंतील कितीतरी तेथे येत. मला दुरून बघत. माझे तेथे प्रदर्शन मांडण्यात आले होते. माझी जाहिरात केली जात होती. आणि एक दिवस मी मोहाला बळी पडेन, निमूटपणे त्यांच्या स्वाधीन होईन, विलासात रमेन असे त्यांना वाटत होते. मुंबई-कलकत्यापर्यंत माझी कीर्ती त्यांनी पसरवली. हे भोगातुर किडे माझ्या शरीरावर तुटून पडण्यासाठी टपलेले होते. परंतु आज मी सुटून आल्ये आहे. रामरायाने वाचविले. रामभटजींचे उपकार आहेत. जो शेला माझा अध:पात व्हावा म्हणून त्यांनी दिला, तो तारकच ठरला. त्यांचे उपकार ! आणि मी त्यांना कशाला नावे ठेवू? येथे जमलेल्यांपैकी किती निर्दोष आहेत? मला या सभेत येऊ देत नव्हते. वेश्येला म्हणे सभेत येण्याचा अधिकार नाही. आणि वेश्यांचे पाय चाटणार्‍यांना अधिकार आहे का? बाजारबसवीला येथे म्हणे अधिकार नाही. मी बाजारबसवी नाही. तुम्ही मात्र बाजारबसवे आहात. धर्माचा तुम्ही बाजार मांडला आहे. कोण येथे असा आहे, की ज्याने परस्त्रीकडे कधी पाहिले नसेल? कुंटणखान्यातील खिडक्यांकडे पाहिले नसेल? जो निर्दोष असेल त्याने मला दगड मारावे. परंतु जो निर्दोष असतो तो तर निरहंकारी असतो. तो पतितांचा तिरस्कार न करता त्यांच्यावर करूणा करतो. त्यांना सन्मार्गावर आणतो. तुम्ही येथे धार्मिक म्हणून जमले आहात. आहे का काही धर्मता? आपली अंत:करण शोधा. तेथे कामक्रोध भरलेले आहेत. तेथे दंभ आहे, गर्व आहे. टिळे-माळा, गंधे, भस्मे, जानवी म्हणजे का धर्म? पागोटी म्हणजे का धर्म? दर्भ म्हणजे का धर्म? धर्म म्हणजे उदार होणे, सत्याला अनुसरणे, पवित्र होण्यासाठी धडपडणे. ती धडपड आहे का तुमच्याजवळ? ज्वाला ज्याप्रमाणे तडफडत धडपडत वर जाऊ पाहतात, त्याप्रमाणे ज्याची आत्मज्योती परज्योतीला मिळण्यासाठी धडपडत आहे, त्याच्याजवळ धर्म आहे असे समजावे. तुमच्याजळ आहे का असा धर्म? तुम्ही स्वत:ला सनातनी म्हणविता. सनातन म्हणजे शाश्वत टिकणारे. शाश्वत काय टिकते? सत्य, न्याय, प्रेम यांना शाश्वतता आहे. ज्या चालीरिती सत्याकडे नेतात, उदारतेकडे नेतात, प्रेमाकडे नेतात, सर्वांच्या सर्वांगीण विकासाकडे नेतात त्या चालीरीती ठेवाव्या. बाकीच्या दूर कराव्या. सत्याचे दर्शन हळूहळू होते. जसजसे आपण वर जातो तसतसे अधिक दिसू लागते. आणि नवीन चालीरीती आपण आणतो. नवीन दिसलेल्या सत्त्याला अनुरूप अशा नवीन चालीरीती. सत्याचे नवनवे दर्शन आणि त्यामुळे आचारविचारांतही नवनवे बदल; अशाने प्रगती होते.

“तुम्ही विद्वान आहात. सुज्ञ आहात. तुम्ही शास्त्रे वाचली असतील. परंतु मनुष्याचे हृदय समजण्याचे शास्त्र तुमच्याजवळ नाही. शाब्दिक शास्त्रे फोल आहेत. तुम्ही शब्दपूजक आहात. धर्माचा आत्मा कोठे आहे तुमच्याजवळ? प्रभू रामचंद्र निळया सागराप्रमाणे, निळया आकाशाप्रकाणे अनंत आहेत. ते सर्वव्यापी आहेत.

 “नभासारखे रूप या राघवाचे”

आकाशाखाली आपण सारे जमतो, त्याप्रमाणे प्रभूजवळ सारी जमू या. अस्पृश्य जेथे जाऊ शकत नाहीत, जेथे सारे मानव जाऊ शकत नाहीत, तेथे का देव आहे? तेथे देव नसून तुमच्या-आमच्या अहंकाराची दगडी मूर्ती आहे, अहंकार आहे, भेदाभेदांची भुते आहेत. जेथे प्रभूची मूर्ती असेल तेथे आपण सारी जाऊ या. प्रभूसमोर लवू या. तेथे नको मनात ब्राम्हण्य, नको काही. तेथे केवळ निरहंकारी होऊन आपण उभे राहिले पाहिजे.

“मी तुम्हांला काय सांगू? मी आगीतून गेल्ये आहे. अपार दु:ख अनुभविले आहे. तुम्ही उदार व्हा, सहानुभूती शिका. आपल्या मुलींवर प्रेम करा. त्यांची हृदये पाहा. स्त्रियांची गुलामगिरी दूर करा. अस्पृश्यांवरची गुलामगिरी दूर करा. गरिबांवरची गुलामगिरी दूर करा. समाजात आपण सर्वत्र गुलामगिरी निर्माण केली. आणि तिच्यातूनच परकी सत्तेची, साम्राज्यवाद्यांची ही भयंकर गुलामगिरी जन्माला आली.

“आज कोठला धर्म? तुम्ही वर्णाश्रम-स्वराज्य-संघाचे सभासद. परंतु आज वर्ण उरला आहे का? आपल्या आवडीची सेवामय स्वधर्मकर्मे येतात का करता? ब्राम्हण सारे परसत्तेचे हस्त झाले आहेत. ज्यांनी स्वतंत्र विचार द्यावा, मुक्तीचा मार्ग दाखवावा, ते परसत्तेचे नोकर झाले आहेत ! आणि क्षत्रिय? मायभूमीला स्वतंत्र करण्यासाठी कोणता क्षत्रिय तडफडत आहे? क्षत्रियही परसत्तेचे हस्तक झाले आहेत ! आणि व्यापारी? तेही परसत्तेचे दलाल बनले आहेत ! आज हिंदुस्थानात एकच वर्ण आहे. तो म्हणजे गुलामगिरीचा ! आपण सारे गुलाम आहोत ! आणि आश्रम तरी आहेत का? समाजाची सेवा करण्यासाठी बाहेर पडणारे कोणी आहेत का वानप्रस्थ? कोणी आहेत का संन्यासी? जर वानप्रस्थ आश्रम जिवंत असता, खरा संन्यास जिवंत असता, तर देशात अज्ञान राहिले नसते. साक्षरतेचा प्रसार झाला असता. नवविचार सर्वत्र गेले असते. आपणांजवळ ना वर्ण, ना आश्रम; आणि स्वराज्य तर दूरच राहिले ! सारा शब्दांचा पसारा ! सारे बुडबुडे !

“मी काय सांगू? मी पहाटे सारखी विचार करीत होत्ये. काय बोलू; काय सांगू याचा विचार करीत होत्ये. हे मी आज बोलत नाही. प्रभूचा हा शेला मला बोलवीत आहे. बंधूंनो, उदार बना, सारे जवळ या. एकमेकांना प्रेम द्या. माणुसकी जीवनात आणा. सर्वांची मान उंच करा. कोणी दीन, दरिद्री नको. कोणाच्याही भावनांचा कोंडमारा नको. सर्वांच्या भुका-शारीरिक व मानसिक भुका-नीट प्रमाणात पुरविल्या जावोत. सर्वांचा नीट विकास होवो. सर्वांची नीट धारणा जेथे होते, सर्वांचा संसार जेथे सुखाने होतो तेथे धर्म असतो.

“अवघाचि संसार सुखाचा करीन ।
आनंदे भरीन तिन्ही लोक”

 असे तुकाराममहाराजांनी म्हटले. तुम्ही हरिजनांचे, अस्पृश्यांचे संसार नाही का सुंदर करणार? तुम्ही स्त्रियांच्या भावना नाही का ओळखणार? रूढींचा धर्म फेकून विवेकाचा धर्म नाही का आणणार?

“हरिजनांना आनंदाने मंदिरात घ्या. देवाला त्याची वनवासी लेकरे भेटू देत. रामरायाचा रथ त्यांना ओढू दे. उद्या ते मग राष्ट्राचा रथ ओढतील. पाच-सहा कोटी हरिजनांची शक्ती आपण वाया दवडली आहे. पाच-सात कोटी अस्पृश्य बंधूंची मने, त्यांच्या बुध्दी आपण पडित ठेवल्या आहेत. तेथे पीक घेऊ तर केवढा ज्ञानविकास होईल ! राष्ट्राची शक्ती किती वाढेल ! भारताचा संसार मग दुबळा न राहता प्रभावी होईल. आपणच आपले हातपाय तोडीत आहोत. आपली शक्ती खच्ची करीत आहोत. हे पाप फार झाले. अत:पर पुरे, यापुढे तरी ज्ञानाचे डोळे उघडोत. हृदयमंदिरे उघडोत. खरा देव जीवनात येवो. प्रभू करो आणि तुम्हा-आम्हा सर्वांना सद्बुध्दी देवो. कमीअधिक बोलल्याची क्षमा करा. मी तुमची धर्मकन्या आहे. धर्मभगिनी आहे. जिला रामरायाच्या शेल्याने सांभाळले, तिला तुम्ही नाही आशीर्वाद देणार? तुमचे आशीर्वाद घेऊन मी जात्ये.”

सरला अध्यक्षांस प्रणाम करून निघाली. सारी सभा तटस्थ होती. सरलेच्या तोंडाने जणू प्रभूच बोलत होता. जणू मूर्त धर्म बोलत होता. ती जणू संस्फूर्त झाली होती. तिच्या तोंडावर सात्त्विता फुलली होती. डोळयांत तेजस्विता व करुणा यांचे अपूर्व मिश्रण होते. ती निघाली. स्वयंसेवकांनी रस्ता करून दिला. मोटार बाहेर होती. तीत बसून ती गेली.

आणि शेटजी उभे राहिले. त्यांचे डोळे स्त्रवत होते. ते म्हणाले :

“सर्व बंधु-भगिनींनो,

मी आणखी काय सांगू? मी पापी आहे. त्या मुलीचे शब्द हृदयात बाणाप्रमाणे घुसत होते. तिचेच मुख्य भाषण समजा. तुम्ही अस्पृश्यांना बंधू माना. त्यांना जवळ घ्या. हा विरोध बंद करा. प्रभूजवळ प्रार्थना जाऊ दे. आईजवळ तिची सारी लेकरे जाऊ देत. मंदिरे पवित्र करा. तेथे प्रेम, स्नेह, दया, बंधुभाव, सत्य, पावित्र्य फुलतील असे करा. परिषदेची ही फलश्रुती.

“पकड कर इष्क की झाडू
सफा कर हिज्र ए दिल को”

“प्रेमाची झाडणी घेऊन आपली हृदये साफ करा.” म्हणजे प्रभू रामचंद्र तेथे वास्तव्य करायला येईल. रामरायाची बैठक तुम्ही स्वच्छ करता. त्याचा अर्थ आपण हृदये साफ करणे. शेवटी प्रभूची बैठक, त्याचे सिंहासन आपल्या हृदयात आहे. तेथे त्याला बसवायचे आहे, तेथे त्याला पुजावयाचे आहे. खरे ना?

 “या परिषदेचा हा संदेश. स्वातंत्र्याचे, समानतेचे, न्यायाचे विचार देणारे ब्राह्मण बना; स्वातंत्र्यासाठी लढणारे क्षत्रिय बना; देशाचा व्यापार वाढवून सर्वांना पोटभर अन्नवस्त्र मिळेल अशी व्यवस्था निर्मिणारे वैश्य बना; देशाची मनापासून सेवा करणारे शुद्र बना. ज्याची जी वृत्ती असेल ती त्याने समाजासाठी लावावी. स्वत:चे व समाजाचे कल्याण करावे. आणि शेवटी वैयक्तिक संसार अजिबात सोडून समाजसेवेस संपूर्णपणे वाहून घ्यावे. आणि मरताना विश्वाशी विलीन व्हावे.

“मी ही परिषद पुरी करतो फार बोलण्याची जरूरी नाही. मला ती शक्तीही नाही. तो प्रभू रामचंद्र सर्वांस सदबुध्दी देवो, सत्प्रेरणा देवो.”

आणि कोणीतरी उठून पटकन आभार मानले. सभा संपली. शेटजी निघून गेले. लोक घरोघर चालले. सारे अंतर्मुख होऊन चालले. अंतर्मुख होणे म्हणजेच धर्माचा आरंभ. त्यादृष्टीने ती सनातनी सभा अत्यन्त यशस्वी रीतीने पार पडली असे समजायला हरकत नाही.

***

***

रेट करा आणि टिप्पणी द्या

सर्वप्रथम टिप्पणी टाइप करा!!