Ramacha shela..- 9 books and stories free download online pdf in Marathi

रामाचा शेला.. - 9

रामाचा शेला..

पांडुरंग सदाशिव साने

९. गब्बूशेट

“हे पहा गब्बूशेट, तुम्हीच अध्यक्ष झाले पाहिजे. तुम्ही नाही म्हणू नका. मुंबई शहरातील वर्णाश्रम स्वराज्य-संघाचे तुम्ही अध्यक्ष. आज धर्म धोक्यात आहे. सबगोलंकार होऊ पाहात आहे. आपला थोर धर्म का रसातळाला जाणार? सनातन धर्म जगायला पाहिजे. तुम्ही ऐका. धर्माला आज तुमच्यासारख्यांची अत्यंत आवश्यकता आहे.”

“अहो, मला धर्मात काय समजते? पूर्वजांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे वागावे एवढे मला समजते.”

“तीच तर महत्त्वाची गोष्ट आहे. आपले पूर्वज का महामूर्ख होते? मनू, याज्ञवल्क्य यांच्यासारखे त्रिकालज्ञ महर्षी का मूर्ख होते? त्यांनी त्रिकालाबाधित धर्म दिला आहे. तो पाळणे आपले कर्तव्य. आपण संघटित होऊन धर्मरक्षणार्थ आटाआटी केली पाहिजे. आणि कोणत्याही कामाला श्रीमंत वर्गाची सहानुभूती हवी. अहो, तुमच्यासारखे काही महात्मे थोडा फार धर्म पाळीत आहेत म्हणून पृथ्वी चालली आहे. मानवजात जिवंत आहे. मोठया आशेने मी तुमच्याकडे आलो आहे. गब्बूशेट, प्रसंग गंभीर आहे. तुम्ही होकार द्या.”

“मोरशास्त्री, आम्हाला भारी उद्योग. नावाचा अध्यक्ष होण्यात काय अर्थ?”

“अहो, नावात सारे असते. कलियुगात नामाचाच सारा महिमा. तुमचे नाव असले पाहिजे. आम्हांला त्यामुळे धीर येईल.”

“मी तुमच्या वर्णाश्रमसंघास दहा हजार रुपये देतो; परंतु हे अध्यक्षपद नको.”

“अहो, पैसे तुम्ही पाण्यासारखे ओताल हे का माहीत नाही? परंतु पैसे हवे असले तरी माणसे आधी हवीत. तुमचे नाव अध्यक्षस्थानी असणे ही गोष्ट लाखाची आहे.”

“दुसरे कोणी नाही का मिळत?”
“तुमच्या पात्रतेचे कोण आहे? तुमची धर्मश्रध्दा अपूर्व आहे. यात्रा करता, पुण्य जोडता. नाशिकला तर प्रत्येक महिन्याला तुम्ही जाता. प्रभू रामचंद्राचे दर्शन घेऊन येता, पवित्र, पावन होऊन येता. अहो, धंदा सर्वांनाच करावा लागतो. परंतु धंदा सांभाळून धर्माचीही पूजा करणारा दुर्मिळ असतो.”

“तुम्ही म्हणताच तर मी होतो अध्यक्ष.”

“छान ! किती आनंद मला झाला आहे ! मुंबई शहरात वर्णाश्रम-स्वराज्य-संघ आता फोफावल्याशिवाय राहणार नाही. मी आभारी आहे.”

“मोरशास्त्री, यात आभार मानण्यासारखे काय?”

“तसे कसे? तुमचा होकार कोटी रूपये किंमतीचा आहे. मी तोंडदेखला बोलत नसतो. धर्म म्हणजे आमचा प्राण. धर्मासाठी आम्ही प्राण देऊ. धर्मावर प्रेम करणारा कोणी दिसला की मला कृतार्थ वाटते. बरे, मी येतो.”

“माझ्याकडून काम करवून घ्या. मी निमित्तमात्र आहे. मी धर्मज्ञ नाही. परंतु धार्मिक आहे.”

“तुमचा विनय तुम्हांला साजून दिसतो. बरे. जयगोपाळ.”

“जयगोपाळ.”

मोरशास्त्री गेले. गब्बूशेट दिवाणखान्यातच बसून होते. थोडया वेळाने ते मोटारीत बसून बाहेर गेले. त्यांना किती उद्योग ! पैसा का फुकट मिळतो? किती घालमेली कराव्या लागतात ! त्या सर्व उठाठेवी ते व्यापारीच जाणोत.

आज गब्बूशेट नाशिकला जाणार होते. नाशिकला त्यांनी नवीन बंगला बांधला होता. तेथे माळी असे. बंगल्याभोवती सुंदर बाग होती. शहराचा कंटाळा आला म्हणजे ते येथे येत. विश्रांती घेत. बरोबर आचारी वगैरे सारे घेऊन यायचे. नाशिकला दोन-चार दिवस राहून परत यायचे. नाशिक म्हणजे त्यांची करमणूक होती. त्यांचा आनंद होता. रामरायाचे दर्शन म्हणजे त्यांना अमोल वस्तू वाटे.

शेटजी येणार म्हणून बंगल्यात फोन आला होता. माळी झाडलोट करीत होता. त्याने सुंदर हार करून ठेवला. गुच्छ तयार करून ठेवला. दिवाणखान्यात त्याने पुष्पगुच्छ ठेवले. दारावर त्याने फुलांचे तोरण बांधले. आज मालक येणार होता. रामरायांच्या पूजेसाठी सुंदर पुष्पमाळा माळयाने करून ठेवल्या. शेवंतीच्या फुलांचे घवघवीत हार ! किती रमणीय दिसत होते ते !

मोटार आली. फाटक उघडले गेले. शेटजी उतरले, सामान उतरण्यात आले. शेटजी दिवाणखान्यात बसले. प्रवासाने ते थकले होते. जरा शीण आला होता. माळयाने फळे आणली. पोपयीच्या रसाळ फोडी. संत्री-मोसंब्यांच्या फोडी. डाळिंबाचे दाणे. शेटजींनी फलाहार केला. ते बागेत जरा हिंडले.

आणि मोटार कोठे चालली? कोणाला आणण्यासाठी चालली? मोटार रामभटजींकडे गेली. रामभटजी रामाची पूजा करून नुकतेच घरी आले होते. मोटार दारात थांबताच ते बाहेर आले.

“कोण आहे?”

“गब्बूशेट आले आहेत.”
“वा: ! छान. मी आलोच हा. आता जेवणखाण मागून.”

रामभटजींनी पोशाख केला. मोटारीत बसून ते निघाले. बंगल्यात आले. आत गेले.

“या रामभटजी, बसा.”

“जयगोपाळ शेटजी. कधी आलेत?”

“आताच आलो.”

“आधी कळले नाही.”

“मी येथे फोन केला होता. आज सायंकाळी रामाला आमची पूजा. किती रूपयांची पूजा बांधू?”

“ते मी काय सांगू? शोभेल असे करा. देवासाठी द्याल तितके थोडेच आहे. रामराया तुम्हांला हजारो हातांनी देत आहे.”

“इतर काही खूषखबर?”

“खूषखबर आहे. परंतु जरा अडथळा आहे.”

“सारे अडथळे पैशाने दूर करता येतील.”

“एक सुंदर तरूण स्त्री आली आहे.”

“कधी?”

“दोन-तीन महिने झाले.”

“आणि मला कळवले नाहीत?”

“तुम्ही दसरा-दिवाळीच्या गर्दीत होतेत.”

“ती गर्दी सोडूनही आलो असतो. पहिला वास मी घेतला असता.”

“तिचा वास अद्याप कोणी घेतला नाही.”

“काय सांगता !”

“खरे ते सांगतो.”

“अहो, हे शक्य आहे का? तेथे का कोणी फुकट पोशील? रोज दहा-वीस रुपयांची कमाई करावी तेव्हा खायला मिळते.”

“परंतु हे रत्न अपूर्व आहे. ती म्हणाली, “काही दिवस थांबा. मी व्रतस्थ आहे. चैत्र-वैशाखापर्यंत थांबा. त्याच्या आधी मला कोणी स्पर्श कराल तर मी जीव देईन.” कदाचित ती खरेच जीव द्यायची. कारण, पाणी काही निराळे आहे. म्हणून मी थांबा सांगितले आहे. एकदम घाईने काही होणार नाही. अधीर होऊ तर सारेच गमावू. कोणी बडे लोक आले तर तिचे फक्त दर्शन घेतात. पाहून पागल बनतात. ती डोळे मिटून योगिनीप्रमाणे बसते. परंतु किती दिवस बसेल? कंटाळेल. सभोवतालचे वातावरण तिला आत्मरूप करील. तुम्हांला घ्यायचे आहे दर्शन?”

नुसते दर्शनच? स्पर्शन नाही का?”

“क्षणिक स्पर्शासाठी जाल, परंतु कायमचे मुकाल. जरा सबुरीने घ्या. माझी तर इच्छा आहे की, हे रत्न खास तुमच्यासाठी राखायचे. सौंदर्यांची राणी आहे. परंतु थोडे दिवस जाऊ देत. मधून मधून येत जा, बघत जा. भूक वाढू दे. शेवटी ती तुमची होईल.”

“आज रात्री पाहू तरी. आणि पूजा ठरली हो. मी दिवे लागता मंदिरात येतो. आधी रामरायाची पूजा. मागून ती पूजा.”

“ठीक. जयगोपाळ.”

रामभटजी निघून गेले. गब्बूशेटांचे जेवणखाण झाले. तांबूलभक्षण झाले. मऊमऊ गादीवर ते पहुडले. सुखाचा विचार करीत ते झोपी गेले. सायंकाळ केव्हा होते, रात्र केव्हा येते, या विचारात गुंग असता डोळे केव्हा मिटले ते त्यांना समजले नाही.

तिसरे प्रहरी त्यांना जाग आली. काही खानपान करून मोटारीत बसून ते फिरायला गेले. दिल्ली-आग्रा रोडने गेले. त्या घनदाट उंच वटवृक्षांच्या गर्द छायेतून ती काळीसावळी मोटार मध्यम वेगाने जात होती. वाटेत मोटार थांबली. ते उतरले. आणि पायांनीच रस्त्याच्या बाजूच्या शेतातून जरा हिंडले. शेवटी एका ठिकाणी बसले.

सायंकाळ होत आली होती. अपरंपार रंग आकाशात भरले होते. क्षणाक्षणाला ते रंग बदलत होते. शेटजी सौंदर्याकडे पाहात होते. परंतु ते सौंदर्य क्षणात संपले. फारच दाट ढग एकदम आले. अगदी काळे ढग. सायंप्रकाशाच्या साधनाने स्वत: सुंदर होण्याऐवजी त्या ढगांनी तो सायंप्रकाशच संपूर्णपणे आच्छादून टाकला. परंतु त्या दाट ढगांतूनही ते पाहा सौंदर्य प्रकट होत आहे. ते पाहा किरण ! जणू किरणांचे उलटे कारंजे उडत आहे असे वाटते. प्रकाशाच्या झारीतून किरण वरून कोणी खाली उडवीत आहे असे वाटते. सुंदर दृश्य ! आणि आता तर अजिबात गेले ढग. अहाहा ! काय अपूर्व शोभा आणि तीत कसे गांभीर्यही आहे ! लाल रंगात थोडी कृष्णछटाही आहे. शेटजी, या सौंदर्याचा समजतो अर्थ? तुम्ही कोणत्या सौंदर्याचे उपासक आहात? परंतु सौंदर्यातील अर्थ पाहणार्‍यास ते समजत नसते. सौंदर्य केवळ अनुभवायचे असते.

शेटजी उठले. गार वारा सुटला होता. तो का त्यांना झोंबत होता? असा मोकळा स्वच्छ वारा त्यांना कसा सहन होणार? विजेच्या पंख्याच्या वार्‍याची त्यांना सवय ! हा पहाडी वारा त्यांना कसा मानवणार? उठा शेटजी. मोटारीत बसा. सार्‍या काचा लावून घ्या. वारा लागून आजारी पडाल हो. मुंबईत जाऊन पडा आजारी. आज येथे रामरायाच्या नगरीत तरी नका पडू आजारी.

शेटजी मोटारीत बसले. ते घरी आले. थोडावेळ विश्रांती घेऊन भोजन करुन ते मंदिरात जायला निघाले. आज पूजेचा अपूर्व थाट व्हायचा होता. ते मंदिरात आले. रामरायाची मूर्ती किती सुंदर दिसत होती ! पिवळया शेवंतीचे ते हार कसे शोभत होते ! आरती सुरू झाली. हजारो भक्त येत-जात होते. कोणी हात जोडून उभे होते. त्या आरतीत सामील होत होते. “रामा हो रामा” असे म्हणून प्रणाम करून लोक जात होते. कोणी हळूच स्वत:चे कान ओढून घेत होते, हळूच थोबाडीत मारून घेत होते; पावन होत होते. आपण चुकत आहोत, हातून पापे होत आहेत, याची जाणीव होणे हे काय कमी आहे? एक तरी जागा अशी आहे की जेथे आपण जातो व स्वत:चे स्वरूप उघड करतो व क्षमा मागून घेतो. मंदिरांतून घाण असेल, पुजारी व्यभिचारी असतील; परंतु ती प्रभूची मूर्ती हजारोंच्या जीवनात थोडी शांती आणीत असेल यात शंका नाही. एक क्षण का होईना, सुसंस्कार, पवित्र भावना यांची प्राप्ती होत असेल तर त्यांची का किंमत नाही?

पूजा संपली. प्रसाद, तीर्थ वाटण्यात आले. शेटजी “रामा हो” करून गेले. मोटार घरी आली. शेटजींना पोचवून ती मोटार भटजींना आणण्यासाठी परत गेली. आणि रामभटजी आले.

“या भटजी. आजची पूजा फार सुंदर दिसत होती.”

“शेटजी, तुम्ही वर्णाश्रम-स्वराज्य-संघाचे अध्यक्ष झाला आहात म्हणे?”

“मुंबई शहरातील शाखेचा. त्याचे काय?”

“नाही, आज ब्रम्हवृंदात प्रश्न निघाला होता. तुमची स्तुती करीत होते. तुमच्या अध्यक्षतेखाली येथील शाखेतर्फे एखादी सभा घेण्याचा विचार आहे. आलेच आहात.”

“या वेळेस नको. पुन्हा पाहू. मला सभांचा वीट आहे. नुसती भाषणे ! धर्म आचरणासाठी आहे. आपले आचरणच जगाला शिकवील. खरे की नाही?”

“खरे आहे.”

“निघायचे का?”

“निघू या. मात्र जरा जपून हां. ती मुलगी मोठी भावनाप्रधान आहे. तुम्ही जर का काही करालसवराल, अधिकउणे, कमीजास्त बोलाल, तर ती अपमान करील, थोबाडीतही मारील. तिला आज नुसते पाहा; वाटले तर दोन शब्द बोला; काही भेट द्या. नंतर बैठकीत येऊन गाण्याला बसा. चला.”

शेटजींनी सुंदर पोशाख केला. गळयात सोन्याचे अलंकार शोभत होते. बोटांतून अंगठया होत्या. अत्तराचा सुगंध येत होता. दोघे मोटारीत बसले. निघाली मोटार. त्या वाडयाच्या दारात येऊन ती मोटार उभी राहिली. मोठया अदबीने त्यांना आत नेण्यात आले. गाणे चालले होते. मुख्य लोडाशी शेटजी बसले. त्यांना विडा देण्यात आला.

थोडया वेळाने शेटजी उठले. कोणीतरी त्यांना इशारा केला. ते आत जात होते. सर्वांचे डोळे तिकडे वळले. परंतु दार लावून घेण्यात आले. कोठे गेले शेटजी?”

ती पाहा सरला ! गरीब मैना ! चिखलात फसलेली दुर्दैवी गाय !

“सुंदरा, वर बघ जरा.” ती दुष्ट बाई म्हणाली.
“का मला छळता?” सरला बोलली.

“हे शेटजी आले आहेत तुझ्या दर्शनाला. रामरायाचे दर्शन घेऊन तुझ्याकडे आले आहेत. हे लक्षाधीश आहेत. तू नुसती संमती दाखव. ते तुला स्वर्गात ठेवतील. सारी संपत्ती तुझ्यावरून ओवाळतील. त्यांच्याजवळ दोन शब्द बोल.”

“शेटजी, मला मुक्त करा येथून. मी तुमची मुलगी आहे. मला पदरात घ्या. मला यांनी फसवून येथे आणले. तुम्ही रामाची भक्ती करता आणि असे कसे वागता? तुम्ही का माझ्यासाठी आलेत?”

“हो. तुझ्यासाठी !”

“मला सोडविण्यासाठी?”

“दुस-यांपासून सोडविण्यासाठी. तुझ्या अंगाला इतर कोणी स्पर्श करणार नाही. तू खास माझी. काळजी नको करू. वाटेल त्याने तुला हुंगावे असे नाही होणार. तू स्वर्गातील फूल आहेस. हा घे तुला हार. घाल गळयात.”

“शेटजी, या गळयाला फास लावायला तो उपयोगी पडेल का? काय बोलता तुम्ही? तुमची जीभ झडत कशी नाही? तुम्हांला का तुमचे घर नाही? येथे कशाला शेण खायला येता?”

“किती सुंदर दिसता तुम्ही? कसे छान बोलता !”

“नीघ येथून, पापी मेला !”

“परंतु या पाप्याच्या स्पर्शाने तू एक दिवस मुक्त होशील. आज तू तिरस्कार कर. परंतु एक दिवस मला आलिंगन देशील. प्रथम राग नंतर लोभ. त्यातील मौज काही न्यारी आहे. परंतु मी तुला अभिवचन देतो की, माझ्याशिवाय तुझ्याकडे कोणी येणार नाही. भिऊ नकोस. आज मी जातो. अतृप्त मनाने जातो. परंतु एक दिवस तृप्ती होईल. जाऊ?”

“नीघ चांडाळा ! तुझे दर्शनही नको !”

“मग का इतर कुत्र्यांची दर्शने हवीत?”

“शेटजी, चला. थोडी ती गोडी.”

“सुंदरा, येतो हां.”

शेटजी, भटजी, ती दुष्ट बया, सारी गेली. सरला तेथे बसली होती. कधी संपणार हा नरकवास, असे मनात येऊन ती रडत होती. किती दिवस बिचारी रडणार? ते डोळे का फक्त रडण्यासाठीच जन्मले होते?

शेटजी व भटजी मोटारीत बसून गेले. बंगल्यात परत आले.

“शेटजी, कसे होते रूप? कशी कोमलता? तरी ती नीट खातपीत नाही. परंतु चंद्र क्षीण झाला तरी त्याचे सौंदर्य का लपणार आहे?”

“रामभटजी, आज डोळे धन्य झाले. रामरायाची कृपा म्हणून त्या सुंदरीचे दर्शन झाले. परंतु लक्षात ठेवा. तिचा पहिला आनंद मी लुटणार. दुसर्‍या कोणी तिचा स्वीकार करता कामा नये. मी विटलो म्हणजे मग दुसरे. मला कंटाळा येईपर्यन्त तिचा मीच भोक्ता. समजले ना?”

“ती व्यवस्था मी करतो.”

“किती महिने वाट पाहायची?”

“आता कार्तिक संपेल. चार महिने राहिले.”

“हां हां म्हणता जातील. मी मधून मधून येत जाईन. तिचे दर्शन घेत जाईन. आणि एक दिवस सुखाचा उजाडेल. झिडकारणारी ही सुंदरा मला मिठी मारील. आजपर्यंत मी कोठे माघार घेतली नाही. ती येथे कशी येऊ?”

“माघार घेण्याचा काय प्रश्न? आजही तिला नसते का जवळ घेता आले? परंतु न जाणो, एखादे वेळेस काही करायची. जरा गोडीने घ्यावे असे ठरले आहे. तीनचार महिने आता जातील. स्वत:चे हाल ती किती दिवस करून घेईल?”

“कशी बोले, कशी रागाने बघे.”

“परंतु सुंदरीचा रागही सुंदर असतो. जे सुंदर असतात त्यांचे सारे सुंदरच दिसते. त्यांना सारे साहून दिसते. त्यांचे रडणे गोड, हसणे गोड, बोलणे गोड, चालणे गोड, रागवणे गोड, रूसणे गोड ! ते एक अपूर्व दर्शन असते. क्षणाक्षणाला रंग बदलतात. छटा बदलतात.”
“भटजी, तुमची मात्र मजा आहे. तुम्हाला नित्य नूतन दर्शने !”

“परंतु दर्शनेच !”

“कमिशनही मिळते ना?”

“शेटजी, परंतु नुसते पैसे का चाटायचे?”

“रामरायाची तुमच्यावरही कृपा होईल. इच्छित भोग मिळतील.”

“मग उद्या सभा घ्यायची का?”

“बारीकसारीक सभेचा अध्यक्ष होण्यात काय आनंद? एखादी प्रांतिक वर्णाश्रम संघाची परिषद बोलवा. अखिल भारतीय परिषद बोलवा. तेथे करा अध्यक्ष. तुमच्या भद्रकालीजवळ अध्यक्ष होण्यात काय स्वारस्य? तो कमीपणा आहे. तुम्हाला नाही वाटत?”

“मी हीच गोष्ट तेथे ब्रम्हावृंदात सांगितली. मोठी परिषद भरवण्याचाही विचार आहे. पंढरपूरला भरवायची की नाशिकला हा प्रश्न आहे. परंतु परिषद हवी तीर्थक्षेत्रीच.”

“नाशिकच बरे. पंढरपूर जरा बाजूलाच पडते.”

“बघावे. बरे तर. मी जातो.”

“पाखरू संभाळा. उडून जाईल हो.”

“तो बंदोबस्त आहे. खोलीला कुलूप असते. जरूरीपुरते बाहेर जाते.”

“परंतु पाखरू जिवंत राहिले पाहिजे.”

“जिवंत राहील. तिची आयुष्यरेषा मोठी आहे.”

“तुम्ही जवळ घेऊन हात कधी पाहिलात?”

“दुरूनच रेषा दिसली.”

“बरीच सूक्ष्म दृष्टी आहे तुमची !”

“ही रामरायाची कृपा. तुम्ही उद्या जाणार म्हणता?”

“राहिलो तर कळवीनच. अच्छा, जयगोपाळ.”

“जयगोपाळ.”

रामभटजींना पोचवायला मोटार गेली. शेटजी पलंगावर पहुडले. सुंदर मच्छरदाणी वार्‍याने हलत होती. शेटजींचे मन डोलत होते. मध्येच त्यांना हसू येई. जणू गुदगुल्या होत. परंतु सरला तिकडे रडत होती. प्रभूचा धावा करीत होती. उदयला आठवीत होती. शेटजी, आज तुम्ही हसा; उद्या तुम्ही रडाल. सरले, आज तू रड; उद्या तू हसशील.

***

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED