मी एक अर्धवटराव - 3 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मी एक अर्धवटराव - 3

३) मी एक अर्धवटराव!
आपल्याकडे कसे आहे, मुलाला नोकरी लागली, तो कामाधंद्याला लागला, त्याच्या हाताला एकदाचे काम मिळाले की, तो विवाहासाठी योग्य झाला, वयात आला असा शिक्का बसतो. माझेही तसेच झाले. पदवीधर झालो आणि एका सरकारी कार्यालयात नोकरीला लागलो. झाले. लगेच माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली. यात माझी आई आघाडीवर होती. कुणाच्याही आईला तिच्या मुलाच्या लग्नाची घाई सर्वात जास्त असते. लग्नाला नकार देणाऱ्या मुलाचे मन वळवून त्याला 'दोनाचे चार' करायला लावण्यात आईचा सिंहाचा वाटा असतो. माझेही तसेच झाले. इच्छा नसताना आईच्या पुढाकाराने माझ्यासाठी वधुसंशोधन सुरु झाले. नोकरीच्या निमित्ताने मी दुसऱ्या गावी राहात होतो. ते गाव माझ्या राहत्या गावापासून बरेच दूर होते. दररोज जाणे-येणे करणे शक्य नव्हते. त्यामुळे माझ्या खाण्या-पिण्याचे होणारे हाल लक्षात घेऊन आईने मला लग्नासाठी प्रवृत्त केले. कदाचित माझा आळस, काम कंटाळा स्वभाव असल्यामुळे तिने तशी घाई केली असावी. आठ-पंधरा दिवसांनी घरी आल्यापासून ते पुन्हा नोकरीच्या गावी निघेपर्यंत आईचा एकच धोशा सुरू असे, 'किती वाळलास रे? गाल बघ किती मध्ये गेलेत ते. चेहरा सुकलाय. हातापायाच्या काड्या झाल्यात. ते काही नाही बाबा, तुला बाहेरचे खाणे पचणारे नाही आणि घरी करून खायला तुला जमणार नाही. तेव्हा पटकन एकदा तुला उजवून टाकते म्हणजे तुझे खाण्याचे वांधे होणार नाहीत.' शेवटी मी लग्नाला होकार देताच आईला खूप आनंद झाला. बाबा म्हणाले,
"हे बघ. पोरीची, तिच्या घराण्याची प्राथमिक माहिती, टिपण-टापण आम्ही बघतो. पोरगी मात्र तू आधी बघून येत जा. तुला बरी वाटली तर पसंती कळविण्याच्या आधी आम्ही जाऊ पाहायला आणि मग पुढले सारे ठरवता येईल."
त्यादिवशी गुरुवार होता. मी कार्यालयातून माझ्या खोलीवर पोहोचलो. हातपाय धुऊन फेरफटका मारून जेवण करायला जाणे हा माझा नित्यक्रम. त्याप्रमाणे तयारी करत असताना अचानक बाबा आले. त्यावेळी भ्रमणध्वनी नव्हते आणि फोनही फारच कमी लोकांच्या घरी होते. काही तरी महत्त्वाचे, तातडीचे काम आहे म्हणून बाबा आले आहेत असा मी मनोमन विचार केला. बाबांसोबत एक अनोळखी गृहस्थ होते. बाबांनी परिचय करून दिला आणि त्या गृहस्थाच्या येण्याचे कारण मला समजले. त्यांच्या मुलीचे स्थळ घेऊन ते आले होते. दोन दिवसांनी म्हणजे रविवारी मी त्या माणसाच्या घरी जाऊन मुलीला बघून यावे असे त्या दोघांचे मत होते. माझ्यासमोर होकार देण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता. रविवारी सकाळी मी त्यांच्याकडे दहा-साडेपर्यंत जाण्याचे ठरले. त्यांच्या गावी बसने माझ्या नोकरीच्या गावापासून जायला सात तास लागत होते. म्हणून मी शनिवारी रात्री निघायचे ठरवले...
शनिवारी रात्री मी अकराच्या बसने निघालो. मोटारीची अवस्था एकदम बेकार अशी होती आणि रस्त्याची अवस्था त्याहूनही वाईट होती. त्यामुळे झोपेचे पार खोबरे झाले. एक क्षणभरही झोप लागली नाही. सकाळी पाचच्या सुमारास मी त्या गावी उतरलो. बसस्थानकाच्या बाहेर आल्यावर तिथे दोन-तीन लॉज दिसल्या. लॉजवर जाऊन दोन-तीन तास झोप काढावी या हेतूने मी तिकडे निघालो पण रस्त्यावर असलेल्या एका गाडीने माझे लक्ष वेधले. गरमागरम पोहे तयार होते. गरम कांदा-पोहे माझे अत्यंत आवडते खाद्य! नोकरीच्या गावी रोजच सकाळी नाष्ट्याच्या वेळी असेच पोहे खात होतो. तसेच मुली पाहण्याचा म्हणजे 'कांदापोहे' खाण्याचा रीतसर शुभारंभ त्याच दिवशी चार-पाच तासांनी होणार होता तरीही त्या गाडीवरचे गरमागरम पोहे पाहून तोंडाला पाणी सुटले. आणि चांगला दोन बश्यांवर ताव मारला. लॉजवर आलो. खोली घेतली. सहा वाजत होते. दोन-तीन तास आराम करून मग पाहुण्यांकडे जावे या विचाराने पंखा लावला. पलंगावर अंग टेकले न टेकले की अशी झोप लागली म्हणता विचारायची सोयच नाही. मध्यंतरी दोन-तीन वेळा जाग आली की, भिंतींवर असलेल्या घड्याळाकडे नजर टाकावी पण झोप मोडत नव्हती. पुन्हा चेहऱ्यावरून पांघरूण घेत होतो. शेवटी एकदा अशीच अर्धवट जाग आली. डोळा उघडत नव्हता पण डोके गदगदा हलवत उठून बसलो. जड पडलेल्या डोळ्यांनी घड्याळ बघितले. तसा दचकून मनाशी पुटपुटलो,
'बाप रे! चार वाजले. परतायला हवे. उद्या सकाळी कार्यालयात जावे लागेल...' असे बडबडत मी उठलो. पटापट तयार झालो. पटकन बसस्थानक गाठले. योगायोगाने बस लागलेलीच होती. आत जाऊन बसलो. दुग्धशर्करा योग म्हणजे खिडकीजवळची जागा मिळाली. काही क्षणातच वाहक- चालक आले. वाहकाने तिकीट दिले आणि मी आसनावर डोके टेकवले. लगोलग झोप लागली...
'गाडी दहा-पंधरा मिनिटे थांबणार आहे. जेवण, नाष्टा, चहा करून घ्या. पुन्हा गाडी थांबणार नाही...' वाहकाच्या आवाजाने जाग आली. घड्याळ पाहिले. रात्रीचे दहा वाजत होते. खाली उतरलो. चेहऱ्यावर पाणी मारले. तसे पोटातील कावळ्यांची कावकाव सुरू झाली. जेवणाची ऑर्डर दिली. सहज इकडेतिकडे पाहिले. समोरच्या टेबलावर बसलेल्या एका जोडप्याने लक्ष वेधले. बहुतेक नवविवाहित होते कारण शीयपेयाच्या एका बाटलीत दोन पुंगळ्या टाकून एकमेकांच्या डोक्याला डोके भिडवून पेय पित होते. ते दृश्य पाहून माझी स्थिती एखादा मोठ्ठा विजेचा झटका बसवा तशी झाली. मनाशीच पुटपुटलो,
'बाप रे! आपण हे काय करून बसलो. ज्या कामासाठी आलो होतो ते काम केलेच नाही. मुलगी पाहायला आलो नि त्या घरी न जाताच परत निघालो. असा कसा वागलो मी? अशी कशी झोप लागली म्हणावी? पाहुण्यांनी तर वाट पाहिलीच असेल पण त्या मुलीनेही डोळ्यात प्राण आणून वाट पाहिली असेल. आता काही खरे नाही. बाबाला समजले की, आपलीच वाट लागली लागणार. आता परतही जाता येणार नाही. पोहचायला रात्रीचे दोन वाजतील. ते बरोबर दिसणार नाही. केवढा धांदरटपणा केला मी. आता आपल्याला शिव्या तर मिळणारच सोबत 'झोपाळू' हे नवीन विशेषण चिकटणार...' हा विचार मनात येताच मी मनाशीच खुदकन हसलो. पुन्हा विचार आला,
'ठीक आहे. जाऊ देत. पुढच्या शनिवारी गावी जावे आणि आई-बाबांना खरे ते सांगून मोकळे व्हावे.येईल कुठेतरी योग...' अशी मनाची समजूत काढत जेवणावर यथेच्छ ताव मारला. बसमध्ये बसलो. काही क्षण विचारात गेले पण त्या विचारावर खिडकीतून येणाऱ्या थंडगार हवेमुळे येणाऱ्या झोपेने अतिक्रमण केले आणि मस्त झोप लागली...
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे कार्यालयात गेलो. तिथे नेहमीप्रमाणे असलेले वातावरण पाहून वाटले, 'बरे झाले. कार्यालयात काल कुठे जाणार होतो ते सांगितले नव्हते. नाही तर कार्यालयात प्रवेश केल्याबरोबर सर्वांनी घेरले असते. प्रश्नांचा भडीमार केला असता...' कामाच्या व्यापात सारे काही विसरून गेलो. कार्यालयीन वेळ संपताच खोलीवर पोहोचलो. पाहतो तर काय बाबा येऊन बसले होते. मला पाहिल्याबरोबर त्यांनी जणू प्रश्नपत्रिका समोर टाकली.
"गेला होतास ना? मुलगी पाहिली ना? कशी वाटली? वेळेवर पोहोचला ना? जेवण कुठे केले? खरे सांग, तुझ्या प्रश्नांची तिने बरोबर उत्तरं दिली ना? अडखळत नव्हती ना? बोबडी, लंगडी वगैरे नाही ना?आपल्या घराण्याला साजेशी आहे ना? घरकामाची आवड आहे ना?..."
"बाबा, यातील काही एक झाले नाही..."
"म्हणजे तू गेलाच नाहीस?अरे, आपण त्यांना दिवस दिला होता. त्यांनी सगळी तयारी करून ठेवली असणार. तू बाहेर गावाहून येणार म्हणून जेवायची तयारी केली असणार. काय वाटले असणार त्यांना? असे बरोबर नाही रे. मुलाकडचे झालो म्हणून कसेही वागता येत नाही रे. अशाने पाहुण्यांमध्ये नाचक्की होते रे. तोंड दाखवायला जागा राहात नाही..."
"बाबा... बाबा, रात्रभर प्रवास करून मी तिथे पोहोचलो होतो. थकून खूप झोप लागली. अर्थात मी माझ्या वागण्याचे समर्थन करीत नाही. मी तिथे मुलगी पाहायलाच गेलो होतो ना? लॉजवर कुणी उठवणारे नव्हते. दुपारी चार वाजता झोप चाळवली. डोळा उघडत नसताना तसाच हट्टाने उठलो.."
"अरे, मग चार वाजता जायचे होते ना?"
"बाबा, बरोबर आहे तुमचे. पण खरे सांगतो, थकवा आणि डोळ्यातील झोप यामुळे मी चक्क विसरून गेलो हो..."
"असा कसा रे झोपाळू तू? ते पाहुणे उद्या परवा अवतरतील. काय सांगू त्यांना? कोणत्या तोंडाने सांगू की, माझा पोरगा झोपाळू असल्यामुळे आला नाही ते. बरे. ते जाऊ दे. या शनिवारी तुला सुट्टी आहे. गावाकडे ये. उद्या परवा ते गृहस्थ आले की, रविवारी येतोय म्हणून सांगतो. जीप करून जाऊ आपण सगळे. ठीक आहे..."
झालेही तसेच. मी शुक्रवारी कार्यालयीन वेळ संपल्यानंतर नेहमीप्रमाणे उशिराची बस पकडून गावाकडे सकाळी सकाळी पोहोचलो. सारे झोपले होते. माझी नेहमीची पोहोचण्याची वेळ माहिती असल्यामुळे आई जागी झाली होती. माझ्या हातात पाण्याचा प्याला देताना ती म्हणाली,
"गुरुवारी ते पाहुणे आले होते. उद्या आपल्याला मुलगी पाहावयास जायचे आहे..."
"बरे. मी पडतो थोडा वेळ..." असे म्हणत मी अंग टाकले. दुसऱ्याच क्षणी माझा डोळा लागला...
रविवारी सकाळीच मी, आई-बाबा, माझी एक आत्या जीपने निघालो. दुपारी अकराच्या सुमारास मुलीच्या घरी पोहोचलो. आम्हाला पाहताच मुलीकडील मंडळीचे चेहरे आनंदले. कदाचित त्यांच्या मनात एक भीती होती की, मागील रविवारप्रमाणे या रविवारीही मुलगा झोपणार नाही ना. मुलीचे वडील म्हणाले,
"आपण सारे फार दुरचा प्रवास करून आला आहात. चहापाणी घ्या. तासाभरात स्वयंपाक होईल. जेवणे करूया. नंतर मुलगी पाहण्याचा कार्यक्रम करूया. आपणास जेवायच्या आधी मुलगी पाहायची असल्यास आमची हरकत नाही."
"नाही. तसे काही नाही. होऊ द्या निवांत." बाबा म्हणाले.
दोन तासात जेवणे झाली. थोडा आराम झाला. थोड्या गप्पागोष्टी झाल्या. आम्ही सारे पुन्हा तयार झालो. काही वेळातच मुलगी चहा घेऊन आली. मुलगी आम्हा सर्वांना व्यवस्थित दिसेल अशा ठिकाणी बसली. तिच्या बाजूला अजून एक मुलगी बसली. आम्ही म्हणण्यापेक्षा आई-आत्याने अशा प्रसंगी विचारायचे असतात असे काही प्रश्न विचारले. बाबांनीही एक-दोन प्रश्न विचारले. मी शांत बसून होतो. मला सर्वांनी प्रश्न विचारावेत असा आग्रह केला पण मी शांत बसून राहिलो. सर्वांचा निरोप घेऊन आम्ही निघालो. जीप गावाबाहेर पडली न पडली की आत्या म्हणाली,
"कशी वाटली रे पोरगी. मला तर बाई चांगली वाटली. खानदानी आहे. सुसंस्कारित आहे. वहिनी, तुम्हाला कशी वाटली हो?"
"मला तशी चांगली वाटली. पण हा आपला हिरो काय म्हणतो बघूया. काय रे, काय आहे तुझा विचार? एकदाचा सांगून टाक बाबा." आई म्हणाली.
"कोणती होती मुलगी? चहा दिला ती की तिच्यासोबत होती ती?" मी विचारत असताना आत्या हसत म्हणाली,
"ये आळशी पोरा, पोरगी पाहतानाही तुझा वेंधळेपणा आहेच का? अरे, जिला आम्ही प्रश्न विचारले त्या मुलीबाबत बोलतोय आम्ही."
"ती होय? ती तर छान आहे. मस्तच आहे. चांगली आहे." मी बोलत असताना बाबा म्हणाले,
"ये बाबा, अशी गडबड करू नको. तू रात्री निघणार आहेस ना मग तोपर्यंत चांगला विचार करून सांग. जीवनभराचा प्रश्न आहे. वाटल्यास पुढल्या रविवारी मी तिकडे येतो. चांगला आठवडाभर विचार करून सांग. काही गडबड नाही..."
मुलगी खरेच चांगली होती. मी रात्री नोकरीच्या गावी निघालो. आईची तळमळ लक्षात घेऊन आणि मला मुलगी आवडली असल्यामुळे मी आईजवळ होकार सांगितला आणि निघालो. पुढील बाजी बाबांनी सांभाळली. लग्नाची तारीख ठरली...
@ नागेश सू. शेवाळकर