विनयच्या डोळ्यासमोरुन गेला हा सर्व सिनेमा. काय दिवस होते ना ते.... मंतरलेले दिवस अगदी. किती प्रयन्त केले या सर्वांना एकत्र आणण्यासाठी. पण सुरुवात झाली ती ... त्या दिवशी.
" चंदन .... तू सगळ्यांना मेल करू शकतोस ना एकाचवेळी... " ,
" सगळे म्हणजे कोण ? " ,
" पूर्ण ऑफिसला.. " ,
" का... आणि कसला मेल " ,
" अरे आज दुपारी ४ वाजता मी एक कार्यक्रम ठेवला आहे. मी गाणी गाणार आहे. " चंदन हसला त्यावर....
" कोणी permission दिली... " ,
" मोठ्या सरांनी... " ,
" हो हो... विसरली मी.. तुझी ओळख मोठ्या केबिन मधली आहे... तरी , माझ्या मित्रा... तुला आजच एक महिना झाला इथे... तुला कोण ओळखते... एक मी सोडलो तर इतर ४-५ जण.. कोण येणार ऐकायला .. " ,
" तरी कर ना मेल... " शेवटी चंदनने त्याचे काम थांबवले आणि विनय समोर बसला.
" हे बघ विनय.. तुला गाणी गायची आहेत, गिटार वाजवायचे आहे ... मी येतो ऐकायला. पण हे मेल वगैरे नको... तसही इथे कोणाला interest नाही या सर्व प्रकारात आता...त्यात पुन्हा भांडणे वगैरे नको.. तुला permission मिळाली आहे... तू वाजव... मी इथे वेळेवर.. बाकीच्यांना मेल नकोच.. ठीक आहे ना ... " एवढं बोलून चंदन त्याच्या कामात गुंतला.
सगळे कामात होते. अचानक गिटारचा आवाज येऊ लागला. चंदनने घड्याळात पाहिलं. ४ वाजले होते. " याने सुरुवात केली वाटते .. " चंदन मनातल्या मनात बोलला. खरंच त्याने गाणे सुरु केले होते. चंदनने त्याचे हातातले काम पटापट संपवून १५ मिनिटांनी पोहोचला तिथे. त्या आधीच १०-१५ जण होते तिथे. अरे व्वा !! मला तर वाटलं होते कि मीच असेन ... इथेतर आधीच आले आहे audience... सुंदर आवाज लागला होता विनयचा शिवाय आवाजही खणखणीत.. गिटार वर सुद्धा छान सूर लागले होते. एकंदरीत पाहता पहिलं गाणे फारच छान झालं. टाळ्या वाजल्या. चंदनने आजूबाजूला पाहिलं ... किती गर्दी झाली होती. पण महत्वाचे... एका कोपऱ्यात दिक्षा आणि चहाच्या मशीन जवळ अविनाश... हे सुद्धा होते. आवाजच इतका छान होता... सगळेच आकर्षित झाले. दुसरे गाणे सुरु केले त्याने. ते गाणे मध्यावर असताना, अनुजाची entry झाली. बहुदा , ती सुद्धा गाणी ऐकायलाच आली असावी. कारण परत फिरून न जाता , एका ठिकाणी उभी राहिली ती सुद्धा... सुंदर झालं दुसरं गाणे हि... पुन्हा टाळ्या वाजल्या... चंदनने नजर फिरवली. जवळपास सर्व ऑफिस होते आता तिथे... कमाल केली याने.
आणखी १५ मिनिटे विनयचा कार्यक्रम झाला. खास करून मोठे सर सुद्धा काही वेळेसाठी आलेले. एकंदरीत छान झालं सगळं. एका वर्षानंतर असं काही झाले होते ऑफिस मध्ये, त्यामुळे तिथे जमलेले सारेच खुश झाले. थोडे काही बोलावं म्हणून विनयने गिटार बाजूला ठेवली आणि उभा राहिला. " Hi ... मला ओळखत नाहीत जास्त लोकं अजूनही... मी विनय... आजच मला १ महिना झाला या ऑफिसमध्ये. मला कोणालाही इंप्रेस करायचे नव्हते. फक्त इथल्या लोकांशी ओळख करायची होती. मी ऐकलं आहे कि इथे आता पाहिल्यासारखे कार्यक्रम होतं नाहीत, खरंही असेल ते.. तरी मी एक छोटा प्रयन्त करून पाहिला... I hope ... तुम्हाला आवडला असेल... " सगळ्यांनी " हो !! " म्हटले. " thanks !! " विनयला आनंद झाला. " आणखी काही बोलू का... मी एक महिना बघतो आहे.. कोणी कोणाला साधं " good morning " सुद्धा बोलत नाही. का ते माहित नाही... निदान त्याला पैसे खर्च करावे लागत नाहीत असे वाटते मला... हेच बोलायचे होते... आजचा दिवस आणि हा आठवडा सुद्धा गेला. येणाऱ्या सोमवार पासून .. मी सुरु करणार आहे हे असे बोलायला... तुमचा समोरून रिप्लाय आला नाही तरी काही नाही... मी बोलणार.. चालेल ना.. " सर्वांनी माना डोलावल्या. हे ऐकायला त्या ४ पैकी फक्त अव्या थांबला होता. हेमंत तर आलाच नाही. दिक्षा , अनुजा आधीच निघून गेलेल्या.
चंदन हळूच अविनाशच्या शेजारी जाऊन उभा राहिला. " काय अव्या... काय बोलतोस.. इथे कसा... " ,
" असाच...काय नाय.... आपल्या ऑफिस मध्ये कोण आलं गिटार घेऊन.. ते बघायला आलो... बरा भेटला हाय timepass .... पण सांग त्याला.. जास्त दिवस चालणार नाय ते... " ,
" का ? " ,
" माहित आहे ना तुला चंद्या... आणि परत विचारतोस... कोणाला आवडत पण नाय आता हे.. " ,
" आवडत नाही... हि गर्दी आपल्या ऑफिसमधलीच आहे ना.. आणि आवडलं म्हणून तुही थांबलास ना... बघ... बदलेलं आता सर्व.. " अव्याने चहाचा कप घेतला... एकदा चंदनकडे , नंतर विनयकडे एक नजर टाकून निघून गेला.
आणि खरंच, फरक तर जाणवतं होता. कारण त्या दिवसापासून विनयला सगळेच ओळखायला लागले होते. शिवाय " गुड मॉर्निंग " बोलणे सुरु झालेलं. सर्वच बोलत नसले तरी सुरु तर झाले होते.
" Good morning दिक्षा... " चंदन दिक्षाच्या डेस्क जवळ आला. दिक्षाने कामातून डोकं वर काढलं.
" हे काय नवीन.. " ,
" सहज... रिप्लाय तर दे Good morning चा... " ,
" हो हो ... Good morning .. पण मधेच का.. " ,
" मधेच कुठे दिक्षा... हे आपण आधीही करायचो... विसरलीस का... " ,
" हो... विसरले... आणि तुही विसरून जा... " ,
" दिक्षा... काही नवीन होते आहे... तर होऊ दे ना ... " चंदनच्या या वाक्यावर दिक्षा काही न बोलता कामात गुंतली.
दिवस पुढे जात होते तशी विनयची ओळख वाढत होती. दर शुक्रवारी त्याचा गाण्याचा कार्यक्रम ठरलेला. आतातर सगळे यायचे, हेमंत सोडला तर बाकी सगळयांची हजेरी असायची. तो "फरक " सगळ्यांनी आपलासा करून घेतला होता. पण आता विनयला काहीतरी वेगळं करायचे होते. चंदनला त्याने त्याचे मनोगत सांगितले.
" अरे बाबा.... काय वेड-बीड लागलं आहे का... ",
" वेडेपणा काय त्यात... तिला जाऊन फक्त बोलवायचे आहे... " ....
" हे बघ... तू तिला फक्त बघितलं आहेस ... ३-४ वेळेला.. मी ओळखतो तिला.... सांगतो ते ऐक... नको भलता प्रयत्न करुस... ",
" ok .... एक काम करू... मला घेऊन चल तिच्या पाशी... मीच बोलतो ... " हा काही ऐकणार नाही... म्हणत चंदन तसाच त्याला घेऊन गेला अनुजाकडे.
" Hi अनुजा... " चंदन, तसं अनुजाने मागे वळून पाहिलं. विनयशी नजरानजर झाली. तीच ती घायाळ करणारी नजर, विनय तर वेडाच होता त्या नजरेचा. पण यावेळेस त्याने सांभाळलं स्वतःला.
" बोल चंदन... " अनुजा बोलली.
" हा विनय... याला ओळखतेस ना.. " अनुजाने एकदा नजर फिरवली विनय वर.
" हम्म " अनुजाने पुन्हा कामात डोकं घातले. " याला काही बोलायचे आहे तुझ्याशी... मी निघतो... " चंदन सटकला तिथून.
" बसा मिस्टर विनय... " अनुजाने कामात लक्ष असतानाच त्याला बसायला सांगतले. " तुम्ही बोला.. मी ऐकते आहे. " ,
" या महिन्यात तुमचा birthday होता ना.... " विनयच्या या वाक्यावर तिने तिचे काम थांबवले क्षणभर.
" So ... then ... ??" ,
" उद्या महिन्याचा शेवटचा दिवस आहे... या महिन्यात ज्याचे वाढदिवस होते , त्या सर्वांचा एकत्र बर्थडे सेलेब्रेट करणार आहोत.. मोठ्या सरांची permision आहे... " ,
" तर ... " ,
" तर उद्या या बरोबर ४ वाजता केक कापण्यासाठी.... " अनुजा बघत राहिली त्याकडे... थेट आमंत्रण...
" मिस्टर विनय ... तुम्ही गाता छान ... गिटार वाजवता... कामात छान आहात... याचा अर्थ असा नाही कि तुम्ही जी गोष्ट कराल ती छान च असेल.." ,
" छानच आहे ना... सगळयांना आवडलं, म्हणून तयार झाले ना.. तुम्ही राहिला होता म्हणून सांगायला आलो. " ,
" मग जे तयार आहेत ना... त्यांना घेऊन करा celebration.. मला काही interest नाही... तुमचे बोलणे झाले असे समजते मी. जाऊ शकता तुम्ही.... " आणि अनुजा पुन्हा कामाला लागली.
-------------------------- क्रमश: ------------------