निशांत - 7 Vrishali Gotkhindikar द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निशांत - 7

निशांत

(7)

दुसर्या दिवशी रविवार होता.
सकाळीच नाश्ता करून सुमितची स्वारी गायब झाली होती.
सुट्टी असल्याने अनया निवांत झोपली होती.
तिला उठवण्यासाठी सोनाली खोलीत गेली.
अनया शांत झोपली होती झोपेत हसत होती , स्वप्नात असावी
तिचा निरागस चेहेरा पाहुन सोनालीला कसेतरीच वाटल ..
इतक्या लहान वयात पोरीच्या डोक्यावरच बापाच छत्र गेले होत
“अनु उठ बेटा ,सकाळ झाली आता.”
असे म्हणताच अनया उठून बेडवर बसलेल्या आईच्या मांडीवर येऊन झोपली
“मम्मा मला झोपायचं अजुन..”
“चला आज मस्त आवरून नाश्ता करून बाजारात जायचेय आपल्याला
तुला मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी गिफ्ट घ्यायचे आहे न..
आणखी काय काय हव आमच्या पिल्लूला...”
असे म्हणत सोनालीने अनयाला उठवुन तयार केले
दोघी आवरून बाजारात गेल्या..
तिला हवे ते घेऊन देऊन सोनाली तिला एका आईस्क्रीमच्या दुकानात घेऊन गेली.
अनया अगदी खुष होती.
आईस्क्रीम खाताना सोनाली म्हणाली ,
“अनु तुला एक सांगु का..परवा जसे तु घरी काहीही न सांगता काका सोबत सिनेमाला गेलीस ना तसे परत जायचं नाही बर का..
मला कीती काळजी वाटली माहित आहे ना..
मला सांगितल्या शिवाय कुठ जायचं नाही हं राजा..”
“पण मम्मा मी आपल्या काका सोबत गेले होते न आणि तोच मला म्हणाला मी तुझ्या आईला सांगुन आलोय म्हणून मी गेले ना “
आईस्क्रीम खाता खाता तनया बोलली.
“ आता झाल ते झाल पण परत मात्र असे नाही जायचे बर का..”
“हो मम्मा मी नाही जाणार तुला न सांगता “अनया म्हणाली.
मग दोघी घरी गेल्या ,सुमितचा पत्ता नव्हताच.
सुट्टी असल्याने दोघी गप्पा मारत टीवी पहात बसल्या.
दुपारी अनयाचा थोडा अभ्यास पण घेतला सोनालीने.
रात्री उशिरा कुठूनतरी सुमित घरी आला..बहुधा पिऊन आला असावा
तनया जेऊन झोपुन गेली होती.
घरात येताच सुमितने सांगितले मला जेवायचे नाहीये.
निमूटपणे सोनालीने स्वयपाकघर आवरून घेतले.
हात धुवून मागे वळताचक्षणी सुमितने तिचा हात धरून आपल्या खोलीकडे
नेले ,जाता जाता अनयाच्या खोलीचा दरवाजा बंद करायला तो विसरला नाही.
मग पुन्हा रात्री एकदा दोनदा तीनदा..मग रात्री नेहेमीप्रमाणे सोनाली आपल्या खोलीत येऊन झोपली.
अचानक जर कधी मध्येच अनया उठली तर काय होईल..
अशा विचाराने सोनाली घाबरी होत होती.
दोन तीन दिवसांनी अनयाच्या शाळेला कसलीशी सुट्टी होती.
ती घरीच मैत्रिणी सोबत खेळत बसली होती.
सुमित पण घरात नव्हता मग सोनाली त्या दोघींना सांगुन बाजारात गेली.
औषधे संपली होती ,थोडी भाजी ,इतर सामान घेऊन तासाभरात सोनाली घरी परतली.आजकाल ती अनयाला सोडून फार बाहेर राहत नव्हती.
घरी आल्यावर सोनालीने बेल वाजवली
आतुन टीवीचा आणि हसण्याबोलण्याचा मोठा आवाज येत होता.
एवढे का हसत आहेत या मुली.?.
दरवाजा उघडाच होता हे दार ढकलल्यावर तिच्या लक्षत आले.
हॉलमधल्या सोफ्यावर अनयाला अगदी कुशीत घेऊन सुमित बसला होता.
दोघे काहीतरी खात खात टीवी पहात होते.
मधुनच सुमित अनयाला जवळ ओढुन तिचे पापे घेत होता.
ते दोघे टीवी मध्ये इतके गर्क होते की सोनाली आत आलेली त्यांना अजिबात समजलेच नाही.
समोरचे दृश्य पाहताच सोनाली रागाने लालेलाल झाली.
झटकन पुढे येऊन सुमितच्या मांडीवर बसलेल्या अनयाला तिने ओढुन खाली घेतले आणि तिच्या एक थोबाडात लगावली..
“कार्टे काय चाललेय हे तुमचे ? आणि मैत्रीण कुठे गेली तुझी.
अनयाला आईने का असे मारले हेच समजेना..
मोठ्याने भोकाड पसरून ती रडायला लागली.
लगेच सुमित उठला आणि अनयाला जवळ ओढुन शांत करायला लागला.
“वहीनी का त्या एवढ्याशा मुलीला मारतेस ग?
काय केलेय तिने..
किती गोड आहे ती..”
हे तो बोलत असतानाच त्याच्या डोळ्यातील “वासना” सोनालीला जाणवली.
तिने अनयाला त्याच्यापासुन दूर केले आणि कडाडली..
“अनया आधी आपल्या खोलीत जा आणि दार लाऊन घे “
आईचा राग बघुन अनया मुसमुसत खोलीत जाऊन बेडवर धाडकन पडली.
सोनालीने दरवाजा ओढुन घेतला आणि सुमितकडे पाहून म्हणाली.
“ परत अनयाला हात लावायचा नाही, तिच्या जवळ पण तु गेलेले मला नाही चालणार समजले का ?
तु माझ्यासोबत जे करतो आहेस त्याविषयी मी बोलु शकत नाही कारण मी असहाय आहे एकाकी आहे
पण माझ्या मुलीकडे अजिबात “वाकड्या” नजरेने पाहिलेलं मला नाही चालणार “
“सुमित भडकला ,” एवढी गुर्मी कुणाला दाखवते आहेस ग ?
आणि काय करणार आहेस तु माझे ?
नको तिथे फुशारक्या नको मारूस
मला वाटेल ते मी करेन...समजले ?
रात्री बोलावले कि लगेच यायचं खोलीत नाही ते “नखरे” नाही करायचे ..
असे म्हणून ताडताड पावले टाकत तो खोलीत गेला आणि धाडकन त्याने दार बंद करून घेतले.
खोलीचे दार उघडून सोनाली आत गेली तेव्हा अनया अजुन पण ओक्साबोक्सी रडत होती.
नेहेमी प्रेमाने वागणारी आई आज आपल्या अंगावर ओरडली आणि शिवाय तिने आपल्यावर हात उगारला हा धक्का तीच्या बालमनाला सहन होत नव्हता.
सोनालीने तिला जवळ घ्यायचा प्रयत्न केला पण तिने तो हात हिसडून टाकला.
तरीदेखील सोनालीने तिला शांतपणे थोपटायला सुरवात केली..
“अनु मला माफ कर ग तुला मी रागावले आणि मारले पण..
माझे खुप चुकले ग..हे बघ मी आता स्वतःला मारून घेते असे म्हणून तिने फाडफाड स्वतःच्या तोंडात मारून घ्यायला सुरवात केली.
हे बघून मात्र अनया चटकन उठली आणि आईचा हात मागे घेऊन तिच्या कुशीत शिरली.
“नको न मम्मा असे करूस..
मला खुप भीती वाटतेय..”
सोनालीने तिला कुशीत घेतले आणि म्हणाली.
“अनु मी तुला मारले याचे कारण तुला आत्ता नाही समजणार बेटा..
पण खर सांगते तुला त्रास व्हावा असे मला बिलकुल वाटत नाही “
हे बघ तुला मी काही गोष्टी सांगते..ऐकशील माझे “
“हो मम्मा नक्की ऐकेन..”
पोरीच्या तोंडावरून मायेने नात फिरवून सोनाली म्हणाली
“अनु बाळा तुला माहित आहे ना तुझ्या बाबाच्या अपघातानंतर आपण तिघीच तर आहोत.तु आता मोठी होतेयस ना
मग लक्षात ठेव कायम मम्मा सोबत राहायचे
आणि मम्माला न सांगता कुठे जायचे नाही आणि कुणाचे काही ऐकायचे नाही
“पण मम्मा मी काका सोबतच होते की आपल्या “
अनया ला गोष्टीचे “गांभीर्य” समजावून सांगणे खुप कठीण गेले सोनालीला
पण तिने ठरवले आता अनयाला आपल्या नजरेआड नाही होऊ द्यायचे.
त्या रात्री नेहेमीप्रमाणे अपरात्री तिला सुमितच्या खोलीत जावेच लागले
अत्यंत रागात असलेल्या सुमितने तिच्या शरीराचे हाल हाल केले.
त्याला झोप लागल्यावर कधीतरी ती तिथुन उठून आली.
आजच्या दिवसात जे घडले होते ते “भयंकर” होते
भविष्यातल्या “दुर्घटनेची” कदाचित ती एक सुरवात असावी.
आता सोनालीला आणखी खबरदारी घेणे भाग होते.

क्रमशः