मी एक अर्धवटराव - 9 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

मी एक अर्धवटराव - 9

९) मी एक अर्धवटराव !
मी माझ्या बायकोच्या माहेरचा जावाई होतोच ना ! माझे सासरही तसे मध्यमवर्गीय पण त्यांनी माझे जावाई या नात्याने सारे कोडकौतुक, मानसन्मान केला. मुळात मी स्वभावाने अतिशय शांत असाच. त्यामुळे मीही माझ्या सासरी किंवा सासरच्या माणसांबद्दल कधी राग, संताप, द्वेष, चिडचिड असे प्रकार केले नाहीत. एकंदरीत मी एक आवडता असा जावाई होतो. त्यादिवशी रविवार असल्यामुळे सारे कसे सुस्तावल्यासारखे झाले होते. तितक्यात माझ्या चुलत सासऱ्यांचा फोन आला. मी उचलताच तिकडून सासरे म्हणाले,
"जावाईबापू, नमस्कार. एक छोटे काम होते हो..."
"मामा, सांगा ना. संकोच करू नका..." माझी परोपकारी वृत्ती जागी झाली.
"काय आहे, तुम्हाला तर माहिती आहेच की, वर्षासाठी म्हणजे तुमच्या मेहुणीसाठी वरसंशोधन मोहिम हाती घेतली आहे..."
"व्वा! छानच की! सापडला का कुणी? म्हणजे आले का कुणी लक्षात?..." असे विचारत असताना मी मनात म्हणालो, 'तुमच्या वर्षा नामक ध्यानाला जो भेटेल त्याचे नशीब फुटेल हो...'
"म्हणून तर फोन केलाय. कसे आहे, तुमच्या शहरात एक वधूवर सुचक मंडळ आहे. त्याचा पत्ता मी पाठवतो. तिथे जाऊन वर्षाचे नाव नोंदवाल का? जी काय फिस असेल ती सध्या भरा. आपली भेट होताच मी देईन तुमचे पैसे..."
"असे का म्हणता? वर्षासाठी मी इतकेही करणार नाही का? मी बाहेर जाणार आहेच तेव्हा तिकडे जाऊन नोंदवतो नाव. पत्ता मात्र लगेच पाठवा..." म्हणत मी भ्रमणध्वनी बंद केला
"कुणाचा फोन होता हो?" बाहेर येत सौभाग्यवतीने विचारले
"अग, तुझ्या काकांचा फोन होता." मी म्हणालो
"काकांचा? एवढ्या दिवसांनी? काय म्हणत होते?"
"काही नाही. वर्षाच्या लग्ना..." माझे पूर्ण न ऐकता बायको चित्कारली,
"अय्या! वर्षीचे यावर्षी लग्न होईल असे मला वाटत होते. चला. एक साडी पकली माझी. तुम्हाला सांगते काकाकडून चांगली भारीची साडी घेणार आहे. माझ्या पसंतीची..."
"अग, तुझ्या साडीची ऑर्डर द्यायला विवाह मंडळाच्या कार्यालयात चाललोय. थोडे पूर्ण ऐकून तर घेत जा. लग्न म्हटले की, आठवली साडी! कशात काय नि फाटक्यात पाय..."
"थोडे नीट सांगाल का काय झाले ते?"
"तेच तर सांगतो पण तू ऐकशील तर ना? काका म्हणाले की, इथल्या वधूवर सुचक मंडळात वर्षाचे नाव नोंदवा..." मी बायकोला सांगत असताना माझ्या भ्रमणध्वनीने 'संदेश' प्राप्त झाला असल्याची सूचना दिली. मी संदेश पेटारा उघडला. पाहिला. वाचला. पत्त्यासोबत वर्षाची आवश्यक माहिती पाठवली होती. योगायोगाने मला त्याच भागात जायचे होते.
"बरे झाले. मलाही तिकडेच जायचे होते..."
"अहो, काकांचे काम... म्हणजे सासरचे काम आहे म्हणून जास्त उल्हासित होऊ नका. मागच्या वेळी आई इथे असतानाच घडलेला प्रसंग आठवतो ना?..." सौभाग्यवती म्हणाली आणि कुणी ह्रदयाला लागेल असे बोलताच डोळ्यात टचकन पाणी यावे तसा तो 'सासू प्रसंग' माझ्या डोळ्यासमोर तरळला...
दोन महिन्यांपूर्वी आमच्या सौभाग्यवतीची प्रकृती ठीक नव्हती म्हणून माझ्या सासूबाई हिला भेटायला आल्या होत्या. माझ्या सासूबाई तशा जुन्या वळणाच्या नसल्या तरीही जावयाला नावाने हाक मारण्याच्या परंपरेपासून दूर होत्या. गाऊन, पंजाबी ड्रेस कधीच घालत नसत. कपाळावर ठसठशीत कुंकू, वेणी हाच त्यांचा साजश्रुंगार! जावयासोबतच जेवढ्या पुरते तेवढेच बोलायचे, आघळपघळ गप्पा त्यांना आवडायच्या नाहीत. तीन-चार दिवस त्या राहिल्या आणि त्यांनी जायची चर्चा सुरू करताच ही म्हणाली,
"अहो, आई जायचे म्हणते?"
"का? अग, आत्ताच तर आल्यात ना, शिवाय आपल्याकडे बऱ्याच वर्षांनी आल्या आहेत तर आल्या सरशी राहा म्हणावे आठ-दहा दिवस."
"अहो, ती कुठे राहणार? एवढे दिवस राहिली हेच खूप झाले. घर सोडून ती कुणाकडेच राहात नाही. मला काही बाजारात जाणे होणार नाही. असे करा ना, तुम्ही फिरायला गेले म्हणजे बाजारातून आईसाठी चांगली भारीची साडी आणा ना."
"मी आणेन ग. पण मी आणलेली साडी तुला, त्यांना आवडेल ना?"
"आवडेल म्हणा..."
"हेत ते 'म्हणा' घोळ करते. तुम्हा बायकांना इतरांनी आणलेली सोडा पण स्वतः आणलेली साडी घरी आल्यावर आवडत नाही अनेकदा पुन्हा जाऊन बदलून आणावी लागते. म्हणून विचारले."
"आणा तर खरे. आईच्या आवडीनिवडी तशा फार विशेष नाहीत. त्यात जावयाने आणलेली साडी ती आनंदाने नेसेल. आवडेल तिला."
त्या सायंकाळी मी फिरायला गेलो. नेहमीप्रमाणे मित्रांशी गप्पा मारून घरी निघालो. अर्ध्या रस्त्यात आलो न आलो की, पटकन आठवले की, अरे, सासूबाईंसाठी साडी न्यायची आहे. एकदा वाटले, उशीर झालाय साडी गेली उडत. लगेच दुसरा विचार आला की, नको रे बाबा. साडी न्यायलाच हवी. तर ताबडतोब पिछेमूड झालो. काही अंतर चालून गेल्यावर दिसलेल्या पहिल्या साडीच्या दुकानात शिरलो. दुकान बंद करण्याची तयारी सुरू होती. गिऱ्हाईक कोणत्याही वेळी आले तरी जिथे मालकाला कमालीचा आनंद होतो तिथे नोकरांच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पसरते. गडबडीत, आलेली पिडा कशी तरी काढावी या हेतूने त्यांनी काही तरी दाखवले. मीही जास्त चिकित्सा न करता म्हणजे आपणास फार कळते हे न दाखवता एक वाण पसंत केले. पैसे देऊन घरी आलो. माझी वाट पाहून मायलेकी जेवायला बसल्या होत्या. मी आत जाऊन पलंगावर हातातील पिशवी टाकली. तोवर त्यांची जेवणे झाली. माझे ताट वाढून, ते माझ्यासमोर ठेवत बायको म्हणाली,
"आणली ना साडी? बघू तुमची पसंती?" असे म्हणत ती आत गेली. मी पहिला घास गिळला न गिळला की, एखादी चवताळलेली वाघीण चालून यावी त्या आवेशात सौभाग्यवती बाहेर आली आणि डरकाळी फोडल्याप्रमाणे म्हणाली,
"अहो, हे काय आणलेत? तुम्हाला साडी आणायला सांगितली होती आणि तुम्ही ड्रेस मटेरियल घेऊन आलात? आईने कधी ड्रेस घातल्याचे पाहिले आहे का तुम्ही? आई, आता तुच बघ, असा आहे यांचा वेंधळेपणा..."ही माझ्यावर डाफरत असताना सासूबाईंना हसणे दाबून ठेवणे कठीण झाले. त्या साडीच्या पदराने तोंड दाबत आत गेल्या आणि पाठोपाठ गडगडाटी हास्य करत बायकोही गेली... आत! ...
तो प्रसंग आठवून मीही हसत बाहेर पडलो. सासऱ्यांनी पाठवलेला पत्ता शोधणे अवघड गेले नाही. तो एक वृद्धाश्रम होता आणि त्याच कार्यालयात शासनाच्या 'एक खिडकी' योजनेप्रमाणे वधूवर सुचक मंडळासह इतरही बरीच कार्यालयं होती. मी आत गेलो. व्यवस्थापकांना भेटलो. चर्चा केली. त्यांनी एक फॉर्म भरायला सुरुवात केली. ते विचारतील ती माहिती मी सांगत गेलो. फॉर्म भरून होताच मीच स्वाक्षरी केली. एक हजार रुपये फिस भरून पावती आणि भरलेल्या फॉर्मची कार्बन प्रत घेऊन बाहेर पडलो. त्याच भागात माझी एक-दोन कामे होती. ती करून घरी परतलो.
"मिळाला का हो तो पत्ता? झाले का काम? नोंदवले का नाव? नाव वर्षाचेच नोंदवले ना? नाही तर तुमचे स्वतःचेच नाव नोंदवून आले असणार." सौ.ने हसत विचारले
"आता मला कुठली आलीय संधी? हा घे भरलेला फॉर्म आणि ही पैसे भरल्याची पावती. तुझ्या जवळ सांभाळून ठेव. मी ठेवली आणि वेळेवर सापडली नाही तर पुन्हा मला वेंधळेपणाची आठवण करून देशील..." असे म्हणत तिच्याजवळ तो फॉर्म आणि पावती देत मी आत वळलो न वळलो की ही किंचाळली,
"अहो, हे काय? चक्क एक हजार रुपये भरलेत? अहो, एवढी मोठी रक्कम भरायच्या आधी एकदा मला विचारायचे तरी. काका आता ही रक्कम कधी परत करतील का करणार नाहीत ते देव जाणे."
"करतील ग. कुठे जाणार आहेत? आणि नाही केली तरी काय फरक पडणार आहे, तुझे सख्खे काका आहेत ते..." असे म्हणत मी आत गेलो. कपडे बदलून खुंटीला लटकावत असताना सौभाग्यवती दाणदाण पाय आपटत आत येऊन म्हणाली,
"अहो, हे काय केलेत तुम्ही? पुन्हा एकदा स्वतःचा अर्धवटपणा उजागर केलात..."
"आता काय झाले? फॉर्म भरला. फिस भरली ..."
"ते सारे भरले हो. पण फॉर्म कुणाचा भरलात?"
"वर्षाचा भरला ना..."
"वर्षाचा भरला असता तर मी कशाला बोलले असते..."
"म्हणजे? वर्षाच फॉर्म न भरता मी तुझा फॉर्म भरला की काय वधूवर सुचक मंडळात. आयला! किती मजा येईल ग, माझा क्रमांक दिला असल्यामुळे उद्या मला फोन येतील आणि मी सांगेन की, होय! माझी बायको उपवर आहे..."
"होईल. हेही होईल. एखादे वेळी तुम्ही मला दाखवायला म्हणून एखाद्या मुलाला आणायलाही कमी करणार नाहीत. अहो, तुम्ही वर्षाचा फॉर्म न भरता काकांचा फॉर्म भरलाय..."
"ये हुई बात! काका दुसरे लग्न करणार..."
"अहो, काय डोके फोडावे बाबा या माणसासमोर. तुम्ही काकांसाठी वृद्धाश्रमात प्रवेश मिळण्याचा फॉर्म भरून आलात..."
"बाप रे! आता ग..." दीनवाणे होत विचारले
"बसा आता..." ती वैतागून म्हणाली
"वृद्धाश्रमात जाऊन..." मी हसत म्हणालो आणि झाले गेले विसरून बायकोही माझ्या हसण्यात सामील झाली परंतु तिच्या चेहऱ्यावरील भाव मात्र मला खिजवत होते. जणू ती म्हणत होती,
'काय पदरात पडलय...अर्धवट ध्यान!'
@ नागेश सू. शेवाळकर