मी एक अर्धवटराव - 5 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

मी एक अर्धवटराव - 5

५) मी एक अर्धवटराव!
मला पहिल्यापासूनच प्रवासाची भारी आवड! त्यातही बसने प्रवास करणे ही माझ्यासाठी आनंदाची पर्वणी! आमच्या पिढीने एक काळ असाही पाहिला आहे की, त्याकाळी सर्वसामान्यांना केवळ आणि केवळ लालपरीचा अर्थात महामंडळाच्या बसचा सहारा होता, आधार होता. महामंडळाने जारी केलेल्या योजनांमध्ये ३-५-७- आणि १० दिवसांचे पास अशा योजना असायच्या. ठराविक रक्कम भरून तो पास विकत घेतला की, मग योजनेप्रमाणे तितके दिवस महाराष्ट्र राज्यात फिरत राहायचे. तर असे मुदती पास काढून मी एकट्याने अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. ते म्हणतात ना, 'हौसे, गवसे, नवसे' ही त्रयी अनुसरून फिरत असलो तरीही महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांना भेटी देणे हाही प्रमुख उद्देश होता. तसा मी धार्मिक, आस्तिक वृत्तीचा असल्याने मला देवदर्शन करणे अत्यंत आवडत असे. सोबतच मी चांगल्या प्रकारचा खवय्या असल्यामुळे मला हॉटेलमध्ये जाऊन शाकाहारी जेवणावर ताव मारायला आवडायचे. सोबतच मुक्काम पडलेल्या गावी एखादा चांगला सिनेमा असेल तर माझ्या प्रवासाला चार चाँद लागायचे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा काळ कार्यालय आणि संसार दोहोंपासून सुटका करून घेतल्यासारखा असे...
प्रवास म्हटला की, विविध अनुभवांची, गमतीजमतीची जंत्री असते. मीही असे अनेक अनुभव घेतले आहेत. एकदा मी एका लग्नाला उपस्थित राहण्यासाठी एकटाच निघालो. बारा तासांचा रेल्वेचा प्रवास होता. दुपारी साडेबाराच्या रेल्वेने निघायचे होते. म्हणून घरी सकाळी नाष्टा केला. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाचा डब्बा देण्यास बायकोला सांगितले. एक सांगायचे राहिले, ते असे की, मी मुळात विनोदी स्वभावाचा! तो जन्मतःच गुण माझ्याकडे होता. साध्या-साध्या शब्दात, छोट्या वाक्यात दडलेला विनोद मी सहज उचलून तो इतरांच्या लक्षात आणून देत असे. त्यावेळी सोबत असलेले सारे खळाळून हसायचे. तसा माझ्या सौभाग्यवतीचा स्वभावही खेळकर होता. अनेकदा माझ्या गुगलीवर ती सणसणीत षटकार ठोकायला कचरत नसे. लहर आली की, मला खिजवायला ती मागेपुढे बघत नसे. असो. त्यादिवशी साधारण अकरा वाजता घरातून निघणार होतो. ठरल्याप्रमाणे बायकोने दोन्ही वेळेसचे जेवण तयार केले. उन्हाळ्याचे दिवस होते. सकाळी शिजवलेली भाजी रात्रीपर्यंत टिकणार नाही म्हणून तिने एक भाजी कोरडी म्हणजे पाणी न टाकता शिजवून दिली. हो! माझी बायको घरकामात आणि स्वयंपाकात एकदम सुगरण म्हणजे थेट अन्नपूर्णा! तिच्या हातचे जेवण म्हणजे आता मी काय वर्णन करावे? तिच्या हातचे जेवण करणारा तृप्त होतो. समाधानाचा ढेकर देतो. दोन वेळेसचे जेवणाचे डब्बे म्हणजे काय तर कागदात व्यवस्थित केलेला पोळ्यांचा गुंडाळा, सोबत एका मेणकापडाच्या पिशवीत भाजी. डब्बा यासाठी बायको देत नसे की, तिच्या लेखी मी अत्यंत विसराळू माणूस! दिलेला महागामोलाचा डब्बा कुठे तरी विसरून येईल. ती अनेकदा माझ्या विसराळूपणावर भाष्य करताना म्हणते,
"बाई! बाई!! काय बाई, तुमचा हा विसराळूपणा! तीन गोष्टी आणायला सांगितल्या तर त्यातली एक गोष्ट तीही अत्यंत महत्त्वाची आणायची विसरून जाता. बरे, तुम्हाला यादी करून द्यावी तर ती यादी एक तर घरीच विसरून जाता किंवा मग दुकानात गेल्यावर खिशात आपण सामानाची यादी आणलीय हेच विसरून जाता. तरी बरे तुमचे नाव विनायक नाही. तसे असते तर आपल्या पुस्तकातील गोष्टीतला 'विसराळू विनू' म्हणून समजून तरी घेता आले असते. तुमचा विसराळूपणा कमी होतच नाही, उलट दिवसेंदिवस वाढतच जातो. असेच होत राहिले ना तर एखादे दिवशी मला बाहेर कुठे न्याल आणि आपण एकटाच आलो होतो असे समजून चक्क मला तिथेच सोडून निघून याल..." यावर मी बापडा काय म्हणणार? बसतो आपला गुपचूप!...
तर मी त्यादिवशी निघत असताना पोळी-भाजीचा कागदी गुंडाळा माझ्या हातात देत म्हणाली, "हे जेवण आधी बॅगच्या बाहेरील कप्प्यात ठेवा. दुपारचे जेवण आहे. लक्षात ठेवा, ही बाई रात्रीसाठी..." ती सांगत असताना मी आश्चर्याने आणि तेवढ्याच आनंदाने चित्कारलो,
"का.. य? रात्रीसाठी बाई? अग, किती चांगली आहेस ग तू. कित्ती कित्ती करशील माझ्यासाठी! इतर बायकांना नवरा कुण्या बाईसोबत बोललेला सहन होत नाही. पराचा कावळा करून आकांडतांडव करतात आणि तू चक्क माझ्यासाठी ..."
"अहो, महाराज, उगाच पंख नसताना उडायचा प्रयत्न करू नका. तोंडावर पडाल. तुम्ही पडले असे विसराळू! तुमच्या लक्षात राहावे म्हणून..."
"अग, हे काय सांगणे झाले? तू माझी एवढी व्यवस्था करतेस, माझ्या खाण्या-पिण्यासह रात्रीची..."
"काय सांगावे बाई या माणसाला? निर्लज्जपणाचा कळस..."
"अग, मी काय निर्लज्जपणा करतोय. जर केलाच असेल तर कुणी तर तो तू करतेस पण तुझा हा निर्लज्जपणा माझ्यासाठी स्वर्गाचे..."
"पतीराज, तुम्ही निर्लज्ज तर आहातच पण कमालीचे विसराळू आहात म्हणून तुमच्या जेवणाच्या दोन गुंडाळ्या केल्या आहेत. दुपारी खायचे जेवण बॅगच्या बाहेरून ठेवायला सांगितले आहे. 'बाई' हा तुमचा विकपॉईंट आहे हे माहिती असल्यामुळे तुमच्या आवडत्या नटीचे चित्र असणारी आणि दिसणारी बाजू असलेला गुंडाळा रात्री सोडून जेवण करायचे. तुमच्या लक्षात राहावे म्हणून बाई हा परवलीचा शब्द वापरला. समजले?"
"असे आहे तर! पण खरेच काय हरकत आहे ग, एकदाच..."
"अनेक वर्षांपासून एकटेच दरवर्षी चार-चार दिवस भटकत राहता. तिकडे काय दिवे लावता ते मला काय माहिती असणार? जा आता लवकर. पुन्हा रेल्वे गेली निघून तर माझ्या नावाने शंख कराल." हसत हसत बायको म्हणाली आणि मीही तशा विनोदाने प्रसन्नावस्थेत घराबाहेर पडलो...
ऑटोने रेल्वेस्थानकावर पोहोचलो. वेळेवर रेल्वे आली. आरक्षण असल्यामुळे जागा मिळविण्याचा प्रश्नच नव्हता. आरक्षणातही खिडकीजवळची जागा मिळाल्यामुळे प्रवासाचा आनंद द्विगुणित झाला. सोने पे सुहागा किंवा भगवान जब देता है तो छप्पर फाड के देता है, हा अनुभव मला लगेच आला. माझ्या पाठोपाठ डब्यात चढलेली एक अत्यंत सौंदर्यवान षोडशी तिचा क्रमांक शोधत माझ्याच शेजारी विराजमान झाली. गाडीही वेळेवर मार्गस्थ झाली. एक वाजत असताना समोरच्या बाकड्यावर बसलेल्या प्रवाशांनी दशम्या सोडायला सुरुवात केली. शेजारच्या सुंदरीने स्वतःचा डब्बा काढला. माझ्याकडे तिरके डोळे करीत मधाळ आवाजात विचारले,
"काका, जेवण झाले का?"
सौ. ने दोन डबे दिले होते. लक्षात ठेवण्यासाठी प्रत्येक डब्याच्या खाणाखुणाही सांगितल्या होत्या. त्या कायम लक्षात राहाव्यात म्हणून मी ऑटोत बसल्यापासून एकच घोकत होतो ते म्हणजे ... 'रात्रीसाठी बाई...' जणू माझ्यासाठी हे दोन शब्द म्हणजे अलिबाबाची गुहा उघडण्यासाठी असलेले परवलीचे शब्द होते. शेजारच्या रमणीने जेवायची चौकशी केल्यानंतर मी म्हणायला हवे होते की, धन्यवाद! माझे जेवण आहे की सोबत! पण मी तास-दीडतासापासून घोकत असलेले शब्दच उच्चारताना म्हणालो,
"आहे ना. रात्रीसाठी बाई..."
त्या बिचारीचा माझ्या तशा बरळण्यामुळे वेगळाच समज झाला. तिला इतका राग आला म्हणता, तिचे ते नशीले डोळे राग ओकू लागले. नाकाचा शेंडा लालबुंद होऊन फुरफुर करू लागला. ओठ थरथरू लागले. अगदी गोऱ्या गोऱ्या कानाच्या पाळ्याही लालेलाल झाल्या.
"का..य? काय म्हणालात तुम्ही? मी तुम्हाला सज्जन समजत होते पण तुम्ही तर भलतेच..."
"अ.. अहो, तसे काही नाही. तुमचा काही तरी गैरसमज झालाय. मला म्हणायचे होते की, आता दुपारचे जेवण आहेच पण बाई, रात्रीचेही जेवण सोबत आहे. असे म्हणायचे होते. बाई म्हणजे तुम्हाला उद्देशून म्हणत होतो. माफ करा हं..."
"अस्सं आहे का? मला वाटले... " म्हणत ती बाई अशी हसली म्हणता की त्यामुळे तिच्या रसरशीत ओठांमागे असलेले शुभ्र मोती चकाकू लागले... तिचा गैरसमज दूर करण्यात मला यश मिळाले आणि एक फार मोठ्ठे संकट टळल्यामुळे मी समाधानाचा निश्वास सोडला. कसे आहे सांगू का, शहाण्या पुरुषाने सार्वजनिक ठिकाणी बाईशी पंगा घेऊ नये. आपला समाज बाईच्या बाबतीत एवढा संवेदनशील आहे ना की, विचारु नका. पुरुषाची चूक असेल किंवा नसेल याचा कोणताही सोक्षमोक्ष न करता सरळ पुरुषाच्या पाठीचे धिरडे करतात. तिचा गैरसमज दूर झाला ह्याचा मला असा फायदा झाला की, नंतर ती ललना अशी खुलली म्हणता. बाकी काहीही वर्णन न करता मी एवढेच म्हणेन की, माझा तो प्रवास अविस्मरणीय झाला. सुज्ञास जास्त सांगणे न लगे!...
@ नागेश सू. शेवाळकर