८) मी एक अर्धवटराव!
त्यादिवशी कोणत्या तरी सणाची सुट्टी होती. सण म्हटले की काय खायची चंगळ! त्यात स्वयंपाकात बायकोचा हात कुणी धरणार नाही अशी माझी खात्री! बायकोने केलेल्या स्वयंपाकावर आडवातिडवा हात मारून मी पलंगावर आडवा झालो आणि काही क्षणातच घोरायला लागलो. अर्थात ही बायकोची मल्लीनाथी! कारण मीच काय कुणीही आपण घोरतो हे कबुलच करत नाही. कारण स्वतःचे घोरणे फार कमी लोकांना ऐकू येते. ज्या लोकांना स्वतःचे घोरणे ऐकू येते यापैकी अनेक लोक ते कबुलच करत नाहीत. आता हेच बघा ना मला माझे घोरणे ऐकू न येताही मी ते मान्य करतो पण नेहमी रात्री अपरात्री जिच्या घोरण्यामुळे माझी झोपमोड होते ती माझी बायको घोरते हे ती ऐकूनच घेत नाही. ती मला चक्क खोटे ठरवताना वेड्यात काढते. एक दोन वेळा तिचे घोरणे मी माझ्या भ्रमणध्वनीवर शुट करून तिला ऐकवले, दाखवले पण तिने ते मान्य केले नाही. उलट मी शुट केलेल्या व्हीडीओमध्ये मी दुसऱ्याच कुणाचा तरी घोरण्याचा आवाज तिच्या तोंडात घातलाय असे ऐकवून तिने माझीच दांडी उडवली. असो. त्यादिवशीही बायकोच्या घोरण्यामुळे मला जाग आली. पाहतो तर बायको शेजारी झोपलेली. ती सारे आवरून केव्हा झोपली हे मला कळालेच नाही. एवढी मला गाढ झोप लागली होती. डोळ्यात झोप होती पण बायकोच्या घोरण्यामुळे नंतर झोप लागणे शक्यच नव्हते हा नेहमीचा अनुभव लक्षात घेता मी दिवाणखान्यात येऊन बसलो. वर्तमानपत्र हातात घेऊन त्यातील ठळक बातम्यांवर नजर टाकत होतो, त्याच त्याच बातम्यांचे रवंथ करीत होतो कारण बायको झोपलेली असताना टीव्ही लावण्यावर बंदी असायची. टीव्ही सुरू होताना जो आवाज होतो तो आवाज बायकोची झोप मोडण्यासाठी पुरेसा असायचा आणि मग असे काही चक्रीवादळ घोंघावत यायचे की, त्यापेक्षा टीव्ही न लावलेला बरा. काही क्षणातच बायकोचा आवाज आला. ती म्हणाली,
"अहो, टीव्ही लावा ना. झोपही लागत नाही आणि उठावेही वाटत नाही. अतिकामाचे परिणाम सारे. उठल्यापासून एका क्षणाचीही उसंत मिळत नाही. त्यामुळे एवढा थकवा येतो की, झोपही लागत नाही आणि फार वेळ पडूनही राहता येत नाही..."
"हो.. हो.. लावतो... " असे म्हणत मी हातातील वर्तमानपत्र बाजूला ठेवले. उठून टीव्ही सुरू केला. हातात रिमोट घेऊन सोफ्यावर बसलो. सवयीप्रमाणे खेळाची वाहिनी लावली. त्यावर अनेक वर्षांपूर्वी झालेल्या एका क्रिकेट सामन्याची क्षणचित्रे दाखवत होती. क्रिकेट म्हणजे माझा जीव की प्राण! त्यातच सचिन तेंडुलकरची फलंदाजी म्हणजे विचारुच नका. विशेष म्हणजे सचिन त्या सामन्यात भलताच भरात होता. धावांची बरसात करीत होता. मी भान विसरून सचिनच्या फलंदाजीचा आनंद लुटत असताना अचानक सौभाग्यवतीचा आवाज आला. क्रिकेट आणि त्यातही सचिनची खेळी अत्यंत आवडत असताना मी एक पथ्य मात्र इमानेइतबारे पाळत असतो ते म्हणजे बायकोचा आराम, झोप चालू असताना टीव्हीचा आवाज बंद करून फक्त 'मुक चित्रपट' पाहावा तसा मी सामना पाहतो. त्यावेळीही मी 'मुकपणे' क्षणचित्रे पाहत असताना अचानक समालोचक जोरात ओरडावा तसा बायकोचा आवाज आला,
"अहो, काय करताय?"
"काय म्हणजे? सचिनची फलंदाजी पाहतोय. तुच म्हणालीस ना की, टीव्ही लावा म्हणून. टीव्हीचा आणि माझाही आवाज बंद करून पाहतोय..."
"काय सांगावे बाप्पा! अहो, माणसाला छंद असावा, माणूस छंदिष्टही असावा पण त्यापायी भ्रमिष्ट होऊ नये इतपत काळजी घ्यावी हो..."
"आता मी काय वेड्यासारखा वागलो ग. तू सांगिल्याबरहुकूम मी टीव्ही लावलाय..."
"अहो, तुम्हाला टीव्ही लावा असे म्हणाले पण क्रिकेट लावा असे कुठे म्हणाले?"
"बरोबर आहे. तसे नाही म्हणालीस पण नेमकी कोणती वाहिनी लावा हे तरी कुठे सांगितलेस? टीव्ही लावा.. लावला. माझ्या आवडीची वाहिनी लावली."
"बरे. बरे. पुरे! आता तरी कुठे जुनी गाणी लागली असतील तर लावा. दोन- तीन गाणी ऐकू द्या. मी तुमच्यासारखी रिकामटेकडी नाही, कायम त्या टीव्हीवर तोंड खुपसून बसायला. चार वाजायलेत. चहा उकळावा लागेल नाही तर घर डोक्यावर घ्याल. आणि इथला पंखा लावा ना..." बायको म्हणत असताना मी टीव्हीवर जुने गाणे लावले. चरफडत उठलो. स्वयंपाक घरात गेलो. माठातील थंडगार पाणी पिऊन गॅस सुरू केला आणि पुन्हा दिवाणखान्यात येऊन बसलो. गाणी बायको ऐकत असल्यामुळे वाहिनी बदलून क्रिकेट पाहण्याची हिंमत होत नव्हती. 'कंटाळलेल्या नवऱ्याची भ्रमणध्वनीवर भ्रमंती' याप्रमाणे भ्रमणध्वनी घेऊन बसलो. काही क्षणातच हिने पुन्हा पुकारा केला,
"काय झाले हो? पंखा लावायला सांगितला होता ना?"
"पंखा केव्हा म्हणाली ग? तू म्हणालीस की, चहाची करायची वेळ झाली म्हणून मी..."
"आता काय दिवे लावले हो..."
"दिवे नाही ग लावले. दिवे लावायला संध्याकाळ कुठे झाली आहे? महत्त्वाचे म्हणजे 'दिवे' लावायचे काम तू करतेस हे मला माहिती आहे. चहा करणार आहेस ना, सकाळपासून काम करून थकलीस म्हणून तुला थोडी मदत करावी याहेतूने गॅस तेवढा चालू करून ठेवलाय..."
"बाई, बाई! काय हा वेंधळेपणा! आग लागो त्या मोबाईलला. त्यात थोबाड खुपसले ना की काही लक्षात राहत नाही..." असे बडबडत बायको स्वयंपाक घरात गेल्याचे पाहून मला कमालीचा आनंद झाला. कारण आता सौभाग्यवती चहा घेऊनच बाहेर येणार या आशेने मी टीव्हीचा आवाज बंद करून पुन्हा खेळाची वाहिनी लावली. सचिन अजूनही त्याच जोशात खेळत होता. बायको जागी आहे तर सचिनच्या फलंदाजीसोबत समालोचनाचा आनंद लुटुया या विचाराने मी टीव्हीचा आवाज सुरू केला. अगदी समाधी लागल्याप्रमाणे मी त्यात बुडून गेलो. सचिनची फटकेबाजी माझ्यासाठी जीव की प्राण! त्याचा गोलंदाज, यष्ट्या आणि पंच यांच्यामधून सीमारेषेकडे जाणारा स्ट्रेटड्राइव्ह तर माझ्या शरीरात आजही रोमांच भरतो. त्याच्या फटकेबाजीचे व्हीडीओ कितीही वेळा पाहिले तरीही माझे पोट भरत नाही, समाधान होत नाही, कंटाळा येत नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, माझ्या पत्नीला क्रिकेटची बाराखडीही माहिती नाही. एक चेंडू ही बाब सोडली तर ती यष्ट्या, बॅट, हेल्मेट कशा-कशाला ओळखत नाही. मात्र ती सचिनला ओळखते. सचिन फलंदाजीला आला की, त्याचे शतक झाले का? इथपर्यंत तिला क्रिकेटशी घेणेदेणे! एकदा एक सामना नुकताच सुरू झाला होता. सचिन पहिला चेंडू खेळायला सज्ज होत असताना बायको दिवाणखान्यात आली. सचिन बॅट घेऊन दिसताच तिने मला विचारले, 'का हो? सचिनचे शतक झाले का?'
सचिनच्या बॅटमधून चौकार-षटकारांची आतषबाजी होत असताना एक जोरकस फटका सचिनने लगावला. चेंडू बंदुकीच्या गोळीपेक्षाही दुप्पट वेगाने गोलंदाज आणि पंच यांच्या बरोबर मधून सीमारेषेकडे जात असताना अचानक बायको बाहेर आली आणि नेमकी माझ्या आणि टीव्हीच्या मध्ये कमरेवर हात देऊन उभी राहिल्यामुळे चेंडू मला दिसत नव्हता परंतु प्रेक्षकांचा गोंधळ आणि समालोचन यामुळे तो षटकार होता हे मला समजले. त्या फटक्याचा आनंद लुटावा म्हणून मी जोरात ओरडलो,
"ए.. ए.. छक्का... बाजूला..."
"का..य? काय म्हणालात छक्का? मला..."
"अग, नाही ग... मावशे, तुला नाही म्हणालो, सचिन..."
"काय तुम्ही सचिनला..."
"नाही ग. सचिनने तिकडे छक्का मारलाय. तू मध्येच उभी होतीस आणि मला तो शॉट बघायचा होता..."
"खरे सांगताय ना, आजकाल तुम्ही कधी काय बरळाल, कुणाला काय म्हणाल याचा नेम नाही हो..." असे म्हणत ती स्वयंपाक घरात गेली तसा एक विचार यक्षप्रश्न बनून माझ्यासमोर उभा राहिला की, बायको तशी माझ्या आणि टीव्हीच्या मध्ये का उभी राहिली असावी? चहाचा कपही तिच्या हातात नव्हता. मग? बाप रे बाप! आपण तेव्हा पंखा सुरु करायच्या ऐवजी गॅस चालू करून आलो होतो म्हणून जाब विचारण्यासाठी संतापलेली बायको तशी कमरेवर हात देऊन उभी होती तर पण नेमके त्याचवेळी आपण 'छक्का' म्हणालो आणि मग त्या वातावरणात पुढील अनर्थ, कठीण प्रसंग टळला. खरे हे जे घडले ते सचिन आणि त्याच्या फटक्यामुळे... धन्यवाद रे सचिन!...
देवासारखा धावून आलास रे बाबा!
@ नागेश सू. शेवाळकर