Marnala kaay ghabrayche ? books and stories free download online pdf in Marathi

मरणाला काय घाबरायचे? 

मरणाला काय घाबरायचे?
मानवी जीवन खूप सुंदर आहे. त्याचा प्रत्येकाने परिपूर्ण उपभोग घेतला पाहिजे. जीवन जगत असताना मरणाला घाबरून कसे चालेल. माणसाचं वागणं काहीसे विपरितच असते. तो मरणाला खूप घाबरतो. मात्र एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे की वेळ आल्याशिवाय मरण येत नाही. वेळेपूर्वी कितीही संकटाचा सामना करा तुम्ही जिवंतच राहणार अन वेळ आल्यावर कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला कोणी वाचवू शकणार नाही. हे जर वास्तव असेल तर मरणाला घाबरून कसे चालेल.
आजकाल टीव्ही मोबाईल पाहणारेच मरणाला खूप घाबरतात. त्यात मरणाला प्राधान्य देणारेच कार्यक्रम असतात. बातम्या, सिरीयल, चित्रपट, मेसेजेस मरणाचेच प्रतिनिधित्व करतात. शुगर, बीपी, नैसर्गिक आपत्ती, जगबुडी, युद्ध, विविध रोग याची भीती दाखवून जीवनाची आनंददायी रंगतच काढून टाकली जाते.50 वर्षांनंतर तर दीर्घकाळ जगण्याचा सल्ला व उपाय सांगणारे अनेकजण भेटतात. जस काही यमाने याना पृथ्वीतलावर आपले प्रतिनिधी म्हणूनच नेमले आहे. हे खाऊ नका, हे पिऊ नका , व्यायाम करा, खूपच जाडी वाढली असा सल्ला देणाऱ्यांची मला कीव करावी वाटते. ही मंडळी स्वतः सगळं करतात उपदेश मात्र दुसऱ्याला करतात.
मला दोन प्रसंगाची येथे उदाहरणे द्यावी वाटतात. आमचे एक मित्र सुपारीचे सुद्धा व्यसन नाही.शाकाहारी जेवणाशिवाय आयुष्यभर काहीही खाल्ले नाही. भरपूर व्यायाम, दवाखान्याची पायरी कधी चढले नाहीत. सेवानिवृत्ती नंतर एक दिवस ह्रदयविकाराचा झटका आला. आयुष्य संपले. वेळ आली की जग सोडावे लागले. त्यांना वास्तविक दीर्घायुष्य लाभावयास हवे होते. आमचे दुसरे एक सहकारी नेहमी दुसऱ्याला म्हणायचे मला कोणतीही व्याधी नाही त्यामुळे मला काळजी करण्याचे कारण नाही. एक दिवस देवदर्शनासाठी गेले तेथेच मरण आले. थोडक्यात काय आपण कितीही जपले तरी वेळ आली की आपणास कोणीही थांबवू शकत नाही. असे असेल तर उर्वरित आयुष्याचा उपभोग घेण्याचे सोडून मरणाची कसली चिंता करता? वेळ आली की डॉकटर, नातेवाईक, मित्र कोणीसुद्धा तुम्हाला वाचवू शकत नाही.
मानवी जीवन एकदाच असते. सतत हसत राहिले पाहिजे. काय करावे वाटेल ते मनसोक्त केले पाहिजे. समाज काय म्हणेल, आपल्याला कोणी नावे ठेवेल का? याचा विचारच करायचा नाही. तुम्ही खूप चांगले वागला म्हणजे समाज तुम्हाला प्रशस्तीपत्र देईल व तुम्हाला या जगातून नेताना ते प्रशस्तीपत्र जगण्याची मुदत वाढवण्याचे शिफारस पत्र म्हणून विचारात घेतले जाईल असे मुळीच समजू नका.
टी व्ही ला एडियट बॉक्स म्हणतात ते काही खोटे नाही. अमुक तेलातील पदार्थ खाल्ल्याने आयुष्य वाढते, जीवन पद्धतीत बदल केला की खूप काळ जगता येते, जिम लावली की आजार पळून जातात हा झाला व्यवसाय वृद्धीचा भाग. त्याकडे डोळेझाक करणेच चांगले. परमेश्वराने जन्माला घालतानाच आपल्या आयुष्याची पॅकिंग डेट व एक्सपायरी डेट लिहलेली असते. ती कोणीही बदलू शकत नाही. औषधी गोळ्यावर आपण या दोन्ही डेट पाहतो. एक्सपायरी डेट संपली असेल तर गोळ्या आपण वापरत नाही. परमेश्वर देखील तुमचे कार्य सम्पलय असे मानून तुमच्या एक्सपायरी डेट ला तुम्हाला उचलतो. हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडते मग त्याला घाबरून कसे चालेल?
प्रत्येकजण आपल्या तब्येतीवर टिपलेला असतो. बघा ना भेटल्यावर पहिला प्रश्न असतो , काय म्हणते तब्येत? किती शुगर लेव्हल आहे? चेहरा जरा सुजलेला दिसतो ? एकदा चेक करून घ्या. आपण काहीही विचारले नसताना अशी विचारणा करणारी सल्ले देणारी मंडळी खूप भेटतात. मरणाचा अंदाज कोणी बांधू शकत नाही. त्यामुळे आयुष्य आहे तोवर हसा आनंदी रहा. काही माणसे आपला आजार सतत उगाळत बसतात. शुगर 200 झाली, बीपी वाढला किंवा कमी झाला, भूकच लागत नाही, झोपच येत नाही, गुडघे खूप दुखतात अशा विविध तक्रारी असतात. बायका तर सतत कसतरीच होतंय अशी तक्रार करतात. कसतरीच म्हणजे कस हे देखील त्यांना सांगता येत नाही. गमतीचा भाग सोडा. तक्रारीचा पाढा वाचणे बंद करा. मग बघा जीवन किती सुंदर आहे.
प्रदीप जोशी, पत्रकार, मोबाईल 9881157709

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED