Me aek Ardhvatraav - 1 books and stories free download online pdf in Marathi

मी एक अर्धवटराव - 1

१) मी एक अर्धवटराव!
'नमस्कार! मी अर्धवटराव! दचकलात ना असे अजब गजब नाव ऐकून? खरे सांगू का या नावाने मला कुणी हाक मारली तर मी दचकत नाही, रागावत नाही, चिडत नाही, ओरडत नाही आणि रडतही नाही. उलट अशी हाक कुणी आणि त्यातल्या त्यात बायकोने मारली ना तर मला एखादा बहुमान, सर्वोच्च पुरस्कार मिळाल्यासारखे वाटते. एक अगदी खरे-खरे कुणाचीही शपथ न घेता सांगतो (कारण शपथ घेतली म्हणजे खरेच बोलावे असा काही नियम नाही ना, फारतर तो एक संकेत आहे) की, अर्धवटराव हे नाव मला माझ्या बारशाच्या दिवशी, पाळण्यातून खाली-वर करताना मिळालेले नाही. शाळा, कॉलेज, कार्यालय किंवा कुठेही लिखित स्वरूपात या नावाचा पुरावा नाही. तरीही हे नाव मला मिळालेले आहे. आता सांगूनच टाकतो ना, कशाला तुमची उत्सुकता ताणायची ना. हे नाव माझ्यासाठी माझ्या अतिप्रिय बायकोने अगदी लाडाने, कधी त्राग्याने, कधी वैतागून, कधी चिडून उच्चारलेले आहे. सुट्टीच्या दिवशी मी घरी असायचो ना तर दिवसातून किमान शंभर वेळा या नावाने पुकारा होतो. आता तर काय मी सेवानिवृत्त झाल्यामुळे तिच्याकडून माझ्या या नावाचा मारे जपच चालू असतो. जागेपणी तर जागेपणी पण रात्री-अपरात्री मी जागा होतो माझी बायको झोपेतही 'अर्धवटराव... अहो, अर्धवटराव...' असे बरळत असल्यामुळे! एकदा तर आमच्या सौभाग्यवतीने कहरच केला. काय झाले, एका पाहुण्याकडे आम्ही लग्नाच्या निमित्ताने गेलो होतो. आता चार बायका एकत्र जमल्या आणि विवाह सोहळा असला की, नवऱ्याचे नाव घ्यायची आणि तेही उखाण्यात घ्यायची प्रथा, परंपरा, प्रघात, रीत आहे. त्या मंगलकार्यातही बायकांनी नाव घ्यावे अशी टुम इतर कुणी नाही तर खुद्द गुरुनींच काढली. अशी टुम काढण्यात गुरु वस्ताद असतात. बाई नवोदित असो की, कवळी बसवलेली असो तिला गुरूंच्या इच्छेखातर नवऱ्याचे नाव घ्यावेच लागते. त्याप्रमाणे तिथे नाव घेण्याचा कार्यक्रम सुरु झाला. एक-एक स्त्री बाई नाव घेत असताना पाळी आली ती माझ्या परमप्रिय पत्नीवर! पतीचे नाव घ्यायची मनोमन इच्छा असतानाही इतर बायका ज्याप्रमाणे लाजतात,मुरडतात, टाळाटाळ करतात तसे सारे प्रकार करून अखेर माझ्या बायकोने खणखणीत उखाणा घेतला...
'शुभ कार्यात थोरामोठ्यांचे आशीर्वाद
घ्यावेत,त्यांचे पद स्पर्शून,
अर्धवटरावांचे नाव घेते,
गुरुंचा मान राखून !'
तुम्हाला सांगतो त्या मंगलमय वातावरणात तो उखाणा ऐकून स्मशानशांतता पसरली. सारे स्त्री-पुरुष कधी माझ्याकडे तर कधी माझ्या सौभाग्यवतीकडे आश्चर्याने पाहू लागले. कुणाला काहीही अर्थबोध होत नव्हता. तितक्यात एका चाणाक्ष बाईच्या लक्षात तो प्रकार आला. तिने हसायला सुरुवात केली आणि लायटिंगच्या माळांमधील बल्ब एकानंतर एक प्रज्वलीत व्हावेत तसे तिथे हास्याचे लोट उठले. सारे हसून लोटपोट होत असताना आमची बायको मात्र लाजेने चुर्र होत तिथून बाजूला झाली. तिने तशा कार्यक्रमात घेतलेले, सार्वजनिक केलेले माझे अर्धवटराव नाव ऐकून मला तिचा राग आला नाही उलट चूक लक्षात येताच तिचा गोरामोरा झालेला चेहरा, चेहऱ्यावर पसरलेली लाली, डोळ्यातील अपराधीपणाचे भाव पाहून मला आनंद झाला, समाधान वाटले आणि मग मीही इतरांसोबत पोट धरून हसू लागलो...
आपल्याकडे कसे आहे, दोन अपरिचित व्यक्ती काही क्षण का होईना समोरासमोर आल्या ना की, एकमेकांचा परिचय करून घेतात... 'नमस्कार! मी अमुक अमुक. मी या गावचा रहिवासी आहे. मी फलाण्या गावी नोकरीस आहे. आपण?' असे त्याने विचारताच समोरची व्यक्तीही अशाच प्रकारे स्वतःचा परिचय करून देते. किंवा दोन अपरिचित व्यक्ती त्या दोघांचा ज्या व्यक्तीसोबत परिचय असतो अशा अन्य एखाद्या व्यक्तीकडे भेटल्या की, तो त्रयस्थ त्या दोन अपरिचित व्यक्तींचा परिचय करून देतो. एकमेकांना परिचय करून देण्याचे एक हमखास ठिकाण म्हणजे प्रशिक्षण स्थळ! वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या लोकांना प्रशिक्षणाच्या सुरूवातीला परिचय द्यावा लागतो.
'नमस्कार! मी अमुक तमुक चमके! शिक्षण धमके! पद पावके! नोकरीला इतकी वर्षे झाली. मिळालेले पुरस्कार.... इत्यादी बाबींचा समावेश...' असो हे झाले परिचयाचे! एकदा मोठी गंमत झाली हो. मोठी धम्मालच झाली म्हणा ना. काय झाले? एकदा मी एका प्रशिक्षणात मी माझा परिचय करून देताना म्हणालो,
'नमस्कार! मी अर्धवटराव! घरकामाची मुळीच आवड नाही. चुकून एखादे काम करावेच लागले तर म्हणजे बायकोच्या हट्टापायी किंवा धाकापोटी एखादे काम करावेच लागले ना तर वेंधळ्याप्रमाणे, अर्धवटपणे असे करतो. कामचुकारपणा हा माझा स्थायीभाव! कामकंटाळा... काम कसे टाळावे हा विषय घेऊन मी पी.एच.डी. करु शकतो एवढा मी या विषयात पारंगत, प्रवीण आहे परंतु कंटाळा असल्यामुळे 'कामकंटाळा' या विषयावरील माझा तयार असलेला प्रबंध पाठवायचे राहून जाते. बोलणे हा माझा अत्यंत आवडता विषय! तहानभूक विसरून क्रिकेट पाहणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार!...' मी माझा असा परिचय करून देत असताना त्या ठिकाणी अशा हास्याच्या लहरी कोसळल्या म्हणता विचारुच नका. व्यासपीठावर असलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. कदाचित त्यांचाही अनुभव तोच असावा परंतु 'असा' स्वतःचा परिचय करून देण्याची त्यांच्याजवळ हिंमत नव्हती कदाचित संकोच आडवा येत असावा. त्यांच्या डोळ्यात आलेले पाणी पाहून मला तर वाटले की, प्रत्येकाच्या डोळ्यासमोर एखादा तांब्या धरला तर तो एका क्षणात अश्रूंनी भरून जाईल...
अर्धवटराव हे नाव बायकोने विधिवत दिले असले तरीही आस्मादिक लहान असल्यापासून त्याच्या अर्धवटपणाची चुणूक घरातील मंडळीस आमच्या एकूण वागण्यावरून लागली होती. त्यामुळे अमावस्या-पोर्णिमेस घरातील कुणी ना कुणी कंटाळून, रागावून, वैतागून, चिडून माझ्या नावाने बारसे करीत असत. परंतु पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय पदवीदान समारंभ होत नाही. त्यामुळे 'विवाह' ही पदवी संपादन केली आणि काही दिवसातच संसार या विद्यापीठाच्या कुलगुरू अर्थात आमच्या अर्धांगिनीने आम्हाला 'अर्धवटराव' ही पदवी बहाल केली आणि आम्ही भरून पावलो. कदाचित या समारंभाचा सोहळा पत्नीच्या हस्ते व्हावा असे आमच्या कुंडलीत लिहून ठेवले असावे. कसे का होईना तो सन्मान आम्हाला प्राप्त झाला हेही नसे थोडके...
एक मात्र नक्की की, बालपणापासून ते आजपर्यंत घडीपर्यंतचा इतिहास, एकूण प्रवास खूपच मनोरंजक आहे. तो जशास तसा तुमच्यापुढे ठेवत आहे...
मी जन्मतःच आळशी होतो आणि जन्म किती घेतानाही मी किती आळस केला ह्याचा किस्सा आईकडून मला वारंवार ऐकायला मिळत असे. झाले काय तर मी आईच्या पोटात प्रवेश केला. नऊ महिन्यापेक्षा जास्त काळ मी आईच्या पोटात मजेत होतो. यथायोग्य मी बाहेर पडायची धडपड सुरू केली. त्यावेळी आईला खूप वेदना होत होत्या. शहर म्हणता येईल अशा एका गावात माझे आई-बाबा राहात होते. तिथल्या दवाखान्यात सोई सुविधा तशा नगण्यच. तिथल्या डॉक्टरांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इमानेइतबारे आईची सुटका करण्याचा अर्थात मला या जगात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे सारे प्रयत्न निष्फळ ठरले. आईची तब्येत आणि सारेच काही अत्यंत गुंतागुंतीचे झाल्यामुळे त्या डॉक्टरांनी बाबांना सांगितले की, तुम्ही ताबडतोब शेजारच्या शहरात घेऊन जा. तिथे म्हणे बऱ्यापैकी सुविधा होत्या. झाले. तशा अवघड परिस्थितीत आईची आणि माझी रवानगी शेजारच्या शहरात करण्यात आली. प्राथमिक तपासणी होताच डॉक्टरांनी सांगितले की, बरीच अवघड केस आहे कारण बाळ आडवे आले आहे. त्यामुळे वेळ लागू शकतो. बाळाच्या किंवा आईच्या धोकाही होऊ शकतो. बाबांपुढे 'हो' म्हणण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता. माझे हे 'आडवेपण' मला सातत्याने पुढे ऐकावे लागायचे. काहीही झाले की, आई आधी म्हणायची की, जन्मापासूनच आडवं आहे हे कार्ट! डॉक्टरांनी सर्व प्रयत्न सुरू केले. पण आईची प्रकृती क्षणोक्षणी गंभीर, नाजूक होत होती. तशा परिस्थितीत एक दिवस गेला. दोन दिवस झाले. आई ओरडून ओरडून बेशुद्ध झाल्याप्रमाणे पडली होती. तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हता आणि वेदनाही सहन होत नव्हत्या. सलाईन सुरू होते. इंजेक्शनचा मारा सुरू होता. तोंडातून औषधे दिल्या जात होती पण मी मात्र आतच निश्चल पडून होतो. मला कसलीही घाई झाली नव्हती. बरीच नातेवाईक मंडळी जमली होती. एक वयस्कर, अनुभवी बाई म्हणाली म्हणे की, बहुतेक बाळाने आत जीव सोडलाय. या डॉक्टरांना काही समजत नाही. त्यामुळे सारे अधिकच परेशान झाले असताना बाहेर आलेल्या नर्सला कुणीतरी विचारले. तशी ती उद्गारली की, 'तसे काही नाही. बाळ जिवंत आहे, सुखरूप आहे. त्याचीही धडपड बाहेर येण्यासाठी सुरू आहे.' आईला ऑक्सिजन आणि रक्ताचा पुरवठा सुरू करण्यात आला. दुसरीकडे डॉक्टरांनी बाबांना बोलावून सांगितले की,
'हे बघा. आमचे सारे प्रयत्न संपले आहेत. आता ईश्वरेच्छा! ' कदाचित त्यावेळी आजचा प्रचलित उपचार म्हणजे 'सिझर' नसेल किंवा आईची नाजूक अवस्था पाहता डॉक्टर ती प्रक्रिया टाळत असतील. सारे काही परमेश्वरावर सोडून बाबा आणि इतर नातेवाईक हवालदिल होऊन बसले होते. कुणी काही, कोणी कोणता सल्ला देत होते. कुणी म्हणाले की, अजून मोठ्या शहरात नेऊया. परंतु डॉक्टर ठामपणे विरोध करत होते...
शेवटी तिसऱ्या दिवशी रात्री बारा वाजता आईची सुटका झाली. आई बेशुद्धच होती. दुसऱ्या दिवशी आई शुद्धीवर आली. आईची तब्येत सुधारत असताना एका नर्सने आईला सांगितले की, बाळ जेव्हा बाहेर आले. त्याची स्वच्छता करताना मला जाणवले की, त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे हलके असे हसू होते. याचा अर्थ दुसऱ्याला त्रास, वेदना होताना पाहून त्याला आनंद होत होता. आहे की नाही मी आळशी! आईच्या पोटातून बाहेर पडायला मी चक्क तीन दिवस घेतले होते. कंटाळा, आळस आणि त्यामुळे कोणत्याही कामात येणारा अर्धवटपणा हे गुण माझ्या पाचवीलाच पुजलेत असे म्हणण्यापेक्षा हे सारे गुण माझ्या रक्तातच मिसळले आहेत असे म्हणणे जास्त उचित ठरेल नाही का? नंतर भविष्यात ज्या ज्या वेळी मला माझ्या या गुणांची कुणी आठवण करून देत असे, तसा दाखला देत असे त्यावेळी मी म्हणत असे की, अहो, ते तर माझ्यावर झालेले गर्भसंस्कार आहेत. त्यावेळी आई तिथे असली म्हणजे ती हसून दाद देताना म्हणत असे, 'बघा. किती निर्लज्ज आहे तो. अरे, तुझे नशीब चांगले म्हणून मी जिवंत राहिले. नाही तर तुझ्या आळसामुळे मी बाळंतपणातच 'राम' म्हटले असते....'
@नागेश सू. शेवाळकर

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED