मी एक अर्धवटराव - 6 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

मी एक अर्धवटराव - 6

६) मी एक अर्धवटराव!
विवाहानंतर एक-एक दिवस, आठवडे, महिने आणि अर्थातच वर्षेही एकामागून एक जात होती. परंतु माझ्या स्वभावात तीळमात्र फरक पडत नव्हता उलट अंगीभूत असलेले गुण दिवसेंदिवस वाढत होते. नशीब चांगले की,बायको अत्यंत समजूतदार, गृहकृत्यदक्ष होती. कधी माझ्या स्वभावामुळे चिडत होती, रागवत होती, संतापत होती,त्रागा करीत होती, रुसत-फुगत होती, आदळआपट करीत असे पण शेवटी सारे सांभाळून, समजून घेत होती,'पदरी पडले नि पवित्र झाले' याप्रमाणे वागत होती. आमचा संसार कडुगोड आठवणींसह सुरळीतपणे चालू आहे...
रविवारचा दिवस उजाडत असताना बायकोच्या कोंबड्याने बांग दिली. नाही! तसे नाही! आम्ही कोंबडाच काय पण कोणताही प्राणी आयुष्यभरात पाळला नाही त्याचे एकमेव कारण म्हणजे बायकोला असलेली प्राण्यांबद्दलची ऍलर्जी, घृणा, किळस, तिरस्कार अजून बरेच काही. तर कोंबड्याने बांग दिली म्हणजे हिचा भ्रमणध्वनी सकाळी सकाळी आरवला. मी नेहमीप्रमाणे सकाळपासूनच जागा होतो. रविवारची सुट्टी असल्याने जरा उशिराने उठावे असा विचार करीत रात्री अंथरुणावर आडवा झालो परंतु मनातील विचार मनातच राहिले कारण ठरलेल्या वेळी जाग आली. एकदा जाग आल्यावर रविवार असो की अजून कोणती सुट्टी पुन्हा झोप लागणे शक्यच नाही. त्यामुळे झोप नाही तर नाही खूप वेळ मस्त लोळत पडावे या विचाराने मी पडून राहिलो. ह्या स्थितीत काही क्षण पडून राहिलो न राहिलो तोच दिवाणाच्या दुसऱ्या बाजूस ठेवलेल्या आमच्या दोघांच्याही भ्रमणध्वनीपैकी सौभाग्यवतीचा भ्रमणध्वनी वाजला. एक अलिखित नियम असा आहे की, अपवादात्मक परिस्थिती सोडली तर ज्याचा भ्रमणध्वनी वाजेल त्याने तो उचलावा. त्यामुळे मला वाटले, बायकोचा फोन वाजतोय ती उचलेल. मी शेजारी बघितले, बायको घोरत असल्यामुळे तिच्या कानावर तो आवाज पडत नव्हता. तिच्या झोपेत त्या आवाजाने व्यत्यय येईल, किमान ती कुस बदलेल या माझ्या विचारला तिने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. शेवटी मी धडपडत, चरफडत उठलो. भ्रमणध्वनी घेतला. त्यावर तिच्या मैत्रिणीचे नाव दिसत होते. म्हणजे मी तो फोन उचलून फायदा नव्हता कारण मी उचलला तरी काय सांगणार होतो तर माझी बायको झोपली आहे. ती उठली की, तिला फोन करायला सांगतो. असे एक दोन वेळा झाल्यानंतर बायको म्हणाली,
"मी झोपेत असताना विशेषतः सकाळी सकाळी कुणाचा फोन आला तर उचलायचा नाही. बायको झोपेत आहे असे तुम्ही सांगितले की, नंतर मी लावला की, सारे हसतात. माझी खिल्ली उडवतात. तो अपमान मला सहन होत नाही..."
झाले तेव्हापासून मी बायकोला आलेला कुणाचाही फोन उचलत नाही. हिच्या मैत्रिणीचा फोन आलाय हे तिला उठवून सांगावे की फोन कट होऊ द्यावा हा विचार सुरू असताना तिला उठवावे असे मी ठरवले कारण नाही उठवले तर पुन्हा दिवसभर हिची एकच एक टेप ऐकावी लागेल म्हणून मी हातात भ्रमणध्वनी घेतला आणि बायकोला उठवावे म्हणून मागे वळत असताना तो बंदही झाला. मला एवढा आनंद झाला म्हणता की, मी पुटपुटलो,
' बरे झाले. कट झाला. विना औषधाचे खांडुक फुटले. ही उठल्यावर पुन्हा आला आणि तेव्हा मैत्रिणीने हिला 'का उचलला नाही?' असे विचारले आणि नंतर बायकोने आपल्याला विचारले तर सरळ सांगता येईल की, मलाही जाग आली नाही ग...' पण कसचे काय? माझा विचार मनातच राहिला. कारण पुन्हा हिचा भ्रमणध्वनी वाजू लागला. यावेळी मात्र कोणताही विचार आणि उशीर न करता पटकन तो भ्रमणध्वनी उचलला आणि कुंभकर्णाच्या कानाशी वाद्ये वाजवावीत तसा तो वाजणारा फोन सरळ सौभाग्यवतीच्या कानाशी लावला. तुम्हाला खरेच सांगतो हिच्या भ्रमणध्वनीची ट्युन अक्षरशः नगाऱ्याचा यावा अशी होती शिवाय आवाजही मुद्दाम मोठा केलेला होता. तो कर्णकर्कश्श आवाज कानी पडताच ती दचकून जागी झाली.
"क... क.. काय? फ..फ..फोन कुणाचा?.." असे ती अर्धवट झोपेत बरळत असताना मी काहीही न बोलता फोन 'ऑन' करून तिच्या कानाशी लावला. गंमत अशी की मी फोन ऑन केलाय हे तिला समजलेच नाही. गाढ झोपेचा परिणाम दुसरे काय? त्याच अवस्थेत ती बडबडली
"सकाळी सकाळी कोण कलमडलय हो? धड झोपूही देत नाहीत. आणि काय हो, तुम्ही उचलला असता आणि मी झोपलेय हे सांगितले असते तर? एखादे दिवशी थोडे पडावे म्हटले की, झोप मोडायला कुणी तरी भुतासारखे अवतरते..."
ते ऐकून मी हसत हसत म्हणालो, "अग, तुझ्या मैत्रिणीचा फोन आहे. मी उचललाय. बोल पटकन..." ते ऐकून माझ्याकडे जळजळीत कटाक्ष टाकून ती बोलायला लागली. बहुतेक हिने केलेला त्रागा तिकडे ऐकू गेला नसावा. नंतर जवळपास वीस मिनिटे ती मैत्रिणीशी बोलत होती. त्यावरून मी एवढाच अंदाज काढला की, त्या मैत्रिणीचा नवरा एका बैठकीसाठी आमच्या गावी येणार होता. सहज भेटायला म्हणून आमच्या घरी येणार होता. भ्रमणध्वनीवर मनसोक्त बोलणे होताच भ्रमणध्वनी बंद झालाय की नाही याची खातरजमा न करता ही घाईघाईने मला म्हणाली,
"अहो, ऐकलत का? सीमीचा फोन होता. तिचा नवरा आपल्याकडे येणार आहे..."
"केव्हा?किती वाजता?"
"तसे नक्की काही सांगितले नाही पण त्यांच्या सवडीनुसार भेटायला येणार आहेत."
"मग स्वयंपाकाचे कसे?" दोघींच्या फोनवरील संभाषणातून ते जेवायला येणार नाहीत हे मला समजले होते परंतु मी मुद्दाम विचारले कारण बायकोकडील कुणी येणार असले आणि नवऱ्याने जेवणाची चौकशी केली की बायका खूप खुश होतात हा माझा अनुभव आहे.
"नाही म्हणे. ते तिकडेच जेवणार आहेत. फराळही करणार नाहीत. फक्त चहा घेतील..."
"फक्त चहा? काय कमाल आहे,इतक्या दुरून येणार आणि केवळ चहा घेणार? कसे आहे, ते जेवले असते किंवा फराळ करतो म्हणाले असते तर 'गाड्याबरोबर नळ्याची यात्रा..' याप्रमाणे जरा आमच्याही जीभेचे चोचले पुरले असते ना?"
"तुम्हाला असे म्हणायचे का की, कुणी पाहुणा आला तरच तुम्हाला चांगलेचुंगले, चमचमीत खायला मिळते आणि एरव्ही काय? ते जाऊ द्या. असे करा. थोड्या वेळाने बाहेर जाऊन आईस्क्रीम घेऊन या. आणि हो चॉकलेट फ्लेवर आणा. त्यांना आवडते म्हणे..."
"ही आवड काय सीमाने सांगितली काय? हां. बरोबर आहे. फोनवर नेहमी तासनतास बोलत असतात. बोलून बोलून बोलणार तरी काय? मग नवऱ्यांच्या आवडीनिवडी, खाणपान यावरही चर्चा रंगत असणार. आणतो. चॉकलेट आईस्क्रीम आणतो..." असे म्हणत मी सकाळची कामे आटोपली.
अकराचा सुमार असेल. सीमाचा पुन्हा फोन आला. बोलणे होताच बायको म्हणाली,
"अहो, सीमाचा नवरा दहा-पंधरा मिनिटात येतोय. लवकर जाऊन... नाही तर असे करा ना, उगीच दूरवर जाण्यापेक्षा इथल्या जवळच्या दुकानातून चॉकलेटचा वास असलेले आईस्क्रीम घेऊन या. असेल थोडे महाग पण काय करणार. वेळ महत्त्वाची आहे..."
"ठीक आहे..." असे म्हणत मी बाहेर पडलो...
पंधरा-वीस मिनिटात मी घरी परतलो. ही स्वयंपाक घरात होती. माझी चाहूल लागताच म्हणाली, "आलात ना? मिळाले ना? फ्रीजमध्ये ठेवा..."
हातातील पिशवी फ्रीजमध्ये ठेवून मी दिवाणखान्यात सोफ्यावर टेकतो न टेकतो तोच पाहुण्यांचे आगमन झाले. नमस्कार-चमत्कार झाला. मी त्यांना सन्मानाने सोफ्यावर बसवले. तितक्यात पाणी घेऊन सौभाग्यवतीचे आगमन झाले. प्याला घेत ते म्हणाले,
"वहिनी, चहा-फराळ काहीही नको. वेळ फार कमी आहे. महत्त्वाची बैठक आहे. लगेच निघावे लागेल..."
"अहो, पण असे कसे?..."
"टेंशन घेऊ नका. केवळ भेट व्हावी म्हणून मी आलोय..."
"ठीक आहे. आलेच..." म्हणत ही आत गेली आणि दुसऱ्याच क्षणी आवाज आला,
"अहो, एक मिनिट या ना."
"आलोच..." असे म्हणत मी आत गेलो. ही फ्रीजपुढे उभी होती. मला पाहताच हाताच्या इशाऱ्याने तिने विचारले,
"कुठे आहे?"
मी फ्रीजजवळ गेलो. मी ठेवलेली पिशवी काढून तिच्या हातात दिली आणि वळलो न वळलो तोच हिचा हात माझ्या खांद्यावर विसावला. हाताचा खांद्यावर पडलेला दाब लक्षात येताच मी समजलो की, काही तरी नक्कीच बिनसले आहे हे ओळखून मी मागे वळलो.
"हे काय नुसते चॉकलेट? आईस्क्रीम कुठे आहे?" बायकोने शक्य तेवढे आवाजावर नियंत्रण ठेवून विचारले. शब्द आणि आवाजावर जरी ताबा असला तरीही चेहरा संतापाने फुलला होता. डोळे आग ओकत असल्याचे पाहून मी विचारले,
"आईस्क्रीम? तू कधी सांगितलेस? चॉकलेट सांगितलेस तेच आणले..."
"जा. बसा. आता..." ती हलक्या आवाजात परंतु पराकोटीच्या रागात म्हणाली. तसा मी पडत्या फळाची आज्ञा घेतल्याप्रमाणे दिवाणखान्यात आलो. आम्ही दोघे गप्पा मारत बसलो असलो तरीही दोघेही बेचैन, अस्वस्थ होतो. कारण पाहुण्यांना वेळ होत होता म्हणून ते तळमळत होते तर पाहुणे जाताच आपल्याला कोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागणार होते हा विचार माझ्या मनात रुंजी घालत होता म्हणून मी परेशान होत होतो. काही वेळातच बायको एका ट्रेमध्ये चहा आणि बिस्कीट घेऊन आली. पाहुण्यांनी कसे तरी एक बिस्कीट घेतले. घाईघाईने चहा संपवत ते निघून गेले आणि एखाद्या शत्रुवर रणभूमीवर शस्त्रास्त्रे कोसळावेत तसे असंख्य शब्दास्त्र माझ्यावर माझ्याच दिवाणखान्यात आदळत होते...
@ नागेश सू. शेवाळकर