A Strange Thing - The Siren Calls - 9 books and stories free download online pdf in Marathi

अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स (9)

९. एट दि एन्ड्, ट्रुथ प्रिवेल्ड् -

"मग? तुम्ही तिलाही...?" मी मिस्टर वाघला घाबरून विचारलं.
"तुला तिची काळजी वाटणार माहीत होतं. म्हणून नाही मारलं." तो चेष्टेत म्हणाला.
माझा चेहरा मक्ख होता. मी त्याच्या चेष्टेच्या मूड मध्ये याजीबात नव्हतो. हे समजून तो देखील गंभीर झाला. म्हणाला,
"नाही!" त्यानं शांतपणे उत्तर दिलं.
"का?" मी गोंधळून विचारलं.
"कारण तीही तेच काम करत होती, जे मी करतोय! समाजातला कचरा साफ!" तो चेहऱ्यावरचे भाव न बदलता म्हणाला.
"पण तुम्हाला तिला पोलिसांच्या स्वाधीन तर करावंच लागलं असेल?" मी शंकेन विचारलं.
"अनुषा सोबत असल्यानं; हो! पण एलिसला काही होणार नाही याचीही मी पुरेपूर व्यवस्था केली आहे!" तो म्हणाला.
"ते कसं काय?"
"माझा वकील तिची तिथली केस लढतोय!" त्यानं उत्तर दिलं.
आता मिस्टर वाघचा वकील, म्हंटल्यावर तो ही तितकाच हुशार असणार हे समजायला स्वतःला हुशारी असण्याची गरज नाही.

आणि हीच ती गोष्ट ज्याला मी मिस्टर वाघचं अनपेक्षित वागणं म्हणालो होतो. पहिल्यांदाच त्यानं इतक्या जघण्य गुन्हेगाराला जीवंत सोडलं होतं आणि ती कायद्याच्या कचाट्यातून वाचावी यासाठीही तोच तिला मदतही करत होता...
"यात तिची चूक काय?" माझ्या आश्चर्यावर तो म्हणाला,
"आपल्या देशात तिला, तिच्या बहिणीला इतकं काही भोगावं लागलं त्याची भरपाई तर केलीच पाहिजे. आपणच त्यांच्यावर अन्याय करायचा आणि आपणच त्यांना शिक्षा पण करायची याच्या सारखा क्रूरपणा दुसरा कोणता नाही! आपल्या देशाची वाईट इमेज बाहेर जाता कामा नये. म्हणून हे सारं!" तो मोहक स्मित करत म्हणाला,
"आणि शेवटी वसुधैव् कुटुंबकम् मानणारे आपण, त्या आहेत तर आपल्याच भगिनी, मग त्यांना न्याय मिळवून द्यायला नको?!"
त्यानं प्रश्न केलेला असून मी नि:स्तब्ध...

या घटनेमुळे माझ्या लक्षात आलं, की मिस्टर वाघला आपल्या देशाविषयी प्रचंड प्रेम आहे, पण त्याच सोबत तो विश्वमित्र सुद्धा आहे...!

मला असा बसलेला पाहून मिस्टर वाघच म्हणाला,
"काय? रॅपिड फायर चालू करणार नाहीस?"
"अं?" मी अजून हरवलोच होतो.
"तुझी प्रश्नावली!" तो चिडवण्यासाठी बोलला.
मी नॉर्मल झालो,
"कोण आहात तुम्ही? काय आहात?" मी नि:श्वास टाकत विचारलं.
"याच उत्तर मी देखील शोधतोय!" बराच वेळ तसाच पडलेल्या चहाचा घोट घेत तो बोलला.
त्याच्या ओठांवर तेच मोहक स्मित...
"तुम्ही... बाईलवेडे नाहीत होय ना? तुम्ही दारुडेही नाही..." मी संकोचत विचारलं.
"तुला मी असा वाटतो, सूरज?" त्यानं मला भोळा भाव चेहऱ्यावर आणत विचारलं.
"नाही!" मी उत्तर दिलं,
"पण मग... ड्रिंक्स घेणं... प्रोस्टिट्यूट, अनुषा व एलिस सोबतच तुमचं वागणं...?" मला अजूनही स्पष्ट कसं विचारावं हे कळत नव्हतं.
गार झालेला चहा एका घोटात संपवून तो म्हणाला,
"दारू मी पित नाही. घशात साठवून ठेवतो आणि वेळ मिळेल तेव्हा बाहेर ओततो." तो म्हणाला.
त्यावेळी मिस्टर वाघची नवीनच कला मला समजली. पूर्वी काही गुन्हेगारांना ही कला अवगत होती. स्वातंत्र्यपूर्व काळात अंदमानला सेल्युलर जेलमध्ये पैसे जवळ ठेवण्यास गुन्हेगारांना मनाई होती. म्हणून तेव्हा ते असं गळ्याच्या नळीत थैलीसारखी जागा करून त्यात पैसे ठेवायचे. काही जण तर चरस, गांजा, अफीम पण घशात लपवून ठेवायचे. जेलमधील बाजारासाठी बाहेर पडल्यावर ते विकून पैसेही कमवायचे. त्यामुळं हे न पटण्यासारखं नाही. मिस्टर वाघनं अजून किती कलागती माझ्या पासून लपवून ठेवल्यात हे त्यालाच माहित! आणि दुसरं त्या परमेश्वराला...
पुढं तो म्हणाला,
"प्रोस्टिट्यूट बद्दल विचारशील, तर मागील केस मधील ती माझी इंफॉर्मर होती. एलिस सोबत मला तसं वागावंच लागणार होतं, कारण त्याशिवाय मी पण एक वुमनाईझर आहे असं तिला वाटलं नसतं आणि ती माझ्या जाळ्यात अडकली नसती!" तो बोलला.
"आणि अनुषा?" मी विचारलं.
"अनुषाला एक डिटेक्टिव्ह आणि माणूस म्हणूनही खूप काही शिकायचंय. ती तेवढ्यावरच विश्वास ठेवते, जेवढं ती पाहते आणि ऐकते. तिचा आजार तसा आहे म्हणून नाही, तर जगातले सर्वच जण हीच चूक करतात. तिनं मला प्रोस्टिट्यूट सोबत पाहिल्यानं मी बाईलवेडा आहे असाच तिने माझ्याविषयी ग्रह करून घेतला. तिनं जरा निरीक्षण केलं असतं, तरी तिच्या लक्षात आलं असतं, की मी नैनितालला गेल्यापासून एकदाही तिच्याशी गैरवर्तनच काय, तर साध फ्लर्टिंगही केलं नव्हतं. पण माझ्या आधीच्या पाहिलेल्या आभासी इमेजवरून तिनं मला थरकी हा टॅग देऊन टाकला होता. म्हणून म्हटलं, हिची थोडी जळवावी!" तो खट्याळ हसला.

"तुम्ही खूप क्रूर आहात!" मी त्याला म्हंटल.
त्यावर तो म्हणाला,
"माहितेय मला. नवीन काही तरी सांग रे! नेहमी तेच बोलतोस." हा त्याचा निर्लज्जपणा होता.

आणि म्हणूनच मी म्हणतो, की जेव्हा मला मिस्टर वाघ कळायला लागलाय असं वाटायला लागतं, तेव्हा हा काहीतरी अनपेक्षित वागतो.
त्यानं पहिल्यांदाच असं एखाद्या गुन्हेगाराला जीवंत सोडलंय असं नाही. डेथ विल मध्ये ऋतुजाला, अ हेवी प्राईझ् मध्ये प्रभाची लहान मुलगी संस्कृतीला, आणि इथं एलिसला!
पण या सगळ्यात एक गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे, की मिस्टर वाघ स्त्रियांबद्दल खूप पार्शल - पक्षपाती आहे; पण असं म्हणत असतानाच हे पण लक्षात येतं, की यानं आयुष्यातील पहिला खून केला होता, तीही एक 'बाई'च होती...
आणि मग समजू चुकतं, की तो स्त्रियांविषयी पक्षपाती नाही, तर त्याचे न्याय करण्याचे दंडक व परिमाण वेगळे आहेत...!

मिस्टर वाघच्या सहवासात राहून अनुषाही तिच्या भीतीशी सामना करायला शिकली आणि तिनं तिच्या सिंड्रोमवर उपचार घेणं थांबवलं. तो नैनिताल वरून परतताना तिला म्हणाला होता,
"भूतकाळाची बंदी बनून राहू नको. तीच खरी मुक्ती आहे. आशा आहे, की तुला हवं असलेलं निर्वाण तुला प्राप्त होईल."
त्यावर तिनं त्याला उत्तर दिलं होतं,
"ऑलरेडी मिळालंय!"

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED